विषय क्रमांक २ - कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो....

Submitted by तुमचा अभिषेक on 23 June, 2014 - 13:35

काय ते दिवस होते. मी आणि माझा मित्र ...
नाव नाही घेत, नाहीतर स्साला बदनाम होईल.
इराण्याच्या हॉटेलात बसायचो आणि दोघांत एक कोकाकोला मारायचो. मोठाले काचेचे ग्लास! पाउण भरलेले चांगले नाही वाटायचे, म्हणून त्यात पाणी मिसळायचो. तयार होणारे मिश्रण फिके पडू नये म्हणून त्यात दोन थेंब लिंबू पिळायचो. तो ही अर्थात फुकटातच मागून घ्यायचो. ढेकर यायची थांबली तरी बडीशेप चघळत राहायचो. ना इराण्याचा पोट्टा आम्हाला हाकलायचा ना आम्ही तिथून जायचो. बेशरमसारखे तिथेच पडून राहायचो. शाळेच्या अर्ध्या चड्डीची लाज न बाळगता कॉलेज कट्ट्यावरच्या पोरी बघायचो. जीन्स मधील त्या पोरींनी कितीही वेड लावले तरी शेवटी शाळेतल्या पोरींवरच मरायचो. अंह, तो नाही मी एकटाच. तो केवळ मला सोबतीला म्हणून. स्वताला मुली बघण्यात जराही रस नसून केवळ माझ्याबरोबर म्हणून, माझ्याशी असलेली मैत्री निभवायला म्हणून, मला आवडणार्‍या प्रत्येक पोरीचा पाठलाग करताना तो माझ्याबरोबर असायचा. त्यावेळी माझ्या मैत्रीची व्याख्या त्याच्या या गुणावरूनच सुरू व्हायची.
........ पण साथीला साथ देणे हा एकच गुण नव्हता त्याच्यात. जीवाला जीव देणे या त्याच्या खुबीवर जीव जडला होता माझा.

त्याची आणि माझी पहिली ओळख ...
काही ओळखी नशीबच घेऊन येतात. दहावीचे पहिले वर्ष आणि वर्षाचा पहिला दिवस. माझ्या शालेय जीवनातील आणि शैक्षणिक कारकिर्दीतले ते एकमेव असे वर्ष, जेव्हा मी माझी उन्हाळी सुट्टी वेळेवर आटपती घेऊन पहिल्याच दिवशी शाळेची वाट धरली. त्यामुळे दिवसही विशेष लक्षात राहण्यासारखा असा. भायखळ्यावरून ट्रेन पकडली, बरेपैकी रिकामी. तब्बल दोनेक महिन्यांनी ट्रेनच्या दारात हवा खायला म्हणून उभा होतो. पुढच्याच स्टेशनला एक माझ्यासारखाच किडकिडीत शरीरयष्टीचा मुलगा चढला. पण माझ्यापेक्षा किंचित काटक भासणारा. त्याचे सूर घेत ट्रेन फलाटाला लागायच्या आधीच पकडण्यातील सफाईदारपणा पुरेसा बोलका होता. मात्र या प्रयत्नात त्याचे पॅंटमध्ये अर्धे खोचलेले शर्ट आणखी बाहेर निघाले. एका हाताने चष्मा सावरत, दुसर्‍या हाताने थोडेसे खोचत, त्याने पुन्हा तसेच अर्धे आत ढकलले. हम्म स्टाईल .. मी एक नजर माझ्या कपड्यांवर टाकली. सेम टू सेम .. एक नजर त्याचीही माझ्यावर जाताच आम्हा दोघांच्याही चेहर्‍यावर हसू फुलले. एक ओळखीचे हसू, कारण एकाच शाळेचा गणवेश. अर्ध्या बाह्यांचे शर्ट आणि गुडघ्याच्या चार बोटे वर असणारी अर्धी विजार. जी तो नियम डावलून आम्ही दोघांनीही गुडघ्यापर्यंत शिवली होती. हि देखील तेव्हाची एक स्टाईलच होती. त्या वयात चष्मा लागलेली मुले मला नेहमीच अभ्यासू आणि हुशार वाटायची. पण याच्या दोन भिंगामागे लुकलुकणार्‍या डोळ्यात एक प्रकारची मिष्कीली लपली होती. एखाद्याचा स्वभाव ओळखायचा आहे तर त्याचे डोळे न्याहाळा. ते फार काळ नाही फसवू शकत. मी त्याला पहिल्या नजरेतच पकडला होता.

तो सुद्धा माझ्यासारखाच दारावरच उभा राहिला. माझ्या अगदी मागे. आणि पुन्हा इथेही, आम्ही दोघेही केसांच्या लांबीबाबत असलेला शाळेचा नियम डावलून ते वार्‍यावर उडवत उभे होतो. कोणाशीही पटकन ओळख काढून बोलावे असा माझा स्वभाव नाही, पण त्याचा नेमका उलट असावा..

