उगवल्याबरोबर मावळलेला एक चित्रसूर्य

Submitted by रसप on 19 May, 2014 - 00:16

मला चित्रकलेतलं खूप ज्ञान आहे. शाळेत एक तास चित्रकलेचा असे. तेव्हा मी जिथे जिथे संधी मिळेल, तिथे तिथे माझ्या अगाध ज्ञानाची चुणूक आमच्या बाईंना दाखवत असे. प्रत्येक वेळेस बाई स्तिमित होत आणि कित्येकदा तर त्यांनी मला पाठीत शाबासकीही दिली. स्वत:ला माझ्याहून चांगले चित्रकार समजणारे काही मूर्ख मित्र त्या शाबासकीला धपाटा समजत आणि खोट्या आनंदात सुख मानत.

शाहजहानने ताज महाल बनवला आणि अशी दुसरी वास्तू निर्मिली जाऊच नये म्हणून सर्व कारागिरांचे हात छाटले, असं म्हणतात. आमच्या बाईंनाही असे अनेकदा माझी अप्रतिम सुंदर चित्रं पाहून वाटले असावे.
माझी काही चित्रं तर इतकी पुरोगामी व प्रसंगी बंडखोरीची प्रक्षोभकतेपर्यंतची पातळी गाठणारी असत की बाई ती चित्रं माझ्या चित्रकलेच्या वहीतून फाडून घेत. नंतर नंतर मला त्यांच्या ह्या सवयीची बरीच लागण झाली आणि मग मीच माझ्या वहीतली काही चित्रं फाडून ठेवायला लागलो. १०० पानांच्या आडव्या, लांबोडक्या चित्रकलेच्या वहीची काही दिवसांतच १५-२० पानंच उरलेली असायची. तुंबळ युद्ध करून पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणताना बहुतांश साथीदारांना गमावलेल्या सैनिकांप्रमाणे ती उरलेली शूरवीर पानं माझी लुळी वही मिरवत असे.

माझी चित्रं इतकी अभिनव असत की बरेचदा मला मीच काढलेलं चित्र काही दिवसांनी नेमकं कशाचं आहे, ह्यावर जरासा विचार करावा लागत असे. माझी जुनी चित्रं पुन्हा पाहताना मला नेहमीच नव्याने भेटत असत. पण ती कधीही निरर्थक नव्हती. त्यांचा अर्थ फक्त बदलत असे.

चित्रांत रंग भरण्याचीही माझी एक स्वत:ची शैली होती. माझे रंग अनेकदा पानाच्या मागल्या बाजूला किंवा मागच्या व पुढच्या पानावरही असत. रंगांना चित्र सोडून भरलेलं पाहून आमच्या बाईंना त्यांच्या घराच्या मोरीतल्या चिरक्या नळाची बादली सोडून धार मारण्याची सवय आठवत असे आणि त्यामुळे माझी चित्रं त्यांना नेहमीच वास्तवाचे भेदक व विदारक दर्शन करणारी वाटत असत.

शाबासक्या देऊन देऊन थकल्यानंतरच्या काळात माझी चित्रं पाहून त्यांना त्यांच्या भावनिक आवेगास महत्प्रयासाने रोखावे लागे. त्या चित्रांचे खोलवर आघात त्यांच्या मनावर होत असत व चित्रकलेच्या प्रत्येक तासानंतर स्टाफ रूममध्ये त्या काही काळ मख्ख चेहऱ्याने बसून राहत, हे मी स्वत: अनुभवलेलं आहे. कारण अश्या अत्यंत हेलावलेल्या मनस्थितीत त्यांनी मला अनेकदा स्टाफ रूममध्ये बोलावून प्रेमळ विनंत्या केल्या होत्या की अशी चित्रं नको काढत जाऊस. पण माझ्यातला तडफदार कलाकार माझ्या स्वत:च्याही रोखण्याने थांबणारा नव्हताच. बाईंनी कुठलेही चित्र काढायला सांगितले असले तरीही मी माझ्याच मनाचे प्रतिबिंब कागदावर उमटवत असे व प्रत्येक वेळी बाईंना भावनिक आवेगाचा धक्का सहन करावा लागत असे.

