काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १२ वा मगरेब देश; ट्युनिशिया, मोरोक्को, लिबिया आणि अल्जेरिया

Submitted by शबाना on 31 May, 2014 - 11:17

इजीप्तबरोबरच उत्तर आफ्रिकेतले इतर प्रदेश लिबिया, मोरोक्को, अल्जिरीया आणि ट्युनिशिया हे ही नावाला ऑटोमन साम्राज्याचे भाग होते, परंतु या प्रांतात इथल्या अधिकाऱ्यांचे, मनसबदारांचेच शासन होते. युरोपशी भौगोलिक आणि आर्थिक संलग्नता या प्रांतांची होती आणि त्याचेच रुपांतर नंतर युरोपीय वसाहतवादी देशांनी या प्रांतांना जोडून घेण्यात किंवा आक्रमण करून काबीज करण्यात झाले. वसाहतवादाचा यांचा अनुभव आणि नंतरचे राष्ट्रीय उठाव यातही बरेचसे साधर्म्य आहे. मोरोक्को पासून सुरुवात करूयात. मोरोक्को हा अटलांटिक आणि भूमध्य समुद्रकिनार्यांवर वसलेला बराचसा डोंगराळ आणि वाळवांटी प्रदेश. अरबस्तानच्या पश्चिमेला म्हणून मगरेबचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा. इसवी सनाच्या पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि नंतर रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा देश होता. मुळच्या बर्बर टोळ्या आणि व्यापार किंवा राज्यविस्ताराच्या उद्देशाने आलेले अरब यांची इथे मुख्य वस्ती. सातव्या शतकात इस्लामचा आणि त्यानंतर अनेक इस्लामिक राजवटींचा प्रसार इथे झाला. तेव्हापासून मुस्लिम बहुल असलेला हा प्रदेश अनेक मुस्लिम राजवटी आणि साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. अजूनही इथे राजेशाहीच आहे. मोरोक्कोच्या भौगोलिक स्थानामुळे युरोपीय सत्तासंघर्ष या भूमीवरही खूप रंगला. स्पेन, ब्रिटन, फ्रांस आणि जर्मनी सर्वांचेच या भूभागात हितसंबंध. स्पेन, पोर्तुगाल आणि ब्रिटनचा प्रभाव आजही इथे दिसून येतो. अमेरिकेस राष्ट्र म्हणून पहिलीमान्यता मोरोक्कोने दिली. १७८६ साली अमेरिका आणि मोरोक्कोत झालेला मैत्री करार हा अमेरिकेच्या इतिहासातील पहिला आणि आतापर्यंत अबाधित राहिलेला मैत्री करार. अमेरिकेच्या व्यापारी जहाजांना मोरोक्कोच्या बंदरात सुरक्षा आणि संचार या कारणांसाठी हा करार तेव्हाच्या सुल्तानाबरोबर केला होता. मोरोक्को जरी स्पेन आणि फ्रेंच वसाहत म्हणून या युरोपीय शक्तींच्या अधिपत्याखाली गेला असला तरी इथली राजेशाही, शासनव्यवस्था मात्र अबाधित राहिली.

अल्जिरियाची कहाणी मात्र फार वेगळी आणि जटील आहे. अल्जीरीयास फ्रेन्चानी फक्त वसाहत म्हणून न ठेवता त्या भूभागास फ्रान्सच्या मुख्य भूमीस जोडून फ्रान्सचाच भाग म्हणून जाहीर केले व १८४८ मध्ये सर्व फ्रेंच व्यवस्था लागू केल्या. सातव्या शतकापासूनच अल्जेरीयात मुस्लिम धर्मप्रसार आणि राजवटींचा प्रसार सुरु होता. अनेक मुस्लिम राजे इथे होऊन गेले व त्यांनी त्या त्या कालच्या खिलाफती / साम्राज्यांबरोबर संबंध ठेवले. सोळाव्या शतकात तत्कालीन राजप्रमुखाला ऑटोमन सम्राटाने जानिसरी आणि इतर लष्करी मदत देऊन हा प्रदेश ऑटोमन साम्राज्यात आणला. परंतु ऑटोमन साम्राज्याशी संलग्नता ही नावापुरतीच होती आणि इथे प्रचलित शासनव्यवस्था निर्धोक चालू राहिली. १८३० मध्ये फ्रेंचानी आक्रमण करून अल्जेरिया ताब्यात घेतला. यावेळी स्थानिक टोळ्या आणि फ्रेंच यांच्यात घनघोर लढाई झाली, अल्जेरीयातील जनतेचा बराच संहार या लढ्यात आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्ती -प्लेग, कॉलरा, यात झाला. फ्रेन्चानी मोठ्या संख्येने अल्जेरियात वसाहती स्थापन केल्या आणि स्थानिक लोकांच्या जमिनी बळकावून स्थलांतरित फ्रेंच नागरिकांना दिल्या. याचा परिणाम म्हणजे स्थानिक बर्बर जनता अधिकच गरीब झाली आणि त्यांच्यात विकासाची गती मागासलेलीच राहिली. फ्रेन्चानी सुधारणा करतानाही भेदनीतीचा अवलंब करून त्यांना धार्जिण्या लोकाना/ टोळ्याना शिक्षण आणि प्रशासनात सहभागी करून घेतले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय आंदोलन इथे प्रखर होते आणि शेवटी १९५४ पासून सुरु झालेले अल्जेरिया स्वातंत्र्य युध्द १९६२ मध्ये अल्जेरिअन प्रजासात्ताकाची स्थापना होऊन संपले.

