लीडर

Submitted by हायझेनबर्ग on 9 June, 2014 - 00:10

* २००७ मध्ये सदस्य झाल्यावर माझी ही मायबोलीवरची बहूधा पहिलीच कथा असावी. २००९ मध्ये काही कथा मी काढल्या होत्या आणि त्यांची दुसरी कॉपीही नव्हती. आज अचानक जुन्या पेन ड्राईववर ही सापडली. माझ्या मते बहूतेक हा कथेचा पहिलाच ड्राफ्ट असावा. नव्याने सदस्य झालेल्या मायबोलीकरांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहे.

शर्‍याचा हा सलग दुसरा दिवस होता कँटीनमध्ये न येण्याचा. तो असा कधीच मला न सांगता गायब होत नसे. सम्या, श्री, सोनल, चारु अन् मन्या सगळेच लेक्चर संपवून कँटीनमध्ये नेहमीसारखाच दंगा घालत होते. का कुणास ठाऊक मला दुपारपासून लेक्चरला जावसं वाटतच नव्हतं , बहुतेक शर्‍यामुळेच असावं.

सम्या-सोनलची कालच्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनवरुन आजही जुंपली होती. तुझं नि माझं जमेना अन् तुझ्यावाचुन करमेना, असा किस्सा होता दोघांचा. श्री सवयीप्रमाणे मागच्या पिकनिकच्या हिशोबात गुंग, सी.ए. चा कार्टाना, ग्रुप च्या सगळया खर्चाचं प्लॅनिंग याच्याकडेच लागलेलं कायम. मन्या आणि चारु, शर्‍याला व्हॅनिला फ्लेवर शिव्या घालत कसेतरी कुठूनतरी बिपाशाच्या फिगरवर घसरले. मला शर्‍या नाहीतर उगीचच चुकल्याचुकल्या सारखं वाटत होतं. सकाळीपण सगळे शर्‍या नाही आला अजून कळाल्यावर चकितच होते.

शर्‍याचं आज लिनक्सचं प्रॅक्टिकल होतं आणि त्यालाही तो उगवला नव्हता म्हणजे अतिच होतं, ओएस चा कीडा होता ना, मास्तरला लॅब इन्स्टॉलेशनपण यानेच करुन दिलेलं आणि वरुन मास्तरचीच खेचणार साला नेहमी.

शर्‍या, 'शरदराव वसंतराव बोडखे-पाटील' असंच नाव होतं कॉलेजच्या रजिस्टरमध्ये शर्‍याचं. सातार्‍याच्या बागायतदाराचा हा पोरगा, सधन शेतकरी कुटुंबाचे सगळे रांगडे गुण उतरले होते गड्यात, एक स्वभाव सोडला तर. अगदी त्याचे माई-आबा ही त्याला शरदरावच म्हणायचे अन् आम्ही त्या शरदरावाचा एकदम शर्‍या केला होता.

रविवारी सकाळी गावाकडं जातो म्हणुन सांगून गेलेला, एरवी देखील गावाकडून एका दिवसात तीन-तीन वेळा फोन करणारा हा पोरगा मंगळवारचं कॉलेज संपल तरी उगवला नव्ह्ता. तसा तो नेहमीच शनिवारी गावाकडे जाण्यासाठी निघून सोमवारी सकाळीच कॉलेजात उगवत असे, पुणे सातारा आहेच कितीसं अंतर. बरं हॉस्टेल नाही आवडत म्हणून युवराजांना त्याच्या दादांनी स्पेशल रुम घेऊन दिली होती, मन्या आणि तो दोघं तिथंच रहायची. हा रुमवर येऊन झोपला म्हणावं तर तशीही शक्यता नव्हती, कारण चावी एकच आणि तीही मन्याकडं.

'ए मन्या, शर्‍याचा गावाकडचा फोन नंबर आहे ना रे तुझ्याकडे ?' मी मन्याला एकदम विचारलं.
'आहे रे अभि, पण रुमवर आहे नक्की, त्याच्या दादांनी दिलेला मागे,पण फोन मध्ये फीड करायला विसरलो', मन्या आठवत म्हणाला.
'सोड रे अभि, तू कशाला एवढी काळजी करतोयेस, त्याला नाही कळत का ग्रुप मध्ये सगळे वाट बघत असतील म्हणून', चारु मला समजावत म्हणाली.
'बघा रे कोण बोलतंय! Look who is talking! रडेश कुठची', श्रीने मधेच टाकला.
'गप रे श्री, नको छळूस तिला,नाहीतर इथेच भोकाड पसरायची ती ' सोनल ने श्रीला मध्येच तोडलं.
'तो एक तर त्याच्या शिवारात हुंदडत तरी असेल नाही तर त्याच्या म्हशींबरोबर डुंबत तरी असेल' इति सम्या.
'ए सगळे गपा ना जरा, मन्या तू रात्रीच फोन टाक शर्‍याच्या गावाकडं, बघुदे तरी कुठं रमलाय साला.' मी सगळ्यांना थांबवत दुसरं वाक्य जरा रागातच म्हणालो.

पुढचे दोन तास ठरल्याप्रमाणे यंदा फिरोदियासाठी मोकाशींच 'साठेचं काय करायचं' घ्यायचं का याची खलबतं करण्यातच गेले. सात वाजले तसे सगळेच निघालो, जातांना सग्ळ्यांनी, शर्‍या उद्या नाही आला तर काही तरी ऍक्शन घ्यायची, अस पक्कं केलं होतं. श्री चारुला रोजच्यासारखा ड्रॉप करणार होता, मन्या जिमला निघाला. सोनलला बसस्टॉप वर सोडून मी आणि सम्या हॉस्टेलकडं चालत निघालो, शर्‍याचा भुंगा काही केलं तरी मेंदू पोखरतंच होता.

गेल्या दोन महिन्यांपासून शर्‍या जरा अबोलच झाला होता, तुट़क्-तुटक वागत होता, प्रत्येक रविवारी गावाकडं काय जात होता. तरी दोनदा फैलावर घेतला होता त्याला, 'इंजिनिरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरला सबमिशन्समध्ये हाराकिरी का करतोय म्हणून'.

