लेखनस्पर्धा - २०१४ - परीक्षकांची व प्रायोजकांची माहिती

Submitted by Admin-team on 5 June, 2014 - 00:42

मनोविकास प्रकाशन आणि मायबोली.कॉम यांनी आयोजित केलेल्या लेखनस्पर्धेचे विषय, स्वरूप आणि नियम यांची माहिती इथे मिळेल.

***

यंदाच्या लेखनस्पर्धेचं परीक्षण करणार आहेत श्री. संजय आवटे आणि श्रीमती सुजाता देशमुख.

awate1.jpg श्री. संजय आवटे हे ख्यातनाम संपादक व पत्रकार आहेत. दै. पुढारीचे ते सध्या मुख्य संपादक आहेत. लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रांचं संपादकपद या पूर्वी त्यांनी भूषवलं आहे. द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातही ते कार्यरत होते. या वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेले स्तंभ बरेच गाजले होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी व राजकारण हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भाग घेतला आहे. 'पाकिस्तान - लष्करी सत्तेचे अर्थरंग', 'नियतीशी करार - नव्या जगाचे नवे आकलन', 'बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड', 'कला-कल्पतरुंचे आरव' आणि 'ग्लोबल वॉर्मिंग - खरे काय, खोटे काय' ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

sujata_deshmukh.JPGएक साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून श्रीमती सुजाता देशमुख यांचा लौकिक आहे. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून सार्‍याजणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. , ’गौहरजान म्हणतात मला!’, ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्‍हाड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र), ’दहशतीच्या छायेत’ यांसह आठ अनुवादित पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. सध्या ’माहेर’ मासिकाच्या आणि मेनका प्रकाशनाच्या पुस्तक विभागाच्या त्या मुख्य संपादिका आहेत.

***

या स्पर्धेचे प्रायोजक आहेत मनोविकास प्रकाशन, पुणे

मनोविकास प्रकाशनाची स्थापना श्री. अरविंद पाटकर यांनी १९८६ साली केली. प्रकाशन सुरू केलं तेव्हाच सामाजिक भान ठेवणारी, समाजाचा विकास साधणारी, साहित्यातून सामाजिक विषयांना स्पर्श करणारी पुस्तकं छापावीत ही भूमिका प्रकाशक अरविंद पाटकर यांनी घेतली. त्यामुळे ’शाहीर’ या अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारलेल्या पहिल्या पुस्तकानंतर श्याम मानवांची अंधश्रद्धा निर्मूलनावरची पुस्तकं, राजेंद्र बर्वे याची मनोविज्ञानावरची पुस्तकं, डॉ. आंबेडकरांचं जातिसंस्थेचं उच्चाटन, आरोग्यविषयक, विज्ञानविषयक पुस्तकं प्रकाशित केली. प्रकाशनाचा विस्तार वाढत गेला तसा हा व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी श्री आशिष पाटकर यांनीही घेतली. दरम्यान मनोविकास प्रकाशनानं प्रकाशन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. नव्या दमाचे लेखक शोधत सामाजिक जाणिवा सखोल करणारी पुस्तकं प्रकाशित केली. ‘पुस्तक मुखपृष्ठापासूनच वाचलं जातं’ याचं भान ठेवून उत्तम आशयाबरोबरच दर्जेदार, देखण्या पुस्तक निर्मितीवर भर दिला. गेल्या २५ वर्षांत ८००पेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती ’मनोविकास’ने केली आहे. मनोविकास प्रकाशनाची बांधिलकी चोखंदळ वाचकांशी आहे.

***

आपण सर्व उत्साहानं सहभागी होऊन लेखनस्पर्धेचा हा उपक्रम यशस्वी कराल, ही खात्री आहे.

***
विषय: