'खांदेरी' च्या बेटावर..

Submitted by Yo.Rocks on 9 June, 2014 - 22:08

वातावरण सगळे उन्हात होरपळून गेलेले... घामाच्या धारांनी अभिषेक सुरु झालेला मग दिवस असो वा रात्र... हवेचा मागमूस नाही... गेल्या तीन -चार महिन्यात ट्रेक नाही... अश्यातच सरत्या मे महिन्यात 'खांदेरी' ट्रेक ने साद घातली.. नेहमीचा कंपु तयार झाला.. अगदी बच्चेकंपनीसकट.. छोटा-मोठा इंद्रा, छोटा-मोठा भीडे, आमचा मुकादम - गिरी, रो.मा आणि नविन... आमच्यातला सुन्या मात्र नोकरीशी प्रामाणिक राहुन गैरहजर राहीला.. कंपुत दोन पाहुणे.. एक छोटा-मोठा संत्या नि दुसरी मायबोलीकर सेलिब्रेटी म्हणजे कांदबरी.. च्च सॉरी.. नंदिनी ! मान पाहुण्यांचा म्हणून खाण्याची तजवीज करुन येणे आधीच बजावलेले...

सकाळी ठिक साडेसहा वाजता... मध्य रेल्वेवासी सिएसटीला नि पश्चिमवासी चर्चगेटला भेटण्याचे ठरले.. ठरल्याप्रमाणे वेळ काही पाळली गेली नाही.. दोष मात्र रेल्वेलाच दिला गेला.. ! शेवटी 'गेटवे'ला व्वाह ताज करत कंपू एकत्र आला.. बरेच दिवसांनी भेट सो हाय हेल्लो झाले.. गिरी व नविन यांचा आवेश तर अगदी इथं नाक्यावर जाउन येतो असा.. अगदी रिकामटेकडयासारखे आलेले.. तर इंद्रा, विन्या व संत्या त्यांच्या बच्चेकंपनीच्या वजनाने किंचीतशे बुजलेले.. 'गेटवे ते मांडवा' प्रवास करणार्‍या बोटीसाठी रांगेत उभे राहीलो नि गप्पाष्टक सुरु झाले.. अर्थात गिरीने आपल्या मुकादमच्या भुमिकेत शिरुन सगळ्यांकडून आधीच ट्रेकहप्ता वसुल केला..

बोट धक्क्याला लागली.. तिकीटे फाडली गेली.. सुट्टीचा काळ तेव्हा गर्दी असणारच.. त्या गर्दीतूनच बोटीच्या 'अप्परडेक' ला विराजमान झालो.. निघण्याची घंटा झाली नि आम्ही गेटवेच्या किनार्‍याचा निरोप घेतला...

'गेटवे'वरुन दिसणारा समुद्र व त्यावर तरणार्‍या बोटींचे दृश्य जितके सुंदर वाटते त्यापेक्षा समुद्रातून गेटवेचा किनारा कितितरी पटीने जास्त बघेबल वाटतो.. अख्ख्या मुंबापुरीचा निरोप घेउन जातोय असे वाटते..

हिंवाळ्यात हा प्रवास करायचा तर समुद्रपक्ष्यांचे थवे बोटीच्या दोन्ही बाजुंनी उडू लागतात तो अनुभव काही वेगळाच.. आता मात्र बोटीच्या मोटारचाच आवाज.. जो तो आपापल्या मोबाईलमध्ये कॅमेर्‍यात गर्क झाला.. गेटवेचा किनारा जितका दुर राहिला तितकीच त्याची लांबी जास्त नजरेत भरु लागली.. तर एका टोकाला दुरवर तिरंगा फडकावत उभी असणारी 'विक्रांत' ही युद्धनौका आपल्या भवितव्याबाबत विचारमग्न दिसली.. एव्हाना इथे बच्चाकंपनीचे त्रिकुट एकमेकांशी गप्पांमध्ये रमले होते.. अचानक छोटा इंद्रा (श्रीशैल) याने इंद्राकडे येउन 'आता आपण कुठल्या देशात जाणार' असा निरागस प्रश्न विचारला... आम्ही उत्तर दिले 'मांडवा'

जल्ला 'मांडवा' हे नाव घेताना अगदी 'अग्निपथ' चा विजय दिनानाथ चौहाण आठवतो.. पाउणतासाच्या सफरीनंतर मांडवा आले.. ओसंडून वाहणार्‍या गर्दीमध्ये आम्ही पण अलिबागला पिकनिकसाठीच जातोय असे वाटत होते.. त्यात गिरी व नविन यांना रिकामे बघून कुठलीच शंका उरली नव्हती.. मांडवावरुन बसच्या रांगेचा नि गर्दीचा कंटाळा करत मुकादमांनी 'टमटम' बुक केली नि आम्ही थळच्या दिशेने चालू पडलो..

