"वृक्षसखा"

Submitted by जिप्सी on 12 June, 2014 - 06:50

वटपौर्णिमेला आईने त्याला वडाची फांदी आणायला सांगितले. झाडाची फांदी तोडावी वगैरे त्याच्या तत्वात बसणारे नसल्यामुळे त्याने आईचे बौद्धिक घेतले. आईनेही त्याला प्रतिप्रश्न केला, की मला वडाची पूजा करायची आहे ती कशी करायची ते सांग. त्या माऊलीला तिची परंपरा जपायची /जोपासायची होतीच. तो शांतपणे गच्चीत गेला आणि तिथली एक कुंडी त्या‍ने आईसमोर आणून ठेवत सांगितले, "याची पूजा कर!" त्या- कुंडीत होतं, त्याने जगवलेले आणि जोमाने वाढणारे "वडाचे झाड!"

यातील "तो" म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच मध्यमवर्गीय तरूण "विक्रम यंदे".

याच "हिरव्या दूताचा" हा अल्पपरीचय आणि त्याचा एक लेख खास वटपौर्णिमेच्या निमित्ताने.

झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण, भौतिक सुखाची असीम लालसा ह्या गोष्टींमुळे झाडांची संख्या सर्वत्र झपाट्याने कमी होताना दिसते. एकीकडे ‘ग्लोबल वॉर्मिंग’, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हुणून कंठशोष करणारे शहरवासीय दुसरीकडे झाडांच्या मुळावर उठले आहे. अशा वेळी, विक्रम यंदे झाडांची मुळे जपण्याचे हिरवे काम करत आहे. विक्रमला झाडापानांची आवड उपजत आहे. तो ठाण्याचा. पूर्वी ठाणे हे घनगर्द झाडांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. ठाण्याने विकासाच्या बाबतीत मुंबईसारखीच गती घेतली आणि तिथल्या वृक्षवल्लीं चा नायनाट होऊ लागला. रस्त्यांचा विस्तार होऊ लागला आणि विस्तारलेली झाडे सपासप कापली जाऊ लागली. मोठ्या झाडांचे पुनर्रोपण झाले खरे, पण त्यात माया नव्हती. होता तो सरकारी उपचार!

विक्रमने २००४ मध्ये पर्यावरणविषयक काम करणा-या ठाण्यातल्या एका संस्थेसोबत काम सुरू केले. त्या संस्थेत राहून तो वृक्षसंवर्धनासाठी काम करू लागला, पण तो पूर्ण समाधानी नव्हता. त्यातून त्याच्या ‘ग्रीन अम्ब्रेला’चा जन्म झाला. विक्रमचा विश्वास निव्वळ जनजागृती करण्यावर नाही. त्याच्या मते विचारांना कृतीची जोड द्यायला हवी. ‘आधी केले, मग सांगितले’ ही रामदासी वृत्ती स्वभावात बाणवायला हवी. तरच बदल घडू शकतो. मग प्रारंभ झाला, तो इमारतीमध्ये रूजलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा! विक्रमने इमारतींच्या भिंतींमध्येच उगवलेली पिंपळासारखी झाडे नीट काढाण्याचे, त्यांचे पुनर्रोपण करायचे काम सुरू केले. त्याला, ‘तुझं हे समाजसेवेचं वय नाही. आधी स्थिरस्थावर हो, मग सामाजिक कार्यात लक्ष घाल’ असा सल्ला दिला गेला, पण तो ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ ह्या न्या‍याने घेतला वसा टाकायला तयार झाला नाही! ‘ग्रीन अम्ब्रेला’ने वर्षाला सातशे ते आठशे याप्रमाणे गेल्या काही वर्षांत दोन हजाराहून जास्त झाडांचे यशस्वीं पुनर्रोपण केलेले आहे. .