गेल्या बुधवारी रात्री कँटीनमधे खोदून खोदून विचारलं,
'शर्‍या, अरे काय झालय काही सांगशील का?, अस तुट़क्-तुटक वागणं, एकटं एकटं रहाणं ग्रुपच्या कायद्यात बसत नाही मित्रा. घरी कुणी काही बोललं का? मास्तुरे सबमिशन्ससाठी बडबडला का? वैताग आलाय का कसला, टेंशन आहे का काही? अरे काहीतरी बोल ना यार' मी अगतिक झालो होतो पण शर्‍या ढिम्मच.
'कुणी पोरगी आवडली वाटतं? प्रेमात बिमात पडला की काय कुणाच्या, हां? मी त्याचा खांदा हलवत विचारले, तरी हुं की चुं नाही केलं त्यानं.
'हे बघ शर्‍या, मन्या सिगरेट पितो पण लपवतो का कुणापासून? सम्या ने पण सगळ्या ग्रुप समोर प्रपोज केला सोनलला?
चारु सांगतेच ना सगळं तिच्या भावाच्या डिव्होर्सबद्द्ल, श्रीचं अमेरिकावेड पण सगळ्या ग्रुपला माहितेय, मी तर हा ग्रुपच जगतोय बाबा गेल्यापासून, मग तुच का असा अचानक अबोल? काय लपवतोयस आमच्यापासुन तू? सांगना कुठला व्हायरस पोखरतोय तुला आं? अरे चार वर्षांचा होतोय आपला ग्रुप आता, Its time for celebration dude आणि तू राग मायुसफेस आळवतोयेस " यावेळी मी शर्‍याचा खांदा जोरात दाबला, तशी त्याने मान वरती केली, टचकन् दोन थेंब त्याच्या गालावर ओघळले आणि दुसर्‍याच क्षणी शर्‍या उठून चालायला लागला.
'शर्‍या अरे.....थांब मी... ' पण मीच स्वतःला थांबवले, माझी खात्री होती तो आज ना उद्या नक्की आपणहूनच काय ते सांगेल.

मागे सगळा ग्रुप त्याच्या गावी गेला होता, तेव्हाचा शर्‍या अन् आत्ताचा शर्‍या यात जमीन-आस्मानाचा फरक होता. त्याचा गाव फिरवतांना, त्याच्या हिरव्या शिवारांमध्यल्या कॅनालमध्ये पोहतांना, म्हशींची दुधं काढतांना नुसता कानात वारं भरल्यासारखा ऊडत होता सगळीकडे हा खोंड आम्हाला घेऊन. दादांनाही खास गाडी घेऊन बोलावलं होतं पुण्याला, ग्रुपला न्यायला.

शर्‍याचे दादा, त्याचा मोठा भाऊ, एकदम राजा माणूस. लाल मातीत कमावलेल शरीर, दमदार आवाज अन् धारदार मिशा, महिन्याला एकदा तरी खरेदीला पुण्यात येणार हे पक्कं. शर्‍यावर खूप जीव त्यांचा. म्हणुनच हे शेंडेफळ जरा जास्तीच लाडावलेलं होतं. ते आले की ग्रुपची फुल टू ऐश असणार, मग रुपाली, गार्डन्-कोर्ट, सिटी-प्राइड, बोलिंग, ग्रुप एकदम खुश.

पहिल्याच खेपेला जातांना शर्‍याचे दादा मला अचानक बालूला घेऊन म्हणाले,
'काय रं गड्या, तू लीडर दिसतो या समद्यांचा, आं?
'तसं काही नाही दादा, मी असं लीडर वगैरे काही नाही ......' या अचानक प्रश्नानं मी जरा अवघडलोच होतो.
'हा हा, म्या आडाणी जरुर हाय पण खुळा न्हाई, एक काम करशीला का आमचं?' दादांचा मिष्किल प्रश्न.
'कसलं काम दादा?' मी पण एखाद्या आज्ञाधारक मुलासारखं विचारलं.
'त्याचं आस हाय, आमचं शरदराव अंमळ हट्टी हायती, काय बी गोष्ट मनाईरुध घडली तर लई बैचेन होत्यात , गपगप राहत्यान, लय कासावीस व्हत्यान, पण कुणाजवळ एक शबुद बी न्हाय काढायचे, सवतालाच तरास करुन घेत्यात बघा. तर वाईच काळजी घ्या त्येंची. पयलाच टाईम हाय नव्हं त्येंचा घराबाहेर. मायला बी लई घोर लागतोया बघा आमच्या.' दादांचा चेहरा खरच काळजीत होता.
'हो दादा, तुम्ही आजिबात काळजी करू नका, आम्ही छान सांभाळू शर्‍याला, आय मीन शरद.....रावांना' मी उगीच थोडा गडबडलो.
'बरं बरं येतू आम्ही, तुम्ही समदी बी पोरं लई चांगली अन् शहाणी हायाती ' दादांचा चेहरा आता थोडा हसरा वाटला.

मात्र शर्‍याचे दादा म्हणत होते त्यात नक्कीच तथ्थ्य होतं हे मला लवकरच कळालं.

शर्‍या ग्रुपमध्ये कुणासाठी एकदम हळवा असेल तर ती म्हणजे चारु. चारु एकदम अर्चना जोगळेकरची जुळी बहीण वाटावी अशी, प्रचंड नाजुक, टिपिकल कोब्रा, तिची सतत काही ना काही कुणकुण चालु असायची, आज हे दुखतंय, आज ते दुखतंय. नाटकं सगळी, तिला माहितेय शर्‍या पुरवतोय ना सगळे लाड. चारुला आवडतं म्हणुन वणवण करत खरवस घेउन यायचा शर्‍या दर खेपेला सातार्‍याहून.