दुतर्फा सुपारीच्या बागा, आमराई नि अधुनमधुन लागणारी टुमदार घरे पार करत आम्ही थळ किनार्‍यावरील मासळी बाजारपेठ गाठली.. एव्हाना मुकादम मोबाईलवरुन नावाडयाचा पत्ता घेत होते.. हा नावाडी म्हणजे अश्विन बुंडके.. ह्याची इथे अगदी मोनोपॉली.. त्यांच्या बोटिविना समुद्रातील 'खांदेरी-उंदेरी' किल्ला भेट होणे जवळपास अशक्यच.. दोन दिवस अगोदर बोलणी करुनही हे महाशय आज गायब होते नि त्यांनी कुणा दुसर्‍याला आमच्या सफरीसाठी पाचरण केले.. ही बोलणी होइस्तोवर बाजुच्याच टपरीवर वडा - उसळपाव असा झणझणीत कार्यक्रम आटपून घेतला.. पाहुण्यांनी आणलेल्या शिजोरीवरदेखील ताव मारला गेला.. ढेकर देउन आता बोटीसाठी किनार्‍याकडे मोर्चा वळवला... चोहीकडे सुकी मासळीचा घमघमाट सुटलेला.. त्यात एका मावशीच्या टोपलीत माशांऐवजी लालबुंद'रतांबे' दिसले.. कोकणवासीयांना हे नेहमीचेच.. पण बाकीच्यांसाठी काहितरी नविन म्हणुन उत्सुकतेने डझनभर खरेदी झाली.. तोंड आंबट करत जेट्टीकडे वळालो... !

बरीच लगबग सुरु होती.. समुद्रातील होडया परतल्या होत्या.. तर काही जायच्या तयारीत.. मालवाहतूक करण्यासाठी बैलगाड्या पाण्यातुन सुसाट पळत होत्या.. या किनार्‍यावरुन दुरवर समुद्रात 'खांदेरी-उंदेरी' हे जलदुर्ग नजरेस पडले..

आमची योजना खरी तर 'खांदेरी-उंदेरी' असे दोन्ही किल्ले करण्याची होती पण सारी मदार नावाड्यावर होती.. खांदेरी सहज करता येतो पण उंदेरीला बोटीसाठी धक्का नसल्याने भरतीच्या वेळीच जाणे शक्य होते.. उंदेरी किल्ला तसा अगदी हाकेच्या अंतरावर वाटत होता तर खांदेरी खोल समुद्रात... आम्ही भरती-ओहोटीची वेळ बघूनच गेलेलो म्हणून पहिले खांदेरीलाच भेट देण्याचे ठरलेले..

जेमतेम १५ जण मावतील अश्या छोटया बोटीत आम्ही वजनाप्रमाणे बसलो.. नविन व गिरी यांनी बोटीच्या सिंहासनाची म्हणजेच बोटीच्या पुढच्या टोकाची जागा पकडलेली.. तर आम्ही बच्चाकंपनीबरोबर मध्ये पसरलेलो.. मोटार सुरु झाली नि सागरी मार्गे किल्ल्याकडे कूच केले..


(सिंहासनावर आरुढ नविन व गिरी नि पुढे विन्या त्याच्या पिल्लुसोबत.. मागे दुरवर खांदेरी)

बोट सुरु होण्याअगोदर आवश्यक काळजी घेतली असली तरी तसे फोटो काढायच्या नादात बेसावधच राहीलो.. तितक्यात एक मोठी लाट बोटीला थडकली नि सगळ्यांना अंघोळ घातली.. आधीच घामाने चिंब.. त्यात पाण्याचे तुषार काय उडाले आम्ही खुष ! चिल्लरपार्टी तर एकदम खूष !! एकच कल्लोळ !

