लग्न, संसार आणि त्यासंबंधित बदलते संदर्भ

Submitted by निवांत पाटील on 21 May, 2014 - 14:03

काल जवळपास ६ ते ६.३० तास एका तालुक्याच्या छोट्याशा पोलिस स्टेशन मध्ये कामानिमीत्त बसायचा प्रसंग आला. तेवढ्या वेळेत इतक्या अजब गोष्टी पहायला मिळाल्या कि त्या घडतानाच इथे टाकायचे डोक्यात आले. धाग्याचे नाव सुद्धा ठरवले. पती पत्नीतील बदलते नाते. पण त्याच नामसाधर्म्यातला धागा पाहुन तिकडेच टाकावे हा विचार आला पण तिकडे काय हे विषयानुरुप झाले नसते म्हणुन हा धागा. (नमन)

एकुण ४ प्रसंगः
पहिला. अगदी सकाळी सकाळी एक स्त्री लहान मुलीला काखेत घेउन आली. आणि ठाणे अंमलदार पाटी असलेल्या टेबलावर नुकतीच आलेल्या एका महिला पोलिसांकडे माझी नवर्‍याबद्दल तक्रार आहे ती लिहुन घ्या असे विनवु लागली. महिला पोलिसांनी तिला थोडे बसायला सांगितले आणि त्यांची आवरावर सुरु झाली, थोड्या वेळाने त तिचा पती आला. कडेवर असलेल्या मुलीला चुचकारु (एक्झॅक्टली) लागला पण ती लहान मुलगी लगेच रडु लागली. मग अंमलदार महिला पोलिसांनी ( एकवचन आदरार्थी) तिला बोलावले तसे अजुन ४-५ लोक लगेच तेथे आले. कदाचित ते बाहेर अंदाज घेत बसले असतील.

तीने लगेच बोलायला सुरवात केली. हा माझ्यावर प्रचंड संशय घेतो. मारहाण करतो. काल तलवार घेउन मारायला अंगावर आला होता. आम्ही मळ्यात रहातो. जाता येता कुणी पाणी प्यायला मागितले तर त्याचे आणि तुझे संबंध आहेत म्हणुन लगेच भांडण सुरु होते. तोपर्यंत नवर्‍याने बोलाय्ला सुरुवात केली. त्यासरशी अंमलदारांनी जी शिव्यांची लाखोली वाहली बापरे. सगळे परत शांत झाले तशी तिची सासु जी आत आली होती ती बोलु लागली. लगेच अंमल्दारांनी तीला झापले नवरा बायकोंच्या भांडणात तुम्ही पडु नका बाहेर जा म्हणुन सगळ्यांना बाहेर हाकलले.

आता या ५ मिनीटात सगळ्यांना काय चालु आहे याचा अंदाज आला होता आणि आता काय होणार याकडे (माझ्यासकट)सगळ्या ंचे लक्ष लागुन राहिले. पुढची पाच मिनिटे त्या बाईने तिच्यावर कसा अत्याचार होतो हे कथन केले.

मग अंमलदारांनी मोर्चा तिच्या नवर्‍याकडे वळवला. त्याने मुद्दा एका वाक्यात कव्हर केला. कि तिने माहेरुन एक लाल रंगाचे सिम आणले होते. ते सिम घरातल्या मोबाइल मध्ये घालुन ती कोणाशी तरी बोलायची. आणि हि गोष्ट लक्षात आल्यावर तिने ते सिम मोडुन टाकली. मग मला संशयास्पद वाटणार कि नाही?

यावर लगेच्ग त्या बाईने बोलायला सुरवात केली पण अंमलदारांनी तिला गप्प बसवले. आणि नवर्‍याला प्रश्न केला कि तुझ्याकडे मोबाइल आहे का? त्याने होय म्हटल्यावर पुढचा प्रश्न, तु त्यावरुन फोन करतोस का? हो. मग तुझी बायको तुला विचारते का कि तु कुणाशी काय बोलतोस ते? नाही. मग तुझी बायको कुणाशी काय बोलते ते तुला काय कराय्चे? ती जर तुझ्यावर संशय घेत नसेल तर तु कशाला तिच्यावर संशय घेतोस. आता तुम्ही घरी जा आणि व्यवस्थित रहा.