"किंजॉज का?" त्याने मला विचारलेला पहिलाच प्रश्न. आमच्या शाळेचे नाव ‘राजा शिवाजी विद्यालय’ असे बदललेले असले तरी ती आधीच्या "किंग जॉर्ज" या नावानेच जास्त प्रसिद्ध.

"हो" माझे तुटक उत्तर... ‘आणि तू?’ असे पुढे औपचारीकता म्हणून विचारावे की नाही या विचारांत असतानाच ..

"अर्रे सही, मी पण .." म्हणत त्याने मैत्रीचा हात पुढे केला.

पुढील चिंचपोकळी ते दादर या नऊ मिनिटांच्या प्रवासात त्याने मला त्याच्या पहिली ते नववी पर्यंतच्या नऊ वर्षांचे पराक्रम आणि त्याच्या जुन्या शाळेची महती सांगितली, तसेच माझ्याकडून आमच्या आणि त्याच्या नवीन शाळेची माहिती काढून घेतली. त्या पुढच्या पाच मिनिटांच्या दादर स्टेशनपासून शाळेपर्यंतच्या पायपीटीत, त्याला त्याच्या नवीन शाळेतला पहिला मित्र मिळाला होता आणि मला स्वताला एखादा जुनी ओळख असलेला नवीन सवंगडी गवसल्यासारखा आनंद झाला होता. काही जणांची बडबड पहिल्या शब्दापासूनच आवडायला लागते. तो त्या कॅटेगरीतील होता.

...... अरे हो, शाळेच्या आवारात पोहोचताक्षणी आम्हा दोघांचेही शर्टस पुर्ण आत खोचले गेले होते.

मी दहावी "अ" चा विद्यार्थी तर तो दहावी "फ" चा विद्यार्थी. हा फरक एवढ्यासाठीच की मी पुर्ण संस्कृत घेतले होते तर त्याने पुर्ण हिंदी. ते देखील त्यांच्या जुन्या शाळेत शिक्षकांअभावी संस्कृत शिकवले जायचे नाही म्हणून, अन्यथा अक्कलहुशारीत तो माझ्यापेक्षा काकणभर सरसच होता. यामुळे एकाच वर्षाला असून आमचे वर्ग वेगळे होते, पण हळूहळू उमलत जाणार्‍या आमच्या मैत्रीत त्याने काही फरक पडणार नव्हता. पहिल्याच मधल्या सुट्टीत तो मला शोधत माझ्या वर्गावर आला, आणि तेव्हा पासून वर्षभर डबा खायला तो आमच्यातच असायचा. तो मला ‘अभ्या’ म्हणून हाक मारायचा. जेव्हा शाळेत सारेच एकमेकांना आडनावांवरून हाक मारायचे, तिथे हा पहिलाच जो सर्वांना त्यांच्या नावावरून हाक मारायचा. विचारले तर म्हणायचा, "अभ्या आडनावावरून जात कळते रे, आणि मित्रांमध्ये जात बघायची नसते." युक्तीवाद तर बिनतोड होता. पण तो आपण स्वत: भंडारी असल्याचा उल्लेख ज्या अभिमानाने करायचा त्याच्याशी हे नेमके विसंगत होते. याउपर जाऊन मराठा-भंडारी भाऊ भाऊ म्हणत माझ्याही जातीचा उल्लेख करायचा ते वेगळेच.

वर्ग वेगळे असले तरी शाळेची वेळ एकच असल्याने रोज सकाळ संध्याकाळ आम्ही एकत्रच ये जा करायचो. बरेचदा तो चिंचपोकळीला न उतरता रेल्वेपास पुढपर्यंत असल्याचा फायदा उचलत भायखळापर्यंत यायचा. तिथे बसस्टॉपवर आम्ही माझ्या बसची वाट बघत गप्पा मारत थांबायचो. बस यायच्या, थांबायच्या, आणि मी चढायची वाट बघत वैतागून निघून जायच्या. मी ज्या दिशेहून बस येणार असायची त्या दिशेला पाठ करून बसायचो, तर तो कोणत्या नंबरची बस येतेय याकडे कधी लक्ष नाही द्यायचा. दिवसभराचा गप्पांचा कोठा संपला की मग त्यानंतर जी पहिली बस येईल ती पकडून मी माझ्या घरी, तर तो थोडी जास्तीची पायपीट करत त्याच्या घरी. तेव्हा आम्ही काय आणि कश्यावर बोलायचे हे आता फारसे आठवत नाही, पण त्याला रोजच बोलायचे ईतके विषय कुठून सुचायचे याचे कुतुहल मात्र नेहमी वाटायचे. कधी त्याच्या वर्गावर जाणे व्हायचे तेव्हाही हा भोवताली मुलांचे कोंडाळे करून त्यांना कथाकथी सांगताना आढळायचा. तोंडातून एकही शब्द न काढता त्याने सलग चार श्वास घेतले की त्याची तब्येत तर बरी आहे ना ईतपत शंका यावी असा तो गप्पिष्ट, आमच्या भाषेत सांगायचे तर बोलीबच्चन होता.