विक्रमला कोणतीही झाडे लावत जायचे ही गोष्ट मान्य नाही. तो वनस्प‍तीशास्त्राचा अभ्यास करतो आणि त्यानंतर कुठे कोणती झाडे लावायची याचा निर्णय घेतो. त्याने झाडांचा अभ्यास करताना पुस्तकांमधून माहिती मिळवली, अनेक पक्षीतज्ञ आणि निसर्गतज्ञ यांच्यान भेटी घेतल्या . तो वृक्षप्रेमींसोबत विविध ऋतूंमध्यें जंगलांमधून फिरला. त्या कामात त्या्ला पुण्याचे पक्षीतज्ञ उमेश वाघे यांची मदत झाल्याचे तो नमूद करतो. आपल्या वातावरणाशी सुसंगत, दीर्घायू, जीवनसाखळीला पोषक अशी झाडे वाचवण्यात आणि ती वाढवण्यात त्याला विशेष रस आहे. तो म्हणतो, की आपल्या रस्त्याच्या दुतर्फा किंवा इतरत्रही परदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावलेली दिसतात. ती झाडे आपल्याक वातावरणातील नसल्या्मुळे त्यांना कीड लागत नाही. त्यामुळे त्यांची वाढ लवकर होते. त्यामुळे वनखाते व मनपाकडून ही विदेशी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यालत येतात. त्यामध्ये निलगिरी, अॅकेशिया, सुबाभूळ, गुलमोहर, रेनट्री आणि पेल्ट्रोफोरम अशा झाडांचा समावेश असतो. झाडांची लागवड करताना स्थानिक झाडांचा किंवा त्यांच्यावर जगणा-या जीवजंतू-पक्ष्यांचा विचार केला जात नाही. याचा परिणाम आपल्या बायोडायव्हर्सिटीवर होतो. त्याचा परिणाम पक्ष्यांच्या संख्येवरही होऊ लागतो.

विक्रमने स्वतःच्या इमारतीच्या आवारात सूत्रबद्ध पद्धतीने झाडे लावली होती, मात्र रहिवाशांनी गाड्या उभ्या करायला अडचण होते म्हणून ती उपटून फेकून दिली. ती घटना विक्रमच्या जिव्हारी लागली. पण तो हार मानायला तयार नाही. विक्रम म्हणणतो, ‘हे चित्र नक्की बदलेल. मुंबईमध्ये २६ जुलै २००५च्या पुरानंतर लोकांना प्लास्टिकचे दुष्पीरिणाम कळून चुकले. प्लास्टिकमुळे गटार-नाले तुंबल्यावर काय हाहाःकार घडू शकतो याची प्रचिती आली. अशीच एखादी आपत्ती आली, की लोकांना झाडांचेही महत्व कळल्यायशिवाय राहणार नाही. पण, आपत्ती येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच जर आपण शहाणे झालो तर ते आपले भाग्य’

झाडे वाचवण्याची पद्धत
१. इमारतींवर, त्यांच्या पाईपजवळ वाढणार्यार छोट्या-मोठ्या वनस्पतींचे पुनर्रोपण करणे हे ‘ग्रीन अम्ब्रेला’चे प्रमुख कार्य आहे. परंतु झाडांना जीवनदान देण्याच्याही काही पद्धती आहेत.
२. इमारतीवर वाढलेल्या आणि रहिवाशांना त्रास होत असलेल्या झाडांचा सर्वप्रथम शोध घेणे, त्यांचे सर्वेक्षण करणे.
३.झाडांचे पुनर्रोपण करताना त्यांना इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेणे.
४.झाडांचे पुनर्रोपण करताना झाड झटपट वाढण्यासाठी ‘रुटेक्स’ नावाचे सोल्युशन लावून नंतर त्यांचे रोपण करणे.
५.वाचवलेल्या वृक्षांची एका प्लॅस्टिकच्या पिशवीत अथवा कुंडीत लागवड करणे.
६.लावलेल्या झाडाच्या रोपाला नैसर्गिकरित्या पाणी मिळेल, अशाप्रकारे झाडाचे रोपण करणे.
७. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, झाडाचे रोपण केल्यावर त्याची देखभाल करणेही तितकेच गरजेचे आहे.

वटवृक्षावरचा हा विक्रमचा लेखः
वटपौर्णिमा हा सण सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र तो मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पर्यावरणप्रेमींना पौर्णिमेनंतरचे दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहवे लागते.

भारत हा जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्याप्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील तीनशेपासष्ट दिवस निसर्गानंद साजरा करणाऱ्या सण-उत्सवांचा देश. तेथे सृष्टीतील प्रत्येक सजीव-निर्जीव रूप पूजनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा समतोल जितका राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कुठेही सांभाळला गेला नसेल.

पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. पतिव्रता सावित्रीचे देणे असलेले ते व्रत हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे.

ग्रीन अंब्रेलाचे कार्यकर्ते:

(प्रचि सौजन्यः अनिल शिंदे)

पुराणकाळातील बुद्धिमान, विदुषी सावित्री वटवृक्षाचे महात्म्य जाणत होती, म्हणूनच तिने मृर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले, कारण ते झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ साठ टक्के प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती! आधुनिक भाषेत वटवृक्ष नैसर्गिक व्हेण्टिलेटरचे काम करतो. आर्यांना हा वृक्ष प्राचीन काळापासून परिचित असल्याचे दिसते. वेदांमध्ये याचा ‘न्यग्रोध’ नावाने उल्लेख आहे. रामायण, महाभारत, चरकसंहिता, बृहत्संहिता, कौटिलीय अर्थशास्त्र, रघुवंश इ. अनेक संस्कृत ग्रंथातून भिन्न भिन्न संदर्भात वडाचा निर्देश आहे. प्लिनी यांनी ‘इंडियन किंग ट्री’ असा याचा उल्लेख केला आहे. सीतादेवीने प्रयागाच्या प्रसिद्ध वटवृक्षाची प्रार्थना केल्याचा उल्लेख रामायणात आहे. वडाच्या काटक्यांचा उपयोग होमहवनात व यज्ञात समिधा म्हणून करतात. बौद्ध धर्मीयही या वृक्षाला पवित्र मानतात. त्यांच्या सात बोधीवृक्षांपैकी हा एक आहे. वटवृक्षांचा अंतर्भाव मोरेसी कुलातील फायकस या प्रजातीत करतात. फायकस या प्रजातीत सुमारे एक हजार जाती असून त्यांपैकी सत्ततर जाती भारतात सापडतात.

पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील तो पूजनीय मानतात. त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे वडाच्या काड्या होमहवनात किंवा मंगलप्रसंगी अग्नीला अर्पण केल्या जातात. वडाच्या अनेकविध गुणधर्मांमुळे त्याची लाकडे सरपणासाठी वापरणे निषिद्ध मानले जाते.

एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड एका तासाला सातशेबारा किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे; म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पाने असल्यामुळे तो जास्तीत जास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. वड उन्हाळ्यात दिवसाला दोन टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो. त्याचा उपयोग ढग बनण्यासाठी आणि हवेत आर्द्रता व गारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेऊन पाऊस पाडण्यास मदत करणे हेदेखील वडाच्या झाडाचे कार्य आहे. वटवृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे तो भरपूर सावली देतो.

भारतीय समाजजीवनात त्याला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेलात तरी देवळाजवळ, गावात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येईल. तो देखील कुटुंबप्रमुखासारखा अटळ, अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचे कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या, लहानथोर त्याच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आयुष्याची संध्याकाळ घालवणारे हजारो लोक आहेत; एरवीही पारावरच्या गप्पा प्रसिद्धच आहेत. टीव्हीवरील वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकल्या, की त्या गप्पाच आठवतात ना! कितीतरी ज्येष्ठांना त्यांची सुखदु:खे वाटण्यासाठी त्याच्या विशाल सावलीचा आधार असतो.

(लेखातील काहि माहिती 'मराठी विश्वकोश संकेतस्थळाहुन साभार).

विक्रम यंदे
इमेल – vikram.yende99@gmail.com
www.green-umbrella.org

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर आणि आशादायक माहिती.

