केंद्रातील सत्तापालट

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2014 - 08:09

मोदी सरकार आलेले आहे. तळागाळात पोचलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहणार्‍या आणि प्रत्यक्षात सत्ता प्राप्त करू न शकणार्‍या भाजपला ह्यावेळी मतदारांनी सुस्पष्ट बहुमत प्रदान केलेले आहे.

ब्राह्मणांचा पक्ष, संघाच्या तत्वज्ञानावर चालणारा पक्ष, हिंदूत्ववादावर जिवंत राहू शकणारा पक्ष, जातीधर्मांंमधील तेढ वाढवण्यास जबाबदार असलेला पक्ष, राममंदिरासारखे नॉनइश्यूज पेटवत ठेवून त्यावर जिवंत राहणारा पक्ष अशी अनेक टीकात्मक बिरुदे मिरवणार्‍या भाजपला एकदाचे स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. हे बहुमत असे आहे की निव्वळ भाजप हा एक पक्षच सरकार स्थापन करू शकेल, करेल. सहकारी पक्षांची सरकार बनवण्यासाठी भाजपला आवश्यकता नसेल. १९८४ नंतर प्रथमच संसदेत एक स्पष्ट बहुमतात आलेल्या पक्षाचे स्थिर सरकार असेल. प्रदीर्घ इतिहास असलेला, गांधी नेहरुंच्या वैचारीक साच्यात घडलेला काँग्रेस पक्ष अभूतपूर्व पराभवाला सामोरा गेलेला आहे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आणि कित्येक दिग्गज नेत्यांनी भाजप ह्या पक्षाची धुरा आपापल्या कालावधीत समर्थपणे किंवा जमेल तशी वाहिली. त्यातल्यात्यात अडवानींची रथयात्रा एक प्रकारची नवसंजीवनी देणारी ठरली होती. नरेंद्र मोदींचे वैशिष्ट्य हे की ज्या ज्या आघाडीवर जे जे प्रयत्न करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न त्यांनी नेटाने केले. पैसा खर्च करणे, देशभर प्रचार करून देश ढवळून काढणे, सर्व प्रकारच्या माध्यमांंमधून प्रभावी प्रचार करणे हे उपाय कोणत्याही नेत्याने केलेच असते. किंबहुना हे उपाय काँग्रेसनेही केलेच. पण नरेंद्र मोदींचे वेगळेपण अनेक बाबींमध्ये जाणवले. स्वतःचे व्यक्तिमत्व पंतप्रधानपदासाठी बोलीवर लावण्याआधी मोदींनी गुजराथमध्ये अनेक गोष्टींचा कायापालट करून दाखवला. एखादी लाट यावी आणि ओसरून जावी असे आपल्या नावाचे होणार नाही ह्याची खबरदारी घेत त्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे स्वतःचेच मार्केटिंग केले. पक्षांतर्गत विरोध मोडून काढताना त्यांच्या जमेला गुजराथमधील विजयांची मालिका आणि इतर राज्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेली 'क्रेझ' या दोन गोष्टी असतील हे त्यांनी नक्की केले. पक्षाबाहेरील लोकांना भाजपतर्फे मोदी पुढे केले जातात की अडवानी ह्या गोष्टीशी आत्ताआत्तापर्यंत घेणेदेणेही नव्हते. पण अचानकच ही परिस्थिती पालटली. अचानक देशभरात मोदी हे नांव असे काही गाजू लागले की अडवानी हे नांव त्याच पक्षातील एका नेत्याचे आहे ह्यापलीकडे अडवानी ह्या नावाची जादूही राहिली नाही. प्रचाराची पातळी स्वतःच्या भाषणांमध्ये तरी घसरू न देता मोदींनी आत्मविश्वासाने व मिश्कील शैलीत भाषणे केली. त्यांची देहबोली गेले जवळपास तीन महिने एखाद्या जेत्यासारखीच होती. पण हे सगळे असूनही, भारतीय मतदाराने केवळ 'मोदींकडे पाहून' भाजपला मतदान केले आहे का?

तर तसे मानायला वाव नाही.