मग त्याची बायको परत बोलु लागली कि माहेरचा फोन घेउ देत नाही. आता भावाचे लग्न झाले पण पाठवुन दिले नाही. याची अगोदरची बायको सोडुन गेली आहे. तिला २ मुले आहेत आणि तिला देखिल हा असाच त्रास देत होता. लगेच नवर्‍याने त्याचा हुकमी एक्का टाकला. हिचा पहिला नवरा विष पिउन मेलाय आम्हाला फसवुन हे लग्न लावुन दिलेय.

आता पर्यंत माझे मत एकदा हिच्या पारड्यात तर कधी त्याच्या पारड्यात पडत होते, याक्षणी मात्र मी त्रयस्थ झालो. त्यानंतर पुरुष पोलिसांनी सुत्रे हाती घेतली . त्यांची वाक्ये काही इथे लिहु शकत नाही पण जाणकारांना अंदाज येइल. हळुहळु बाहेर काढलेले लोक आत येउ लागले आणि जमेल तसा रंग बघुन एखादे वाक्य टाकु लागले. दंगा वाढल्याने तिथुन त्या दोघांना बाहेर दुसर्‍या रुममध्ये घेउन गेले. मग एक एक जण आत येउन अंमलदार बाईंना माहितीची रसद पुरवु लागला. ज्याचे एकत्रित सार :

बायको काही कमी नाही, ती सासुला मारते. चावते. चावलेला व्रण देखिल दाखवला.
नवर्‍याला ५ तोळे सोने हवे. ३ तोल्याची चेन आणि २ तोळ्यांची अंगठी. पण मुलीची आई गवंड्याच्या हाताखाली कामाला जाते, ती कुठुन आणुन देइल? म्हणुन नवर्‍याची मारहाण. इत्यादी इत्यादी.... मुलीच्या माहेरची ४-५ मंडळी आणि मुलाकडची २ आपापसात भांडण कम चर्चा करीत होती.

थोड्या वेळाने ती बाई आली आणि तिने आग्रहच धरला कि कंप्लेंट लिहुन घ्या नाहितर आता घरी गेलो कि तो परत मारेल. पण तिला परत साहेब आल्यावर ये म्हणुन बाहेर बसवले.

(नवरा मेस्त्रीकाम करतो, बायको घरीच असते. बायकोची आई गवंड्याच्या हाताखाली कामाला जाते आणि हे लोक जिथे राहतात तेथुन मुख्य वस्ती जवळपास २ किमी अंतरावर आहे. दोघांचिही हि दुसरी लग्ने आहेत. त्याची बायको वेगळी रहाते २ मुलांना स्वतः वाढवते आणि तिचा नवरा मरण पावला आहे)

दुसरा:
तोपर्यंत दुसरी एक बाई जिचे तोंड पुर्ण सुजले होते ती येउन त्या अंमलदारांच्या जवळ रडु लागली. तिच्या नवर्‍याने तिला खुप मारले होते आणि ती कंप्लेंट द्यायला आली होती. हिची केस सुरु असताना मला फोटोकॉपीसाठी बाहेर जावे लागले त्यामुळे तिचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे समजलेच नाही. पण दुपारनंतर तिची केस लिहुन घेतली व तिला जायला सांगितले. तर ती बाहेर पडायला तयार नव्ह्ती. तुम्ही नवर्‍याला पकडुन आणा मग मी जातो असे तीचे मत होते. अंमलदारांनी तीला दवाखान्यात जायला सांगितले. पण तिच्याकडे पैसे नव्हते, ते देखिल द्यायची तयारी दाखवली. तरी ती बाहेर पडायला तयार नव्हती. शेवटी आज आमच्याकडे गाडी नाही आहे. उद्या सकाळी तुझ्या नवर्‍याला धरुन आणतो असे आश्वासन देउन तिला घालवले.