काही क्षणांतच पुढची सागरी वाट खडतर असल्याचे समजून गेले.. आतला समुद्र बराच खवळलेला होता.. लाटांचा भडीमार सुरु होता.. आमची बोट अगदी विरुद्ध दिशेनेच नेमकी जात होती त्यामुळे बोटीचे हेलकावे जरा जास्तच सुरु झाले.. आता मात्र चिल्लर पार्टीची तंदरली.. आम्ही लाट आली की अगदी आरोळ्या ठोकुन मज्जा करत होतो... पण एका क्षणाला बोट जरा जास्तच उडाली तेव्हा आमच्याही काळजाचा ठोका चुकला.. चिल्लर पार्टीची तर बोलती बंद .. बच्चा त्रिकुटाने आडवे झोपुनच दिले.. तिकडे टोकाला सिंहासन देखील हलले होते.. Lol नावाडयासाठी हे नेहमीचेच असेल पण आम्ही या थरारक प्रवासाचा पुरेपुर आस्वाद घेत होतो.. एव्हाना आम्ही उंदेरी किल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोरून जात होतो.. या किल्ल्याभोवाताली पसरलेल्या खडकांची डोकी समुद्राच्या पाण्याबाहेर आलेली दिसत होती.. इथे नक्की जायाला मिळेल ना हा प्रश्न बाजुला सारून आम्ही खांदेरी बेटावरच लक्ष केन्द्रित केले..

उंदेरी किल्ला

किनार्‍यापासून अंदाजे सहा- सात किमिवर असणारा खांदेरी किल्ला आता समीप आला होता.. बेटावरील दीपगृह दृष्टिस पडले.. समुद्राचा आवेश मात्र कायम होता.. या बेटाअगोदरच समुद्रात उभारलेल्या एका बांधकामाच्या टोकावर एक मोठा समुद्र-गरुड आपल्या घरट्याची राखण करीत बसलेला.. इथे छोटा इंद्रा, छोटा संत्या अधुनमधून आपापली डोकी वरती काढून अजुन किती लांब ते बघत होते.. तर ज्युनिअर भीडे अगदी कसलेही टेंशन न घेता पडून राहीले होते..

अखेरीस आमची बोट उसळत्या लाटांचा सामना करत खांदेरीच्या बेटाला लागली.. नि आतापर्यंतच्या प्रवासात 'शेळ्या' बनलेली बच्चाकंपनी लगेच 'टायगर' बनली नि पुन्हा डरकाळ्या सुरु! धावाधाव उडया सुरु ! यांची मस्ती बघून आपल्या लेकीला आणले नाही याचा नंदिनीला मनोमन आनंद झालेला... Wink धक्क्यासमोरच या बेटाचा नकाशा दाखवला आहे.. 'कान्होजी आंग्रे' बेट असे नाव दिले गेलेय.. तो नकाशा वाचेस्तोवर नावाडयानेच किल्ला फिरवून आणण्याची तयारी दर्शवली.. आम्ही मग पहिले किल्ल्यावरील प्राचीन वेतोबा मंदिराजवळ पोचलो.. शेंदुर फासलेली भव्य मूर्ति, चित्रांनी सजावट केलेले माश्यांचे मोठे सुळे.. सारं काही मस्त..

- -

माशाच्या सुळ्यावर चितारलेले "जय मल्हार"

किल्ल्याला भल्यामोठ्या दगडांनी बांधलेली भक्कम तटबंदी दिली आहे.. त्याच तटबंदीवरून फेरफटका मारायला घेतला.. कॅनॉन पॉइंट वर पहिल्या तोफेशी भेट झाली नि त्या काळी मराठ्यांनी बांधलेल्या किल्ल्याचे कौतुक अभिमानाने बघू लागलो.. भवताली अथांग सागर नि मधोमध हा अभेद्य किल्ला.. मुंबईला इंग्रजांवरती वचक ठेवण्यासाठी नि जंजीरा किल्ल्याच्या सिद्दिला शह देण्यासाठी महाराजांनी या बेटाची किल्ल्यासाठी निवड केली होती..

- -

कॅनॉन पॉइंट वरून पुढे मुंबई पॉइंट च्या बुरुजावर आलो.. इथून वातावरण स्वच्छ असेल तर मुंबई नजरेस पडते म्हणे.. पुढच्या बुरुजावर तर अगदी तोफा वाहून नेणारया गाड्यांसकट तोफा अजुनही तग धरून आहेत ! या दुर्मिळ तोफांच्या गाड्या तर अगदी पुर्वीच्या काळात घेउन जातात.. ..


