माझे साईपदयात्रेतील अनुभव. - भाग - १.

Submitted by कविता१९७८ on 30 May, 2014 - 01:39

मी ६ वर्षांपासुन पदयात्रा करीत आहे. मार्च एप्रिल मध्ये जात असते. आमचा पदयात्रेचा मार्ग चारोटी - जव्हार - मो़खाडा - त्र्यंबकेश्वर - नाशिक - सिन्नर - वावी ते शिर्डी असा आहे. दिवसा कमालीचे उन आणि रात्री जंगल असल्याने भरपुर थंडी असते. गेल्याच महिन्यात मी माझी ६ वी वारी पुर्ण केली. रात्री अतिशय थंडी असल्याने मला ह्यावेळी रात्री झोपच लागायची नाही. २ शॉल्स नेउन सुद्धा सारखी कुडकुडायचे. म्हणुन विचार केला कि वुलनच्या उबदार शॉल्स घेतल्या तर बरं पडेल. मी आमच्याकडे शोध घेतल्या शॉल्स तर मिळाल्या पण साईज छोट्या होत्या. त्यामुळे मी मायबोलीवर मदत मागितली. मला लगेचच रिया, वेल, अश्विनी के , जागु, गंधा, मंजुडी , मनीमोहोर, नंदीनी , बी.एस. यांची मदत मिळाली. जागुने लगेचच अवल यांच्याशी काँटॅक्ट करुन दिला. सगळयांचे मनापासुन आभार. सगळ्यांनी पदयात्रेचा कौतुक केलं आणि पदयात्रेचा अनुभव लिहिण्याविषयी सुचवले. मला लिहिण्याचा अनुभव नाहीये पण वरील मैत्रीणींच्या प्रेमाखातर मी जसं जमेल तसं लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकत असल्यास माफी असावी. लिहिताना ६ वार्‍यांचा अनुभव जसा आठवेल तसा टाकण्याचा प्रयत्न करते.

दरवर्षी बर्‍याच ठिकाणांहुन भाविक साईपदयात्रेत सामील होतात. माझ्या घरातुन माझा सख्खा भाऊ गेली १४ वर्षे पदयात्रा करतोय तर एक चुलत भाउ २१ वर्षे व दुसरे ५ - १० वर्षांपासुन पदयात्रेत सामील होतात.पण बहुतकरून ग्रुप हा फक्त पुरुषांचाच दिसायचा. मला जायची तीव्र ईच्छा होती. मी शिर्डीला गाडीतुन बर्‍याचजणांना चालत जाताना पाहायचे, एका ग्रुपमध्ये बायका दिसायच्या. मला त्यांचे खुप कौतुक वाटायचे. २००८ च्या नोव्हेंबर मध्ये माझ्या बहीणीच्या बिल्डींगमध्ये भाउजींचे मित्र राहायला आले. बोलता बोलता कळले की त्यांच्या गावातुन २ ग्रुप पदयात्रेसाठी निघतात व दोन्ही ग्रुपमधुन बायका ही जातात. त्यांचे गाव घिवली आहे. पालघर - डहाणुच्या (महाराष्ट्र - गुजराथ बॉर्डर ) मध्ये बोईसर हे स्टेशन आहे जिथे मी राह्ते. मोठा एम.आय.डी.सी. एरीया आहे. तिथुन १० कीमी वर तारापुर हे गाव आहे. व तिथुन आतमध्ये २ कीमी वर घिवली आहे. बी.ए.आ. सी. व टी.ए.पी.एस. चे १,२,३,४ हे प्लांट गावाला लागुन आहेत. एक ग्रुप जो भंडारी जमातीचा (गावड, मोरे, पाटील, राउत ) आहे तो राउतच्याच माणसांचा आहे म्हणजे ग्रुप मेंम्बर्स हे त्यांचे सर्व नातेवाईक आहे, भाउ, मामा , चुलते वगैरे आहेत. हे ग्रुप गुढीपाडव्याच्या दिवशी निघतात आणी रामनवमीच्या आदल्या दिवशी पोहोचतात. मी त्यांना लगेचच सांगितले की माझे नाव तुमच्या ग्रुपमध्ये नोंदवा. फेब्रुवारी २००९ साली त्यांनी सांगितले की २६ मार्च २००९ ला पदयात्रा निघणार आहे तर २ फोटो , फी हे द्यावं लागेल आणी ते पत्रक देतील त्याप्रमाणे सामान बरोबर घ्यावं लागेल.