तिसरा:
वय साधारण २१ ते २२. अगदी नविन लग्न झालेली मुलगी आणि तिचे घरचे आले होते. प्रत्येक जण तिला समजुन सांगत होता कि हे सगळे व्यवस्थित होइल आम्ही सांगतो त्याला समजावुन. पण हिचे उत्तर एकच होते. मला त्याचे तोंडही पहायचे नाहिय. अगदी तिथल्या साहेबांच्या तोंडावर देखिल तीने हेच सांगितले कि मी नांदायला जाणार नाही काही झाले तरी. हि मुलगी यायच्या अगोदर मला त्याच कामासाठी बँकेत जावे लागले त्यामुळे तिचा नेमका प्रॉब्लेम समजला नाही.

चौथा: माझे काम अल्मोस्ट होत आले होते. एक म्हातारी बाई साधारणपणे ६० ते ६५ वयाची, एका महिला पोलिसांजवळ येउन आपले गार्‍हाणे मांडत होती. बहुतेक ती तीच्या ओळखिची वाटत होती. तीने सांगितले कि माझ्या नवर्‍याला आणि दिराला आत टाका नाहितर ती लोकं मला मारायची वाटचं बघत बसलेत. मग तिने एकदम हळुहळु तिला प्रॉब्लेम सांगितला. तो काही लक्षात आला नाही पण बहुतेक प्रॉपर्टीचा इश्यु असावा असे वाटले.

हे बघितल्यावर, जर एकाच दिवसांत एवढे लोक इथे येत असतील तर नेमका प्रॉबलेम काय असु शकतो? प्रत्येक केसमध्ये पोलिस समुपदेशकाची भुमिका (अगदी शिवराळ भाषा जरी वापरली तरी) घेत असल्याचे लक्षात आले. पण पहिल्या केसमधील बाईचे शब्द मन अस्वस्थ करुन गेले.
"मला जर त्याने मारुन टाकले तर कुणाला कळणार पण नाही"

मग आठवले ते पेपरला येणार्‍या घटना, हुंडाबळी , संशयावरुन हत्या, छळ, आणि आत्महत्या. आणि अजुन एक गोष्ट्, या बायकांच्यात होती धमक म्हणुन त्या तिथपर्यंत तरी पोहोच्ल्या पण ज्यांच्यात नसते धमक त्या, धमक असते पण समाजातील रुढी परंपरांनी बांधलेले असते त्या, अगदी घरात लहाण बहिन आहे तिचे लग्न जुळावे त्यात आपल्यामुळे प्रॉब्लेम येउ नये असे म्हणुन सहन करणार्‍या, अश्या किती स्त्रिया असतील?

Sad

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसताच विवाह नाही, पण त्या अनुषंगाने बदलणार्‍या किंवा नव्याने तयार होणार्‍या प्रत्येक नात्याला, समुपदेशनाची गरज आहे. नवरा बायको लाख प्रगल्भ असतील, घरी दिर्/जाऊ/नणंद्/आजेसासू/ आत्या असे अनेक प्रकार असतात जे बास असतात मनःस्वास्थ्य ढळवायला. सेम गोष्ट मुलालाही लागू पडते. फरक इतकाच की ज्या फ्रिक्वेन्सी ने त्याला त्याच्या सासरी डिल करावे लागते ती फ्रिक्वेन्सी फारच कमी असते.

हे झालं समुपदेशन, पण सेल्फ डिलिस्प्लिन, सेल्फ डेव्हलपमेन्ट, लर्निंग हे ही असलं पाहिजे.

"...पण सेल्फ डिलिस्प्लिन, सेल्फ डेव्हलपमेन्ट, लर्निंग हे ही असलं पाहिजे...."

~ हे शक्य आहे फक्त तिथे जिथे मेल फॅक्टर्सकडे किमान काही तरी सुशिक्षितपणा दिसून येत असला पाहिजे. पतीपत्नीच्या भांडणात मध्यस्थ म्हणून माझ्यासारखी किमान वय ज्येष्ठ असलेली व्यक्ती पडू पाहते तर नवर्‍याकडून "पाटीलसर, तुम्हाला यातील काही कळणार नाही....आमचे आम्ही बघून घेतो..." अशी मस्तवाल उत्तरे मिळाली आहेत तर ती बाब मुलीकडील लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न केला तर "तुम्ही नका लक्ष घालू....मुलगी समजून घेईल...एवढे काही नाही त्या भांडणात..." असली भलती उत्तरे स्वीकारली आहेत. म्हणजे माहेरच्या लोकांनाही नवर्‍याने आपल्या मुलीला मारले (कारण दुय्यम) यामध्ये काही विशेष वाटत नाही असेच दिसून आले.

