जनसंमोहिनी...

Submitted by चैतन्य दीक्षित on 28 May, 2014 - 22:51

काल खूप दिवसांनी गुरुजींकडे (पं. राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडे) रियाजाला गेलो होतो. गुरुजींनी 'जनसंमोहिनी' हा राग निवडला होता. वादनानंतर मनात आलेले विचार अनावरपणे लिहिले गेले तेच इथे देतोय.

आमचा रियाज किंवा शिकवणी म्हणजे गुरूजी आधी बासरी वाजवतात आणि त्यांचं अनुसरण करण्याचा आम्ही बापडे प्रयत्न करतो. गुरूजी जो जो राग वाजवतात त्या त्या रागातल्या स्वरांचं एक निर्गुण शिल्प कोरत आहेत असंच वाटतं. स्वरांची एखादी लड अशी काही सुटते की जणु एखादं फूल उमलावं किंवा एखादी वीज चमकावी. दोन्ही उपमा जितक्या विरुद्ध तितक्याच नैसर्गिक ,सहज. कधी ते स्वर अलगद उमटतात, ऐकताना आस्वादता येतात तर कधी अगदी झटकन समोरून निघून जातात . आत्ता इथे वीज चमकलेली जाणवली म्हणून पुन्हा तिथेच पाहावं आणि वीज दुसरीकडेच कडाडावी तसंच काहीसं. ह्या स्वरांच्या लडींची जर फुलं झाली तर फुलपाखरांनाही कोणत्या फुलातला मध प्यावा? असा संभ्रम व्हावा.

हे निर्गुण स्वरशिल्प जितकं अल्पजीवी तितकंच चिरंजीव. क्षणाक्षणाला नवनवोन्मेषी, नवरूप धारण करणारं म्हणून अल्पजीवी, तर ऐकणार्‍याचे पंचप्राण कर्णेंद्रियावाटे शांत करणारं आणि केवळ त्याचं स्मरण होताच पुन:प्रत्यय देणारं म्हणून चिरंजीव!
गळ्यातून स्वर काढता येणं आणि बासरीवर फुंकरीच्या नियंत्रणानं स्वर उमटवणं हयात बराच फरक आहे. स्वर उमटवण्यापर्यंत ठीक आहे पण त्या त्या रागानुसार त्या त्या स्वरांचे नेमके 'स्वरलगाव' बासरीवर उतरवणं हे खूपच अवघड! तिथे केवळ घोकंपट्टीछाप रियाजाचा उपयोग नाही. रियाज हा तांत्रिक अंगासाठी उपयुक्त , पण रागाचा आत्मा गवसायला त्यातल्या स्वरांशी घट्ट मैत्रीच गरजेची. गुरुजींची स्वरांशी मैत्री आहे. ही मैत्री केवळ ह्या जन्मीची नसणार ख़ास! कारण गुरुजी कधी कधी आग्र्याचे किंवा जयपूरचे गायक होतात आणि 'नोम-तोम' मध्ये किंवा नुसत्या आकारात त्या रागाची खासियत आम्हाला ऐकवतात. ऐकताना कसं ऐकावं आणि त्या रागाच्या सर्वमान्य अशा ख़ास जागा कोणत्या? याची ती शिकवणी असते. हे शिकवणं इतकं सहज असतं की बासरी थांबली आणि गाणं चालू झालं तरी ऐकणा-याला दोन वेगळी स्वरशिल्पं न जाणवता त्या रागाची एक अखंड स्वराकृतीच जाणवते. गुरुजींना गाताना-वाजवाताना ऐकलं की त्यांचं स्वरांशी असलेलं तादात्म्य लक्षात आल्यावाचून राहात नाही.