१. काँग्रेसकडे करिष्माई नेतृत्व नसणे! मनमोहन सिंगांना वलय नाही, सोनिया गांधींचे वक्तृत्व 'आपलेसे' वाटत नाही आणि राजीवजींची पत्नी असण्याची जादू फार पूर्वीच संपलेली असणे! राहुल गांधींची प्रतिमा एक अपरिपक्व युवक अशी तयार होणे! राहुल गांधींचे वक्तृत्वही प्रभावी नसणे! इतर सर्वच नेते वरिष्ठ असूनसुद्धा कधी ना कधी गांधी - नेहरू घराण्यासमोर झुकणारेच नेते असल्याचे जनमानसाला ज्ञात असल्याने त्यांनाही काही खास वलय प्राप्त न होणे! थोडक्यात, ह्या सत्तापालटामागे मोदींव्यतिरिक्त जी कारणे आहेत त्यातील पहिले कारण हेही आहे की काँग्रेसकडे तूल्यबळ नेतृत्वच नव्हते. कणाहीन पक्ष झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत होती.

२. काँग्रेसशी आतून किंवा बाहेरून हातमिळवणी करणार्‍या पक्षांची व्याप्ती त्यांच्यात्यांच्या राज्यापुरती मर्यादीत होती. त्याशिवाय ह्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा खालावलेलीही होती.

३. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये 'मोदींची जादू चालते' हे सामान्य मतदाराला समजलेले होते. ह्या व्यक्तीला केंद्रातील निवडणूकांमध्ये हात दिला, साथ दिली तर काहीतरी बदल घडेल असा विश्वास निर्माण झालेला होता.

४. गेल्या कित्येक वर्षात भाजपकडून प्रथमच फारशी भावनिक आवाहने नसलेला आणि विकासाबाबत मुद्दे असलेला प्रचार झाला. गुजराथ पॅटर्न म्हणजे काय ह्याच्या खोलात कितीजण गेले आणि किती नाही हा भाग वेगळा, पण असे काहीतरी असते आणि इतर देशाला ते मिळू शकत नाही आहे कारण सरकार भाजपचे नाही आहे अशी एक भावना निर्माण झाली.

५. सामान्य माणसाला काहीतरी नवे, ताजेतवाने समोर आले तर आकर्षक वाटते. नैसर्गीकरीत्याच त्याच त्याच नेत्यांना वर्षानुवर्षे निवडून देण्याऐवजी मोदी हा फ्रेश चेहरा पसंत केला गेला.

६. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असलेले देशाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या कारकीर्दीत ओलांडले गेलेले अनेक विकासाचे टप्पे, इतर अ‍ॅचिव्हमेंट्स ह्या गोष्टींचे मार्केटिंग त्या पदावरील नेत्याने स्वतः केल्यास ते अधिक शोभून दिसते. राहुल गांधी हे 'घराण्यातील व्यक्तिमत्व' एक्झिक्युटिव्ह पॉवर्स नसतानाही काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीवर भाषणे ठोकत असताना मनमोहनसिंगांचा मुखदुर्बळपणा अदृष्यपणे नकारात्मक प्रभाव टाकत राहिला. त्यातच मेड इन कानपूर, मेड इन मिर्झापूर अशी सवंग व स्वस्त विधाने करून राहुल गांधींनी काही प्रमाणात स्वतःचे हसेही करून घेतले.

७. 'आपण काही ह्यावेळेस जिंकत नाही' ही भावना अनेक काँग्रेसी नेत्यांच्या देहबोलीत जणू आधीपासूनच ठासून भरल्यासारखी आली होती. परिणामतः अनेक काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून जनतेचे मनही दुखावले. सुशीलकुमार, मुलायम सिंग, अजितदादा ही अशीच काही उदाहरणे! जनमानसाची नाडी सापडल्यानंतरही तुम्ही त्यांना बरे वाटेल असे बोलला नाहीत तर काय होते ते ह्या निवडणूकीत सगळ्यांना समजले.

८. तांत्रिक विकास, परकीय गंगाजळी, इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ ह्या तीनही गोष्टींचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतोच. 'जे आहे ते काही बरोबर नाही, ह्यापेक्षा अधिक चांगले असू शकते' ही नैसर्गीक मानवी मनातील इच्छा अनेकदा बदल घडवून आणण्यास माणसाला प्रवृत्त करते. ह्याला अनुसरून लोकांनी बदल घडवण्यासाठीही मते दिली. प्रत्यक्षात भारतात जो काही विकास झाला व जो झाला असता पण झाला नाही ते सर्व काही काँग्रेसच्या कारकीर्दीत प्रामुख्याने झालेले आहे. बहुमत मिळाल्यामुळे भाजप पाच वर्षात काही जादू करून दाखवेल हा भ्रम आहे. खरे तर प्रशासनात असल्याची सवय नसलेल्या त्यांच्या कित्येक नेत्यांना नवलाई संपेपर्यंत गोष्टींवर नियंत्रण तरी आणता येईल की नाही असेच वाटत आहे.

