वाटले तर मी उद्या शिंपीन माझे रक्तही

Submitted by वैवकु on 11 June, 2014 - 10:57

मी गझल सोडायच्या आलोय घाईला इथे
अन मला म्हणतेय ती आयुष्य आहे मी तुझे

काळजी करण्यात काही अर्थ नाही फारसा
पाहिजे आहे मला ते व्हायचे आहे कुठे

मी तुझ्या प्रेमात बहुधा गुंतलो आहे पुरा
मी तुझ्या कैफात नसलो की रडावे वाटणे

ना कळे पाण्यात ह्या पडतात कसल्या सावल्या
भारही त्यांचा असा की डोह सारा डुचमळे

वाटले तर मी उद्या शिंपीन माझे रक्तही
वाटले तर मी उद्या लिंपीनही माझे तडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ना कळे पाण्यात ह्या पडतात कसल्या सावल्या
भारही त्यांचा असा की डोह सारा डुचमळे

क्या बात!
* * * * * *

गैरमुरद्दफ गझलेत स्वरकाफिया मीही योजलेला आहे 'बेफिकीरी'मध्ये! पण समहाऊ ते मलाही रुचलेले नाही.

पण जबाबदारीने गझल करणे व बेजबाबदारीने ती करणे ह्यातील फरक मला समजू शकतो.

तेव्हा:

>>>ना कळे पाण्यात ह्या पडतात कसल्या सावल्या
भारही त्यांचा असा की डोह सारा डुचमळे

वाटले तर मी उद्या शिंपीन माझे रक्तही
वाटले तर मी उद्या लिंपीनही माझे तडे<<<

हे दोन शेर फार आवडले.

ना कळे पाण्यात ह्या पडतात कसल्या सावल्या
भारही त्यांचा असा की डोह सारा डुचमळे >>>>>> केवळ अप्रतिम .....

स्वरांतकाफिया/ स्वरान्त्ययमकाच्या गझला वाचायची सवय नसल्याने असेल कदाचित, पण पाचही शेर पाच वेगळ्या गझलांतलेच वाटले. त्यात तांत्रिक एकसूत्रता असेल, आहेच; पण तिने मनावर पकड घेतली नाही मात्र. Sad

पाचही शेर आवडले.
'वाटणे' ऐवजी 'वाटते' हवे आहे का ? हाच एक शेर मला जरा कमजोर वाटला.
चौथ्याने कहरच केला आहे..!! Happy

पण जबाबदारीने गझल करणे व बेजबाबदारीने ती करणे ह्यातील फरक मला समजू शकतो
<<<<< मला हे वाक्य समजले नाही . मी बेजबाबदारीने गझल केली आहे / करतो असा अर्थ मला काढावा वाटत आहे पण तो तसा नसेलही असेही वाटते आहे
कृपया नेमकेपणा मला कळेल ह्या लेव्हलवर आला तर फार बरे होईल ,नव्हे तसा आग्रहच मी धरू पाहत आहे Happy
स्वरांतकाफियाची गझल गैरमुरद्दफ असणे मलाही फारसे पटत नाहीच स्वरांतकाफियाला योग्य अश्या रदीफेची जोड असेल तर जमीन जास्त खुलते उठून दिसते असे मला वाटते . पण माझा मुळात स्व्रांतकाफिया ह्या विशयी कसलाही पवित्रा वगैरे नाही आहे

गैरमुरद्दफ स्वरकाफिया असल्याने पकड न घेता येणे बाबत जितूशी सहमत असे होते खरे !

मुळात ही रचना करताना माझ्या मनात काफियांच्या स्वरूपाबाबत / जमीनीबाबत काही ठोकताळे नव्हते कोणताही प्रयोग करण्याचाही मनसुबा नव्हता
पहिल्या शब्दापासून शेवटपर्यंत जशी सुचेल तशी गझल करत गेलो काफियांकडे वळून पाहिले तेव्हा इतके समजत होते की असे जमीन तंत्रानुसार चुकत तर नाही आहे ना मग झाले तर ..मग मी तंत्राचा फारसा बाऊ केला नाही सुचेल त्यात काहीही बदल केला नाही शेरांचा क्रमही बदलला नाही फक्त कैफात हा शब्द इथे टाईपताना बदलून आला इथे दु:खात असा शब्द होता आधी

वाटणे असाच शब्द हवा होता मला ते ऐवजी णे मला हवेसे वाटले आणि मुळात मला अमुक वाटते ही परिस्थिती सांगायची नाही आहे त्या ओळीतून मनाची अवस्था तशी झाली आहे 'रडावे वाटणे' ! हे सांगायचे आहे त्यावरून वरची ओळ ज्यात बहुधा असे असावे की मी तुझ्या प्रेमात पडलोय असा त्या खालच्या ओळीचा निष्कर्श काढायचा प्रयत्न आहे

तिसरा व चौथा शेर माझ्यासाठी विठ्ठलाचे शेर आहेत

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

ना कळे पाण्यात ह्या पडतात कसल्या सावल्या
भारही त्यांचा असा की डोह सारा डुचमळे

व्वा!

>>>कृपया नेमकेपणा मला कळेल ह्या लेव्हलवर आला तर फार बरे होईल ,नव्हे तसा आग्रहच मी धरू पाहत आहे<<<

तुम्हाला कळण्याच्या लेव्हलवर आल्याचे तुम्हाला कळले नाही तर काय घ्या? म्हणून लिहायचे तितके लिहिले.

शुभेच्छा! Happy