माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३

Submitted by कविता१९७८ on 2 June, 2014 - 00:58

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १
http://www.maayboli.com/node/49174

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - २
http://www.maayboli.com/node/49191

माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - ३

सकाळी ३.३० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. बायका ग्रुपने ओढ्याच्या काठी जाउन प्रातःविधी उरकु लागल्या. रस्त्याच्या एका बाजुला बायका तर विरुद्ध दिशेला पुरुषांनी जायचे अशा मंडळाच्या सुचना
होत्या. हातात छोटी बॅटरी घेउन अंधारात ३-४ बायका मिळून गेलो. सर्वच जणी ग्रुपमधुन यायला लागल्या. परत येउन ब्रश केला आणी तोंड धुतले. चादरींची घडी करुन मोठी बॅग पॅक केली, ही बॅग आता रात्रीच्या थांब्याच्या वेळीच मिळणार होती. आंघोळीचे कपडे बॅकपॅक मध्ये काढुनच ठेवले होते जी दुपारच्या जेवणाच्या थांब्याला आंघोळ करण्याच्या वेळी मिळणार होती. मंडळाच्या दोन सभासदांनी चहा बनवला होता. त्यातला एक माझ्याबरोबर काल शेवटी मला घेउन येत होते त्या लो़कंबरोबर थांबला होता. त्याचे नाव निलेश होते. रांग लावुन चहा घेतला, जवळ बिस्कीटे आणी टोस्ट (रस्ट) ठेवली होती त्यातली काही घेतली. सर्वांचं आटोपता आटोपता ४.३० झाले. सभासदांनी सतरंज्या गाडीत टाकल्या. सर्वांनी आपापले सामान गाडीजवळ नेउन ठेवले. मी एक पाउच घेतला होता जो कमरेला बांधला. एक बॅटरी हातात घेतली. घरुनच पांढरी क्रिकेटची टोपी घेतली होती, थंडी वाजु नये म्हणुन कॉटनची ओढणी कानाला बांधली, हळुह्ळु सर्व पदयात्री रोडवर जमायला लागले. रोडवर काळाकुट्ट अंधार होता. रात्री मी ज्या बाईंजवळ झोपले होते त्या नेमक्या मंडळाच्या अध्यक्षाच्या बायकोच निघाल्या. त्या म्हणाल्या ताई घाबरु नका. निशाणी बरोबर चाला आपोआप पुढे चालाल. पालखी आधी निशाणी काढतात त्यामागे पदयात्री चालतात. निशाणी बरोबर चालल्याने माणुस फास्ट चालतो अशी या लोकांची समजुत. वास्तविक ही माणसे स्पर्धा करुन चालतात जो मागे पडतो त्याला बाकीची माणसे हसतात कारण सगळी एकाच गावातले आणि एकमेकांचे नातेवाईक. त्यामुळे मनातुन एकमेकांवर धुसफुसणे हा प्रकार, काही करुन एकमेकांना पुढे जाउ द्यायचे नाही हे ठरवुन स्वतःला कीतीही त्रास झाला तरीही फास्ट चालायचं हे या लोकांचं ठरलेलं. बायका तर त्याहुन पुढे. एका बाईच्या तर पायाच्या बोटातुन रक्त येत होतं तरीही ती सर्वात आधी चालत होती. मला बायका सांगत होत्या की लवकर चालायचं मग आराम करायचा. पण मी प्रत्येक वेळी मागे मागे पडत चालले होते.

