बरा पडतो अरे, एकांत हा संवादण्यासाठी!

Submitted by profspd on 25 May, 2014 - 07:44

बरा पडतो अरे, एकांत हा संवादण्यासाठी!
विनाव्यत्यय स्वत:शी पारदर्शी बोलण्यासाठी!!

किती ओट्याभरण चालू, खुशामत आणि मनधरणी......
किती हे लोक धडपडतात निव्वळ गाजण्यासाठी!

तुला काळीज मी माझे नवे कोरे दिले आहे....
नव्याने बेत स्वप्नांतील अपुल्या आखण्यासाठी!

न सुटला सूर्य सुद्धा झुंडशाहीतून मेघांच्या....
ढगांची झुंड सूर्याला गिळे अंधारण्यासाठी!

निमित्तालाच ते आहेत अगदी टेकले आता....
जरासेही पुरे खुसपट तुला झिडकारण्यासाठी!

मला कळते कधी जिंकायचे, केव्हा हरायाचे....
कलेजा लागतो मोठा खुशीने हारण्यासाठी!

अता माझ्याच हृदयाची सफर दररोज मी करतो....
मला माझ्यातुनी खुडतो, मला विस्तारण्यासाठी!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगाचे कायदे पाळू, सुखाने हारण्यासाठी

- डॉक्टर कैलास गायकवाड

प्रोफेसर साहेब, तुम्ही हे बरे करत नाही आहात.

कृपया वेळीच आवरा हे प्रकार!

कधीतरी आमच्याही एखाद्या गझलेच्या जमीनीचा नंबर लागून आम्ही कृतकृत्य होतोय का बघूया Happy

बाकी , गझल आवडली आहेच

एकूणच प्रोफेश्वरांचे असे म्हणणे आहे,की इतकी चांगली जमिन,कवाफी असून सुद्धा तुम्हा लोकांना चांगली गझल लिहिता आली नाही. मी बघा कशी गझल केली असे त्यांना दाखवायचे आहे.

एक काम करा प्रोफेश्वर, भटसाहेबांच्या गझलांच्या जमिनी घ्या बरं. येवू द्या एक नवीन झंझावात .होवून जाउ दे एल्गार,तुमचा आगळा वेगळा रंग दाखवून आम्हाला रसपूर्ण मुजरा करायला भाग पाडा.

काव काव.

प्रश्न जमीनीचाच नाही आहे कावळा!

जमीन कोणालाही कितीही वेळा तश्शीच्या तश्शी सुचली असा दावा करता येईल व त्याला काऊंटर करता येणार नाही. तसेच, 'ह्यांच्या जमीनीत ह्यांच्यापेक्षा मीच अधिक सरस लिहितो' हे दाखवण्याचा आटापिटाही अनुल्लेखता येईल.

प्रश्न असा आहे की हे का केले जात आहे? तेही ध्यानात आणून दिल्यानंतरही सातत्याने का केले जात आहे? ही वृत्ती गझलेच्या विकासासाठी पोषक आहे का? (हे म्हणणारा मी कोण म्हणा, पण खरंच आहे का पोषक?)

आज एक प्राचार्यपदी राहिलेला ज्येष्ठ कवी असे करत आहे, उद्या फेसबूकसारख्या ठिकाणी कोणीही सोम्यागोम्या हे करेल (नियंत्रण नसणारच एह मान्यच). पण काही दिवसांनी मूळ गझल कोणाची हा प्रश्न उभा ठाकेल आणि नको ते वाद घडतील. आधीच काव्यचौर्य नावाचा एक धागा फेसबूकवर काढून एक गझलकार उत्साहाने चोर्‍या दाखवण्यात धन्यता मानत आहेतच. त्यांच्यासारख्यांच्या हाती हे आयतेच पडेल.

सर्वात महत्वाचा मुद्दा - हे एका वयाने, अनुभवाने, मानाने, व्यवसायाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तीला शोभते का? जेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या हिम्मतीवर रोज एक स्वतंत्र जमीनीतील गझल पाडू शकत असते तेव्हा? आणि तेही, ती व्यक्ती जेव्हा अनेकवेळा व प्रत्यक्ष गझलांमध्येही तिच्या व भटांच्या नातेसंबंधांचा उल्लेख करते तेव्हा?

ह्या कृतींचा निषेध!

आत्तापर्यंत ह्यांनी सहा गझलांचे असे केलेले आहे. ह्याच संकेतस्थळावर!

-'बेफिकीर'!