लेखनस्पर्धा २०१४ - विषय, स्वरूप, बक्षिसं व नियम

Submitted by Admin-team on 5 June, 2014 - 00:41

गेली तीन वर्षं आपण सातत्यानं मायबोलीवर लेखनस्पर्धा आयोजित करत आलो आहोत. या वर्षीही भरघोस बक्षिसांसह, तुम्हांला लिहितं करण्यासाठी घेऊन येत आहोत - मनोविकास प्रकाशन व मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धा - २०१४.

***

या स्पर्धेचा कालावधी आहे ५ जून - १४ जुलै, २०१४.

***

यंदाच्या लेखनस्पर्धेसाठी विषय आहेत -

१. मोदी जिंकले; पुढे काय...?

भारतात नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून श्री. नरेंद्र मोदी निवडून आले. काहींना आनंद झाला, तर काहींना ’या देशाचं आता काय होईल?’, अशी चिंता वाटू लागली. काहींच्या मते ’अच्छे दिन आ गये’, तर काहींना ’लोकशाही’, ’सर्वधर्मसमभाव’ ही तत्त्वं नाहीशी होण्याची भीती.. काहींना त्यांच्या ’विकासपुरुष’ या प्रतिमेचं आकर्षण, तर काहींना त्यांच्या २००२ सालच्या दंगलींमधल्या भूमिकेविषयी शंका. पंतप्रधानपदी मोदींनी विराजमान होणं म्हणजे अनेकांना अपेक्षित असलेला विकास, की एका हुकूमशहाच्या हाती आलेली सत्ता, भारताचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय की महागाई, गरिबी यांच्यात वाढ, असे प्रश्न अनेकांच्या मनांत आहेत. अशा परिस्थितीत आता या देशाचं, इथल्या नागरिकांचं सारं लक्ष मोदींच्या प्रत्येक हालचालीकडे आहे. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर, त्यांच्या प्रत्येक भाषणावर चर्चा झाली आहे, होत आहे.

यंदाच्या लेखनस्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही यापुढे श्री. नरेंद्र मोदी यांच्या व या देशाच्या राजकारणाची, समाजकारणाची दिशा काय असू शकेल, याचा विविध बाजूंनी विचार करायचा आहे.

२. व्यक्तिचित्रण - जागतिक वाङ्मयात ’व्यक्तिचित्रण’ या लेखनप्रकाराला महत्त्वाचं स्थान आहे. मराठीतही काही अप्रतिम व्यक्तिचित्रं लिहिली गेली आहेत. अत्रे, दुर्गाबाई, पुलं, शांताबाई शेळके, जयवंत दळवी ते रामदास भटकळ, सुरेश द्वादशीवारांपर्यंत अनेक दिग्गजांनी काही अतिशय हृद्य, कसदार व्यक्तिचित्रं रेखाटली आहेत. या वर्षीच्या लेखनस्पर्धेत तुम्हीही तुम्हांला भावलेल्या व्यक्तीचं शब्दचित्र रेखाटावं, अशी आमची इच्छा आहे. ही व्यक्ती कोण असावी, कशी असावी यांवर काहीएक बंधन नाही. तुम्ही केलेलं व्यक्तिचित्रण काल्पनिक असल्यास, किंवा तुम्ही त्या व्यक्तीला कधीही भेटले नसल्यास अजिबात हरकत नाही. तुमच्यातल्या ललितलेखकानं या स्पर्धेच्या निमित्तानं व्यक्तिचित्रण करावं, हाच या विषयामागचा एकमेव उद्देश आहे.

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत ज्येष्ठ पत्रकार व संपादक श्रीमती सुजाता देशमुख व श्री. संजय आवटे
.

***

लेखनस्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी प्रायोजित केलेली बक्षिसं.

प्रत्येक विषयासाठी चार बक्षिसं दिली जातील.

पहिलं बक्षीस - रु. २००० किमतीची पुस्तकं.

दुसरं बक्षीस - रु. १५०० किमतीची पुस्तकं.

तिसरं बक्षीस - रु. १००० किमतीची पुस्तकं.

उत्तेजनार्थ बक्षीस - रु. ५०० किमतीची पुस्तकं.

सर्व बक्षिसे मायबोली खरेदीच्या गिफ्ट सर्टिफिकेटांच्या स्वरूपात मिळतील. मायबोलीच्या खरेदीविभागातून विजेते त्यांच्या आवडीची पुस्तकं ही गिफ्ट सर्टिफिकेटं वापरून निवडू शकतील.

तसंच, स्पर्धेतील उत्तम लेखांचं एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित करावं, किंवा दर्जेदार लेखांना मनोविकास प्रकाशनाच्या 'इत्यादी' या दिवाळी अंकात स्थान द्यावं, अशी प्रायोजकांची इच्छा आहे.