..... आणि लोकं म्हणायचे तो बोबडा होता.

हो, बरेचदा ‘प’ म्हणताना त्याचे ओठ पटकन विलग नाही व्हायचे, तर कधी ’त’ आणि ’र’ वर त्याची गाडी अडकायची. मित्रांच्या मस्करीत त्याला हुतूतूतू तूतूतू म्हणून चिडवलेही जायचे. पण तरीही लोक त्याच्या बोलण्याच्याच प्रेमात पडायचे ..
..... मग याला व्यंग तरी कसे म्हणावे !

एके काळी ‘शोले’ मधील जय वीरू ची यारीदोस्ती कित्येक मित्रांना आपलीशी वाटली असावी. आमच्यासाठी ती सौदागर मधील वीरू आणि राजू यांची होती. ‘ईमली का बूटा बेरी का पेड’, जणू आम्हाला आमच्या मैत्रीसाठी एखाद्या गाण्याची गरज होतीच जे या रुपात मिळाले होते. सोबतीला दोन कमालीचे कॅरेक्टर. दिलीपकुमार आणि राजकुमार. त्याला नेहमी दिलीपकुमारपेक्षा राजकुमार बनायला जास्त आवडायचे. बहुधा राजकुमारची नक्कल त्याला सहज जमून जायची हे एक कारण असावे. मला नाचायला जमायचे, तर त्याला गायला आवडायचे. पण खरी मजा होती ती शेवटाला एकत्र मरण्यात. आम्ही शाळेच्या प्रवेशद्वारापासून गळ्यात गळे घालत, झिंगत, ‘चल घर जल्दी, हो गयी देर’ म्हणत दादर स्टेशनपर्यंत जायचो आणि तिथे एका बाकड्यावर अंग झोकून ‘ईस जंगल मे हम दो शेर’ म्हणत मेल्यासारखे ‘ढेर’ होऊन जायचो.

जणू मैत्री म्हणजे एकत्र जगणेच नाही तर एकत्र मरणे हे फिल्मी सूत्र आमच्या डोक्यात पार फिट्ट बसले होते.

दहावी नंतर दोघांनाही विज्ञानशाखेत जायचे असल्याने आमची जोडी पुढेही कायम राहील अशी आशा होती, पण कॉलेज निवडताना मात्र आमचा ताळमेळ चुकला. तेव्हा आजच्यासारखे मोबाईल वगैरे संपर्काची साधने नसल्याने त्याने मधल्या काळात खालसा कॉलेज निवडले, तर ईथे मी पालकांच्या मर्जीनुसार किर्ती कॉलेजचा फॉर्म भरला. पण लवकरच कॉलेजला लेक्चर बुडवणे चालते हा नवीन शोध आम्हाला लागला आणि आम्ही अख्खे दिवस बुडवायला सुरुवात केली. कधी मी एखादी दुपार त्याच्या कॉलेजवर घालवायचो, तर कधी एखाद्या संध्याकाळी तो आमच्या कॉलेजमागील चौपाटीला भेट द्यायचा. दोन मित्रांनी एकाच प्लेटमध्ये खाल्याने मैत्री वाढते असे म्हणतात खरे, पण त्याचे पैसे अर्धे अर्धे दिल्याने ती घटते हा नियम त्याने बनवला. आम्ही खालसाला दोघांत एक चिकन फ्रॅंकी खायचो तर चौपाटीवर दोघांत एक भेल. कोण कधी पैसे देणार हे मात्र कोणाच्या खिशात ते जास्त खुळखुळत आहेत यावरून ठरायचे.