९. दलित समाज, मुस्लिम समाज हे काँग्रेसपासून नेमके का दूर गेले (आणि खरंच दूर गेले का) ह्याबाबत मला काहीच समजत नाही आहे. पण असे मानायला वाव आहे की बहुधा ही मतेही काँग्रेसला मिळाली नाहीत.

१०. आम आदमी सारख्या पक्षांना प्रत्यक्षात ह्या निवडणूकीतून काहीच मिळाले नसेल, पण मतदानपूर्व काळात असलेले त्यांचे प्रचारातील अस्तित्व मात्र भल्याभल्यांची झोप घालवणारे होते. ते कोणाची मते खाणार, किती जागा मिळवणार हे प्रश्न डोक्याला भ्यंगा लावत असावेत अनेकांच्या! बरं तडजोडी करण्याइतकी त्यांची पात्रता तरी असेल की नाही आणि असल्यास ते तडजोडी करतील की नाही हेही सांगता येत नव्हते. नेमका आपच्या नेत्यांनी प्रचारही मोदींविरोधात प्रामुख्याने केला. आपोआपच त्यामुळे काँग्रेस आणि आप आतून सामील आहेत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सरकारात केजरीवालांनी घडवून आणलेले विनोदी 'पथनाट्य' आठवल्यामुळे बहुधा जनतेने ह्यावेळी त्यांना नाकारले.

११. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसे सिंधूदूर्गमध्ये राणेंना स्थानिक राकाँ वाल्यांकडून विरोध झाला तसाच तो अनेक नेत्यांना देशभरात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतर्गत सत्तापिपासा, मत्सर, कारस्थाने ह्यांनी काँग्रेस व मित्रपक्ष पोखरले असावेत असे सतत 'वाटत' राहिले खरे!

१२. मोदींनी वैयक्तीक व पक्षाचा प्रचार हा एखाद्या बिझिनेस मॉडेलप्रमाणे केला. सर्व माध्यमे, सर्व संभव प्रचारअस्त्रे त्यांनी नियोजनबद्ध रीतीने राबवली.

१३. प्रचाराची नवीन तंत्रे 'अविरत असंतुष्ट असलेल्या' तरुण पिढीला भावली. ही पिढी बाहेर पडली. मतदानाचा टक्का वाढला. हे वय असे असते की जे असते ते लाथाडावेसे वाटते व जे नसते तेच हवेसे वाटते. भाजपने भारताचा तरुण मतदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले.

१४. व्यावसायिक प्रचारतंत्राचा भाग म्हणा किंवा काही इतर, पण क्षणभरही भाजपने 'स्वतःचे काय होणार ह्याबाबत स्वतःच गोंधळलेले आहोत' हे कोणालाही भासवू दिले नाही. सातत्याने जेत्याच्या आवेशात वावरण्याचा परिणाम जनमानसावर निश्चित झालेला असणार!

एकुण काय तर सत्तापालट झालेला आहे. पण तूर्त तरी फक्त भाजप नेते, समर्थक, त्यांचे मतदार ह्या लोकांना एक वैयक्तीक आनंदच झाल्यासारखा दिसत आहे. हा आनंद फक्त एखाद्या सूड घेतल्यानंतरच्या आनंदाशी तुलना करण्याजोगाच आहे. सत्तेत आल्यावर काय काय करू शकणार हे इतक्यात कळणे शक्यच नाही.