स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'लेखनस्पर्धा - २०१४ हा नवीन ग्रूप ५ जूनला उघडण्यात आला आहे. या ग्रुपाचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे लेखन करता येईल. ५ जून ते १४ जुलै, २०१४, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रुपामध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून तुमचे लेख प्रकाशित करू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून तुमच्या लेखाचा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात लेखाच्या नावाबरोबरच विषयाच्या क्रमांकाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, विषय क्र. २ - ’लेखाचं नाव’- असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल गणेशोत्सवाच्या सुमारास जाहीर केला जाईल.

***

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.

२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी :)) लेखनस्पर्धेच्या पहिल्या विषयासाठी दोन व दुसर्‍या विषयासाठी जास्तीत जास्त तीन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.

३. लेखनासाठी शब्दमर्यादा -

पहिल्या विषयासाठी - तीन हजार शब्द.
दुसर्‍या विषयासाठी - दोन हजार शब्द.

४. एकदा प्रवेशिका प्रकाशित केल्यानंतर तीत शक्यतो बदल करू नयेत. अगदीच गरज भासली आणि शुद्धलेखनाच्या काही चुका दुरुस्त करायच्या असतील, तर या चुका तुम्ही दुरुस्त करू शकता. मात्र हे बदल संयोजकांना संपर्कातून कळवावेत.

५. लेखन स्वतंत्र (म्हणजे तुम्हीच केलेलं) असावं व ते इतरत्र कुठेही पूर्वप्रकाशित नसावं. भाषांतरित लेख स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.

६. लेखाबरोबर वापरलेली छायाचित्रं प्रताधिकारमुक्त असावीत. प्रताधिकारमुक्त नसलेली चित्रं वापरली असतील, तर ती तशी वापरण्यासंबंधीच्या परवानगीचा व प्रताधिकाराचा लेखात स्पष्ट उल्लेख असावा.

७. लेखात अवतरणं, कवितांच्या ओळी इत्यादी देताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.

८. लेखाबरोबर यूट्युब किंवा तत्सम संकेतस्थळांवरील व्हिडिओंचे व इतर कुठल्याही संकेतस्थळांचे दुवे कृपया देऊ नयेत.

मात्र लेखात वापरलेले संदर्भ व संदर्भांचे दुवे लेखाच्या शेवटी देऊ शकता. लेखाच्या शब्दमर्यादेत ही शब्दसंख्या मोजली जाणार नाही.

याबाबत कुठलीही शंका असल्यास, अथवा प्रताधिकारधारकाची परवानगी मागण्यात मदत हवी असल्यास कृपया मायबोली प्रशासनाशी संपर्क साधावा.

९. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. एखाद्या विषयात पारितोषिक देण्यायोग्य प्रवेशिका नसल्यास बक्षीस दिलं जाणार नाही.

१०. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसाची पुस्तकं मायबोली.कॉमच्या पुण्यातील कार्यालयातून घेण्याची व्यवस्था करावी लागेल.

११. स्पर्धेनंतर स्पर्धेतील लेखांचा एखाद्या पुस्तकात किंवा दिवाळी अंकात मनोविकास प्रकाशनातर्फे समावेश झाल्यास तो संपूर्ण व्यवहार प्रकाशक व लेखक यांच्यात असेल. मायबोली.कॉमचा त्याच्याशी संबंध नसेल.

***

मायबोली.कॉमनं यापूर्वी आयोजित केलेल्या लेखनस्पर्धांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला होता. तसाच प्रतिसाद या स्पर्धेलाही मिळेल, याची खात्री आहे.

***

स्पर्धेच्या परीक्षकांविषयी व प्रायोजकांविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

***

spardhaposter1.jpg

संयोजक - अमितव, इन्ना, चिनूक्स, जिप्सी, फारएण्ड, सशल

***
विषय: 

तसंच, स्पर्धेतील उत्तम लेखांचं एक छोटेखानी पुस्तक प्रकाशित करावं, किंवा दर्जेदार लेखांना मनोविकास प्रकाशनाच्या 'इत्यादी' या दिवाळी अंकात स्थान द्यावं, अशी प्रायोजकांची इच्छा आहे. >>>> उत्तम कल्पना! मायबोलीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

दोन्ही विषय चांगले आहेत. या दोन्ही विषयांवर मला लिहायचे होतेच. या निमित्ताने लवकर लिहिले जाईल.

* मायबोलीवर प्रकाशित झाल्यानंतर स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित करता येतील काय?

गंगाधर मुटे,

तुम्ही स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पर्धेतला लेख तुमच्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकता. Happy

मस्त... चला आपल्या पेनातून तर काही नाही झरत पण छान लेख वाचायला मिळणार तर!
भावी स्पर्धकांना शुभेच्छा!

मंजूडी ला +१ Happy

अजुन ऐक शंका.मला नॉट विदाऊट माय डॉटर या कादंबरीतली नायिकेचं शब्दचित्र रेखाटावं असं वाटतंय.चालेल का?

लोकहो- शब्दमर्यादा ही परीक्षकांनी सुचवलेली आहे. तुम्हाला जर कमी वाटत असेल तर परीक्षकांना पुन्हा विचारून आम्ही येथे कळवतो. मात्र परीक्षक ठाम असतील तर आपण हा मुद्दा फार रेटणे योग्य होणार नाही. तरीही त्यांच्याशी बोलून येथे लिहीतो.