मध्यस्थ मूर्ख ठरतो कित्येक प्रसंगी....तरीही राहावत नाही म्हणून अशा प्रसंगी भाग घेणे थांबविलेले नाही.

हे शक्य आहे फक्त तिथे जिथे मेल फॅक्टर्सकडे किमान काही तरी सुशिक्षितपणा दिसून येत असला पाहिजे<<<

अशोकराव, मला वाटते सुसंस्कृतपणा हा शब्द अधिक योग्य होईल Happy

हो....सुसंस्कृतपणा....मान्य. पण तो अंगी येण्यासाठी त्या कुटुंबाने सुशिक्षित असणेही तितकेच गरजेचे आहे. निदान माझ्यासारखा मध्यस्थ त्या कुटुंब प्रमुखाला, "अहो आनंदराव, बाहेर दरवाजावर नावासोबत डीग्रीही कोरून घेतली...त्याची तरी लाज बाळगा जरा..." असे ज्यावेळी बोलला, त्यावेळी ह्या प्रखर बोलण्याचा जाणवण्याइतपत परिणाम दिसून आला होता मला.

कौटुंबिक हिंसा सर्व थरात आढळते. शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य असले तरी हे घडते. स्त्रीयांच्याच बाबतीत घडते असे नाही तर पुरुषांच्या बाबतीतही घडते- प्रमाण कमी किंवा त्याबद्दल बोललेच जात नाही. भारतासारख्या ठिकाणी तर नात्यातील गुंतागुंत अशी की व्यक्ती एका नात्यात पिडीत असेल तर दुसर्‍या नात्यात पीडा देणारी. काही वेळा या सगळ्याला छुपा धार्मिक, सामाजिक पाठिंबाही असतो.
मुळात सशक्त नातेसंबंध म्हणजे काय? त्याची आवश्यकता/महत्व याचा विचारच केला जात नाही. कौटुबिक हिंसाचाराचे चक्र या ना त्या रुपात सुरुच राहाते. या सगळ्या प्रकारात किती ऊर्जा खर्च होते, प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे किती सामाजिक हानी होते याचा तर विचार मनाला शिवतही नाही. यासाठी समुपदेशन आणि कायदे या दोन्हींची गरज आहे. तसेच पिडीत व्यक्तीला आधाराची, पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करण्यासाठी संधीचीही गरज आहे.
समुपदेशनाची सुरुवात पौगंडावस्थेतील मुलामुलींपासून केल्यास दीर्घकालीन बदल घडवून आणणे शक्य आहे.

निवांत पाटील,

कुटुंबात बाई सत्तेच्या बदल्यात प्रेम मिळवू पाहते हे सरसकटीकरण आहेच. कुटुंबातली सत्ता ही बहुतांश पुरुषाच्या हाती असते. कुंकवाचा धनी हेच मुळी सत्तापद आहे.

या पार्श्वभूमीवर तुमचे हे विधान पाहूया.

>> मुळात बाई आणि पुरुष असा संदर्भ घेण्यापेक्षा 'एक व्यक्ती' म्हणुन संदर्भ घेतला तर चांगले होइल.

बाई आणि पुरूष वेगवेगळ्या कारणांसाठी लग्न करतात. त्यामुळे दोघांचा एक व्यक्ती म्हणून केलेला विचार साचेबद्ध ठरेल अशी भीती आहे.

तसेच हिंसाचार थांबवणे आणि प्रेमाने सहजीवन ही दोन वेगवेगळे उद्दिष्टे आहेत. पहिले विपरीत (अॅबनॉर्मल) टाळणारे आहे तर दुसरे यथोचिताचा आग्रह धरणारे आहे. पहिल्यासाठी स्त्रीचे जे सबलीकरण करावे लागणार आहे त्यापेक्षा दुसऱ्यासाठीचे सबलीकरण पार वेगळे आहे.

आ.न.,
-गा.पै.

Pages