रोडवर अंधार होता. जंगलात रोडवर स्ट्रीट लाईट्स नसतात. त्यावेळी आतासारख्या मोटरसायकल बरोबर न्व्हत्या एक सामानाचा ट्रक आणी एक पिकअप होती. त्यामुळे सभासदांनी पेट्रोमेक्स लावुन ती एका काठित अडकवली आणी ती काठी दोघा सभासदांनी दोन्ही बाजुने पकडली त्यामुळे रस्त्यावर चालण्याची सोय झाली. आजकाल ३-४ मोटर सायकल असतात ज्या दिवसभर पदयात्रींठी पाणी घेउन फीरतात. २ पिकअप असतात, एक सामानाचा ट्रक असतो. व एक पाण्याचा टँकर असतो. जे सकाळ पर्यंत पदयात्रींसाठी रस्त्यावर लाईटस ऑन करुन जागोजागी थोडया थोडया वेळाने थांबत असतात. बाकीच्यांनी मला निशाणीवालाच्या बाजुला उभं केलं आणी चालायला सुरुवात झाली. थोडासाच वेळ मी फास्ट चालले असेन नंतर पाय दुखायला लागले आणी वेग कमी झाला, त्या अध्यक्षांच्या बायकोने मला मागुन खेचुन पुढे ढकलायला सुरुवात केली ह्या प्रकाराने तर मी खुपच दमुन गेले. एक तर डोंगराळ रस्ता असल्याने चढण होती. मला पुढे चालवेना अगदी श्वास घेणेही जमेना मी त्यांना सोडुन दिले. मागेच राउतचा भाउ अमोल होता व आत्येभाउ वगैरे मंडळी होती ते म्हणाले ताई हळु चाला. लोकं अजुन मागे होती म्हणुन त्यांनी एका दहवीतल्या मुलाला माझ्याबरोबर चालायला सांगितले. त्याचे नाव मिथिलेश. हे पुर्ण गावकरी एकमेकांचे नातेवाईक. मिथिलेशने मला सांगितले की ताई मी तुम्हाला हाताला धरुन चालतो म्हणजे तुम्हाला फास्ट चालता येईल. खुप छान मुलगा. अंगाने अतिशय बारीक पण चांगल्या स्पीडने नेउ लागला आणी मला दमायला सुद्धा झालं नाही.सारखी बडबड करत होता. ह्याच्याशी आजपर्यंत ओळख कायम आहे. दोन भाउ एक बहीण, वडील अतिशय दारुडे, आईने मासे विकुन लहानाचे मोठे केले, स्वतः कामाला लागुन ह्याने लहान भावाला आय.टी.आय मधे अ‍ॅडमिशन घेण्यासाठी पैसे जमा केले पण लहान भाउ वाईट संगतीत पडलेला खुप समजावुन समजावुन कसंबसं आय. टी. आय. पुर्ण केलं तर नोकरीला जायला तयार नाही. मिथिलेशने आताच स्वतःचं आय. टी. आय. पुर्ण केलं. जवळजवळ सगळ्यांची हीच कहाणी. टी.ए.पी.एस. आणी बी.ए.आर.सी मुळे गावातल्यांच्या जमीनी गेल्या. त्यामोबदल्यात काही लोकांना नोकर्‍या मिळाल्या. आताची पिढी शिक्षणाच्या बाबतीत अतीशय उदासीन. शिकत नाहीत मग टी.ए.पी.एस. आणी बी.ए.आर.सी मध्ये काँट्रॅक्ट मधे कामाला जातात. फक्त सही करुन येणार , कामाच्या जागी दादागिरी करणार. त्यामुळे बोईसर मध्ये खुप मोठी एम. आय. डी. सी. असुनही ही लोकं प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करु शकत नाही. कारण एक तर बाहेर वर्कर्स ची १२ तास
ड्युटी असते व आराम करायला जराही वेळ देत नाहीत.

