चालबाज

Submitted by कवठीचाफा on 14 June, 2014 - 15:19

"डोन्ट वरी, आता मी काम हातात घेतलंय, म्हणजे तुम्ही फक्त सेलिब्रेट करायचं." मी पूर्ण आत्मविश्वासाने म्हणालो.
"तूच एक शेवटची आशा आहेस.. आता मी करण्यासारखं काहीच उरलं नाहीये." प्रख्यात बिझनेसमन म्हणून ओळख असलेला एजाज अली माझ्या विनवण्या करत होता. जग जरी त्याला बिझनेसमन वगैरे म्हणून ओळखत असलं, तरी त्याच्या यशामागचं खरं कारण मला चांगलंच माहीत होतं. साला, स्मगलर होता. ड्रग्ज ते व्ह्युमन ट्रॅफिकिंगपर्यंत सगळ्या धंद्यांमध्ये होता तो. गेल्याच आठवड्यात उतरलेल्या आर.डी.एक्स.च्या साठ्याशीसुद्धा याचे लागेबांधे असल्याची, इव्हन यानेच ते कुठेतरी दडवल्याची खबर अंडरवर्ल्डमध्ये होती.. आज एकदमच भिजलं कोकरू झाला होता. त्याच कारणही फार विचित्र होतं.
सकाळी त्याच्या ऑफिसमध्ये येऊन कुणीतरी दम देऊन गेलं - चोवीस तासांच्या आत जर त्याने त्याच्या सगळ्या काळ्या धंद्यांच्या पुराव्यासहित स्वतःला सरकारच्या स्वाधीन केलं नाही, तर तो त्याला भर ऑफिसमध्ये येऊन उडवणार होता.
उडवणार होता म्हणजे शब्दशः उडवणारच होता. बाँब होता त्याच्याकडे. इतर कुठली वेळ असती तर मी हसण्यावर नेलं असतं. साला सध्या इतकी देशभक्ती कुणाच्यात दाटून आलीये? पण ज्या अर्थी एजाज इतका टरकला होता, त्या अर्थी नक्कीच काहीतरी तथ्य होतं. नाहीतर त्याची इतकी जबरदस्त मॅनपॉवर सोडून तो पैसे खर्च करायला माझ्याकडेच का आला असता?
"साला इथे, समोरच्या खुर्चीत बसून दम देऊन गेला मला. आणि मी काहीच करू शकलो नाही." एजाजच्या आवाजाने ती साउंडप्रूफ रूम दणकली.
"अरे, पण इतक्या सिक्युरिटीमधून तो बाँब घेऊन आत आलाच कसा?" मनातला प्रश्न विचारूनच टाकला मी.
"ते माझ्याही लक्षात आलेलं नाही. सी.सी.टी.व्ही.फूटेजमध्ये आणि सिक्युरिटी चेकिंगमधे काहीच संशयास्पद दिसत नाही, तरीही तो असा समोर ग्रेनेड घेऊन बसलेला." थंडगार एसीतही कपाळावर आलेला घाम पुसत एजाज म्हणाला. हाच माणूस इथेच बसून निर्विकार चेहर्याणने खून पाडायच्या ऑर्डर्स देत असेल. गंमत वाटली त्याला घाबरलेला बघून.
"अच्छा, म्हणजे तो ग्रेनेड घेऊन आलेला? मग बरोबर आहे."
"काय बरोबर आहे? अरे, तुझ्या खिशातलं आर्मी किट जर माझ्या माणसांना सापडतं, तर आख्खा ग्रेनेड सापडू नये? इंपॉसिबल!" सिक्युरिटीबाबतीत एजाजचं बरंच लक्ष होतं तर...
"बरोबर आहे. पण आर्मी किट माझ्यासोबत होतं, हे विसरतोयस तू."
"व्हॉट डू यू मीन? ग्रेनेड कसाही आणला तरी सोबतच आणेल ना तो?" एजाज जरी त्याच्या धंद्यातला किंग असला, तरी चौकट मोडून विचार करणं त्याच्या स्वभावात नव्हतं.
"मी सांगतो, बाँब आधी आला आणि मग तो आला."
"तू फिक्शन स्टोरी सांगतो काय मला? " एजाजचा अविश्वास.
"फिक्शन वगैरे काही नाही, सरळ साधी ट्रिक आहे ती."
"काय ट्रिक करेल तो? तेही कॅमेरे चुकवून?"
"तुझ्या बिल्डिंगच्या कुंपणावर कॅमेरे आहेत, सिक्युरिटी चेक्सच्या इथे आहेत आणि तुझा त्याच्यावर नको इतका विश्वास आहे."
"तुला नक्की काय सांगायचंय ते थोडक्यात सांग."
"सोप्पय रे, कॅमेर्‍यांना एकशेऐंशीच्या कोनात वळून पाहायला तीस सेकंद लागतात. दचकून पाहू नको. येतानाच नोट केलंय मी हे. या तीस सेकंदात कुणीही कुंपणाबाहेरून ग्रेनेड आत फेकू शकेल की."
"काय मारतो काय? ग्रेनेड फुटणार नाही का?"
"तुला ग्रेनेडची काय कल्पना असणार म्हणा... ग्रेनेडची पिन जोवर काढत नाही, तोवर ग्रेनेड म्हणजे शुद्ध दगड. कधी घडलाच तर तो अपघात. पण एरव्ही पिन काढल्याशिवाय ग्रेनेड फुटत नाही. त्याने आधी ग्रेनेड आत फेकला, मे बी त्यासाठी जागा आधीच हेरली असेल त्याने, आणि मग आत येऊन कलेक्ट केला. सो सिंपल!"
"आजच्या आज तिकडे गार्ड उभे करायला सांगतो." फोन उचलत एजाज म्हणाला.
