काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १३ वा. इजिप्त आणि मगरेब देश, वसाहतवादाचा वारसा

Submitted by शबाना on 9 June, 2014 - 08:38

वसाहतवादाचा वारसा

एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात या चारही देशांमध्ये सुरु झालेल्या या वसाहतवादाने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय विकासास एका बाजूने खीळ घातली पण त्याचबरोबर वासाहतिक देशांमध्ये प्रचलित शासन आणि कायदेव्यवस्था या वसाहतींमध्ये नेल्या, रुजवल्या. परिणामी इजिप्त, अल्जेरिया, मोरोक्को आणि लिबिया येथे ऑटोमन आणि नंतरचे वासाहतिक मालक अशा दोन्ही पद्धतींचा पगडा दिसून येतो. कैरो आणि इजिप्त हे १५१७ पर्यंत अब्बसीद खिलाफतीचे केंद्र होते. ओटोमान सम्राटाने खलीफाचा किताब स्वताकडे घेतला आणि इजिप्त ऑटोमन साम्राज्यात सामील करण्यात आले. खरी सत्ता मात्र स्थनिक मामलुक सैन्याचीच राहिली. १७९८ मध्ये नेपोलियनच्या साम्राज्यविस्ताराच्या आक्रमणात तोपर्यंत अस्तित्वात असलेली जुनी इजिप्शिअन प्रशासकीय व्यवस्था अगदी मोडकळली. फ्रेंच सैन्याने जाता जाता जुन्या सैन्याचा अगदी खात्मा केला आणि मोहम्मद अलीस आपली सत्ता स्थापण्यासाठी एक प्रकारे कोरी पाटीच मिळाली. मूळच्या अल्बेनिअन असलेल्या अलीने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. अली आणि त्याचे मामलुक सहकारी हे सर्व कोकेशिअन प्रांतातले गुलाम सैनिक फ्रेंच सैन्याचा बिमोड करण्यासाठी सुलतानाने पाठवले होते. अलीने या नवीन भागात आपले बस्तान बसवले आणि त्याचबरोबर ओटोमान सम्राटाला नाममात्र मान्यता देऊन आपलाच कारभार सुरु ठेवला. पुढच्या दो दशकात अली इतका सामर्थ्यवान झाला होता कि त्याने १८३० साले ओटोमान साम्राज्यावरच हल्ला केला व सिरीया आणि हेजस प्रांताचा मोठा भाग गिळंकृत केला. हेजस - मक्का व मदिना ही दोन शहरे आणि जुना तीर्थयात्रेचा रस्ता - या भागास संपूर्ण मुस्लिम आणि ओटोमान साम्राज्यात अतोनात महत्व होते. दोन्ही शहरातून येणारा कर हा प्रचंड होता आणि त्याचबरोबर या तीर्थक्षेत्राच्या जागांचे रक्षण ही खलीफाची जबाबदारी होती. ओटोमान सुलतानाला हे आक्रमण थोपवण्यासाठी आणि सिरीया आणि हेजस मुक्त करण्यासाठी ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याची मदत घ्यावी लागली होती. म्हणजेच आपल्याच सुभेदाराने केलेल्या बंडखोरीस रोखण्यासाठी ओटोमान सुलतानास दुसऱ्या साम्राज्यवादी शक्तीची मदत घ्यावी लागली होती. ओटोमान साम्राज्याचे युरोपीय साम्राज्यवादी देशांवरचे हे परावलंबन दुसऱ्या महायुद्धानंतर पर्यायाने ओटोमान साम्राज्याचे विघटन होईपर्यंत चालू राहिले. पण त्याचबरोबर स्थानिक सुभेदारावर विसंबून नावापुरते अधिराज्य करण्याची त्यांची शासनपद्धतीही तशीच राहिली. अलीच्या वारसदारानी स्वतास खेडीव ही पदवी ओटोमान सम्राटाकडून विकत घेतली आणि ओटोमान साम्राज्यांतर्गत आपली सत्ता अबाधित ठेवली. ओटोमान साम्राज्याचे विघटन झाल्यावर ब्रिटीशांकडे इजिप्तचा ताबा आला आणि त्यांच्यवतीने या खेदिवांची सत्ता पुढे चालू राहिली ती १९५० मध्ये गमाल नासरने केलेल्या बंडापर्यंत.