अकरावी अशीच भेटाभेटीत गेल्यानंतर बारावीलाही आमचे मैत्रीखात्यात गुण उधळणे चालूच होते. परीणामी दोघांनीही त्या वर्षाला गटांगळ्या खाल्ल्या. मी वर्षभर अभ्यास केलाच नाही हे घरी प्रामाणिकपणे कबूल करत परीक्षेला बसलोच नाही. तर तो मात्र परीक्षेला जातोय असे खोटेखोटेच सांगून दिवसभर भटकून घरी परत यायचा. मला जेव्हा हे समजले तेव्हा धक्काच बसला. हे असे करणे मला तरी शक्य नव्हते. पण शेवटी तो तोच होता. जेव्हा त्याचे ‘न देण्याचे’ दोन पेपर शिल्लक होते त्या दिवशी त्याला दिवसभर भटकायला सोबत म्हणून आम्ही दादरच्या शिवाजी पार्कात बसलो होतो. तिथेच त्याने भेल खाता खाता एक ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणाला, "अभ्या, आपल्या बारावीची तर लागली रे. पुन्हा देऊनही चांगले मार्क्स नाही आले तर ईंजिनीअरींगच्या दारात कुत्रे पण विचारणार नाही. त्यापेक्षा सरळ दहावीच्या मार्कांवर डिप्लोमाला जाऊया."

आणि त्यानुसारच मग पुढे आम्ही डिप्लोमासाठी म्हणून वीजेटीआय कॉलेजला एकत्र आलो. त्याचे दहावीचे गुण माझ्यापेक्षा जास्त होते, त्याला ईंजिनीअरींगच्या ईतर कुठल्याही शाखेमध्ये सहजपणे प्रवेश मिळाला असता. आणि तरीही त्याने माझ्याबरोबर म्हणून सिविल घेतले. खास करून त्या काळी, जेव्हा दर दुसरा कॉम्प्युटरच्या मागे पळत असायचा आणि त्याची स्वताची पहिली पसंती मॅकेनिकल शाखा होती.

कित्येकांना प्रेम आणि करीअर या मध्ये काय निवडायचे हा निर्णय सहजी घेता येत नाही. त्याने एका क्षणाचाही विचार न करता मैत्रीचा पर्याय निवडला होता.

तीन वर्षांच्या मैत्रीनंतर अखेर आम्ही एक वर्ग, एक बाक शेअर करत होतो. आजूबाजुचे इतर मित्र बदलले होते. बारावीनंतर सारेच पुढे निघून गेले होते. पण त्याला मित्र जमवायचे माहीत होते, मैत्री टिकवायचे माहीत होते. बघता बघता त्याच्याच भोवताली आमचा छानसा ग्रूप बनला. पण त्यातही आमच्या जोडीचे स्थान अबाधित होते.

आता आमचा कॉमन ग्रूप झाला होता. आता मला तो जास्त उलगडू लागला होता. प्रत्येक ग्रूपचा एक लीडर असतो. एक खुशमस्कर्‍या जोकर असतो. एक पोस्टर बॉय असतो. तो आमच्या ग्रूपची जान होता. तो आहे आणि खळखळाट नाही असे कधी व्हायचे नाही. तो असला की टाईमपास होतच राहायचा. तो खूप साध्या साध्या विनोदांवर हसायचा. हसवायचा आणि टाळ्या द्यायचा. तो नकला करायचा, गाणी गायचा, भारी भारी संवाद फेकायचा. तो मनोरंजनाचा अनभिषिक्त सम्राट होता. त्याची विनोद सांगायची सवय ही अशी की कोणी विनोद सांगावा तर तो त्यानेच. विनोद असो वा एखादा गंमतीशीर किस्सा, तो सांगतानाच स्वत: इतके हसत सुटायचा की काही विनोद घडायच्या, कोणाला कळायच्या आधीच, प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसू फुलायचे. आमच्या ग्रूपमध्ये घडलेला एखादा विनोदी किस्सा कोणाला सांगायचे झाल्यास हा कार्यक्रम आम्ही त्याच्याच तोंडून सादर करायचो. कधीतरीच मद्यप्राशन करायचा, पण मग त्यानंतर काही विचारायलाच नको. आधीच नकला बहाद्दर त्यात मद्य प्यालेला. साल्याच्या शिव्याही मग गोड वाटायच्या. अश्यावेळी तो माझा शाळेपासूनचा मित्र असल्याचा मला कोण आनंद व्हायचा. अरे तुझा तो पार्टनर नाही दिसला आज, असे कोणी विचारताना तो आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्ध आहे किंवा त्याच्यामुळे आपण ओळखले जातो याचा कधी कमीपणा नाही वाटायचा. अगदी अभ्यासातही आमची कधी स्पर्धा नसायची. पण एक असे क्षेत्र होते जिथे आम्ही चुरशीने लढायचो.