"वेट. पण मला एक सांग, ग्रेनेड फुटला असता, तरी तुझं फारसं काही नुकसान झालं नसतं. या साउंडप्रूफ केबिनच्या आतलं तुझं चेंबरही तसंच साउंडप्रूफ आहे, हे माहिताय मला."
"पण इथे सातव्या मजल्यावर स्फोट झाला असता, तर पोलीस, न्यूज सगळ्यांनी इथे गर्दी केली असती, आणि मला शांत राहून बिझनेस करायचाय." न पटण्यासारखंच उत्तर होतं हे.
"तरी एक शंका राहतेच. तो इथून जाताना तू त्याचं काहीही बिघडवू शकत नव्हतास, असं तरी मला सांगू नको आता."
"येस, तो इथून बाहेर पडल्या पडल्या मी गार्डसना सावध केलं, पण तो कुठेच सापडला नाही. इन फॅक्ट, मला शंका आहे की तो अजून कुठेतरी बिल्डिंगमध्येच लपलाय." हे एजाजच्या भीतीचं खरं कारण होतं तर...
"ओ के, आता मी निघतो. तो तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही, याची आपण काळजी घेऊ." असं म्हणून मी समोरची नोटांची बंडलं घेऊन उठलो.
पार्किंग लॉटमधल्या कारकडे जाताना मला माझ्या नशिबाची गंमत वाटली. कोणे एके काळी चार- पाच हजारांसाठी खून पाडलेला मी, आज करोडोंचा धनी होतो, तेही अगदी थोडक्या वेळात.
"साला, आयुष्यात कधी काय घडेल हे खरंच सांगता येत नाही." कारचे दरवाजे अनलॉक करताना मी स्वतः:शीच म्हणालो.
एक सफाईदार टर्न घेऊन मी गाडी बाहेर काढली. मोजून अकरा तास उरलेले. इतक्याशा वेळात मला माझं काम संपवायलाच हवं होतं. घरी जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाकत मी गाडीला यू टर्न दिला, आणि आरशात पाहिलं. एकही गाडी माझ्या मागोमाग वळली नाही. समाधानाने हसलो मी. चला, किमान इतकी तरी अक्कल आहे या एजाज अलीला. वेळ वाया न घालवता मी गाडीला वेग दिला आणि तिकडे निघालो, त्या ठिकाणी जिथे या सगळ्याची सुरुवात झाली. एकेकाळचा वॉन्टेड म्हणून तोंड लपवत फिरणार्‍या या लखनचा `लकी' बनायला. मला आजही तो दिवस आठवत होता...
धावून धावून श्वास फुललेला, काळजाचे ठोके तर इतके वाढलेले की त्यांचा आवाजही रेल्वेच्या आवाजासारखा कर्कश वाटत होता. पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, दूरपर्यंत कुठेही हालचाल दिसत नव्हती. किंचित वेग कमी केला. बहुतेक पाठलाग सोडवण्यात यश आलं होतं. दूरवर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. आयची, मी त्यांना कसा विसरलो? कुठेही गेलो तरी माझा वास काढत हे तिथवर येणार, हे नक्की. एक चूक - मला अशी रानोमाळ पळायला भाग पाडत होती, एकच चूक. साला, मागच्या दरवाज्यावरचा मामू मला आधी दिसलाच नव्हता. सुरा म्हातार्‍याच्या आरपार करेपर्यंत मला त्याचा पत्ता नव्हता. पण नेमक्या क्षणी त्याने मला पाहिलं आणि ही परिस्थिती झाली. सगळं शहर लपायला कमी पडायला लागलेलं.
खुनी होतो मी.. आणि तोही एका नगरसेवकाचा. अरेस्ट वगैरेच्या भानगडीत न पडता थेट एन्काऊंटरच्या ऑर्डर्स असणार त्यांना. जागोजाग धाडी पडल्या, त्यातून कसाबसा जीव वाचवून मी थेट इकडे, जंगलात पळालो. पण पाठलाग अजूनही संपायला तयार नव्हता. परिस्थिती बिकट होती. समोर दिसेल तो धोका पत्करत मी पळतच होतो. जिवाची आशाच सोडली म्हटल्यावर त्या अंधार्‍या गुहेत शिरतानाही मनाला किंचितही भीती वाटली नाही. आत एखादं श्वापद असेल, एखादा विषारी जिवाणू वगैरे... छे! पार त्या गुहेचा शेवट येईस्तोवर धावत राहिलो. समोरच्या भिंतीवर धडकल्यावर दुसरी चूक केल्याची जाणीव झाली. आता मी कोंडला गेलो होतो. दरवाज्यातून फक्त ते कुत्रे आत सोडायचे, बस्स. फरफटतंच नेला असतं त्यांनी मला.
पण पार कड्यावरून पडणारा माणूसही, उपयोग नाही हे माहीत असूनही - खाली पोहोचेपर्यंत हातपाय हलवत असतो, तसं मी चाचपडायला सुरुवात केली आणि धप्प..
कुठेतरी आतच पाण्याचं ते कुंड होतं. पार नाकातोंडात पाणी जाईपर्यंत बुडालो. शक्य तितका जोर लावून पाण्याबाहेर यायचा प्रयत्न केला, पण डोकं दगडाला धडकलं. म्हणजे आता शेवट इथे होता तर! प्रयत्न करत राहिलो. पुन्हा, पुन्हा.. आणि शेवटी डोकं पाण्यावर निघालं. चाचपडतच हाताला लागतील त्या दगडांचा आधार घेत मी वर आलो.