- -

मुंबई पॉईंट व तोफा असलेला बुरुज

- -

- - -

- - -

---

याच बुरुजावर तटबंदीवरून जाताना डावीकड़े विहीर खोदलेली दिसते..

पुढे मुंबई पोर्टट्रस्ट च्या दीपगृहाकडे जाणारया पायर्‍या लागतात.. तर एकीकडे हेलिपॅडसाठी जागा केलीय.. इथेच तटबंदीतुन बाहेर समुद्राकडे जाण्यासाठी खालून दरवाजा आहे.. शांतपणे बसून सागराच्या लाटांचा कार्यक्रम बघण्यासाठी उत्तम जागा..

------

या गडावर एक खास आकर्षण म्हणजे भांडया सारखा आवाज करणारा खडक.. दिपगृहाच्या जवळच एका मोठ्या झाडाच्या सावलीत हा खडक आहे.. दगडाने या खडकावर ठोकले असता अगदी भांडे वाजवाल्यासारखा आवाज कानी पडतो.. इथे मग सगळ्यांनीच आवाज करून पाहिला.. जल्ला त्या खडकाला आतापर्यंत ठोकून ठोकून त्याच्यावर खडड्यांचे नक्षिकम बनले आहे.. बाकी इतका छान किल्ला पण सबंध किल्ल्यावर मिळेल तिथे स्वतःच्या नावांची रंगरंगोटी करून त्या किल्ल्यास विद्रूप केलेय ! किल्ल्यावर इतरही छोटी- छोटी मंदिरं आहेत, थडगी आहेत...

- -

- -

एव्हाना उनाचे चटके वाढले होते.. अजुन 'उंदेरी' बाकी होता तेव्हा लवकरच धक्क्यावर पोहोचलो.. पुन्हा एकदा बोटीच्या प्रवासासाठी सरसावलो.. बच्चाकंपनीने धसका घेतला होताच.. समुद्रही अजुन खवळलेला.. पण आता आमचा प्रवास लाटांच्या दिशेने होता.. तेव्हा बोटीचा प्रवास बर्‍यापैंकी शिस्तीत सुरु होता..

मनात शंका होती की हा नावाडी बोट 'उंदेरी'ला वळवेल की नाही.. झालेही तसेच.. वातावरणाचे कारण देऊन त्याने किनार्‍याकडे बोट दामटवली !

सुमारे एकच्या सुमारास किनारा गाठला.. जल्ला ट्रेक इतक्या लवकर संपायची पहिलीच वेळ ! त्यात नावाडी तीन हजार भाड़े मागु लागला.. पण आमचे त्या बुंडकेशी फ़क्त खांदेरी झाला तर प्रत्येकी दोनशे नि उंदेरी सकट तीनशे रुपये अशी बोली झालेली.. शेवटी अडीच हजार रुपयांवर मांडवली झाली..!! बाकी लोक्स पुढे रिक्षा स्टँडवर जाईपर्यंत नविन आणि गिरीने सुक्या मच्छीचा बाजार घेतला..

गर्मीने घामाघुम झालेलो तेव्हा लवकर कल्टी मारू म्हणत 'पाटील खानावाळ'चा नाद सोडून दिला.. त्या रिक्षा स्टँडवरच पेटपूजेचा कार्यक्रम आटपला नि ऑटो करून अलिबागाच्या मुख्य रस्त्यावर आलो.. मांडवासाठी जाणार्‍या बसची वाट बघताना बाजूच्याच गोळा- गाडीवर नजर गेली नि गोळ्याचे जवळपास सगळे फ्लेवर ऑर्डर झाले.. थंडगार गोळा खाऊन जीव कुठे शांत झाला तोच समोरून बस आली..

पुन्हा शेवटचा बोटीचा प्रवास सुरु झाला.. मांडवा ते गेटवे ! इथेही समुद्राला उधाण आलेले.. धक्क्याला लागलेली बोट्सुद्धा बरीच हलत डुलत होती.. बराच कल्लोळ करत गर्दी कशीबशी बोट मध्ये चढलेली.. बोट सुटली तोच एक मोठी लाट येउन थडकली नि बोटीच्या एका बाजुकड़ील सर्व प्रवाशांना अंघोळ झाली.. पुन्हा कल्लोळ सुरु झाला पण आम्ही लोक्स अगदी बच्चेकंपनीसुद्धा निर्धास्त होती .. कारण 'खांदेरी' ला जाताना केलेला थरारक प्रवास.. तोदेखील छोट्याश्या बोटीतुन.. सो बाकीचे आता मजा घेत होते नि आम्ही मात्र झोपा काढत होतो.. घरी जाउन सामिष जेवण चोपण्याचे स्वप्न बघत होतो..