इंटरनेटवर वाट्टेल ते ऐकायला मिळण्याचा काळ असल्याने आमच्यापैकी एखाद्यानं पूर्वी न ऐकलेलं रागाचं नांव सांगितलं तर 'तो राग माहिती नसल्याचं' किंवा 'माहिती आहे पण मी तो रीतसर शिकलो नसल्याचं' ते नम्रपणे सांगतात. बासरीवर एखादंच सिनेमातलं गाणं बर्‍यापैकी वाजवू शकणार्‍या आणि रागांच्या बाबतीत फार तर एखादी सुरावट बासरीवर उमटवू शकणार्‍या आणि त्यावर फुशारकी मारणार्‍या माझ्यासारख्यांना 'अजून रागसंगीताची बालवाडीही आपण पास झालो नसल्याची आणि अजून बरंच शिकायचं आहे' याची जाणीव होते. ही जाणीव होऊ शकेल असे गुरू लाभणं ही भाग्याचीच गोष्ट ! स्वत:च्या ह्या भाग्याबद्दल धन्यता मानातानाच त्यात लपलेली जबाबदारीही जाणवते आहे. प्रसिद्धी सहजसाध्य असलेल्या काळात निखळ ज्ञानसाधना करणं सोपं नाही. आणि म्हणूनच 'ज्ञानी गुरूंचा लाभ झाला ' यातच केवळ धन्यता मानून चालणार नाही. गुरूंकडून केवळ त्यांची विद्या न घेता त्यांची वृत्तीही घेतली पाहिजे. हे जे कळतंय त्यातलं कणभर जरी वळलं तरी भरून पावलो असं म्हणता येईल.
गेले काही दिवस थंड पडलेला रियाज आता पुन्हा जोमानं सुरू करायला हवा!

अवांतर-
कालच्या जनसंमोहिनीचं रेकॉर्डिंग केलंय, पण थोडा नॉइझ आहे, तो काढल्याशिवाय ते कुठे अपलोड करता येणार नाही.त्यामुळे गुरुजींनी एका कार्यक्रमात वाजवलेली भैरवी. ऐका. जनसंमोहिनीची लिंक नंतर देईन.

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे केवळ घोकंपट्टीछाप रियाजाचा उपयोग नाही. रियाज हा तांत्रिक अंगासाठी उपयुक्त , पण रागाचा आत्मा गवसायला त्यातल्या स्वरांशी घट्ट मैत्रीच गरजेची. >>>>> क्या बात है, चैतन्या .....

अतिशय सुंदर, अप्रतिम लेख.... तुझ्यासारखा संगीतातील जाणकारच (व सच्चा संगीतप्रेमीच) असा लेख लिहू जाणे ..

स्वरांवर (व तालावरही) इतके प्रेम असते या सर्वच बुजुर्ग मंडळींचे की त्यांच्या श्वासा-श्वासात काय रक्ताच्या प्रत्येक थेंबातही ते संगीत असल्याचे जाणवते - स्वरांशिवाय त्यांना जगणेही अशक्य वाटत असेल - एका वेगळ्याच दुनियेत ही सारी मंडळी रहात असतात - अशा दैवी-स्वरांचे लेणे लाभलेल्या तुझ्या गुरुंच्या संगतीतील जितके शक्य असेल तेवढे इथे कृपया लिहित रहावे - हे सगळे वाचतानाही अतीव सुरेल, अनामिक आणि अतिंद्रिय आनंद मिळत होता .....

तुला अनेकानेक शुभेच्छा.....

पण रागाचा आत्मा गवसायला त्यातल्या स्वरांशी घट्ट मैत्रीच गरजेची>> अगदी चैतन्य!

गळ्यातून स्वर काढायलाही अशी एकरुपता हवीच की! त्याशिवाय गाणं हे गाणं रहातच नाही मग..

बासरीतून असे स्वरलगाव काढणे खरोखरच कौशल्याचे काम असेल!.. ग्रेट!!
तू दिलेल्या लिंक वरची भैरवीही ऐकली आत्ताच!.. व्वा!! सुरेख!

धन्यवाद शेअर केल्याबद्दल. जनसंमोहिनीची ऐकायला आवडेल. छान लेख! Happy

पुरंदरे काका, अंजली
मनापासून धन्यवाद.

पुरंदरे काका,
>>स्वरांशिवाय त्यांना जगणेही अशक्य वाटत असेल
अगदी अगदी.

अंजली,
>>गळ्यातून स्वर काढायलाही अशी एकरुपता हवीच की! त्याशिवाय गाणं हे गाणं रहातच नाही मग..
अगदी खरंय.
गळ्याखेरीज कुठल्याही मानवनिर्मित वाद्यातून रागानुरूप स्वरलगाव काढणे हे कौशल्याचेच काम आहे.
सतारीवरही- आपल्याला सहज भासत असले तरी- त्या तारा जोर लावून पण योग्य तितक्याच खेचल्याशिवाय योग्य स्वर उमटत नाही.
गुरुजी म्हणतात आधी तो स्वर मनात उमटला म्हणजे वाद्यातूनही काढता येतो.