एकदा सिंहगड चढतांना पाय मुरगळला तिचा, तर कंपनी म्हणूनन अनवाणी गड ऊतरला हा मूर्ख तिला पाठुंगळीला घेऊन. अनवाणी? त्याने काय तिच्या पायातली कळ थोडीच थांबणार होती, पण ऐकेल तर शप्पथ, सुजले दोन्ही पाय मग दुसर्‍या दिवशी.
'याच्या डोळ्यांत वेडाची झाक दिसते का रे अभि तुला?' असा सोनलने मध्येच टोमणा हाणला तर म्हणाला,
'सोनलमावश्ये, तू आजारी पड्ल्यावर आई न जेवता बसतेच ना तुझ्या उशाशी, मग ती उपाशी राहिली तर तू बरी होशील असं तिला वाटतं का? नाही ना? तरी असतेच ना तुझ्या उशाशी ती रात्रभर जागी?
आत्मक्लेशाचं शर्‍याचं हे तत्वज्ञान बहुतेक कुणालाच पटलं नव्हतं, पण तरी सगळे निरुत्तर होते हे नक्की.

एक दोन वेळा मुद्दाम त्याला बोलता करावा म्हणुन चारुवरुन डिवचला,
'शर्‍या काय बाबा, चारुलाच फक्त सेलिब्रिटी ट्रीटमेंट देणार, आणि आपण कायम एक्स्ट्रातच बसणार'
'शर्‍याच्या गावच्या म्हशी फक्त चारुसाठीच गाभण रहातात का रे श्री?'
अशा डिवचण्यामुळे तो मनातून बहुतेक चिडत असावा, पण चेहर्‍यावर एक रेषही हलायची नाही.
शेवटी एकदा एका बेसावध क्षणी मी विचारलंच त्याला, 'शर्‍या, चारु आवडते ना तुला?'
तर थंडपणे माझ्याकडे बघत म्हणाला, 'अभि, पुन्हा असलं भलतं सलतं नको विचारूस' मी एकदम अवाक, त्याच्या थंड ऊत्तराने.

------------------------------------------

रात्री मेसमध्ये मन्या एकटाच आला, म्हणजे शर्‍याचा अजुनही पत्ता नव्हता.
'दादांचा फोन झाला का मन्या?' मी आतुरतेन विचारलं.
'लागत नाहीये यार, तासभर झाला प्रयत्न करतोय, Out Of Range सांगतोय सारखा $%&#', मन्याने नेटवर्कला डार्क चॉकलेट फ्लेवर हाणला.

चारुचा हॉस्टेलवर दोनदा फोन येऊन गेला होता, सोनल रात्री साडेनऊला तिच्या बाबांची कार घेऊन आली हॉस्टेलला, शर्‍याबद्दल विचारायला. मला चारुची पण काळजी वाटत होती म्हणून सोनलला रात्री तिच्याकडेच झोपायला पाठवलं. आजची रात्र काढून मी आणि मन्या सकाळीच सातारला जायचा विचार करत होतो त्यामुळे तोही रात्री रुमवर परत न जाता हॉस्टेलवरच थांबला. श्रीची गुरुवारी मुंबईला टोफेलची एक्झाम होती म्हणून मन्याच्या मोबाईलवर त्याचा फोन आला तेव्हा मन्यानं सारंकाही आलबेल असल्याचा दिखावा करत त्याला बेंड इट लाईक बेकहॅम केला. का कुणास ठाऊक पण शर्‍याच्या मागच्या दोन महिन्यातल्या वागण्यावरुन सगळाच ग्रुप काळ्जीत होता.

झोप तशी लागतच् नव्हती, मन्या माझ्या बेडवर लवंडला होता, सम्यापण बेडवर पाय ठेऊन खुर्चीतच पेंगत होता.
मी आपला मगापासून खिडकीत उभा, रविवारी सकाळी निघालेला शर्‍या आठवला.

अचानक रात्री दीडला मन्याचा मोबाईल वाजला, दोघे ही तड्क उठले, 'आनेवाला पलं, जानेवाला हे' ची ट्युन, पण एकदम कर्कश्य वाटली. सोनल होती, 'चारुनं जाम रडारड लावलीय म्हणे', मी मन्याकडून खसकन् फोन ओढला,
'चारु, काही कळतं का तुला? किती वाजलेत बघ जरा, आई-बाबा उठले तर काय सांगणारेस त्यांना' मी दबक्या पण दटावणीच्या सुरात म्हंटलं.
'त्याला यावेळी खरवस नसेल मिळालं रे, तेच शोधायला गेलाय तो', चारुचा आवाज खूपच रडवेला होता. मलाच गलबलून येतंय की काय वाटलं. तिला कशीतरी समजाऊन झोपवली. मीच काय, सगळेच ग्रुप जगतायेत असं आता मला वाटत होतं. फोन मन्याकडं देतच होतो तर परत तीच कर्कश्य ट्यून.
'तिच असणार, ही चारु ना उगीच रडून टेंशन वाढवते यार सगळ्यांचं' सम्याचा वैताग.

'ए अभि, शर्‍याच्या दादांचा फोन, शर्‍याच असणार म्हणजे', मन्या आनंदानं अक्षरशः ओरडलाच.
'शर्‍याचा फोन, आण ईकडं मन्या, थांब झापतोच साल्याला चांगला. कोंबडीचा! फार झाली त्याची थेरं आता, समजतो कोण स्वतःला , ग्रुपपेक्षा मोठा कधीपासून झाला हा? चारुला पण रडवली त्यानं?' माझा राग उफाळून येतच होता.

'हॅलाव, मनिषराव', आयला हा तर दादांचा आवाज, बरं झालं आधीच काही बकलो नाही, मी झटक्यात सावरलो.
'हां, बोला दादा मी अभि बोलतोय, अभिराज' , मी घाईतच बोललो, दादांचा आवाज नेहमीचा दमदार वाटत नव्हता.
'लई मोठ्ठा घोळ झालाय आभिराव, शरदरावांनी ह्यो काय कुटाणा करुन ठेवलाय काय बी कळंना? दादांचा आवाज यावेळी नक्कीच कापरा होता.
'काय झालं दादा, शरद बराय ना?' माझाही आवाज आता थरथरला , काय केलय या शर्‍यानं आता कोण जाणे.
'जीव दिलाय पोरानं नाशकांत, तिथंच आलोयाती आम्ही समदे', पाठोपाठ दादांचा बारीकसा हुंदका.
'काSय जीव दिलाय शर्‍यानं, नाशकांत', मी किंचाळलोच.
पाठोपाठ मन्या अन् सम्याही किंचाळले 'काSSय, आत्महत्या?'
'जिता हाय आजून, आपरेशन चालू हाय, पर पोरगी गेली बघा जिवनिशी', परत तोच हुंदका.
'पोरगी?' मी पुरता हादरलो, मला फक्त मन्या अन् सम्याचे विस्फारलेले डोळे दिसत होते.
'व्हयं, तुम्ही बी या बीगीबीगी जमलं तर, पोरंग काय लई वेळ काढलसं वाटत न्हाय, पत्त्या घेवा लिवुन, साने ऍक्शिडेंट हास्पिटल, पंचवटी, नाशिक, बराय ठिवतो मंग '

