अबकी बार "रायलिंग पठार"

Submitted by जिप्सी on 9 June, 2014 - 01:05

खरंतर एप्रिल-मे महिन्यात सह्याद्रीतील भटकंती थोडी कमीच होते. पण यावर्षी मात्र मे महिन्याच्या सुरूवातीला सांदण दरी आणि शेवटी मायबोलीकर इंद्रधनुष्य, जिवेश, संदिप आणि नरेश यांच्यासोबत रायलिंग पठार अशी सोप्पी भटकंती झाली.

मुंबई-पुण्याहुन नसरापूर मार्गे वेल्हाच्या दिशेने राजगड, तोरणा यांना नमस्कार करत भट्टी मार्गे पासली या गावातुन केळद घाटातुन केळद खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूला मोहरी या गावाकडे जाणारा रस्ता (?) आहे (याच रस्त्यावर एके ठिकाणी राजगड-तोरण्याचा संपूर्ण आकार नजरेस पडतो). रायलिंग पठारावर पोहचण्यासाठी आधी मोहरी गाव गाठावे लागते. मोहरी गावातून साधारण पाऊण एक तासाची वाटचाल केल्यानंतर आपण रायलिंग पठारावर पोहचतो. येथुन देखणा लिंगाणा आणि राजबिंड्या रायगडाचे दर्शन होते. घाट आणि कोकण यांना जोडणार्‍या सिंगापूर नाळ आणि बोराट्याची नाळेचा रस्ता देखील इथुनच आहे. लिंगाणा सर करणे ये अपने बस कि बात नही, सो रायलिंग पठारावरूनच यांचे रांगडे सौंदर्य टिपले. Happy येथुन दिसणारा सह्याद्रीचा नजारा केवळ वर्णनातीत. समोर उभा असलेला देखणा लिंगाणा, त्याच्या मागे दुर्गदुर्गेश्वर रायगड, टकमक टोक इ., लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेले पाने अन् दापोली ही छोटीशी गावं, कोकणदिवा आणि कावळय़ा-बावळय़ाची खिंड कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नव्हते.

वृत्तांतात जास्त काहि लिहिण्यासारखे नाही, पण एक अनुभव मात्र शेअर करतो:

काजळ काळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्याची साथ...

दोन-तीन दिवसांपूर्वी अमावस्या होऊन गेल्याने चांगलाच अंधार दाटलेला. साधारण नऊच्या दरम्यान गावातल्याच एका वाटाड्याला घेऊन आम्ही निघालो. वाट गर्द रानातून जात होती, त्यात तृतियेच्या चंद्रकोरीचा कितीसा तो उजेड? विजेर्‍यांच्या प्रकाशात चालत होतो. सोबत फक्त पानांची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर.घाटमाथ्यावर असल्याने हवेत किंचितसा गारवा होता पण सह्याद्रीतील चढउतारात आणि मे महिन्यामुळे अंगात घामाच्या धारा लागलेल्या. पुढे पुढे वाट अधिकच दाट झाडीतुन जाऊ लागली आणि अंधारातुन चालताना अचानक एका वळणावर......
एका झाडावर अगणित काजवे चमकताना दिसले. संपूर्ण झाड काजव्यांनी भरलेलं होतं. एकाच वेळी सगळ्या काजव्यांचे स्विच ऑन ऑफ होत होते. झाडासोबतच समोरची दरीही हजारो काजव्यांनी लखलखत होती. निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहताना भान हरपले. आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं पहात होतो, अनुभवत होतो. वर नभांगणात लाखो तारका तर इथे जमिनीवर हजारो काजवे लुकलुकतं होते. आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी हि "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला हा "काजवा महोत्सव" भरतो. हा सारा खेळ कॅमेर्‍यात साठवता आला नाही पण मनात मात्र कायमचा जपून ठेवला आहे.

ये रात ये खामोशी, ये ख्व़ाब से नज़ारें
जुगनू हैं या जमींपर उतरे हुए हैं तारें

Believe me कधीही विसरता येणार नाही असे दृष्य होते.