मस्त लिहिलंय. नुकताच (मागच्याच रवीवारी) अमर ओक यांचा 'अमर बासरी' नावाच कार्यक्रम झाला. लगेच बासरी शिकावी असं वाटण्या इतका भार्री झाला. तुझी आठवण आली होती आणि आज हा लेख.
तू बघीतलास का तो कार्यक्रम?

छान लेख चैतन्य....
गुरु कडुन ज्ञान घेणे,यासारखी दुसरी भाग्याची गोष्ट नाही. नवशिक्यांना महत्वाचा ठरतो तो रागाचा विस्तार. राग फुलवायचा कसा, त्याची मांडणी, काही विशिष्ट स्वर समुह. मजा येते
उदा. - मी परवा नंद शिकत असताना, रागाच्या मांडणीत, काहीतरी "गमपनी.....धमप, गममप्..रे.. सा..." अशी सुरुवात केली.
त्यावर माझ्या गुरुंनी सांगितले, कि हा जवाब /उत्तरार्ध आहे कशाचा तरि, समेवर येण्यासाठी.... सुरुवात वेगळी कर.....

जनसंमोहिनी ऐकायचाच आहे... वाट बघतोय.
माझ्याकडे विदुषी झरीन दारुवाला यांनी सरोदवर वाजवलेला होता. कॅसेटच्या दुसर्‍या बाजूला त्यांचा स्वनिर्मित राग सागर होता.. जितक्या वेळा ऐकला तितक्या वेळा संमोहित अवस्था अनुभवली.

ह्म्म! इतके उत्तम गुरु लाभले म्हणून कुलू यांच्या प्रश्नांना इतकी समर्पक उत्तरे दिली आहेस त्या दुसर्‍या बाफवर Happy

गुरुकडून शिकता शिकता जेंव्हा स्वतःच्या मनात एखादे फूल फुलत असेल तेंव्हा कसलं भारी वाटत असेल ना!

गुरुकडून शिकता शिकता जेंव्हा स्वतःच्या मनात एखादे फूल फुलत असेल तेंव्हा कसलं भारी वाटत असेल ना!>>>> अगदी अगदी . नुसत इमॅजिन केलं तरी भारी वाटत!
मी वसंतराव देशपांड्यांचा जनसम्मोहिनी ऐकलाय. आवडला खुप. रिषभवाली कलावती आहे असा सुरुवातीला सांगितलय त्यानी गाण्या आधी!

चैतन्य दीक्षित,

>> गुरूंकडून केवळ त्यांची विद्या न घेता त्यांची वृत्तीही घेतली पाहिजे. हे जे कळतंय त्यातलं कणभर जरी वळलं तरी
>> भरून पावलो असं म्हणता येईल.

अगदी शंभर टक्के अनुमोदन. असे गुरू जेव्हा शिष्यास तयार करतात तेव्हा ब्रह्मांडास दुसरा गुरूच मिळत असतो! Happy

आ.न.,
-गा.पै.

रागाचा आत्मा गवसायला त्यातल्या स्वरांशी घट्ट मैत्रीच गरजेची.>> क्या बात है चैतन्य. अगदी खरं.

रिषभवाली कलावती आहे असा सुरुवातीला सांगितलय त्यानी गाण्या आधी!>> बरोबर. कलावती मधे अवरोहात रिषभ घेतला की जनसंमोहिनी होतो.

सर्वांचे मनापासून आभार!
हर्पेन, नाही ऐकला अजून अमर बंसुरी:'( ऐकायचाय एकदा नक्की.
मुग्धानन्द, तुमच्या नावातच नंद आहे की. खूप गोड राग आहे. पण बासरीवर फारसा एकला नाहिये
जाहीर कार्यक्रमात. बासरीवर काहीसा अवघड आहे.
माधव, शिकता शिकता मनात असं फूल फुलाताना तर भारी वाटतंच पण गुरुजींकडून त्यासाठी
वाहवा मिळाली की अजूनच भारी वाटतं.
दिनेशदा, सरोदवर नाही ऐकला अजून जनसंमोहिनी, पण मस्त वाटेल नक्कीच.
पुनश्च सर्वांचे आभार.
-चैतन्य