तिकडनं एंगेज टोन ऐकू आली तसा मी भानावर आलो, सगळी रुम फिरतेय की मलाच गरगरतंय. घसा एकदम कोरडा पडला होता. मन्या अन् सम्याला न सांगताच सगळं कळलं होतं, दोघेही वेड्यासारखी माझ्याकडं बघतच होती. मी उघड्या खिडकीपाशी जाऊन बाहेर बघत उभा राहिलो दादांच्या बोलण्यातले धागे जुळवत. डोक्यात प्रश्नांची वावटळ ऊठली होती,

'शर्‍या नाशकांत कसा? ही पोरगी कोण? आणि आत्महत्या? असा काय वणवा पेटला होता?'

परत मला रविवारी सकाळी निघालेला शर्‍या आठवला, 'अरे हा ईथेच तर आहे, अन् हे काय नाशिक थोडीच आहे, दादांनी उगीचच खेचली वाटंत, आज एप्रिल........., पण ही अशी भयाण शांतता, हा थंड अंधार हे नवीन नाहिये मला......बाबा गेले तेव्हा ?........गेले....' अन् मी एकदम भानावर आलो.

'मन्या श्री ला उठव, गाडी घेउन यायला सांग, नाशिकला निघतोय आपण लगेच,
सम्या चारु, सोनलला म्हणावं तयार रहा ऊचलतोय तुम्हाला अर्ध्या तासात, शर्‍या आजारी आहे म्हणून सांग फक्त.' मी फटाफट ऑर्डर्स सोडल्या.
'अभि, चारु आणि सो....'
'हो न्यायचय तिला पण, ती एकटी नाही राहू शकणार, आपण सांभाळू तिला' मी सम्याला मध्येच तोडलं.
'मन्या, श्री आणि सोनलचा ब्लडग्रुप बी पॉझिटिव्ह आहे ना, शर्‍याचा तोच आहे', मी आठवत म्हणालो.
'आणि तुमच्या रुमवरही जायचय आपल्याला' मी लगेच बोललो.
'रुमवर कशाला?, श्री आलाकी ईकडूनच निघुया आपण उगीच वेळ जाईल' मन्याचा रडवेला प्रश्नार्थक चेहरा.
'रुमवर जायला पाहिजे मन्या, काम आहे माझं', मी मन्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटले. रुमपार्टनर आणि आत्महत्या ऐकून त्याचा तोल ढळत होता.

सम्या अजूनही चारु आणि सोनलला आवरण्याचा प्रयत्न करत होता, चारु माझ्याशिवाय कुणाचंच ऐकणार नाही महित असूनही मी सम्याच्या त्यासाठी मदत मागणार्‍या डोळ्यांकडे दुर्लक्ष केलं. माझं मन अजूनही शर्‍या, नाशिक, पोरगी हा गुंता सोडवत होतं.

दहाच मिनिटांत श्री धावतपळंत रुममध्ये आला, त्याला दरदरुन घाम फुटला होता.
'अभि, शर्‍या, काय झालं त्याला, तो नाशकांत कसा, ही आत्महत्या काय भानगड आहे?'.
'हे बघ श्री, तुला जेवढं महितेय त्यापेक्षा जास्ती इथे कुणालाच काहिही महित नाहिये, तिथे पोहोचल्यावरच काय ते कळेल', मी श्रीला विझवलं. पाचव्या मिनिटाला आमची गाडी मन्या-शर्‍याच्या रुमखाली होती. मन्याकडून चावी घेऊन मी एकटाच वर गेलो. शर्‍याची बॅग उघडून सगळे कप्पे रिकामे केले, जे मी शोधत होतो, ते मला मिळालं होतं.

------------------------------------------

सकाळचे सात वाजत होते आणि आमची गाडी नाशकांत शिरत होती. चारु रडूनरडून थकली होती, तिचा मलूल चेहरा मन्याच्या खांद्यावर टाकून, आरशातून एकटक माझ्याकडे बघत होती, मला खूपच कावरंबावरं झालं होतं तिच्या आटलेल्या डोळ्यांत बघतांना. मन्याने खिडकीबाहेर लावलेली नजर तसुभरही हलवली नव्हती, सोनलने मगापासून सम्याचा हात घट्ट धरुन ठेवला होता. श्री माझ्या बाजुला, मला रस्त्यांचे अंदाज सांगत होता. एव्हाना त्या दोघींनाही सम्याने खरं काय ते सांगितल होतं.
मागच्या दोनेक तासात कुणीच कुणाशी काही बोललं नव्हतं. सगळेच झाल्याप्रकाराने प्रचंड हादरले होते, ग्रुपचा श्वास थांबला होता.

'क्चॅ...., तो आपला शर्‍या नसणारच मुळी, शर्‍या असलं काही करुच शकत नाही, आणि त्याला कुठली आलीय कोण मैत्रिण नाशिकमध्ये '.... सोनल स्वतःशीच बोलली बहुतेक.

-----------------------------------------

I.C.U च्या जाड काचेरी दारातून शर्‍या निपचित पडलेला दिसला, शर्‍याचे माई अन् दादा बाहेर बाकड्यावर बसलेले दिसले. माई हमसून हमसून रडत होत्या. आबा कॉरिडोअरच्या दुसर्‍या टोकाला पोलिसांशी बोलत होते. आम्हाला बघताच दादा उठून आमच्याकडे चालायला लागले. का कुणास ठाऊक मला वाटत होते त्यांची नजर माझ्यावरच रोखलेली होती. माझी मान आपसुकच खाली गेली. कुणाशी एक शब्दही न बोलता दादा फिरले आणि आम्ही त्यांच्याबरोबर माईंकडे चालू लागलो. ते अंतर कापतांना पायाची एकन्एक नस ताठरुन तट्ट तट्ट तुटत होती.