मघाशी पार अंधारलेली गुहा आता तशी दिसत नव्हती. भिंती निळसर रंगात चकाकत होत्या, त्यावर चंदेरी रंगाचे चमकते कणही दिसत होते.एखाद्या स्वच्छ संध्याकाळी, समुद्रकिनार्‍यावरून आकाश पाहावं तसं काहीतरी. पण त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. डावीकडे, उजवीकडे कुठेही वळून पाहिलं तरी तोच प्रकार. काहीतरी निसरडं असल्यासारखी नजर एका जागी स्थिर होत नव्हती. चक्कर आल्यासारखी वाटत होती. हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी बाहेर जायचा रस्ता शोधायला सुरुवात केली. इथे फार धोका वाटत होता. पायाखालची जमीन फसवी वाटत होती. पुढचं पाऊल थेट कुठल्यातरी पोकळीत पडेल असं वाटतानाच ते जमिनीवर टेकत होतं. छे, मी शिरलो ती गुहा अशी नव्हतीच. ही काहीतरी वेगळी जागा होती आणि बहुधा धोकादायक.
ज्या डोहातून आलो होतो, त्याच डोहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण या फसव्या जमिनीवर ते सोपं नव्हतं. दिशांची सरमिसळ होत होती. नेमकं कुठे जायचं ते कळत नव्हतं. काही मिनिटांपूर्वी जिवाची आशा सोडून मी त्या गुहेत शिरलो होतो. हो, `त्या'चं कारणही `ती' नव्हती, पण आता जिवाच्या आकांताने परत बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो.
एकदाचा हाताला पाण्याचा स्पर्श झाला आणि जीव भांड्यात पडला. पुन्हा एकदा बुडी मारून, प्रयत्नपूर्वक आत्ताची बाजू पाठीमागे ठेवत पोहायला सुरुवात केली. नक्की आता मी पूर्वीच्या गुहेत बाहेर पडणार होतो.
पाण्यावर शेवटचा जोरदार प्रहार करत मी मोकळ्या हवेत बाहेर पडलो आणि जोरदार श्वास घेतला. वरच्या पांढर्‍यास्वच्छ आकाशाकडे एकच नजर टाकली. `आकाश'? मी गुहेतून बाहेर पडायला हवा होतो... हे आकाश कसं डोक्यावर?
भणभणते विचार बाजूला सारत मी आजूबाजूचं निरीक्षण केलं. विहीर असावी ही. वर चढून जायला बाहेर काढून ठेवलेल्या दगडांच्या मोकळ्या पायर्‍याही दिसत होत्या. कुठे का असेना, एकदाचा बाहेर तर आलो! सुटकेचा श्वास सोडून मी कसाबसा वर आलो. समोरचं जंगल तेच, फक्त आता मी जरा उतारावर आणि उजवीकडे होतो, म्हणजे बहुतेक पाठलागही टळला. धडपडत जंगलाच्या बाहेरचा रस्ता शोधायला सुरुवात केली.
"आज तारीख किती?" समोरच्या माणसाला मी बावळट प्रश्न विचारला.
"सात" आणि तो परत डुलक्या खायला लागला.
संध्याकाळपासून हा प्रश्न मी कित्येकांना विचारला असेल. खरं तर ‘आला दिवस गेला’ या टाईपच्या माझ्यासारख्या माणसाला हा प्रश्न विचारायची गरजच नव्हती. पण तिन्हीसांजा होत असतानाच जंगलातून रस्त्यावर म्हणजे पार शहराबाहेरच्या मैदानाजवळ असताना, अंधारातून अचानक आकाशात आतषबाजी सुरू झाली. अशीच कालही सुरू होती. कुण्या राजकीय पुढार्‍याचा वाढदिवस होता. मला माहीत असायचं कारण म्हणजे आजची सुपारी मी इथेच घेतली. तेव्हा घोटाळणारे विचार आत्ताही डोक्यात येत होते - काय साले खर्च करतात! इथे कितीतरी लोक तर जन्माला आले होते, हेच कुणाच्या खिजगणतीत नसतं आणि यांचे वाढदिवस म्हणजे सण. पण लगेच आज कुठला कार्यक्रम काढला असेल इथे?
"काय बे? काय विचार आहे? पाकीटबिकीट मारायचंय का कुणाचं?" आवाजावरूनच हा कुणीतरी मामूच होता. काळजाच चर्रर्र झालं. संपलं आता. मनातले पळून जाण्याचे विचार दाबत मी सावकाश मागे पाहिलं, हवालदार चक्क हसत होता.
"हे बघ, आज आबांचा वाढदिवस आहे. इथे काय गडबड करायला गेलास तर सुजेस्तोवर मार खाशील." त्याने समजावलं.
"आबांचा वाढदिवस काल होता, आज कसा परत?"
"काय बंटा लावून आला काय रे? आजच आहे आजची सात तारीख."