प्रचि ०१
वेल्ह्यामार्गे कुंबळे या गावी जाणारी "स्वारगेट-कुंबळे" एस्टी
(गेल्यावर्षीच्या मढेघाट सह्यमेळाव्यातील गोप्या घाटमार्गे केळदला येणार्‍या मायबोलीकरांना हि यष्टी नक्कीच आठवत असणार. Happy )

प्रचि ०२
गरूडाचं घरटं - किल्ले तोरणा
प्रचि ०३
तोरणा किल्ल्यावरची बुधला माची
प्रचि ०४
किल्ले तोरणा आणि बुधला माची
प्रचि ०५
तोरणा-राजगड
प्रचि ०६
मोहरीगावाच्या दिशेने
प्रचि ०७
संधीप्रकाशातील लिंगाणा आणि किल्ले रायगडावरील टकमक टोक
प्रचि ०८

प्रचि ०९

मुंबईहुन साथ देणारी आमची स्विफ्टुकली मोहरी गावचा उंबरठा ओलांडण्यास राजी नव्हती. पायापडुन, मनधरणी करूनही ती पुढे येत नव्हती. उलट एकाच जागी उभी राहुन चाक गरागरा फिरवत आपला राग व्यक्त करत होती. सो स्विफ्टुकलीला तेथेच एका सुरक्षित जागी उभी करून १० मिनिटे चालत मोहरी गावात पोहचलो.

रागावलेली स्विफ्टुकली आणि मनधरणी करणारे आम्ही
प्रचि १०
SN=Singapoor Naal & RP = Railing Pathar
प्रचि ११
रायलिंग पठार आणि लिंगाणा
प्रचि १२

प्रचि १३
आमचा टेन्ट
प्रचि १४
आकाशगंगा आणि टेन्ट
प्रचि १५

प्रचि १६
आकाशगंगा
प्रचि १७

प्रचि १७ (अ)

प्रचि १७ (ब)

प्रचि १७ (क)

प्रचि १७ (ड)

(प्रचि सौजन्यः जिवेश म्हात्रे)

सूर्योदय
प्रचि १८

प्रचि १९
विविध अँगलने लिंगाणा
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
लिंगाण्याच्या पोटातील गुहा
प्रचि २८

लिंगाण्याचा माथा. या फोटोवरून कल्पना येईल कि लिंगाण्याच्या माथा गाठणे कुण्या येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे. आशुचॅम्प तुला कडक सलाम रे!!
प्रचि २९
कोकणदिवा
प्रचि ३०
आमचा टेन्ट
प्रचि ३१
आणि हा शेजार्‍यांचा टेन्ट Happy
प्रचि ३२

मिलके भी हम ना मिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के हैं फ़ासले तुमसे न जाने क्यूँ
अनजाने हैं सिलसिले तुमसे न जाने क्यूँ
सपने हैं पलकों तले तुमसे न जाने क्यूँ
कैसे बतायें क्यूँ तुझको चाहें, यारा बता ना पाएँ....

प्रचि ३३

(रायलिंग पठारासंबंधित अधिक माहिती, नाश्ता जेवणाची सोय "सह्याद्री गुगल" अर्थात मायबोलीकर "सह्याद्रीमित्र" म्हणजेच ओंकार ओक याने करून दिली. याला कधीही, कुठेही आणि सह्याद्रीसंबंधित कुठलीही माहिती विचारा न कंटाळता सांगतो. अगदी किती किमी अंतरावर कुठले गाव आहे, त्याच्यानंतर किती मीटरवर कुठला टर्न आहे, गावचा सरपंच कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर सगळं ह्याला तोंडपाठ. म्हणुन सह्याद्रीत कुठे भटकायला जायचे असले तर गूगलवर सर्च करत बसण्यापेक्षा सरळ ओंकारला एक फोन करतो. सगळी माहिती क्षणात मिळते. Happy
मनापासुन धन्यवाद रे ओंकार).

(तटि: प्रचि तितकेसे खास आलेले नाही. Happy )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टार ट्रेलचा फोटो>> धन्स रे.
रच्याकने ---काजव्यांचा नजारा.>> झाडाला हिरवी फळे लागल्यासारखा भास देणारा कालचा फोटो हाच का?

वॉव, जिप्सी. झक्कास!

आकाशगंगेचा फोटो पाहून जीव जळला आहे.

माझ्या घरातून पूर्वेच्या दिशेला अनेकानेक पर्वतरांगा दिसतात. त्यात लिंगाण्यासारखाच एक सुळका दिसतो. पण तो लिंगाणा नाही. कोणता असावा? लो.प., शिवडी, बुचर आयलंड या लाईनीत पुढे बघितलं की दिसतो.

आशु लिंगाण्यावर चढाई करून आला आहे? धन्य आहे. Happy

मलंगगडाच्या समोर उभं राहिलं असता सगळ्यात डाव्या बाजूच्या डोंगरावरच्या अवघड वाटेनं एकदा मी काही मंडळी तो डोंगर चढताना पाहिली होती. तो चढ देखिल कठिण वाटला होता.