आम्हाला बघतांच माईंचा भावनांवरचा बांध फुटला, तशा सोनल आणि चारु पुढे झाल्या. मागच्या चार तासांतच कितीतरी मोठ्या झाल्यासारख्या वाटल्या त्या मला.

'काय म्हणावं या पोराला?' माईंचा आवाज कापत होता. 'कुठलं खुळ डोक्यात घातलं लेकरानं आन काय करुन बसला, काय सुदिक पत्त्या न्हाय लागु दिला कुणाला, काय व्हतं त्याच्या मनात त्येचा', चारु रडतांनाही रडणार्‍या माईंना धीर देत होती.
मला दादांची नजर अजुनही माझ्यावरच रोखलेली वाटंत होती. माझी मान वर करुन त्यांच्याकडं बघायची अजिबात छाती होत नव्हती. सगळं एकदम गुढ आणि अनाकलनीय.

'तुम्हाला बी काय बोल्ला न्हाई का त्यो कधी?' माईंच हे वाक्य सुळ्ळ बाणासारखं कानांत रुतलं आणि माईंसहित सगळ्यांच्या नजरा माझ्याकडं वळल्या.

मला एकदम शर्‍याच्या खुनाच्या अपराध्यासारखं वाटायला लागलं होतं त्यांच्या नजरा झेलतांना.

"ग्रुपचा लीडर नारे तू, मग असा कसा नाही समजू शकला त्याच्या मनातलं? का नाही अडवलं त्याला असं करतांना? का नाही दोन वाजवल्या असा भलता विचार केल्याबद्दल? असा कसा चुकलास रे तू अभि? " कोणीतरी कानांत माझ्याच आवाजात मला ओरडून ओरडून विचारतंय. दादांची ती नजर, माईंचे ते शब्द "'तुम्हाला बी काय बोल्ला न्हाई का त्यो कधी?" खोल खोल जिव्हारी लागतायेत. धरणीमाते आता पोटात घे, बस्स. त्या माउलीच्या डोळ्यातल्या धारा माझा करंटेपणा ओरडून ओरडून सांगतायेत. दादांचा श्वास मला ऊभ्या ऊभ्या जाळतोय कुठे लपवू मी स्वतःला. चारु, सोनल, श्री, सम्या, मन्या सगळे असे का बघतायेत माझ्याकडे. गुन्हेगार आहे का मी शर्‍याचा? द्या मला शिक्षा. पण असे नका रे बघू माझ्याकडे. असह्य यातना होतायेत मला त्या नजरा झेलतांना. मी नाही मारालाय रे शर्‍याला, मी नाही मारलाय. चुकलो मी, नव्हती माझी लायकी त्याचा लीडर व्हायची. का मी त्याला त्या रात्री कँटीनमधून तसाच जाऊ दिला? का नाही त्याला थांबवून त्याच्या डोळ्यांतल्या पाण्याचा जाब विचारला? का नाही दोन वाजवून त्याला बोलता केला? का नाही त्याची बॅग आधीच उघडली मी? चुकलो होतो मी त्याच्या मनांतलं दु:ख जाणुन घेतांना.

अरे देवा, कोण ती निष्पाप गेली जिवानिशी, कुणाला गड ऊतरवायला निघाला होता हा शर्‍या अनवाणी? तिचे माई-आबा ते कुठे असतील? त्यांनाही कळाले असेल का त्यांची लाडकी लेक कुणाच्या तरी करंटेपणाचा, कुणाच्या तरी नालायक नेत्रूत्वाचा बळी ठरली होती? बाबा सांगाना यांना मी नाही हो केलंय हे, बघाना या हॉस्पिटलच्या भिंती जवळ येतायेत मला आवळायला, हाडं वितळतायेत माझी. मला ओरडून माईंची क्षमा मागायचीय "मी विचारलं होत हो त्याला, खूप खूप विचारलं होत, पण नाही बोलला तो काहीच, चुकलो मी" बाबा माझी हाडं, चटका बसतोय बाबा............. बाबा......

तेवढ्यात बाजुला गलका झाला अन् मी भानावर आलो, कुणीतरी ओरडून I.C.U. मध्ये घुसायचा प्रयत्न करत होतं.

'जिता न्हाय सोडायचा म्या त्याला, माझ्या बापडीचं ऊरलं-सुरलं आविष्य बी गिळलं या सैतानानं, बघिणच म्या कसा जगतोय त्यो' पोलीसांनी आणि शर्‍याच्या आबांनी त्यांना कसंबसं आवर घालून हॉस्पिटलच्या बाहेर नेलं. त्यांच्या बरोबरच्या बाई थेट माईंसारख्याच दिसत होत्या. तेव्हा माईंनी दादांचा पकडलेला हात मी पाहिला. रडून रडून त्यांचेही डोळे चांगलेच सुजले होते. त्या रडतरडतच माईंकडे आल्या, अन् दोघींनीही एकमेकींच्या गळ्यात पडून हंबरडा फोडला.

"काय विस्कुट करुन घेतला हो पोरांनी आविष्याचा", माईंनी परत हंबरडा फोडला.
"माझी मनी! सा-आठ महिनं बी नवतं रायलं तिचं आन तेवढ्यात बी बोलावणं धाडलं बघा त्या पांडुरंगानं, नाय बघवलं कारं तुला पांडुरंगा? नवसाची पोर माझी, न्यायाचीच व्हती तर धाडली कशाला, आता पोराला तरी वाचीव रं बाबा पदर पसरते." शर्‍यासाठी ती माऊलीपण तुटत होती.

आम्ही सगळे सुन्न होतो. मती गुंग करणाराच प्रकार होता सगळा. आम्हा सगळ्यांचे श्वास ही थांबले होते. त्या दोन्ही माऊलींचा असह्य आक्रोश चालूच होता. आमच्यापैकी कुणीच असा जीव पिळवटून टाकणारा टाहो, असं श्वास लागेपर्यंतच आक्रंदन अनुभवलं नव्हतं.