च्यायला, हा काय घोळ होता? मला चांगलंच माहीत होतं. काल इथे वाढदिवस साजरा केला गेलेला. मला पक्कं लक्षात असायचं कारण म्हणजे आजची सुपारी मी इथेच घेतली, तीही काल. अचानक दुसरी एक गोष्ट लक्षात आली - सकाळपासून माझ्या जिवावर उठलेलं पोलीस डिपार्टमेंट असं अचानक माझ्याकडे दुर्लक्ष का करत होतं? मी आणखी चार-पाच जणांना तारीख विचारली.
आज सात, म्हणजे उद्या आठ! उद्याच मी त्या खुनाच्या लफड्यात अडकणार होतो. पण मी असा एक दिवस मागे कसा आलो?
दिवसभराच्या घटना डोळ्यासमोरून तरळून गेल्या. त्या गुहेत काहीतरी घोटाळा होता. काहीतरी असा प्रवास झाला होता की मी एक दिवस भूतकाळात आलो होतो. एक सुवर्णसंधी.. मी ती सुपारी घ्यायचीच नाही. पर्यायाने एक दिवस काळाच्या मागे जगत राहावं लागलं तरी चालेल. मी तसंच केलं.
त्यानंतर अनेकदा मी त्या गुहेच्या चकरा मारल्या. कित्येकदा इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असा प्रवास करून पाहिला जास्त सावधानतेने आणि एक लक्षात आलं. त्या दुसर्‍या चमकत्या गुहेतून दोन वाटा होत्या,एक परत येत होती आणि दुसरी त्या विहिरीकडे जात होती. दुसर्‍या वाटेने प्रवास केल्यावर मी काळात एक दिवस मागे जात होतो, आणि तोच प्रवास उलटा केला की मूळ काळात परत..
काय असेल ते? काळातला एखादा गुप्त बुडबुडा? की एक वेगळाच अंतराळ?
जे काही होतं, त्यावर बराच अभ्यास केल्यावर त्याचा संभाव्य फायदा माझ्या लक्षात आला. लहानसहान लोटो मी एक दिवस आधी नंबर काढून जिंकायला सुरुवात केली. फार सोपं होतं सगळं. आजचे निकाल बघायचे आणि एक दिवस आधीच्या काळात जाऊन नंबर काढून यायचं, दुसर्‍या दिवशी पैसे घ्यायला हजर.
दिवस मजेत चाललेले. पण हातात इतकी मोठी संधी असताना लहानसहान यशांवर माझं समाधान होईनासं झालं. सध्या तर लोटोवालेही माझ्याकडं संशयानं पाहायचे. शेवटी बराच विचार करून मी एक नवा उद्योग शोधला. भरपूर पैसा, आणि धोका जवळपास नाहीच. मी खर्‍या अर्थाने सुपारीकिंग झालो.
समजा, तुम्हाला आज अचानक कुणामुळे नुकसान होतंय? नो प्रॉब्लेम! मी एक दिवस आधी जाऊन काम तमाम करून देणार. परत भूतकाळ बदलल्याने भविष्यकाळात किंचितसा फरक पडतो, म्हणजे तुम्हाला काही नुकसानच होत नसेल, तर तुम्ही मला बोलावणारच नाही. म्हणजे आज मी सेफ. बरं, आणखी काही चुकलंच तर परत एक दिवस मागे जाऊन चूक सुधारायची संधी आहेच. म्हणजे भूतकाळातून परत एक दिवस भूतकाळात.
दिवस संपेपर्यंत मी सगळ्यात जास्त वेळा म्हणजे एक आठवडा भूतकाळात जाऊन आलोय. म्हणजे फक्त खात्री करून घ्यायला. हे असं अडनिडं काम करायचं, म्हणून मी पैसाही घसघशीत घ्यायचो आणि सगळा अ‍ॅडव्हान्स. हो, काम झाल्यावर तुम्ही उभंही करणार नाही मला. अर्थात, तुम्ही मला दिलेला पैसा कुठे गेला हे मात्र शोधत बसाल.
खुणेचं झाड मागे पडल्यावर पुढच्याच माईलस्टोनजवळून मी गाडी जंगलात घातली. इतक्या खेपा घातल्या होत्या मी इकडे, की आता गाडी लपवायची जागा, आतला डायव्हिंगचा पोषाख सगळं अंगवळणी पडलेलं. गाडीची चावी ठरलेल्या झाडाखाली ठेवून मी निघालो. इतक्या विचारात गर्क असतानाही झाडीतून पुसट दिसणार्‍या रस्त्यावरून नुकतीच वेग पकडणारी गाडी नजरेतून सुटली नाही. जोरदार दचकलो, शरीराचा दगड झाल्यासारखं वाटलं, इतकी सावधगिरी बाळगुनही कुणीतरी गाठलं की काय ? पण नाही, आपल्याच धुंदीत असल्यासारखी गाडी नजरेआडही झाली, कुणीतरी निसर्गाच्या जोरदार हाकेला आपल्यापरीनं प्रतिउत्तर द्यायला थांबलं असेल, त्यासाठी नक्कीच इथे भरपुर एकांत होता..
च्यायला, आपल्या मनात काहीबाही असलं की जाम घाबरायला होतं बाबा, तसंही माझ्या गुपिताची कुणाला शंकाही येणं शक्य नव्हती, उगीच काळजी.
मी माझ्या कामाला लागलो..
परत गाडीकडे येताना अंधार दाटून आला होता. काळजीचं काहीच कारण नव्हतं. माझं काम उद्या सकाळी होतं, आज नव्हे..