मोहम्मद अलीच्या इजिप्तच्या शासनाबद्दल ठाम कल्पना आणी बेत होते. त्याने इजिप्तमध्ये आधुनिकतेचा पाया घातला. महसूल पद्धतीत बदल करून त्याने आर्थिक आणि लष्करी सुधारणा सुरु केल्या. जमिनीचे, महसुलाचे आणि उद्योगधंद्याची सगळी मक्तेदारी अली आणि त्याच्या निकटवर्तीयांकडे होती. Khaled Fahmy's या लेखकाचे All the Pasha's Men. हे या काळ ची परिस्थिती विशद करणारे पुस्तक. ओतोमान साम्राज्यानेही याच काळात सुधारणा सुरु केल्या परंतु त्यांच्या तुलनेत अलीच्या सुधारणा टिकल्या आणि रुजल्या. परंतु अलीस अभिप्रेत असलेला स्वतंत्र आणि आधुनिक इजिप्त काही प्रत्यक्षात अस्तित्वात आला नाही. या अयशस्वीपणाचे महत्वाचे कारण म्हणजे आर्थिक गुंतवणूक आणि व्यवस्थापनातील अपयश. शेती, महसुलात केलेल्या प्रचंड सुधारणामुळे आलेला पैसा इजिप्त सरकारने मोठमोठ्या उद्योधन्द्यांच्या बांधणीत लावला. याकामी त्यांनी युरोपीय देशांकडून भांडवल व इतर सामग्री विकत घेतली. परंतु या प्रकल्पांचे आर्थिक व्यवस्थापन गडगडल्यामुळे इजिप्त कर्जबाझारी झाला आणि वसाहतवादाच्या पंजात सापडला. सुएझ कालवा, ब्रिटिशाची भागेदारी आणि नंतर सर्वच भागभांडवल त्यांनी खरेदी करून सुएझ कालव्यावर आपली सत्ता स्थापन केली. इजिप्तचे भाग भांडवल ऑटोमन साम्राज्याशी जोडलेले. ऑटोमन सम्राटही त्याचवेळेस कर्जबाजारी झालेला. या कर्जाच्या वसुलीसाठी इजिप्तच्या अर्थव्यवस्थेवर ब्रिटीशानी कब्जा केला आणि १८८१ साली लष्करास ही पाचारण केले. अशा प्रकारे इजिप्तच्या गळ्याशी आपले दोर त्यांनी करकचून आवळले. ब्रिटीशांनी स्वत सत्ता न चालवता अलीच्या वारसदारांची राजेशाही चालू ठेवली आणि इजिप्तवर असलेले ऑटोमन अधिराज्यही मान्य केले. ब्रिटीशांचा मूळ उद्देश सुएझ कालव्यातून भारताकडे चालणारी वाहतूक आणि दळणवळण त्याचबरोबर इजिप्तच्या पलीकडे असलेल्या सुदान, इथिओपिया, सोमालिया या भागांवरची पकड मजबूत करणे हाच होता. पहिल्या महायुद्धाने हे समीकरण बदलले. ब्रिटीशांच्या वतीने इजिप्तचे सैन्य महायुद्धात उतरले आणि ब्रिटिशानी इजिप्त आपली वसाहत म्हणून घीषित केले. पहिल्या महायुद्धाच्या शेवटी ओटोमान साम्राज्याचे विभाजन करून दोस्त राष्ट्रांनी साम्राज्याच्या इतर भागांवर कब्जा केला. ब्रिटनने १९२२ साली इजिप्तला स्वतंत्र म्हणून घोषित केले आणि राजेशाही पद्धत सुरु राहिली. परंतु हे स्वातंत्र्य मात्र नाममात्र होते. इजिप्तच्या अर्थव्यवस्थेवर, लष्करावर ब्रिटनचा प्रभाव होताच आणि त्याचे प्रतिबिंब दुसऱ्या महायुद्धात अगदी स्पष्ट दिसून येते. दुसऱ्या महायुद्धात इजिप्त हे एक ब्रिटीशांच्या हातचे प्यादे म्हणून वापरले जाते आणि याच काळात इजिप्तमध्ये राष्ट्रीय आंदोलन जोर धरू लागते. १८८१ ते १९५० असा ७० वर्षाच्या काळात ब्रिटीश प्रत्यक्ष राज्य इजिप्तवर करत नाहीत, परंतु आर्थिक, लष्करी, कायदे आणि प्रशासन या सर्व बाबतीत आपला ठसा इजिप्तच्या शासनव्यवस्थेत उमटवतात.

याचप्रकारे इतर उत्तर आफ्रिकेतले देशही वासाहतिक देशांचे प्यादे म्हणूनच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वापरले जाताना दिसतात. १९१२ मध्ये आपापसात करार करून स्पेन आणि फ्रांस मोरोक्कोवर आपले स्वामित्व जाहीर करतात. मोरोक्कोची घायकुतीला आलेली राजेशाही विनातक्रार हा करार मान्य करते. आर्थिक, राजकीय आणि लष्करी सर्वच बाबतीत मोरोक्कन संसाधने सढळ हाताने लुटली जातात. हीच कहाणी अल्जेरिया आणि त्युनिशियाची. फरक एवढाच कि दुसऱ्या महायुद्धानंतर मोरोक्को आणि ट्युनिशियाची स्वातंत्र्याची मागणी मान्य केली जाते. १९५६ साली हे दोन्ही देश स्वतंत्र झाले परंतु अल्जेरियात पुढची अनेक वर्षे रक्तरंजित संघर्ष चालूच राहतो. मोरोक्को आणि अल्जेरीयात फ्रेंच व ब्रिटीश प्रशासकीय संस्था या काळात जोमाने वाढल्या आणि स्वातंत्र्यानंतर टिकून राहिल्या. परंतु लिबिया, सोमालिया आणि इथिओपिय इथे मात्र इटली आपला असा ठसा उमटवू शकला नाही कारण खुद्द इटलीतच प्रशासकीय आणि कायदेविषयक संस्था कमकुवत होत्या. या देशांच्या स्वातंत्र्यलढ्याकडे आणि त्यानंतर विकसित होणाऱ्या शासनव्यवस्थाकडे वळूयात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users