दादांनी मन्याला सगळ्यांना बाहेर नेण्याची खूण केली तसा तो मला आणि चारुला खांद्याला धरून ओढू लागला. मला ऊगीच त्या काचेरी दारावर 'पांडुरंग' हसत ऊभा दिसला. दादा आम्हाला कॉरिडोअरमधून परत नेतांना समोरून आबा आणि इन्स्पेक्टर येतांना दिसले. आबांची नजरही थेट दादांसारखी माझ्यावर रोखलेली, की मलाच असे वाटत होत कोण जाणे. मी मान खाली घातली.

"शरदचे मित्र का रे तुम्ही, बोलाचंय मला तुमच्याशी" इन्स्पेक्टरांचा भारदस्त आवाज कानावर पडला. मी वर बघेपर्यंत ते आणि आबा I.C.U. कडे गेलेही होते.

आम्ही बाहेर येऊन हॉस्पिट्लच्या पायर्‍यांवर बसलो. तेवढ्यात डॉक्टर लिफ्टमधून बाहेर आले. मी आणि सोनल धावलोच अक्षरशः त्यांच्याकडे.

"डॉक्टर, डॉक्टर एक मिनिट, शरद बोडखे, कसा आहे तो आता?" आम्ही दोघांनी एकदमच विचारले.
"तुम्ही कोण?" डॉक्टर.
"आम्ही त्याचे मित्र, एकाच क्लासमध्ये आहोत आम्ही." मी पटकन् म्हणालो.
"He is out of danger now, ऑपरेशन झालंय रात्रीच त्याचं, but he will not able to walk any more" चालता-चालताच डॉक्टर म्हणाले आणि निघुनही गेले.

आम्ही दोघंही जागीच थबकलो. मला मन्याचे गड उतरल्यानंतर सुजलेले पाय आठवले. सोनलच्या डोळ्यांतही टचकन पाणी आलं. जड जड पावलं टाकत आम्ही दोघंही बाहेर ग्रुपकडं परतलो. एव्हाना मन्या, सम्या आणि दादांचं काहितरी बोलणं चालू होतं. श्री आणि चारु अजूनही पायर्‍यांवरच होते. मला पहाताच दादा उठले, "म्या येतो समद्यासनी चा घेवुन" म्हणत निघूनही गेले. जातांनाही त्यांची नजर मला उभ्या उभ्या जाळुन गेली. ते गेले तसा सम्या पुढं झाला.

"मनी...... मनिषा....... सातारची शर्‍याची शेजारी...... त्याची बालमैत्रिण...... बारावी पर्यंत एकाच वर्गात होती दोघं. शर्‍यांचं प्रेम होतं तिच्यावर आणि तिचंही शर्‍यावर......... नाशिकला होती डेंटलला... आणि "
" आणि काय समीर?" सोनलनं न रहावून विचारलं. तसं चारुनं माझ्या दंडाला घट्ट पकडलं.
".........ब्लडकँसर....... तिसर्‍या स्टेजला डिटेक्ट झाला........ दोन महिन्यांपुर्वी." सम्या परत थांबला
"बरं मग" मी थंडपणे विचारलं.
"जगलो नाही तर मरू तरी बरोबर म्हणून धावत्या रेल्वेसमोर हातात हात घालून उड्या मारल्या दोघांनी............ शर्‍या माहितेयना कसा आहे आपला, निघाला तिला गडावरुन खाली उतरवायला अनवाणी." सम्याला आता रडूच कोसळलं होतं. माझ्या एका दंडाला चारु आणि दुसर्‍याला सम्या दोघंही रडत होते, मी मात्र दगडी चेहर्‍याने मन्याकडे पाहिलं.

तसा मन्या म्हणाला "दोघांनीही जीव खाऊन उडया मारल्या रेल्वेसमोर प्लॅटफॉर्मवरुन, पण नियतीच्या आणि मनीच्या मनांत काही वेगळंच होतं. मनीनं त्याला मागं ओढला अन् स्वतः पुढे गेली. ती पडली रुळावर आणि हा गाडी अन् प्लॅटफॉर्मच्यामध्ये. लोकांनी शर्‍याला लगेच वर खेचला पण गाडी आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये पाय अडकले त्याचे."
"आणि मनी, तिचं काय झालं?" सोनलनं न रहावून विचारलं
"तिचा गड केव्हाच उतरुन झाला होता गं" एवढं बोलून मन्याचाही बांध फुटला

मी तरीही दगडच उभा, मला काहीच का नव्हतं वाटत हे ऐकून, का मी एवढा निष्ठुर झालो होतो? का माझा बांध अजुनही पक्का होता? मी मन्याच्या बॅगमधून मगाशी काढलेला फोटो सगळ्यांसमोर धरला,
"मनिषा"
फोटो बघून चारु अन् सोनलला परत रडू कोसळलं. श्रीनं तो फोटो माझ्या हातातून खसकन् ओढून घेतला आणि टराटरा फाडला,
"च्याSSयला, भेकड कुठचा". त्याचा राग अनावर होत होता पण सम्याने त्याला आवरला. मी नुसताच त्याच्याकडे शून्य नजरेन बघत होतो.

----------------------------------

तो दिवस आम्ही पायर्‍यांवरच बसून काढला, सम्यानं चारु आणि सोनलला बळजबरीनं एकदा बिस्किट भरवली. तेव्हा चारु सोनलकडं बघून म्हणाली,

"नकोय मला, राहीन मी त्याच्यासाठी उपाशी" तशी लगेच सोनल तिला बिलगली.

दादांनी दोनतीन वेळा मन्याकडं आमची विचारपूस केली. मी आणि श्री दोनदा आतमध्ये माईंना बघण्यासाठी गेलो. काही केल्या दादांची ती नजर, माईंचा तो प्रश्न, अन काचेरी दारावरचा पांडुरंग मला स्वस्थ बसू देत नव्हता. डोकं एकदम जड झालं होतं, पण मी डोळ्यातनं अजून एक टिपुसही काढलं नव्हतं.

