बाल्कन युरोप - माँटेनेग्रो - भाग ४ (अंतिम) - कोटोर, चेटिन्ये, बुड्वा

Submitted by मनीष on 25 May, 2014 - 11:44

भाग पहिला - http://www.maayboli.com/node/48703
भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/48718
भाग तिसरा - http://www.maayboli.com/node/48810

दुब्रॉवनिकहून कोटोर,माँटेनेग्रो साधारण ९० किमीवर आहे. या सगळ्या प्रवासात अ‍ॅड्रियाटिक समुद्र एका बाजूने साथ देतच होता. माँटेनेग्रो हा युरोपातला सगळ्यात तरूण देश, २००६ साली सर्बियामधून स्वतंत्र झालेला. सीमेवर कारमध्ये बसूनच इमिग्रेशन झाले. आमच्याकडे माँटेनेग्रोमधे तसा एकच दिवस होता त्यात नेमका त्याच दिवशी पूर्णवेळ पाउस होता. आम्हाला दुब्रॉव्निकहून पिक्-अप साठी जो आला होता त्यालाच माँटेनेग्रोची एक लहानशी टूर (कोटोरच्या आजूबाजूला) करून आणायला सांगितले. तोही लगेच तयार झाला.

सगळ्यात महत्त्वाचे आणि पहिलेच आकर्षण होते कोटोर-बे मधले मानव-निर्मित बेट. मुद्दाम बुडवलेली जहाजं, बोटी आणि मोठी मोठी दगडं टाकून हे बेट बनवलंय. याच बेटावर 'अवर लेडी ऑफ रॉक्स' हे चर्च आहे. आख्यायिका आहे की या बेटाजवळच (सध्याच्या बेटाच्या जागी पूर्वी फक्त एक मोठा खडक होता) आश्चर्यकारकरीत्या मेरीचं एक चित्र सापडलं होतं. मेरीनं स्वतःच आपल्यासाठी जागा शोधली असा विश्वास ठेवून लोकांनी तिथंच तिचं चर्च उभारायचं ठरवलं आणि हे बेट निर्माण केलं. आतादेखील दर वर्षी जवळच्या पेरीस्त गावातले लोक ऑगस्टमधल्या एका ठरलेल्या दिवशी इथं येतात आणि बेटाच्या आजूबाजूनं अजून दगडं टाकतात जेणेकरून बेट तसंच रहावं. पेरीस्त गावातून या बेटावर जायला एकदम रीझनेबल दरात बोटी आहेत. १०-१५ मिनिटात बेटावर पोहोचता येतं. तिथले काही फोटो.

पेरीस्त गाव -

बेट -

चर्च - या चर्चमधे जगातल्या कुठल्याही चर्चपेक्षा जास्त मेरीच्या जीवनातील प्रसंग कोरलेल्या आणि भक्तांनी दान केलेल्या चांदीच्या पट्ट्या (सिल्व्हर प्लेट्स) आहेत.

या बेटाच्या जवळच अजून एक बेट आहे. एप्रिलमध्ये हे बेट पर्यटकांसाठी अजून बंद होते.

तिथून आम्ही बुड्वा आणि सेटिन्येकडे निघालो. तोवर बुड्वामधे पाउस चालू झाला होता त्यामुळं कुठं फारसं थांबता नाही आलं आणि फोटोही नाही काढता आले. तिथून आम्ही लगेचच चेटिन्येला गेलो. चेटिन्ये ही एकेकाळची (राजा निकोलाच्या (निकोलस) वेळी) माँटेनेग्रोची राजधानी. शरहातून वाहणार्‍या चेटिना नदीवरून चेटिन्ये हे नाव दिलंय. इथे एक छोटा राजवाडा अजूनही आहे. इथे एक सतराव्या शतकात बांधलेली ख्रिस्तीयन मोनास्ट्री आहे. ही मोनास्ट्री त्यावेळी सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र होती.

मोनास्ट्रीच्या आत फोटोग्राफीला परवानगी नाही.

तिथल्याच एका चर्चचे अवशेष -

तिथून परत येताना दिसणारं कोटोर -

परत येउपर्यंत अंधार झाला होता त्यात पाउस पडत होता आणि मुली कंटाळल्या होत्या त्यामुळं कोटोरमधलं काही विशेष बघता नाही आलं. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर निघून पोडगोरिचाहून परतीचं विमान पकडायचं होतं. जाता जाता परत एकदा स्वेती स्टेफान वरूनच जावं लागत होतं.

स्वेती स्टेफान - हे एक अति-श्रीमंतांचं (टॉम क्रूझ, पमेला अँडरसन, इतर हॉलिवूड स्टार्स, बर्‍याच देशांचे राजे, इ.) हॉलिडे डेस्टिनेशन आहे. दिवसाचं हॉटेलचं भाडं ३०० युरो ते २००० युरोपर्यंत जातं असं कळालं. आयुष्यात कधीतरी एक रात्र तरी इथं काढू अशी स्वप्नं बघत आम्ही तिथून ब्रसेल्सला परत आलो.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा पण भाग मस्त. मी लव्हेंडरची शेते असलेल्या बेटावर रिटायर होण्याचे नक्की केले आहे. चर्च फार आवडले.

धन्यवाद मंडळी..

एखाद्या परिकथेतील वाटते आहे सर्व >> माँटेनेग्रोमधले डोंगर आणि निसर्ग बघताना, लॉर्ड ऑफ द रिंग्ज किंवा हॅरी पॉटरची आठवण येत होती. Happy

चर्चचे अवशेष भलतेच टापटीप आहेत! वापरातलं चर्च वाटतंय ते... >> बरोबर. माझी थोडी तपशीलात चूक झाली Happy जुन्या मोनास्ट्रीच्या अवशेषांवर हे छोटेसे चर्च आहे. चर्च वापरात आहे.

मी लव्हेंडरची शेते असलेल्या बेटावर रिटायर होण्याचे नक्की केले आहे. >> १ नंबर Happy