रात्र घराबाहेरच काढली. उगीच रिस्क नको. घरी मीच असलो तर? तसा काही धोका नव्हता. माझे धंदे माझ्या मेंदूत पक्के कोरलेले होते. एकमेकांसमोर आलो असतो तरी काही बिघडलं नसतं, पण मी हे कायम टाळलं.
सकाळ व्हायच्या आत चेकआऊट करून मी एजाजच्या हेडऑफिसची बिल्डिंग गाठली. आत गेलो नाही, कारण आज त्याने मला उभंही केलं नसतं. शांतपणे निरीक्षण करून मी ऑफिसला समांतर असलेली बाजूची बिल्डिंग निवडली. बंदच होती. फारसा त्रास नव्हता म्हणायचा. सगळ्यात वरच्या मजल्यावर पोहोचून मी सोबतची केस उघडली. टेलिस्कोपिक गन असेंबल करताना समोर एजाजने सी.सी.टी.व्ही.मधून मिळवलेला त्या व्यक्तीचा फोटो बाहेर काढून ठेवला. गन असेंबल्ड होईस्तोवर तो चेहरा माझ्या डोक्यात पक्का ठसला. आज तो करणार असलेल्या उठाठेवीवर मात करण्यासाठी मी एक दिवस भविष्यातून त्याच्याकडे आलो होतो.
शेवटचं एकदा टेलिस्कोपमधून पाहून अ‍ॅड्जस्टमेंट योग्य असल्याची खात्री करून घेतली. आता फक्त वाट पाहायची होती..
`तो' आला, टेलिस्कोपमधून पाहताना दूरवरूनच स्पष्ट दिसला तो. थोडा अवघडलेला, चालताना किंचित पोक काढून चालत मध्येच आजूबाजूला भिरभिरती नजर टाकत येत होता तो. धमकी वगैरे देण्याची धमक त्याच्यात असेल असं एकूणच पहिल्या नजरेततरी वाटत नव्हतं. पण कधीकधी व्यक्ती दिसते त्यापेक्षा फारच वेगळी असू शकते. त्याला उडवण्याचं हे माझं काम होतं. पैसे त्याचेच घेतले होते. बाकी कशाशी काही घेणं-देणं नव्हतं. तो रेंजमध्ये यायची वाट पाहत राहिलो.
आला, रायफलच्या रेंजमध्ये आला. सायलेन्सर लावलेला असल्याने मी जास्त लांबवरून नेम साधायचा प्रयत्न करत नव्हतो. वेळही भरपूर होता आणि सावज समोर. माझ्या अंदाजाप्रमाणे त्याने आधी सगळ्या बिल्डिंगची फेरी मारायला हवी होती. त्याशिवाय तो ग्रेनेड आत कसा टाकणार? पण इथे त्याचं तसं काहीच लक्षणं दिसत नव्हतं. समोरच्या तिठ्यावर घोटाळून त्याने सरळ एजाजच्या `अलीज'कडे पावलं उचलायला सुरुवात केली. खिशात काहीतरी चाचपडत तो पुढे सरकला. आता मात्र वेळ कमी होता.तसाही तो `अलीज'कडे म्हणजे पर्यायाने माझ्याकडे तोंड करूनच चालत असल्याने नेम धरणं हा पोरखेळ होता. माझ्या हाताचे स्नायू कडक झाले आणि मी त्याच्या छातीचा नेम धरला.
सेकंदभर झटका बसल्यासारखं शरीर हललं त्याचं. गोळीचा इंपॅक्टही तितकाच असणार. सावकाशीने त्याच्या छातीवर एक रक्तफूल उमलून मोठं व्हायला लागलं. चुकलंच काहीतरी.. कदाचित त्याच्या शेजारच्या माणसाचा त्याला ऐनवेळी किंचीतसा धक्का लागला असावा, गोळी थेट हृदयात शिरून त्याने दगडासारखं कोसळायला हवं होतं, पण नेम एखाद सेंटीमिटरनं चुकला. त्यानं त्याचा उजवा हात काही क्षण छातीवर दाबला. नक्की काय प्रकार घडला असावा याचा अंदाज लावत असेल कदाचित. खरं म्हणजे माझं काम झालेलं त्याच्या जगण्याची काहीच आशा नव्हती. रस्त्यावरचे लोक तिथे जमा व्हायला लागलेले. मी निघून जायला हवं होतं; पण मला काहीतरी गडबड असल्याची जाणीव व्हायला लागली, म्हणून मी तिकडे लक्ष ठेवून होतो. खाली पडता पडता त्याने आपल्या पँटच्या उजव्या खिशात हात घातला, काहीतरी काढायचा प्रयत्न चालला होता. कमी होत जाणार्‍या श्वासांशी झगडत त्याने खिशातला हात बाहेर काढला...
आयची रे एजाजच्या, त्याने मला चुकीची माहिती दिली होती. समोरचा माणूस ग्रेनेड घेऊन आलाच नव्हता. बरोबर आहे, तो सिक्युरिटी चेक्समधून सुटला यात काही नवल नव्हतं. त्याने खिशातून बाहेर काढलेल्या हातात कार की दिसत होती, पण ते नक्की काय आहे हे मला क्षणात कळलं.
“एजाज, हरामखोर.. ती आर.डी.एक्स.ची बातमी खरी होती तर!” शिरा ताणून ओरडलो मी, पण कानठळ्या बसवणार्‍या स्फोटाच्या आवाजात ते दबलं गेलं. `त्या'ने रिमोटचं बटन दाबलंच शेवटी.
फार मोठी चूक झाली होती. अशी चूक, जी मी पुन्हा सुधारू शकत नव्हतो... कधीच नाही.
काळोखाच्या दरीत कोसळताना हेच माझे शेवटचे विचार...