दुपारी कधीतरी शर्‍या शुद्धीवर आला. संध्याकाळी आमच्यापैकी एकाला त्याला भेटण्यासाठी परवानगी मिळाली. ग्रुपच्यावतीने सगळ्यांनी मला जायचा आग्रह धरला.

"चांगला जाब विचार त्याला", श्री म्हणाला तो अजून तडकलेलाच होता.
"नको रे, दुखत असेल त्याला खूप, पायाला लागलंय ना त्याच्या", चारु कळवळली.

मन्या I.C.U. च्या दारापर्यंत येतो म्हणाला, माझं मलाच कळत नव्हतं कसा जाणार होतो मी शर्‍यासमोर? पुन्हा ते कॉरिडोअरमध्ये पायांच्या नसांच तट्तट् तुटणं, पुन्हा तीच विखारी नजर आणि तोच दारावरचा पांडुरंग,

"हो आहेच मी जबाबदार या सगळ्या अघटिताला, ती अक्षम्य चूक माझीच होती, आहेच मी वाटेकरी या नजरांचा, मीच कारण आहे सगळ्यांच्या क्लेशांचा", पुन्हा माझाच आवाज माझ्या कानांत घुमतोय.

मन्याकडं एकदा बघून, पडदा बाजुला करुन मी आत गेलो, तसे माई आणि आबा डोळे टिपत शर्‍याच्या बेडवरुन ऊठले आणि दरवाज्याकडं आले, माईंनी बराच वेळ दाबून ठेवलेला हुंदका दारांतच त्यांच्याकडून निसटला, मी बाहेर जाणार्‍या माईंकडे मान वळवून बघतंच होतो.

"कसा आहेस अभि?" शर्‍याचे शब्द कानांवर आले आणि मी भानावर आलो. शर्‍या बेडवरुनच मंद हसला.
"मी बरा आहे, तू कसा आहेस?", मी शर्‍याच्या चेहरा न्याहाळत कसंनुसं हसलो अन् पुढे झालो. त्याचा कमरेखालचा भाग लुळा वाटंत होता बहुतेक तो अजुनही ऍनास्थेशियाखाली असावा.
"मी पण.ब..अं...रा.... बाकी सगळे कसे आहेत?" शर्‍या हळूच कण्हला.
"बरे आहेत.... दुखतंय का रे खूप?" मला शर्‍याची ती अवस्था बघवत नव्हती.
"अं.....थोडंस" शर्‍याने मला त्याच्या बाजूला बसायची खूण केली.
दोन मिनिटं भयाण शांतता, मी शर्‍याचा हात हातात घेतला.

"मनीला भेटायंच होतं यार तुम्हा सगळ्यांना, मी तिला नेहमी सगळं सांगायचो आपल्या बद्दल, आपल्या ग्रुपबद्दल, तुझ्याबद्दल. कसं तू दुसर्‍याचं अस्थिर मन अचूक ओळखतोस, कसा मला त्यादिवशी खोदून खोदून विचारत होतास, कशी आपण नाटकांची तयारी करत होतो, तिला पण खूप आवडतं रे नाटक बघायला" शर्‍या बोलत होता अन् त्याचा एक एक शब्द मला वर्मी लागत होता.
"बघितलाय मी फोटो, सुंदर होती रे तुझी मनी एकदम"...... मी माझ्या दोन्ही तळव्यांमध्ये शर्‍याचा हात घेतला.
"का केलं रे मनीनं असं माझ्या बरोबर.....का नाही नेलं तिने मला तिच्याबरोबर........सांगना अभि?" शर्‍याचे डोळे आणि आवाज दोन्ही भरुन आले होते. त्याला अजूनही मनीच्या त्याला मागे ढकलण्याचा अर्थ लागत नव्ह्ता.
"अरे ती कांय तुझ्यासारखी वेडी थोडीच होती? शहाणी होती तुझी मनी खूप, तिला माहित होतं, माई-आबांना, दादांना आणि ग्रुपलापण खूप गरज आहे तुझी", माझाही आवाज आता ओलसंर झाला होता, पण शर्‍यासमोर रडायचं नाही असं मी आत येतांनाच ठरवलं होतं.
"खरंय तुझं अभि, तिला नक्की असंच वाटत असणार" , शर्‍यानं त्याचा चेहरा दुसरीकडं वळवला आणि हुंदक्याला कसाबसा आवर घातला. आता मला स्वतःलाही रोखणं असह्य झालं होतं.
"येतो मी शरदराव आता, तुम्ही आराम करां, परत येईन सगळ्यांना घेऊन", असं म्हणत मी तडक ऊठलो.
"आयला तुमी बी आमच्या दादांवानी शरदरांव बोलायलंय व्हय रे?" शर्‍या डोळे पुसत हसला.
"आन् चारुबाय कशी हाय रं आपली? खरवंस न्हाय आणलं गड्या याबारी तिच्यासाठी"
"बरीय ती..... तू काळजी घे....." मी मान हलवली आणि पळतंच बाहेर आलो.

मन्या वाटच बघत होता, त्याला मिठीच मारली अन् ढसाढसा रडत सुटलो.
एवढा वेळ कोंडून ठेवलेला अश्रुंचा समुद्र सैरावैरा वहात सुटला, मनाच्या सगळ्या भिंतींवरून ओसंडून उचंबळू पहात होता, पण मनाला भिंती असतात कुठे? माझं मनच आता वाहून जातंय की असं वाटलं ,पण मी त्याला नाही असा वहावत जाऊ देणार, लीडर आहे ना मी! करंटा नालायक का होईना.