बरीच वर्षे ताटकळत राहीलेले 'खांदेरी-उंदेरी' पहायला मिळाले होते.. 'उंदेरी'वर जाता आले नसले तरी शिवरायांच्या आज्ञेनुसार बांधलेला मराठयांचा 'खांदेरी' बघायला मिळाले हेच खूप होते.. शिवाय ह्या ट्रेकच्या निमित्ताने पुन्हा सगळे दोस्तलोक्स एकत्र आले हा आनंद निराळाच ! ट्रेकऋतूच्या म्हणजेच पावसाच्या आगमनापुर्वी अशी भेट होणे म्हणजेच पुढील भटकंतीची न संपणारी चर्चा अटळच ! तेव्हा आता वाट पावसाची... पुढच्या ट्रेकची.. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती सोड्याची पिशवी सुखरूप घरी गेली का ?? Proud

वरच्या फोटोमध्ये दिसत असलेल्या तोफेखालची गाडी नीट पाहिली तर लक्षात येईल की तोफ घडवतानाच ती गाडीपण घडवलेली आहे.

अर्रे भारी!!! मस्त मज्जा केलीत..

आता मला पण घेऊन जा खांदेरीला. (समुद्र खवळलेला नसेल तेव्हाच!)
पण खरंच जायचं आहे मला पण जलदूर्ग पहायला.. एक मायबोलीकरांसाठी खास ट्रिप ठरवा प्लिज प्लिज प्लिज!!!

फोटो आणि लिखाण दोन्ही छान. एकमेकाना पुरक.>>>>+१००

बाकी इतका छान किल्ला पण सबंध किल्ल्यावर मिळेल तिथे स्वतःच्या नावांची रंगरंगोटी करून त्या किल्ल्यास विद्रूप केलेय !>>>> काही लोकांना अस करण्यात काय मजा वाटते तेच समजत नाही, हा प्रकार बहुतेक सर्व ऐतेहासिक ठिकाणी पहावयास मिळतो. आपल्या पुर्वजांनी निर्माण केलेल्या ह्या समृध्द ठेव्यांचे जतन करण्याची जनजागृती करून असे प्रकार टाळण्याचे प्रयत्न करणे एवढचं आपल्या हाती आहे.

मस्तच झाली ट्रीप!! Happy

<<एक मायबोलीकरांसाठी खास ट्रिप ठरवा प्लिज प्लिज प्लिज!!!<< मंजुडी +१११११११११

मस्त

'गेटवे'वरुन दिसणारा समुद्र व त्यावर तरणार्‍या बोटींचे दृश्य जितके सुंदर वाटते त्यापेक्षा समुद्रातून गेटवेचा किनारा कितितरी पटीने जास्त बघेबल वाटतो..
>>>>
अगदी अगदी, नजरेपार होईपर्यंत आपण बघतच राहतो..

हिंवाळ्यात हा प्रवास करायचा तर समुद्रपक्ष्यांचे थवे बोटीच्या दोन्ही बाजुंनी उडू लागतात तो अनुभव काही वेगळाच..
>>>>>
यांना खाऊ पिऊ घातले मुबलक की बोटीबरोबर उडत राहतात, मग फोटोही छान काढता येतात.

किल्ला मस्तच, जलदुर्गाची आपलीच एक मजा असते. अगदी तिथे पोहोचणेही किल्ला सर केल्याचा आनंद देऊन गेला असेल बच्चेकंपनीला..
माश्यांचा फोटो विशेष आवडला, क्लोजअपमुळे का माहीत नाही पण छान सुकटाचा वास पोहोचला इथवर Happy

मंजूडी, बोट इतकी लहान आहे की समुद्र कितीही शांत असला तरी एवढी हालणारच.

ज्युनिअर भिडे वस्ताद आहेत, एवढ्या बोटीच्या हालचालीमध्ये पण एक झोप काढून घेतली.

मस्त रे यो....
मी दोन वर्षांपुर्वी केला होता तेव्हा माझा पण उंदेरी हुकला होता.. माझ्या अनुभवावर मी माबोवर एक लेखपण लिहीला होता.. आता एक उंदेरी स्पेशल ट्रेक करूया...

Pages