...... ते म्हणजे कॅरमच्या बोर्डावर. आम्ही दोघेही कॅरम चांगले खेळायचो आणि दोघांनाही आपल्या खेळाचे कौतुक फार. दोघांच्या शैली मात्र अगदी भिन्न. मला सोंगट्या सटासट जायच्या म्हणून मी स्ट्रायकर हातात येताच पटापट कामाला लागायचो. याउलट तो मात्र स्ट्रायकर तीन बोटांच्या चिमटीत पकडून बुद्धीबळ खेळत असल्याच्या थाटात विचारमग्न व्हायचा. ‘एवढा विचार कधी अभ्यासात केला असतास तर युनिवर्सिटी टॉपर आला असतास रे’ हा आमचा त्यावर नेहमीचा संवाद. पण अगदीच युनिवर्सिटी टॉपर नाही तरी किमान कॉलेजमध्ये पहिल्या पाचात यावे इतका हुशार तरी तो नक्कीच होता. मात्र तसे होणे कठीण होते ..

"मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही..!", हा बाणेदारपणा टिळकांच्या कथेतच शोभतो, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नाही. पण हे त्याला समजायचे होते. जिथे टर्मवर्कचे तब्बल तीसेक टक्के गुण प्रोफेसरांच्या हातात असतात तिथे त्यांच्या कलानेच घ्यायचे असते. पण त्याची तत्वे म्हणा वा स्वभाव म्हणा, शिक्षकांशी त्याचे नेहमीच खटके उडायचे. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच ..

सर्व्हेचा त्याचा तो पहिलाच तास होता, हे सर थोडेसे लहरी आणि ती लहर आपल्या विरुद्ध दिशेने फिरली तर फार कडक आहेत याची कल्पना त्याला दिली होती. सरांनी फळ्यावर कसलेसे सूत्र मांडले आणि त्यावर आधारीत एक गणित सरावाला दिले. सारेच जण सोडवायला लागले. कॅलक्युलेटरच्या बटणांचा खटाखट आवाज येऊ लागला. अरे हो, या सरांनी त्यांच्या आधीच्या तासाला "हा विषय शिकवताना मला प्रत्येकाच्या बाकावर कॅलक्युलेटर दिसलाच पाहिजे" असे फर्मान काढले होते, जे याच्या कानावर घालायचे राहिले होते. सर फिरत फिरत याच्या बाकापाशी आले तर याची तोंडी आकडेमोड करत दिलेले गणित सोडवणे चालू होते. सरांनी थोडेसे चिडतच ‘तुझा कॅलक्युलेटर कुठे आहे?’ अशी विचारणा केली. याने शांतपणे ‘बॅगेत आहे’ असे उत्तर दिले. तो बाहेर काढायला सांगताच, ‘त्याची गरज नाही’ असे उलट आणि अपेक्षित प्रत्युत्तर आले. खरे तर आपल्याला अशी साधी आकडेमोड करायला गणकयंत्राची गरज भासत नाही याचा अभिमान आणि सरांनीही या गुणाचे कौतुक करावे अशी अपेक्षा त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. पण अर्थात, होणार होते उलटेच. या उद्धटपणाची शिक्षा म्हणून वर्गाच्या बाहेर पडताना त्याच्या चेहर्‍यावर आपली काहीही चूक नसल्याचा विश्वास होता. आणि हाच विश्वास त्याने पुढच्या चार वर्षात वेळोवेळी कायम ठेवला होता.

शिक्षकांशी कधीच पटवून न घेणार्‍या त्याचे शिक्षकेतर कर्मचार्‍यांशी मात्र छान जमायचे. मग ते प्रयोगशाळेतील मामा असो वा सिक्युरटी गार्ड किंवा वॉचमन. याचे एक कारण म्हणजे त्यांचे सामाईक व्यसन. तो स्वत: तंबाखूची मळी खायचा, आणि त्यांच्याकडे हक्काने चुन्याची डबी मागायला लाजायचा नाही. समोरून कोणी हसलेच तर हा देखील आपले पांढरेशुभ्र दात चमकवायचा. हो, पांढरेशुभ्रच. कारण हे त्याचे सीजनल व्यसन होते. खास करून परीक्षेच्या काळातले. तेव्हा आम्ही स्टडी नाईटसच्या नावाखाली दिवसरात्र कॉलेज आणि हॉस्टेलमध्येच पडीक असायचो. टेंशन वाढले, सोबतीला सिगारेटचा खर्च वाढला, तर मग हा तंबाखूची मळी दाढेखाली कोंबून थंडीच्या रात्रींमध्ये डोक्याला रुमाल बांधून एकटाच अभ्यास करत बसायचा. पण चहाची तल्लफ मात्र दोघांनाही एकाच वेळी यायची. आमच्या आवडीचे पदार्थ नेहमीच कसे जुळायचे हे मला पहिल्यापासूनच पडलेले एक कोडे होते. शाळेतल्या वडापाव, बोरंचिंचे आणि बर्फाच्या गोळ्यापासून, अण्णाच्या वडासांबार वा चौपाटीवर खाल्लेल्या भेळीपर्यंत सारेच पदार्थ आम्ही दोघेही एकाच आवडीने खायचो. आणि मग एके दिवशी आम्ही दोघांनीही एकत्रच सिगारेट ट्राय केली. मला तेव्हा पहिल्याच झुरक्यात जो खोकला आला ते पुन्हा कधी मी ती चैतन्यकांडी हातात धरली नाही. पण तो मात्र महिन्याभरातच धुराची वलये बनवायला शिकला. दारूबाबतही हेच झाले. फरक इतकाच की मी तिच्या निव्वळ वासानेच पहिला घोट घ्यायला नकार दिला, आणि त्याने नाक चिमटीत धरून जवळपास ग्लास घशाखाली रिकामा केला. त्याच्याच भाषेत सांगायचे, तर ईथे एका भंडार्‍याने मराठ्याला मात दिली होती.