थोडया वेळाने राउतचे नातेवाईक सभासद जे शेवटी राहुन सगळयांना घेउन येतात ते आम्हाला मिळाले. आम्ही सगळ्यात शेवटी चालत होतो. सकाळी साधारण ६.३० वाजता चहासाठी हॉल्ट घेतला. महालक्ष्मी गडावर जाणार्‍या रस्त्याच्या स्टॉपवर सर्वजण थांबलो. चहा झाला डस्टबीनची काही सोय नव्हती सगळीकडे जंगल आणी शेतं विरळ वस्ती, सर्वांनी प्लॅस्टीकचे कप्स बाहेरच टाकले. आजकाल निदान पुठ्ठयाची खोकी डस्टबीन म्हणुन ठेवतात. थोड्यावेळाने नाश्ता आला , प्रत्येकी २ वडापाव मिळाले. नंतर पुन्हा चालायला सुरुवात झाली. मी पुन्हा मागे पडले. दोन्ही पायाला २ छोटे छोट फोड आले होते. अंग दुखत होतं. कसेबसे सकाळी ९.३० ला कासाला दुपारच्या जेवणाच्या थांब्या पर्यंत पोहोचलो. लोकं ८ वाजताच पोहोचली होती. तिथे मंदीरात पालखीच्या थांब्याची सोय झाली होती. सर्व पदयात्री मावतील ईतके मोठे सभाग्रूह होते. बायका आंघोळीसाठी गेल्या होत्या. मला एक बाई तिथे घेउन गेली. एक नदी होती बायका एका दिशेने तर पुरुष खुप कुठे लांब आंघोळीला गेले होते. मनाची समजुत घातली की आता आपल्यासाठी ईथे बाथरुम कुठे असणार ८ दिवस आपल्याला अशीच आंघोळ करायची आहे आणी बाकीच्या १५० बायकांनीही केलीच ना मग आपल्यालाही करायला काय हरकत आहे. बाकीच्या बायकांची आंघोळ होउन त्या कपडे धुवत होत्या. मी कपडे धुण्याचा त्रासाला कंटाळून ८ दिवसांसाठी ८ ड्रेसेस नेले होते. आंघोळ केली. १-२ कपडे धुवुन मंदीरात येउन बसले. आरती सुरु झाली. घिवलीतल्या येथे माहेर असलेल्या एक बाई कासाच्या ह्या मंदीराजवळ राहतात त्यांनी ५ वर्ष पदयात्रींना जेवण द्यायचे ठरवले होते. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. जेवल्या वर नर्सबाईंकडुन फोडातुन पाणी काढुन घेतले. ह्या नर्स फक्त २ वर्षे होत्या ४ वर्षापासुन आमच्या मंडळाकडुन औषधांची काहीच व्यवस्था नसते. पदयात्री स्वतःच कॉम्बिफ्लेम, क्रोसीन , डायक्लोजेम बरोबर घेउन चालतात. मी २ वर्षांपासुन आमच्या फॅमिली आयुर्वेदीक डॉक्टरांकडुन आयुर्वेदीक गोळ्या घेउन जाते. खुपच उन असल्याने ३ वाजता निघण्याचे मंडळाने ठरवले. अतिशय कडक उन्हात प्रवासाची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे मी मागे पडले, चालुन चालुन दमले. पदयात्रेत एक ७५ वर्षाच्या आजी माझ्या पुढे चालत होत्या मी त्यांना पाहुन मनातच बोलत होते कि इतके वय असुन त्या माझ्या पुढे चालत आहेत आणी माझी अवस्था बिकट झालीये. बरोबरच्या लोकांनी मला चहाचा थांबा जवळ आलाय असं सांगत सांगत कसंबसं चहाच्या थांब्यापर्यंत पोहोचवलं. चहा झाल्यावर निघालो. आता मात्र चालवेना पण बरोबरच्या लोकांनी पुन्हा गमती जमती सांगत कसंबसं रात्रीच्या थांब्यावर ७-३० च्या दरम्यान पोहोचवलं. तो एक आदिवासी पाडा होता. एका आदीवासी घराच्या अंगणात सोय केली होती. त्या घरातल्या बायकांना १० रु. एक घमेलं या दराप्रमाणे गरम पाणी घेउन बर्‍याच बायकांनी पाय शेकुन घेतले. पाय शेकल्यावर बरं वाटु लागलं. आरती, जेवण करुन सर्वजण झोपुन गेलो. जंगल असल्याने तिथे ही खुप थंडी होती. २ र्‍या वारीच्या वेळी ह्या ठीकाणी पोहोचायला आम्हाला खुपच उशिर झाला होता. आम्ही ५ जणं होतो आणी रात्रीचे ८ वाजुन गेले होते. जंगलाच्या आतमध्ये होतो, स्ट्रीट लाईटस नसल्याने पुर्ण अंधार होता समोरचे दिसत नव्ह्ते. कुठपर्यंत पोहोचलो तेही कळत नव्ह्ते. मोबालची रेंज नसल्याने मंडळाशी काँटॅक्ट होत नव्हता. मंडळाचे सभासदही चिंतेत होते शेवटी आरती संपवुन सभासदांनी वर जाउन उडणारा फटाका फोडला तेव्हा कळले कि पडाव १० मिनीटावर आहे.