ट्युनिशिया आणि मोरोक्कोच्या इतिहासात बरेचसे साम्य आहे. फ्रेंचांची वसाहत असली तरी स्थानिक अंमल हा तिथल्या लोकांचा होता. १८८१ सालापासून ट्युनिशिया हा फ्रेन्च संरक्षित प्रदेश म्हणून फ्रेंचांनी प्रशासित केला. वसाहतवादाच्या शर्यतीत इटलीने त्यामानाने फार उशिरा प्रवेश केला. तोपर्यंत बलाढ्य ब्रिटीश, फ्रेंच आणि जर्मनीने साऱ्या भूभागांची आपापसात वाटणी करून घेतली होती. भूमाध्यावामुद्राच्या पल्याड असलेल्या लीबियावर इटलीने कब्जा केला आणि फ्रेन्चानी अल्जेरियात राबवलेले वसाहतनिर्मितेच्या धर्तीवर अनेक नागरिकांना लिबियात स्थलांतरित करण्यास प्रोत्साहन दिले. उत्तर आफ्रिकेतल्या या देशात वसाहतवाद हा वेगवेगळ्या स्वरूपात पोहोचला, फोफावला आणि त्यास मिळालेला प्रतिसाद आणि त्याविरुद्धचे बंडही या सुरुवातीच्या रणनीतीनुसार आकार घेत गेले. या सर्व देशांतील जनता एकजिनसी नसून वंश, भौगोलिक आणि सामाजिक दृष्ट्या विविधता असलेले हे समुदाय होते. त्यांच्यात भेदभाव आणि पारंपारिक मित्रता आणि शत्रुता असे अनेक प्रवाह होते. त्यातच बाहेरून येणाऱ्या युरोपीय लोकांची भर पडली. मोरोक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशियामध्ये अरब आणि बर्बर टोळ्यांमध्ये मोठी दरी होती. वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक भेद होते आणि वसाहतकारी देशांनी या भेदांचा फायदा घेतलाच. लिबियाचा प्रश्न थोडा वेगळा होता. वांशिक भेद नसले तरी येथे आदिवासी टोळ्या जास्त प्रमाणात होत्या आणि त्यांच्यात आपसात अनेक भेद होते. बाहेरून येणाऱ्या युरोपीय जनतेचे प्रमाणही फार मोठे होते. १९१२ ते १९५६ मध्ये मोरोक्कोमध्ये दीड लाख लोक आणि अल्जेरीयात दीड दशलक्ष लोक स्थलांतरित झाले, त्युनिशियात हाच आकडा अडीच लाख आणि लिबियामध्ये दीड लाख लोक असा होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या वांशिक, भाषीय, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वेगळ्या अशा या लोकांनी स्थानिक लोकांच्या जमिनी आणि उपजीविकेच्या साधनांवर कब्जा केला. या वसाहतकारांनी सुरु केलेल्या कायदे आणि प्रशासनातील तरतुदींचा उपयोग त्यांनी आपल्या स्वार्थासाठीच केला. परिणामी स्थानिक जनतेत गरिबी आणि रोगराई वाढली. वसाहतीतल्या इतर संसाधानांबरोबरच मानवी संसाधने ही त्यांच्या कामात आणि मुख्यत्वे दोन्ही महायुद्धात सैनिक म्हणून वापरली. फ्रेंच, ब्रिटीश आणि इटलीसाठी धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांमध्ये अल्जेरिया आणि मोरोक्को त्याचप्रमाणे लीबियाचे खूप लोक होते. परंतु त्याचवेळी स्थानिक लोक आणि त्यांचे वासाहतिक मालक यांच्या जीवनमानात खूप दरी होती. Stranger by Albert Camus. आणि Frantz Fanon's book Les damnes de la terre या दोन पुस्तकात ही तफावत आणि त्याचा या समाजावर झालेला आर्थिक आणि मानसिक परिणाम अतिशय उत्तम चित्रित केला आहे. नगदी पिकांच्या लागवडीमुळे अन्नपाण्याची ददात वाढलीच होती त्याचबरोबर आलेल्या नव्या करआकारणीमुळे ही जनता पेटून उठली नसती तरच नवल होते. बंडाची सुरुवात काबली नावाच्या डोंगराळ जमातीत झाली आणि त्याचे लोण सर्व स्तरात आणि प्रदेशात पोहोचले. १८५१ ते ५७ असा मोठा कबिलिञ्चा उठाव अल्जेरियात झाला आणि पुढचे शतकभर वेगवेगळ्या मार्गाने वसाहती सत्ताधार्कांना विरोध होताच राहिला.