याच धमाल मस्तीच्या काळात शाळेतल्या आमच्या सौदागर वेडाने पुन्हा उचल खाल्ली. पण इथे आम्ही दोघेच नसून भलामोठा ग्रूप होता. आम्ही तेव्हा शूटींग-शूटींग खेळायचो. यात प्रसिद्ध चित्रपटांमधील गाजलेल्या द्रुष्यांवर अभिनय करायचो. एकदा दिवार मधल्या अमिताभ बच्चनची भुमिका साकारताना अचानक त्याला साक्षात्कार झाला की आपल्यात एक अ‍ॅक्शन हिरो लपला आहे. त्यानंतर त्यालाच मग आमीर खानच्या गुलाम चित्रपटातील ‘दस दस की दौड’ हा अ‍ॅक्शन सीन करायचे सुचले. ज्यात आमीर खान हा रेल्वेच्या ट्रॅकवर समोरून भरघाव वेगाने येणार्‍या ट्रेनच्या दिशेने धावायला सुरुवात करतो आणि ऐन मोक्याला जेव्हा ती ट्रेन त्याला धडकणार त्याच्या अगदी आधी तिच्या वाटेतून बाजूला सरत ट्रॅकच्या बाहेर उडी मारतो. चित्रपटात त्या ट्रेनची सुटायची वेळ रात्री १०.१० ची होती म्हणून ती दस दसची दौड.

वर्गातल्या दोन बाकांच्या ओळीमधील जागेला रेल्वेट्रॅक बनवण्यात आले तर आमच्यातीलच एक जाडा मुलगा ट्रेनच्या भुमिकेसाठी निवडला गेला. आमचा अ‍ॅंग्री यंग मॅन आमीर खानच्या भुमिकेत शिरला, तर इतरांनी आवडीनुसार सहकलाकारांच्या भुमिका वाटून घेतल्या. चित्रपटातील या मुख्य द्रुष्याआधीचे संवाद नाटकीय पद्धतीने बोलून झाले, आणि समोरून ट्रेन झालेल्या जाड्या मुलाने धावायला सुरुवात केली. इथून हा पुरेश्या वेगात धावू लागला. आता ठरल्याप्रमाणे दोघांची टक्कर व्हायच्या आधी त्याला बाजूला व्हायचे होते. तो ते काय कसे जमवणार हे काहीच ठरले नव्हते, अर्थात तसे ते कधी ठरायचेही नाही. सारेच काही उत्स्फुर्त असायचे. मात्र त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते. ऐनवेळी त्या चिंचोळ्या जागेतून अंग चोरून बाजूला होण्याऐवजी त्याने प्रसंगातील रंजकता वाढवायला भलताच धाडसी पर्याय निवडला. डावीकडच्या बाकांच्या रांगेवर त्याने त्याच वेगात एक शैलीदार झेप घेतली, पण ती काय कशी घ्यायची हे डोक्यात नसल्याने उडीचा अंदाज चुकला आणि गुडघा बाकावर आदळत, पाय एका खाचेत अडकून तो खाली कोसळला. ते थेट त्याच अवस्थेत त्याला टॅक्सीत कोंबून हॉस्पिटलचा रस्ता धरायची पाळी आली होती.

पुढचे जितके दिवस तो लंगडत चालत होता तितके दिवस त्याला ‘दस दस की दौड’ म्हणून चिडवले जायचे. पण प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळेपण जपण्याची त्याची हि वृत्तीच त्याच्याकडून असले अचाट प्रकार घडवायची.

मला नेहमीच पत्त्यांना कात्री मारणारे, दातांनी बीअरच्या बाटलीचे बूच उघडणारे, सिगारेटच्या धूराची वलये बनवणार्‍यांबद्दल एक आदर वाटायचा. छोट्याश्याच गोष्टी, पण ते त्यांच्या संबंधित क्षेत्रात, वा व्यसनात म्हणा, पारंगत असल्याची पावतीच जणू. आणि त्याला हे सारे जमायचे. त्यामुळे त्या किशोरवयीन काळात माझ्या नजरेत तो एक खराखुरा हिरो न बनतो तर नवलच.