शेवटचे ??? अं..हं, मेंदूला हिसडा देणारी आणखी एक गोष्ट जाणवत होती, त्या शेवटच्या काही क्षणात कोपर्‍यावर उभा असलेला एजाज माझ्याकडे पाहून मनापासून हसत होता..
डोक्यात विज कडाडली, काल जंगलात दिसलेली गाडी.. डॅम, एजाज चकवलंस मला..
.
.
समोर उठलेल्या आगीच्या लोळात आपलाच लाखोचा माल नष्ट होताना पाहून एजाज समाधानानं हसला, नाहीतरी डिपार्टमेंटला संशय आलेलाच, जाऊ दे माल गेला तर,पण त्या बदल्यात त्यानं फारच मोठी कमाई केलेली.
फार दिवसापासून त्याला शंका होती, अनेकदा पाठलाग करून त्यानं फेडून घेतली. पुढचं सगळं सोपं होतं, एक डमी शिकार.. आणि थोडीशी कल्पनाशक्ती..
एजाज स्वःतच एकेकाळचा शुटर होता लपून गोळी घालायला कोणती जागा योग्य ठरेल याचा अंदाज बांधणं त्याला जड नव्हतं.. त्याचे सगळेच अंदाज आज बरोबर निघालेले,
मनापासून हसत तो परत निघाला,
त्याच जंगलाकडे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mala nahi kalali. shevati nakki kaay zala yaat maza ghol hotoy. RDX cha satha Aizaz kade asato to ha manus kasa kaay uDavato? nusata RDX cha satha remote mule kasa udel? to udavanyat tya manasacha hetu kaay?