वसाहतकाळात या सर्व देशांत वसाहतींचे कायदे आणि प्रशासनपद्धती लागे करण्यात आल्या. अल्जेरियात तर फ्रेंच कायदा व शासनपद्धती तंतोतंत लागू करण्यात आली. ट्युनिशिया आणि मोरोक्को मध्ये आणलेल्या प्रशासन आणि कायदेपद्धती थोड्या वेगळ्या होत्या. इथे फ्रेन्चांनी तिहेरी न्यायालीन पद्धती सुरु केली. शासनप्रणित फ्रेंच कायद्यावर आधारित न्यायालये, पारंपारिक कायद्यावर आधारित मुस्लिम न्यायालये आणि बर्बर न्यायालये. परिणामी फ्रेंच कायदेपद्धती आणि व्यवस्था इथे इतक्या रुजल्या कि स्वातंत्र्यानंतरही या देशांमध्ये त्या चालू राहिल्या. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात राष्ट्रीय आंदोलने आणि नंतर स्वतंत्र देशांमध्येही या फ्रेंच व्यवस्था टिकून आहेत. स्पेनचा आणि इटलीचा असा संस्थात्मक प्रभाव त्यांच्या अधिशासित प्रदेशांवर पडलेला दिसत नाही याचे कारण हे दोन्ही देश आणि त्यांच्या शासनपद्धती या फ्रेंच आणि ब्रिटीश पद्धतीएवढ्या विकसित नव्हत्या आणि त्यामुळेच त्या प्रभावीही नव्हत्या.