मी त्याचा खास मित्र आहे हे मला एक विशेष पद वाटायचे, कारण तो स्वत: जगतमित्र होता. आमच्या वर्गात हुशार मुलांचा, मागच्या बाकावर बसणार्‍या टवाळखोरांचा, मुलांमध्ये फारश्या न मिसळणार्‍या मुलींचा, तर मागच्या वर्षीच्या नापास विद्यार्थ्यांचा असे कित्येक वेगवेगळे कंपू होते. पण त्या प्रत्येकाला तो आपल्यातला वाटायचा. हेच कारण म्हणून आम्ही शेवटच्या वर्षाला त्याचा वाढदिवस एक आठवण म्हणून एकत्र साजरा करायचे ठरवले. त्याला स्वत:ला याबाबत अनभिज्ञ ठेवत सरप्राईज पार्टीचा बेत आखला.

एका मोठाल्या केकची ऑर्डर द्यायला म्हणून मी जेव्हा प्रत्येकाकडून पैसे गोळा करत होतो तेव्हा त्याला एकानेही आढेवेढे घेतले नाहीत. वर्गातल्या मुलींना सुद्धा हा दोनचार व्यसने असणारा आणि गुरुजनांशी पंगे घेणारा मुलगा कसा साधाभोळा वाटू शकतो याचे मला नेहमीच आश्चर्य वाटायचे आणि हेवाही. यानिमित्ताने काही मुलींना सहज विचारले असता त्यांनी उलगडा केला तो असा, की आम्हाला त्याच्या डोळ्यांमध्ये एक निरागसता दिसते. मला पहिल्याच भेटीत ज्यात एक मिष्किली दिसली होती, तेच हे डोळे. प्रत्येकाला आपल्यापलीकडले सोयीने दाखवणारा त्याचा चष्माच फोडून टाकावा असा एक दुष्ट विचारही त्या दिवशी मनात येऊन गेला. पण तो विचार मनातच राहिला. कारण ती पहिलीच वेळ होती जेव्हा त्याच्या डोळ्यात मी पाणी पाहिले. ज्या मुलाने आमच्या ईंजिनीअरींगच्या चार वर्षात आपल्या निव्वळ अस्तित्वाने धम्माल रंग भरले त्याला पोच म्हणून हा आजचा दिवस सर्वांनी साजरा केला होता. पण त्याचे मात्र या शेवटच्या वर्षानंतर या सार्‍याची पुन्हा कशी आणि कधी परतफेड करणार म्हणत डोळे भरून आले होते. तो दिवस मला निरोपाचाच असल्यासारखे भासून दोन थेंब नकळत माझ्याही डोळ्यात तरळले होते.

शाळेतल्या शिस्तीच्या जगातून बाहेर पडून कॉलेजच्या मोकळ्या विश्वात भरारी घेताना आपसूकच पंख फुटतात. काही जण याला कॉलेजचे वारे लागणे असेही म्हणतात. माझ्या स्वतामध्येही काही बदल घडले होते. पण एका शाळकरी मुलापासून कॉलेज युवकापर्यंतच्या या प्रवासात त्याच्या व्यक्तीमत्वात मात्र बरीच प्रगल्भता आली होती. कदाचित याचमुळे हि डिप्लोमाची चार वर्षे सरता सरता तो माझा निव्वळ मित्र राहिला नसून माझा आधार बनला होता. पण मैत्री. ती मात्र तशीच राहीली होती. त्याला त्याने धक्का दिला नव्हता.

दहावीच्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाला सुरू झालेला हा मैत्रीरथ पुढे बारावीची दोन आणि डिप्लोमाची चार अश्या एकूण सात वर्षांच्या सोबतीनंतर थांबला. अंतिम वर्षाचा शेवटचा पेपर दिला आणि त्याने तिथेच थांबायचा निर्णय घेतला. मी पुढच्या शिक्षणासाठी म्हणून वालचंदला दाखल झालो आणि त्याने नोकरीधंद्याला लागायचे ठरवले. त्या संदर्भातच तो बेंगलोरला गेला आणि तिथूनच त्याची शेवटची खबर आली...
ट्रेन अ‍ॅक्सिडंट ..

अविश्वसनीय होता तो क्षण ..
स्वप्नवत आठवणींच्या आयुष्याला दिलेला एक पुर्णविराम !