कचर्‍या बद्द्ल म्हणायचे तर आम्ही जातो त्यावेळी आम्ही निघतो त्याच वेळी मुंबईहुन बर्‍याच पालख्या निघतात जवळपास २०० पालख्या एकाचवेळी वेगवेगळ्या ठीकाणातुन चालत असतात. कुणाच्या पालखीत १०० पदयात्री असतात तर कुणाच्या पालखीत १५,०००. मुंबई वाले शेवटपर्यंत हायवेवर चालत असतात. कमीतकमी ५ लाख
पदयात्री एकत्र चालत असतात. पदयात्रींठी पाण्याची , चहाची , सरबताची सोय असते. ह्यासाठी प्लॅस्टीकचे कपच सोईस्कर असतात. हायवेवर चालताना शक्यतो पदयात्री हातात कप घेउन चालत चालत जातात आणि नंतर कप्स फेकतात सगळ्यांना एका ठीकाणी जमायला जागाही नसते आणी वेळही नसतो. बरं हि सोय फक्त त्या एकाच पदयात्री मंडळापुरती मर्यादीत नसते दुसरा कुठलयाही मंडळाचा पदयात्री असो तो हक्काने कुठलाही मंडळात जाउन खाउ पिउ शकतो. माझा निरिक्षणानुसार पदयात्री मंडळ पाण्यासाठी व सरबतासाठी जवळपास प्लॅस्टीकचे जाड किंवा स्टीलचे प्याले वापरतात जे पुन्हा पुन्हा वापरता येतात आणी बहुतकरुन कुणीही ग्लास उष्टावत नाही. सर्वच पदयात्रा मंडळाचे पाणी वाढपी हे मोटरसायकल वरुन फीरुन फीरुन पाणी विचारत असतात कारण रोडवर पदयात्री पुढेमागे असतात. ह्यावेळी थोडे फोटो काढले आहेत.
20140406_070259.jpg
तसेच जेवणासाठीही शक्यतो स्टीलची ताटेच असतात जी प्रत्येक पदयात्रींनी आपली आपण धुवायची असतात. नाश्त्यासाठी आणी जेवणासाठी प्रत्येक मंडळाची जागा ठरलेली असते जीथे त्या त्या मंडळाचे पदयात्री एकत्र जमुन
आरामात नाश्ता जेवण करतात. त्या त्या ठीकाणी डस्टबीन ची सोय मंडळ करते. पण जे बाहेरचे सेवा करणारे असतात जे पदयात्रींसाठी सरबत , नाश्ता, पाणी ठेवतात ते बहुतकरुन डीस्पोजेबल डीशेस , ग्लासेस वापरतात आणी पदयात्रींची संख्या ईतकी जास्त असते की डस्टबीन ओवरफ्लो होतात. मी स्वतः पाहते सिन्नर ला बरेचजण सेवा करतात तेव्हा प्लॅस्टीकच्या ग्लासांचा खच पडलेला असतो ह्यावेळी तर एकदम रोडवरच इतका खच पडला होता की त्यावरुनच जावे लागले. मी असे नाही म्हणत की पदयात्री असं करतच नाही पण रोडवर ईतके पदयात्री एकत्र चालत असताना
मंडळाला काही शक्य नसते कारण बर्‍याच मंडळातील सभासद स्वतःही चालत असतात, पुन्हा पदयात्रींसाठी वेळेवर नाश्ता आणी जेवण, झोपेची व्यवथा हे सर्व असतं. आपापल्या पदयात्रींची सेफ्टीची जबाबदारीही असते. थकल्याने कुणी खुप मागे राहतं , उन्हामुळे कुणाला चक्कर, लुज मोशन्स होतात कुणाला पायाला जखमा होतात. माझ्या ५ व्या
वारीच्या वेळेस एका माणसाला जव्हारला पोहोचता पोहोचता हार्ट अटॅक आला होता. आमच्या मंडळाकडे अ‍ॅम्बुलन्स नसते म्हणून दुसर्‍या मंडळाकडुन अ‍ॅम्ब्युलन्स मागवुन त्याला घरी पाठवुन दीले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.. खरे तर त्रासाबद्दल कुणी लिहित नाही, तूम्ही लिहिताय त्यामूळे खरी परिस्थिती कळतेय.
( निलेशच्या व्यंगाबद्दलचे उल्लेख काढणार का प्लीज. )

माझ्या प्रश्नाच्या सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.
होता होईतो आपल्याकडून , आपल्या मंडळाकडून 'स्वच्छता बाळगणे' याकरिता प्रयत्न चालू ठेवा.

कविता,
खूप छान लिहिताय. तिन्ही भाग मस्त वाटले वाचायला.
अजुनपर्यंत असे पदयात्रींचे अनुभव वाचले नव्हते.

दिनेशजी : निलेशच्या व्यंगाबद्द्ल लिहिले होते कारण त्याच्याबद्द्ल सविस्तर लिहीणार आहे. आता निलेश आणी मी खुप चांगले मित्र आहोत. तो पदयात्रेत मला कधीही एकटं सोडत नाही. त्याचं बालपण दु:खात गेलं त्याबद्द्ल लिहिणार होते. चुक झाली असेल तर माफ करा. उल्लेख काढुन टाकलाय..