धागा

Submitted by संतोष वाटपाडे on 12 June, 2014 - 21:50

आकाशाचे खाली येणे झुकणे नसते,
साठवलेल्या ओलाव्याला मुकणे असते..

नकोस हासू पानगळीतील झाडांना तू,
ते तर त्यांचे दोन क्षणांचे सुकणे असते...

जेव्हा म्हणते तू मजला कि नकोस जाऊ,
तुझ्या मनातील पालीचे चुकचुकणे असते...

पहिला पाऊस पडताना आडोसा बघणे,
भिजर्‍या ओल्या आनंदाला हुकणे असते...

स्विकारल्या तू माझ्या सार्‍या सवयी जरका,
रोज तुझे मी गेल्यावर पुटपुटणे असते...

रेशमधागा जोडत असतो आपली नाती,
संशय म्हणजे संबंधांचे तुटणे असते...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast aahe

आकाशाचे खाली येणे झुकणे नसते,
साठवलेल्या ओलाव्याला मुकणे असते..

पहिला पाऊस पडताना आडोसा बघणे,
भिजर्‍या ओल्या आनंदाला हुकणे असते...<<< वा वा

(तंत्र तपासावे) Happy

वैवकु आणि बेफिकिरजी......तंत्र मंत्र तुम्ही सांगितल्याशिवाय कसे कळेल राव मला..... तुमच्याकडे पाहून पाहून तर हे सर्व लिहायची हिंमत केलीय..... आभार्

''स्विकारल्या तू माझ्या सार्‍या सवयी जरका,
रोज तुझे मी गेल्यावर पुटपुटणे असते...'' खयाल मस्तच Happy

सुंदर शेर.. सगळेच !

तंत्राबाबत सांगायचं झाल्यास..
'नसले-असले' असं मतल्यात आल्यावर काफिया '(अ)सले' असा नक्की झाला. मग पुढे हसले, फसले, कसले, ठसले, इ. अपेक्षित होते. पण प्रत्येक शेरात 'असले' आलं. बहुतेक तुम्ही 'असले'ला रदीफ मानले आणि कवाफी झुकणे, मुकणे, चुकणे असे घेतले.

रणजितजी धन्यवाद...असे काही उलगडून सांगितले कि बरे वाटते.... पुढच्या प्रयत्नात नक्कीच या माहितीचा उपयोग होईल....भारतीजी मनस्वी आभार........ _/\_

नसते , असते हे काफिये मानले तर खाली सगळीकडे असते हा एकच काफिया गझलभर फिरवला तरी चालत असावे कारण एक कफिया एकाच गझलेत कितीदा वापरायचा याचा नेमका नियम कुठे पाहण्यात नाही
कारण झुकणे ,मुकणे हे मतल्यातले काफिये मानले तर पुटपुटणे तुटणे हे काफिये पुढे चालत नाहीत

आणि ही बाब वाटपाडेना लक्षात आल्यावर मतला (जो त्यांना मागाहून सुचला असावा )तसा केला गेला असावा असे मला वाटले म्हणून मी तसे म्हणालो

बेफीजींचा एक अफलातून मिसरा आहे >>>रदीफ बेफिकीर होत काफिया बनायची <<< तांत्रिकदृष्ट्या असे होण्याच्या अनेक शक्यतांपैकी एक उदहरण वाटपाडेंच्या ह्या रचनेत आढळले

एक शंका -

इथे (अ)णे असते ही काफिया का रदिफ जे म्हणतात ते होऊ नाही का शकत?
(मला काफिया आणि रदिफ मधला फरक अजुनही कळला नाहीये )
मी समजत होते की पहिले दोन शेर ज्याने संपतात त्याने प्रत्येक शेराची दुसरी ओळ संपली पाहीजे असं तंत्र असतं Uhoh

मग इथे पण (अ)णे असते ने संपतेच आहे की.

अच्छा! पहिल्या शेराच्या पहिल्या ओळीत नसते आहे .
पण मग (अ)सते ने संपतेय की Uhoh

गझल करणं किती अवघड असतं Sad

(अ)णे कुठाय गं ?
'असते-नसते' आहे. म्हणजे (अ)सते आहे.

----------------------------------------

वैभव,
माझ्या माहितीप्रमाणे असा नियम आहे की एक काफिया पुन्हा वापरू नये. जर तो वेगळ्या अर्थाने येत असेल तर ठीक. अन्यथा नाही.
आणि माझ्या अंदाजाप्रमाणे हे बाराखडीत लिहिले आहे बहुतेक.

(अ)णे कुठाय गं ?
'असते-नसते' आहे. म्हणजे (अ)सते आहे.

>>>
करेक्ट!
मी ते नंतर पाहीलं... Happy
पण मग ते नाही चालत का?

रिया
तुला वृत्त कसे वाचायचे हे तर लक्षात येतच असावे असे मानू
काफिया रदीफ ने शेर संपतो हे बरोबर आहे तुझे . मतल्यातील दोनही ओळी(मिसरे) काफिया रेदीफने संपतात हे ही बरोबर ....(मतला =गझलेचा पहिला शेर)

काफिया रदीफ मध्ये जनरल फरक असा आहे की रदीफ मधले कुठलेही अक्षर/ शब्द/ शब्दसमूह बदलत नाही
काफियात अलामतीनंतरचा भाग तेवढा बदलत नाही अलामतीअधीची अक्षरे बदलती असू शकतात . नव्हे असतातच समज.

सुचताना मात्र मतलाच आधी सुचतो असे नव्हे एखाद कुठला दुसरा शेरही आधी सुचलेला असू शकतो मग त्यातल्या दुसर्‍या ओळीतून शायर काफिया रदीफ ठरवतो

इथे बव्हंशी शेरात (उ)कणे असते असे आले आहे २ शेरात (उ)टणे असते असे आले आहे
म्हणजे जमीन बदलून बसली

तर झुकणे मुकणे हुकणे हे काफिये असतील [किंवा(जमीन बदललेले त्यामुळे एकाच गझलेत न बसू शकणारे ) पुटपुटणे तुटणे असे कफिये असतील] व "असते" ही रदीफ !

या रचनेत एकंदर वाटपाडे (उ)कणे आणि (उ )टणे ह्यात गडबडले असावेत त्यांनी मग मतलाच असा केला /घुमवला असावा जिथे (उ)कणे (उ)टणे ह्यात काफिया ठरत नसून नसते असते ह्या शब्दाना काफिया मानावे लागेल (अ) सते असा काफिया ठरेल व्काफिया नंतर न बदलणार्या अक्षरांचा कोणताही लवाजमा न उरल्याने रदीफ गयब होवून बसेल Happy

या सविस्तर आणि मुलभूत माहितीबद्दल खुप आभार रणजितजी आणि वैवकुजी। हे माहीत होणे खुप आवश्यक होते माझ्यासाठी। धन्यवाद मनस्वी