माझ्या घरच्यांनी मला खुप समजावण्याचा प्रयत्न केला की ईतक्या लांब जाणं झेपायचं नाही. ८ दिवस चालायचं आहे, तु १ कीमी सुद्धा चालत नाहीस कसं होणार? जंगलाचा रस्ता, कुठे उघड्यावर झोपणार जंगलचा रस्ता आहे, उन खुप असणार, तुला सतत ए.सी.ची सवय , परत मुलीचा सेफ्टीचा प्रश्न असतो. परत ज्या ग्रुपबरोबर जातेस ती लोकं अतिशय अशिक्षीत , लगेचंच मारामारीवर येणारी , बायकाही तशाच पुरुषांप्रमाणे अरेरावी करणार्‍या, जाउ नकोस नेहमी गाडीनं जातेस तशीच जा, साईबाबांनी काही सांगीतलं नाहीये कि चालंतच ये म्हणुन ह्या ना त्या प्रकारे मला घरच्यांनी न जाण्याचा सल्ला दिला. पण मला साईबाबांवर विश्वास होता ते मला नेतील ह्याची खात्री होती आणी माझी चालत जाण्याची ईच्छा खुपच प्रबळ होती. माझे वजन ही भावा प्रमाणे जास्त होते त्यावेळी मी चालु शकेल ही माझ्या घरच्यापैकी कुणालाही खात्री नव्हती. आणी मी रोज साईबाबांना विनवायचे की देवा मला सुखरुप न्या.

राउत ने दिलेल्या लिस्ट प्रमाणे मी सामानाची जमवाजमव केली. ऑफीसमधुन १५ दिवसांची सुट्टी घेतली. पॅकींग केली , अगदी निघेपर्यंत सर्व न जाण्याचा सल्ला देत होते. माझ्या नकळत राउतने नातेवाईकांना सांगितले होते. की हिला आरामाची सवय आहे हि काही २ की.मी पेक्शा जास्त चालु शकणार नाही हिला जितकं चालता येईल तितकं चालवा आणी नाहि जमलं तर गाडीत बसवा. पण एकटीला कुठेही सोडु नका मागे पडली तरी तिच्या बरोबर राहा.
राउतने मला सांगितले कॅश जास्ती बरोबर घेउ नकोस, आणी माणसं कशीही असोत कुणाच्याही नादी लागु नकोस, आपल्याला शिर्डीला पोहोचायचं आहे हेच ध्यानात ठेव. २५ मार्चला राउत बरोबर मोठी सामानाची बॅग पाठवुन दीली आणी २६ मार्च २००९ ला सकाळी घिवलीला पोहोचले. आणी पदयात्रेला सुरुवात केली.

(क्रमश Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता, मस्त! छान सुरुवात झाली Happy

<<पण मला साईबाबांवर विश्वास होता ते मला नेतील ह्याची खात्री होती आणी माझी चालत जाण्याची ईच्छा खुपच प्रबळ होती. माझे वजन ही भावा प्रमाणे जास्त होते त्यावेळी मी चालु शकेल ही माझ्या घरच्यापैकी कुणालाही खात्री नव्हती. आणी मी रोज साईबाबांना विनवायचे की देवा मला सुखरुप न्या. >>> "तुम्ही जोर काढू लागा, मी दुधाची वाटी घेऊन मागे उभाच आहे." अशी साईनाथांनी ग्वाही दिलीच आहे (संदर्भ : श्रीसाईसच्चरित)

छान वाटतंय वाचताना. अशी अवघड यात्रा म्हणजे स्वतःचाच एक निराळा शोध असतो. त्या शोधाची प्रक्रिया पुढील भागांतून वाचण्याची उत्सुकता लागली आहे.
"पंढरीची वारी" ह्या सुरेख चित्रपटाचीही अपरिहार्यतेने आठवण झाली.