असले वेड लागलेल्या तरुणांची संख्या अजुन वाढावी आणि वरच्या फोटोतल्या वडाच्या पारंब्यांइतके तरुण झाडांना जोपासायला पुढे यावेत हीच आजच्या दिवशी वृक्षदेवतेकडे प्रार्थना .. Happy

विक्रमला कोणतीही झाडे लावत जायचे ही गोष्ट मान्य नाही. तो वनस्प‍तीशास्त्राचा अभ्यास करतो आणि त्यानंतर कुठे कोणती झाडे लावायची याचा निर्णय घेतो. त्याने झाडांचा अभ्यास करताना पुस्तकांमधून माहिती मिळवली, अनेक पक्षीतज्ञ आणि निसर्गतज्ञ यांच्यान भेटी घेतल्या . >>>>> हे फारच महत्वाचे आहे ....
अतिशय डोळसपणे काम करीत आहे विक्रम - त्याचे हार्दिक अभिनंदन व अनेकानेक शुभेच्छा ... Happy

जिप्सी - विक्रमचा उत्तम परिचय करुन दिलास त्याकरता आभार मानावे तेवढे थोडेच .... Happy

मस्तच आणि समयोचित लेख रे जिप्सी....

विक्रमला देखिल त्याच्या पुढील वाटचाली करता अनेकानेक शुभेच्छा

अगोदर फोटो पाहिले, आता लेख वाचते.
धन्यवाद जिप्सी अशा कार्याची ओळख करून दिल्याबद्दल. Happy

विक्रमला अनेकानेक शुभेच्छा, अत्यंत मोलाचे कार्य.

जिप्सी - विक्रमचा उत्तम परिचय करुन दिलास त्याकरता आभार मानावे तेवढे थोडेच .. +१

अरे वा!! विक्रम ने त्याच्या नावा चं सार्थक केलंय.. जिप्सी, विक्रम ची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !

किती सुंदर उपक्रम .. विक्रम ला खूप सार्‍या शुभेच्छा !!

छानच जिप्सी... विक्रम आणि त्याचे उपक्रम... कौतुकास्पद... या लेखाद्वारे परिचय केल्याबद्दल धन्यवाद.

उपक्रम, कार्य, माहिती, ओळख, लेख सारेच छान !

घरात लहान मुले असले की घराला जसा जिवंतपणा येतो तसेच आपल्या भोवतालच्या परिसरात जीव ओतण्याचे काम हि झाडे करत असतात. प्रत्येकाला हे कळते वळते, फारश्या सोशल अवेरनेसचीही गरज नसावी, पण तरीही आपण मजबूरी का नाम म्हणत वृक्षतोड करतोय आणि कॉंक्रीटची जंगले उगवतोय.

फोटोजमध्ये सारी तरूण मंडळी दिसताहेत हि गोष्ट कौतुकास्पद आणि आशावादी आहे.

विक्रमच्या कामाची इथे समोयोचित ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

वटपौर्णेमेच्या आधी दोन दिवस बाजार विकायला असलेल्या त्या ओरबाडून आणलेल्या फांद्या बघवत नाहीत. त्याहून वाईट अवस्था पूजा झाल्यानंतर कचर्‍यात फेकलेल्या फांद्यांची असते. अक्षरशः पायदळी तुडवल्या जातात. असल्या पूजेने कुठला देव प्रसन्न होतो माहित नाही. विक्रमसारखे झाडामाडांना "सजीव" मानून वाचवणारे फारच कमी. कीप इट अप, विक्रम!!

विक्रम आणि त्याचे उपक्रम... कौतुकास्पद... या लेखाद्वारे परिचय केल्याबद्दल धन्यवाद.>>> +१

फोटोजमध्ये सारी तरूण मंडळी दिसताहेत हि गोष्ट कौतुकास्पद आणि आशावादी आहे.>>> +१

धन्यवाद जिप्सी अशा कार्याची ओळख करून दिल्याबद्दल.......+१

अवांतरः कुंडीत वडाचे झाड २-२.५ फूट झाले आहे.त्याच कुंडीत अ‍ॅडेनियमही आहे.कोणतेही झाड न मारता कसे वेगळे करता येईल?

विक्रम आणि त्याचे उपक्रम खूप कौतुकास्पद... या लेखाद्वारे त्याचा परिचय करुन दिल्याबद्दल जिप्सी तुला धन्यवाद !!

Pages