शेवट बदललेला दिसतोय कालचा Happy
दोनदा वाचायला लागली. झिणझिण्या आणणारी कथा. >>>> +१

प्रामाणीकपणे सांगायच तर काल खरच शेवटी काय झालं याचा अंदाज बांधता येत नव्हता. आजचा शेवट त्यामानाने सोपा आहे Wink

ट्विस्ट खतरनाके!!!!!!!!!!!

माबोवर अच्छे दिन आले म्हणु का?
कौतुक ने लिहिलय, तु ही लिहिलीस. Happy

आबासाहेब.,

आगोदरचा शेवट किंचित अगम्य होता. आता मात्र विस्कटून सांगितलाय. पण एजाजला तो मार्ग कसा सापडणार ते कळलं नाही.

आ.न.,
-गा.पै.

superb

बदललेला शेवट वाचला.
"काल जंगलात दिसलेली गाडी" हे फक्त शेवटी सांगितलंय.
पण तसा उल्लेख कथेत आधी कुठेही आलेला नाही. मला वाटतं, तसा उल्लेख कथेत आधी करायला हवा.

एवढं सोडलं तर नेहमीप्रमाणेच तुमची ही कथासुद्धा अर्थातच आवडली. Happy

...तुमच्या कथांचा एक फ्यान

Pages