मन्यानं मला आधार देत बाकड्यावर बसवलं दोन्ही हातांनी चेहरा झाकून बराच वेळ मी रडत होतो. मन्याचा ओला हात अजूनही माझ्या खांद्यावर होता. वाटत होतं अस्सं परत आत जावं आणि शर्‍याला ओरडून विचारावं,

"का केलत असं शरदराव तुम्ही, का केलत असं? का त्या निष्पाप जिवाचं गडाएवढं ओझं माझ्या छातीवर ठेवलंत? का नाही तुझ्या बॅगेसारखा तुझ्या मनाचा तो कप्पा मला ऊघडता आला, कुठे खोल खोल लपवून ठेवली होतीस तू मनीला त्या कप्प्यांत. का नाही कधीच बोललास रे आमच्याकडे तुझ्या मनीबद्दल, आपण सगळेच जर ग्रुप जगत होतो तर तुच असा जगतां जगतां थोडं थोडं मरत होतांस? अरे तुझ्या मनीला पण जगवली असती अशीच आपल्यामध्ये. सहा महिन्यात आयुष्यभर पुरेल एवढा आनंद आणि प्रेम ओतलं असतं रे तिच्या रक्तात. खुप प्रेमळ आहेत रे सगळीच, घट्ट घट्ट रुजली आहेत आपली मुळं एकमेकांत, एवढ्या सहजी नाही रे उन्मळू द्यायची कुणाला, पडलायेस काय? बाहेर येऊन बघ जरा कशी तुटतायेत सगळी तुझ्यासाठी, श्री रागावलाय, पण तुला बघितल्यावर ओरडणार नाही तो मुळीच तुला, सम्या-सोनल पण भांडत नाहीयेत रे आता, हा मन्या पण बघ तुला आवडतं म्हणुन ते 'आनेवाला पलं' ठेवलय त्याने अजून अन् ही चारु बघ रडून रडून........"

मला एकदम चारु आठवली तसा मी डोळे पुसत ऊठलो...समोर तोच कॉरिडोअर... पायांच्या नसा अजूनही तुटतायेत, ती नजर अजूनही जाळतेय, तेच शब्द "लीडर व्हय रं तू या समद्यांचा" "तुम्हाला बी काय बोल्ला न्हाय का तो" "पोराला तरी वाचीव बाबा, पदर पसरते पांडुरंगा" "तिचा गड तर केव्हाच ऊतरून झाला होता गं" कोण मला कानांत माझ्याच आवाजात ओरडून सांगतंय? नाही सहन होत आता..... या भिंतींवर डोकं आपटावसं वाटतंय.......... कडेलोट करावासा वाटतोय...आत्मक्लेश..हो आत्मक्लेश....पण त्याने मनी थोडीच परत येणार होती....शर्‍याचं आत्मक्लेशाचं तत्वज्ञान..कळतंय आता मला .....अरे पांडुरंगा ते तत्वज्ञान पटवून द्यायला तर हा खेळ नाही खेळलास ना तू.....?

समोर ग्रुप दिसतांच मी परत भानावर आलो, सगळ्यांचे चेहरे अगतिक, फक्त मी बोलण्याची वाट बघत होते.

"बराय तो, विचारत होता सगळ्यांबद्दल"........ आणि मी पायरीवर सम्या आणि सोनलच्या बाजुला बसलो.
"रडला तू अभि?..."..... चारुनं माझ्याकडे बघतांच विचारलं. मी फक्त नकारार्थी मान हालवली.
"नको रे दु:खी होऊ असा, होईल तो बरा" ...... सम्यानं माझ्या गळ्यांत हात टाकून मला हलवलं.

सगळयांनी मला धीर द्यायच बहुतेक आधीपासूनच ठरवलं होतं. त्यांनाही माझं माझ्याशीच चाललेलं द्वंद्व बहुतेक कळंत होतं.

दु:खी........आणि मी?....शर्‍याच्या आणि मनीच्या माई-आबांच्या दु:खापुढे माझं दु:ख खूपच लहान होतं. मी खरंच त्या रात्री मनीला वाचवू शकलो असतो का?

"ए पोरांनो, लीडर कोण आहे रे तुमचा?, ईन्स्पेक्टर सायबांनी बोलिवलंय, पोराबद्दल माहिती ईचारायचीय" .......कॉन्स्टेबल तंबाखु चोळत म्हणाला.

माझं द्वंद्व एवढ्यांत संपणारं नव्हतं..................................

समाप्त...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझी शैली आवडते खुपच .. एकदम इमोशनल गृप दिसतो हा ..

आशय म्हणजे सेन्ट्रल थीम का? सातीची पोस्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कथा आवडली पण आशय नाही म्हणजे काय?

माझ्यासाठी त्या वयात इतका इमोशनल ड्रामा होणं/असणं शक्य आहे ह्या गोष्टीशी रिलेट करता न आल्यामुळे कथा फारशी भावली नाही ..

प्रसंग आणि भावना मस्त उतरवल्या आहेस. पण टायट्ल नि त्याला justify करण्याचे प्रसंग अपुरे वाटतात.

असामी तेच तर, तो काही रुढार्थाने लीडर ईन अ‍ॅक्शन नाहीये. तो एका तरूण गृपमधला, वडिलांच्या जाण्याने जरा मॅच्युरिटी आलेला, जबाबदारीची जाण असलेला मुलगा आहे. गृपमध्ये त्याच्या शब्दाला वजन आहे, ईतरांकडून त्याला एक प्रकारचा रिस्पेक्ट मिळतो, जबाबदारीने तो गृपबद्दलचे निर्णय घेतो. अजाणतेपणे त्याच्याकडे कोणीतरी एक जबाबदारी दिलीये, ती त्याने गांभीर्याने घेतलीये आणि घटनेनंतर त्या जबाबदादारीच्या जाणीवेबरोबर आले प्रचंड मोठे गिल्ट. असतोच रे प्रत्येक गृप असा एक जण तरी.

साती, आशय नाही आवडला हे मलाही कळले नाही. कथा एका करूण प्रसंगाभोवती बांधलेली आहे म्हणून का?

सशल, अश्या गृपमेंबर्सच्या वेव्हलेंग्थ ईमोशन्सवरतीच तर बेस्ड असतात. तो काही गृप डायनॅमिक्स कसे असावे ह्याचे ट्रेनिंग मिळालेला आखून रेखून कृती करणारा कार्पोरेटसमधला गृप थोडीच आहे. Happy

प्रतिसादांबद्दल धन्यवाद सगळ्यांना.

खूप छान लिहिलं आहे… खूप खूप आवडलं… लिखाणाची शैली कौतुकास्पदच आहे.….
हे खरंच घडलंय??? प्रसंग न प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला…. दिवसाची सुरुवात तरी चांगली झाली…. धन्यवाद… !