त्यात लिंगाण्यासारखाच एक सुळका दिसतो. पण तो लिंगाणा नाही. कोणता असावा?>>>>मामी, तो कर्नाळ्याचा सुळका. लिंगोबाचा डोंगुर Happy

जिप्स्या कातील फोटो रे....
आकाशगंगा लईच खास....च्यायला जाम जळफळाट होतोय....पुढच्या वेळी मला न घेता जाच रे मग बघतो तुझ्याकडे....

बाकी, लिंगाणा तर काय प्रश्नच नाही...पठारावरून जो काय अँगल मिळतो तो लाजवाब आहे....

रच्याकने, कुणी बघायची राहून गेली असेल तर ही माझी रिक्षा

http://www.maayboli.com/node/47827

कमाल लोक आहात तुम्ही. सलाम !!!

<<<<मुंबईहुन साथ देणारी आमची स्विफ्टुकली मोहरी गावचा उंबरठा ओलांडण्यास राजी नव्हती. पायापडुन, मनधरणी करूनही ती पुढे येत नव्हती :):)

>>>आकाशगंगेचा फोटो पाहून जीव जळला आहे. >> मी पण.
काय नशिबवान लोक्स आहात तुम्ही सगळे!! असं निरभ्र आकाश आणि त्याखाली असं तंबू ठोकून राहायचं. वाह!!
फोटो भारी आहेत हे वेगळे सांगणे नकोच. Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

आकाशगंगा आणि स्टार ट्रेलचे आणखी काहि फोटोज (प्रचि १७ अ,ब,क,ड) पोस्ट केले आहेत. चारही प्रचि जिवेशच्या कॅमेर्‍यातुन साभार. Happy

कंसराज Proud

जिप्स्या मस्तच रे... आणी आशु सारखेच मि पण म्हणतो.. पुढच्या वेळेला परस्पर गेलास तर बघच... Happy

(गेल्यावर्षीच्या मढेघाट सह्यमेळाव्यातील गोप्या घाटमार्गे केळदला येणार्‍या मायबोलीकरांना हि यष्टी नक्कीच आठवत असणार. )>>>> हो ना.. अगदी आठवतेय... अलीकडे आम्ही, पलीकडे एस्टी आणी मध्ये बेफाम नदी... Happy

फोटोज चांगले आहेत जिप्सी. रायलिंग पठारावरूनच ही वाट 'बोचेघोळ नाळी'तून रायगडावर जाते. मस्त आहे एकदम.>>> नाही आडो... ती ही वाट नव्हे... 'बोचेघोळ नाळ' खानू गावातून वारंगीला उतरते... ह्या गावातून सिंगापूर नाळ आणी बोराट्याची नाळ अश्या दोन वाटा कोकणात उतरतात.... आणी वरती जिप्सी म्हणालाय ती निसणीची ती पण ही वाट नव्हे... निसणीची वाट चांदर वरून कोकणात पान्याला उतरते..

आता रायलींग वरून बोचेघोळीतून उतरायचे असेल तर मोहोरी-चांदर-खानू असा क्रेस्टलाईन क्रॉसकंट्री ट्रेक करावा लागेल (मोहोरी ते खानू अंतर कमीत कमी ५ तास):) Happy

जिप्सी

प्राचि १७ अ ब क ड प्रचन्ड आवडले ..ह्या फोटोन्चि ची Exif Info मिळेल का?

आभारी आहे,
अमित

जिप्स्या आकशगंगा व स्टार ट्रेलचे फोटो भन्नाट. तूला कॉल करतो कधीतरी. एक जागा आहे स्टार ट्रेलकरता.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

ह्या फोटोन्चि ची Exif Info मिळेल का?>>>>>अमित हि Exif Info Happy

आकाशगंगा:
exif : 24mm,
f4,
ISO 3200,
32sec remote release,
flash fired twice in tent to lighten up.
PP in lightroom 4.0

Star trail
24mm,
f4,
ISO 3200,
30sec, 80 clicks approx.
merge in star trail software to get the effect.
PP in lightroom 4.0

तूला कॉल करतो कधीतरी. एक जागा आहे स्टार ट्रेलकरता.>>>>पण आता पावसाळ्यात तेव्हढे निरभ्र आकाश नसणार ना?

@ स्वच्छंदी, बरोबर आहे तुमचं. मी कन्फ्युज झाले. Uhoh

मी बोचेघोळ नाळेतून रायगडाला गेलेय. वेल्ह्याहून जवळपास ८०% चालत त्या गावात पोचले होते. गावाचं नावच विसरलेय पण पार. Sad त्या गावात एक रात्र मुक्काम करून रायदंड पठार (?) चढून दुसर्‍या दिवशी 'खानूच्या डिग्यावर' मुक्काम केला होता आणि तिसर्‍या दिवशी रायगडावर पोचलो होतो. पाने, वारंगी गावांची नावं आठवली.

Pages