दोन्ही महायुद्धांच्या काळात या देशांतील राष्ट्रीय आंदोलनानी जोर धरला होता. अल्जेरिया आणि मोरोक्कोतून मोठ्या प्रमाणावर सैनिक या महायुद्धांमध्ये आपापल्या वासाहतिक मालकांसाठी लढले होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान राजकीय सत्तांची समीकरणे बदलत असतानाही या देशातील राष्ट्रीय नेते त्या त्या वसाहतीन मालकांशी प्रामाणिक राहिले होते. उदा जर्मनीने पूर्ण फ्रान्सचा ताबा घेतल्यानंतरही अल्जेरिया आणि मोरोक्कीचे नेते जर्मनीला मिळाले नाहीत. या आंदोलनांच्या नेत्यांना वासाहतिक मालकांनी दिलेल्या महायुद्धानंतर स्वातंत्र्याचा विचार करू या वचनावर विश्वास होता. फ्रान्सचे नेते जनरल दे गॉल यांनी दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेतील मुस्लिम जनतेने केलेल्या त्याग आणि पराक्रमाची जाहीर प्रशंसा केली होती. परंतु महायुद्ध संपल्यावर त्यांनी आपला शब्द काही पाळला नाही. मोरोक्कोमध्ये त्यांनी अस्तित्वात असलेल्या राजेशाहीकडे सत्ता सुपूर्द केली मात्र. वसाहतींचा कारभार फ्रेन्चान्साठी आता तिथला स्थानिक राजा बघणार अशी होती. परंतु अल्जेरियाच्या बाबतीत फारच कडक धोरण अवलंबले. अल्जेरिया ही फ्रांसची वसाहत नसून त्या देशाचाच एक भाग आहे असे फ्रान्सचे धोरण. त्यामुळे राष्ट्रीय आंदोलनाला दडपून टाकण्याचे कसोशीने प्रयत्न झाले. या कामी त्यांनी लष्कराचाही उपयोग अगदी दामटून केला. १९५४=६२ अलेजिरियचा अतिशय रक्तरंजित स्वातंत्र्यसंग्राम. जवळजवळ ६७५००० लोक यात मारले गेले आणि फ्रेंच सैन्याने या कालवधीत दाखवलेली क्रूरता भयानक होती. राष्ट्रीय आंदोलनातील लोकांचे अत्यंत हाल त्यांनी केले. Battle of Algeria हा यावर निघालेला सिनेमा पाहताना या निर्घृणतेची कल्पना येते. या राष्ट्रीय आंदोलनात नंतर अल्जेरीयात स्थायिक झालेले फ्रेंचही लढताना दिसतात आणि मेनल्यंड फ्रांसपासून विभक्त होण्याची मागणी पुढे येते. हा गोंधळ आणि क्रूर दडपशाही फ्रान्सचे चौथे प्रजासत्ताक कोसळेपर्यंत चालते पण त्यानंतर आलेल्या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष जनरल दे गॉल च्या नेतृत्वाखाली शेवटी उभयपक्षी वाटाघाटी होऊन फ्रेंच प्रजासत्ताक अल्जेरीयाचे स्वातंत्र्य मान्य करतात. फ्रान्समधल्या Avian या गावी या वाटाघाटी झाल्या म्हणून याला Avien Accord म्हणून नाव आहे. स्वातंत्र्यानंतर अल्जेरिअन राष्ट्रीय आघाडीकडे सत्ता येते. इतक्या वर्षाच्या चिवट आणि रक्तरंजित संग्रामात तटून उभ्या असलेल्या या संघटनेस मिळालेला अल्जेरिअन जनतेचा पाठींबा हा अतुलनीय असाच होता. हा स्वातंत्र्यसंग्राम लष्करी पातळीवर दहा वर्षे चालला होता. साहजिकच यांच्या नेत्यात लष्करी अधिकार्यांचा भरणा होताच. त्यामुळे लष्करी ताकद आणि प्रचंड जनपाठींबा या बळावर त्यांनी एकाधिकारी सरकारे स्थापन केली. Magreb.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शबाना,

अतिशय रंजक आणि रोचक माहीती. धन्यवाद! Happy उत्तर अफ्रिकी स्थानिक लोकांवर इस्लामचा प्रभाव कसा पडला ते जाणून घेणे रंजक असेल.

फ्रान्सने अल्जिरीया हा स्वत:चा भाग म्हणून घोषित केलेलं माहीत नव्हतं. तेव्हा अल्जिरीयावर अमाप अत्याचार केले. पण आज जणू त्याची परतफेड होत आहे. फ्रान्समध्ये अल्जिरीया आणि माली येथल्या मुस्लिमांची लक्षणीय संख्या आहे. दक्षिण फ्रान्समध्ये येत्या दशकभरात नागरी युद्ध सुरू होईल की काय अशी भीती व्यक्त केली जाते. फ्रान्समध्ये परदेशी मुस्लिमांना मुक्तद्वार उघडून दिले म्हणून द गॉलच्या नावे बोटे मोडण्यात येतात.

या लेखमालेत युरोपातील आजचा इस्लाम हा लेख वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

छान लेख माला. अल्जिरीयाचे युद्ध हा अतिशयच सेन्सिटिव विषय आहे. अल जझिरा चॅनेल वर कधी कधी या विशयावर फिल्म्स असतात. या भागातील संस्कृतीबद्दल ही लिहा. मला मोरोक्कन जेवण फार मस्त
वाटते. त्यांची ती भांडी, ती मिठातली लिंबे इत्यादी फार मजेशीर वाट्ते.

अमा,

>> मला मोरोक्कन जेवण फार मस्त
>> वाटते. त्यांची ती भांडी, ती मिठातली लिंबे इत्यादी फार मजेशीर वाट्ते.

Rofl

विषय काय चाललाय आणि तुमचं काय चाललंय!! Lol Light 1

आ.न.,
-गा.पै.