त्या दिवशी मी किती रडलो मला आठवत नाही. पण खरं म्हणजे कोणीतरी माझ्यासाठी रडावं असे वाटत होते. त्याच्या जाण्याने मी काय गमावले हे मी इथे दोन चार हजार शब्दांत नाही सांगू शकत, ना त्याच्या आयुष्यात येण्याने काय कमावले याचा हिशोब मांडने शक्य आहे. असे म्हणतात, महापुरुष अमर होतात. कारण त्यांचे विचार कधी मरत नाहीत. तो ईतर कोणासाठी नाही तरी माझ्यासाठी, त्याच्या मित्रांसाठी तरी नक्कीच अमर झाला होता. आमच्या विचारांतून तो कधीच जाणार नव्हता. जेव्हा आम्हा मित्रांचा कट्टा रंगतो त्याचा विषय हमखास निघतो. सोबत घालवलेले क्षण आठवतात आणि आम्ही हसतो. हसता हसता डोळ्यांतून पाणी येते. खास मित्राचे कर्तव्य म्हणत इतरांपेक्षा दोन थेंब माझे जास्त ओघळतात. पण त्या आठवणी भिजल्या डोळ्यांचाही पाठलाग सोडत नाहीत.

पण हल्ली नाही रडायला येत. उलट छानच वाटते. त्याच्या आठवणी भूतकाळातल्या चांगल्या दिवसांत घेऊन जातात, उगाळताना मन पुन्हा तरुण होऊन ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. अगदी आताही.... पक्या साल्या वाचतोयस ना, कॉलेज संपल्यावर नोकरीला लागल्यावर पहिल्या पगारात शेट्टीच्या बारमध्ये बसून दोघात एक खंबा मारायचा होता. पण तुला साधा एक ट्रेनचा खांबा चुकवता आला नाही. पहिली बीअर कडवट लागते असे सारेच बोलतात रे, मला तुझ्या आठवणीत खारट लागली होती...

- तुझाच अभ्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयस रे.. आवडलं. अशी मैत्री म्हणजे आयुष्यभर जपावी अशी मखमली पेटीच असते.
बाकी 'जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला' ही उक्ती तुझ्या मित्राच्याबाबतीही खरी झाली.. दुर्दैव!

छान ओघव्ति लेखन.पक्या,लोकल प्रवास, शाला,कॉलेजविश्व सर्व डोळ्यासमोर उभे
राहिल.शेवट चटका लाउन गेला.

खुप रीलेट होता आलं, प्रत्येकाचा असा एक तरी मित्र असतोच...
जो सदसर्वदा आपल्या सोबत असतो किमान आठवण म्हणून तरी... Happy

संयोजक,

शिर्षक (५ शब्द) आणि लेखाखालील स्वाक्षरी (२ शब्द) पकडून टोटल ३००२ शब्द होत आहेत.
जर वरीलपैकी एखादी बाब वगळली तर लेख शब्दमर्यादेत बसतोय.
(जर निव्वळ स्वाक्षरी वगळली तर पर्फेक्ट ३ के Wink )
पण जर हे नियमांत बसत नसेल तर कृपया तसे कळवून वाढीव दोन शब्द कमी करण्याची परवानगी द्यावी.

अप्रतिम लेख… शेवट वाचून खूप वाईट वाटलं… आणि हो असा मित्र / मैत्रिण लाईफ पार्टनर म्हणून मिळायचे सुख काही वेगळेच… मी ही अनुभवतेय Happy

अभिषेक....

स्पर्धेतील विजयी क्रमांकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....या निमित्ताने मित्राची आठवण पुन्हा येईलच तुम्हाला पण हे पारितोषिकदेखील मित्राच्या प्रेमाचे प्रतीकच आहे असेच तुम्ही समजाल.

लेखातील "...स्वप्नवत आठवणींच्या आयुष्याला दिलेला एक पुर्णविराम..." ~ हे वाक्य फार हळवे करणारे वाटले होते.

असो...या निमित्ताने तुमच्या लेखणीला आणखीन बहर येवो ही सदिच्छा.

अभिनंदन.
या निमित्ताने मित्राची आठवण पुन्हा येईलच तुम्हाला पण हे पारितोषिकदेखील मित्राच्या प्रेमाचे प्रतीकच आहे असेच तुम्ही समजाल. == +१

धन्यवाद सर्वांचे Happy

आज मी सुद्धा हा लेख पुन्हा वाचून काढला. निवडणूकीच्या धामधूमीनंतर तेवढेच हलके वाटले. नाहीतर गेले पंधरा-वीस दिवस मित्रांशीच वाद चालू होते Happy

स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन .
सुरुवातीला वाचताना' शाळा' कादंबरी आठ्वली.तशीही प्रत्येकाच्या आयुश्यात स्वताची 'शाळा' कादंबरी असतेच .लेख खुप आवडला..पण शेवट मनाला चटका लाउन गेला.

मी मिसला होता हा लेख..
खुप सुंदर लिहलायस अभिषेक.
२रा क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन..

Pages