अश्यातच, चित्रकलेच्या एका राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत भाग घेण्याचा मी चंग बांधला आणि तसे बाईंना सांगितले. डोळे व मनाच्या पटलाला भेदून जाणाऱ्या माझ्या चित्रांमुळे होणारा सततचा भावनिक ताण सहन न झाल्याने व माझ्यातला लाव्ह्याप्रमाणे उसळून बाहेर येणारा बंडखोर चित्रकार बंदिस्त करणे केवळ अशक्यप्राय असल्याचे लक्षात आल्याने अखेरीस बाईंनी मुख्याध्यापकांना ह्याची कल्पना दिली. मुख्याध्यापकांनी माणुसकीच्या नात्याने अत्यंत समतोल भूमिका घेऊन, माझ्या आई-वडिलांना भेटण्यास बोलावून परिस्थितीची माहिती दिली व त्या स्पर्धेत भाग घेण्यापासून मला परावृत्त करण्यात आले.

माझी ही कुचंबणा मला अजिबात मान्य नव्हती. त्या निरागस वयात माझ्यावर घातलेलं ते जाचक बंधन मला झुगारायचं होतं, पण कोवळ्या वयातल्या नाजूक हातांत ते साखळदंड झुगारण्याची ताकद साहजिकच नव्हती. कालांतराने मी चित्रकलेपासून खूप दुरावलो. माझ्यातल्या त्या तडफदार कलाकाराचा माझ्या आतच मूक अंत झाला.

आज मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे की, जर त्या काळात मला असं जखडलं गेलं नसतं, तर अत्यंत लहान वयात क्रिकेटला नवा आयाम देणाऱ्या तेंडूलकरप्रमाणे, अत्यंत लहान वयात चित्रकलेला नवा आयाम देणाऱ्या पराडकरचं नावही मोठ्या सन्मानाने घेतलं गेलं असतं.

असो. एकेकाचं नशीब असतं.
Somebody's loss is somebody's gain, हेच खरं. आज मी ह्या क्षेत्रात नसल्याने इतर अनेकांना पुढे येण्याची संधी मिळत आहे, हीसुद्धा एक समाधानाचीच बाब आहे.

- रणजित पराडकर (रसप)
(एका पानावर उगवून दुसऱ्या पानावर मावळलेला एक प्रखर तेजस्वी चित्रसूर्य)
http://www.ranjeetparadkar.com/2014/05/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

सुंदर लिहिलेय रणजीत पण हसताहसताच अंतर्मुख झाले आहे. एका बाल-कलाकाराचा आत्मविश्वास संपवणाऱ्या या व्यवस्थेचा धिक्कार असो !

भारतीताई+१.
लेखात कोपरखळ्या चपखल बसल्या तरी कोवळ्या मनांत निरूत्साह भरणार्‍या व्यवस्थेचा बिमोड व्हायला हवा.

मस्त लेख !
( पण आधी मला एकाच दिवसात आपटलेल्या एखाद्या चित्रपटाचा रेव्ह्यू असेल असे वाटले होते. )

पण आधी मला एकाच दिवसात आपटलेल्या एखाद्या चित्रपटाचा रेव्ह्यू असेल असे वाटले होते >> Lol

प्रस्थापित चित्रपंडीतांना चित्रातील कला न कळल्याने चित्रकलेचे भले मोठे नुकसान झाले परंतूु लेखनाचे चांगलेच भावले.

छान लिहिले आहे.आपल्या ब-याच गुणांना फाटा द्यावा लागतो या व्यवस्थेत.

-माझ्यातला लाव्ह्याप्रमाणे उसळून बाहेर येणारा बंडखोर चित्रकार बंदिस्त करणे केवळ अशक्यप्राय असल्याचे लक्षात आल्याने अखेरीस बाईंनी मुख्याध्यापकांना ह्याची कल्पना दिली

( थोडे दिवस मनमोहन होवून रहायचे होते नंतर मोदींचा विजय नक्कीच होता कि).. Happy