अरे व्यक्तिचित्रणाला दोन हजार शब्द खूप झाले की! Happy
(मला प्रश्न पडतो की कुणाला प्रेमाचे प्रपोझल करताना केलेल्या स्तुतीकरतातरी दोन हजार शब्द कुणी वापरलेत का इथे? Wink अरे बाबान्नो दोन हज्जार शब्द फार झालेत...... हे आपले माझे मत बर का! )

२००० हजार शब्द म्हणजे नक्की केवढे होतात?
तरी २० शतशब्दकथा होतील ना..

स्प्रर्धेत काही लिहेन ना लिहेन पण वाचायला मुबलक मिळेल हि अपेक्षा .. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा Happy

दोन हजार ही शब्दमर्यादा अपुरी आहे, अशी काही मायबोलीकरांनी तक्रार केली होती. त्या संदर्भात आम्ही परीक्षकांशी बोललो. त्यानुसार पहिल्या विषयासाठी शब्दमार्यादा आता तीन हजार शब्द असेल. दुसर्‍या विषयासाठी शब्दमर्यादेत काहीच बदल नाही, म्हणजेच दुसर्‍या विषयासाठी शब्दमर्यादा दोन हजार शब्द असेल.

धन्यवाद.

स्पर्धेचं व दोन्ही विषयांचं स्वागत.

मागच्या वर्षीच्या स्पर्धेच्या निकालांमधली एक बाब खटकली होती. विषय क्र. ३ मधे दोनच एन्ट्रीज आल्यामुळे त्या बाद केल्या होत्या. कमीत कमी अमूक एन्ट्रीज आल्या तरच व्हॅलीड ठरवणार असा काहीही नियम सुरवातीला दिला नव्हता. अशा वेळेला अख्खी कॅटेगरी बाद ठरवून त्या दोन लेखनकर्त्यांच्या कष्टांवर पाणी फिरवणे योग्य वाट्लं नाही. परीक्षकांचं काहीही मत असलं तरी, मायबोलीच्या व्यवस्थापकांनी त्यांच्या सभासदांचे कष्टं लक्षात घेऊन, परीक्षकांना आलेल्या एन्ट्रीजमधून नंबर काढायला सांगायला हवं होतं असं वाटलं. अर्थातच हे माझं वैयक्तिक मत आहे.

यंदाच्या नियमांमधे देखील असा काही नियम नाही. तेव्हा त्याचा खुलासा आधीच करणार का?

शुगोल,
गेल्या वर्षी तिसर्‍या विषयासाठी परीक्षकांना प्रवेशिका पारितोषिक देण्यायोग्य वाटल्या नव्हत्या. प्रवेशिकांची संख्या कमी म्हणून बक्षीस दिलं नाही, असं झालं नाही. तसं निकाल जाहीर करताना स्पष्ट केलं होतं. प्रवेशिकांची संख्या आणि पारितोषिक यांचा संबंध नाही. परीक्षकांच्या निकालात मायबोलीनं हस्तक्षेप केलेला नाही. तीच परंपरा या वर्षीही राखली जाईल. Happy

तुमच्या प्रवेशिकांची वाट पाहत आहोत. Happy

लेखांची संख्या कमी असताना, क्वालिटीच्या इश्युवर कॅटेगरीच बाद ठरवणं पटत नाही. कारण हेही आधी सांगायला पाहिजे होतं असं वाटतं. असो.

तुमच्या लिखीत व अलिखीत नियमांसकट लेखनस्पर्धेला शुभेच्छा!

नितिनचंद्र,

प्रत्येक धाग्याच्या सर्वात वर असलेल्या दुव्यांमध्ये "लेखनस्पर्धा २०१४" हा दुवा दिलेला आहे. त्यावर जाऊन सर्व प्रवेशिका वाचता येतील.

I have been following maayboli since 2010,but never wrote anything.This time I also want to make an attempt.My problem is I can not type in Marathi.So Is it possible if I wrote it on a paper and then send it doing scanning.Please guide me regarding this.

नमस्कार प्रीती,
मायबोलीवर मराठीत लेखन करणं खूप सोपं आहे. कृपया http://www.maayboli.com/node/1554 हा धागा बघा, इथे सर्व माहिती आहे.
तरीही देवनागरीत लिहिता येत नसेल, तर chinmay@maayboli.com या पत्त्यावर तुमचा स्कॅन केलेला लेख पाठवा. Happy

व्वा, मायबोलीचा अ‍ॅटीट्युड किती सकारात्मक आहे. आणि किती त्वरीत उत्तर. म्हणूनच मायबोलीचा सार्थ अभिमान वाटतो.

एक उपाय: लेख लिहुन झाल्यावर कुठल्याही वर्ड प्रोसेसर (जसे MS word) मध्ये चिकटवा. तिकडे रिव्हू tab खाली वर्ड काउंट वर टिचकी मारलीत तर शब्द संख्या येईल.

Pages