कित्येक ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही असे दिसत आहे. सुशीलकुमारांसारखे दिग्गज स्वतःच्या बालेकिल्ल्यात कोसळलेले आहेत. सोनिया व राहुल ह्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पण हे सगळे बघताना मनात येते की जो पक्ष गेली सव्वाशे वर्ष भारताच्या कणाकणात स्थान मिळवून होता, ज्याला गांधींसारख्यांचा परीसस्पर्श झालेला होता तो असा कस्पटासमान फेकला कसा काय गेला? ह्याला मोदी लाट म्हणणे हा मतदारराजाचा अपमान ठरेल. मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान केलेले आहे. फक्त मोदी हवेत म्हणून नव्हे, फक्त काँग्रेस नको म्हणून नव्हे, फक्त बदल हवा म्हणून नव्हे तर सुजाणपणे, नेत्यांची बेताल वर्तने व भ्रष्टाचार ह्यांचा सूड घेण्यासाठी, आपल्या हातात असलेला मतदानाचा हक्क बजावून आपले सामर्थ्य दाखवून देण्यासाठी मतदान केले गेलेले आहे. तीन दशकांनी आपल्यासारख्याच कोट्यावधी लोकांनी एक स्थिर सरकार पुन्हा आणलेले आहे. बहुतेक आता पाच वर्षे त्रिशंकू सरकारचे भय वाटू नये. मोदी लाट, मोदी लाट असे म्हणून सूज्ञ मतदारांचे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये.

मात्र भाजपपुढे अनेक आव्हाने आहेत. काँग्रेसपुढे एकच आव्हान आहे. पुन्हा नव्याने बस्तान बसवणे!

सत्तापालटाची कारणमीमांसा, तुमची काही खास मते, माझ्या लेखनात काही तृटी असल्यास त्या, ह्या सर्वांवर अवश्य मनमोकळेपणे लिहावे अशी सर्वांना विनंती!

बाकी ह्या सत्तापालटामुळे परराष्ट्रांच्या मनात काय काय आले असेल ह्यावरतीही येथील तज्ञांनी आपली मते मांडावीत अशी विनंती!

धन्यवाद!

जय लोकशाही!

======================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी,

अतिशय समतोल लेख !!

भारतासारख्या मोठ्या देशात ईतक्या राज्यात क्लिन स्वीप करण्यात बिजेपी पक्ष यशस्वी झालेला आहे यातच सर्व
काही आलेल आहे.

आता येण्यार्या काळात खुप काही आव्हाने पक्षा समोर आहेत.

सरकार समोरील गहन प्रश्न, त्यांना देण्यात येणारी प्राथमिकता ते अगदी वेगवेगळ्या मंत्रालयासाठी येणार्या बिजेपी
सरकारासाठी योग्य मंत्री निवडण्यापर्यंत.

ण हे सगळे बघताना मनात येते की जो पक्ष गेली सव्वाशे वर्ष भारताच्या कणाकणात स्थान मिळवून होता, ज्याला गांधींसारख्यांचा परीसस्पर्श झालेला होता तो असा कस्पटासमान फेकला कसा काय गेला? ह्याला मोदी लाट म्हणणे हा मतदारराजाचा अपमान ठरेल. >>>
पहिली गोष्ट सध्याचा कोंग्रेस पक्ष हा जुना कोंग्रेस पक्ष नव्हे. तो केंव्हाच संपला जेंव्हा कोंग्रेस(आय) आला. तेंव्हा १२५ वर्षांची परंपरा वगैरे सोडून द्या. ह्याच भावनिक गोष्टींमुळे सध्याच्या कोंग्रेसला जे पूर्वी फटके बसायला हवे होते ते मिळाले नाहीत. तेंव्हा पुन्हा भावनिक आसवे कशाला गाळायची? हेच भाजपचे झाले असते तर तमाम सेक्युलरवादी जळी स्थळी कष्टी पाषाणी जावून असाच वयक्तिक आनंद वक्त केला असता. तेंव्हा हे फक्त भाजपच करतो आहे आणि बाकीचे करत नाहीत हेच चुकीचे आहे.

दुसरी गोष्टी प्रत्येक नायक हा विशिष्ठ परिस्थितींच येतो. त्याला लाटच म्हणतात. उगाच कशाला नाकारायचे? त्याने काय मिळते?

हे दुसरीकडॅ टाइप केले होते पण इथेही अनुसरुन वाटतेयः
ज्या उमेदवारांना आपल्या निवडुन येण्याबद्दल असणार्‍या तीव्र विरोधाची जाणिव होती त्यांनी ही निवडणुक खुपच गांभिर्याने घेतली. उदा. कोल्हापुर. मोदींचा करिष्मा अगदी मिरजेत सुद्धा चालला. पण दुर्दैवाने ज्या उमेदवारांनी मला कोण पाड्तय अशी भुमिका घेतली ते अक्षरशः भुइसपाट झाले. राजु शेट्टी निवडुन येणार हे अगदी ६ महिण्यापासुन सगळ्यांना माहित होते पण तरीही प्रचारात त्यांनी अक्षरशः झोकुन देवुन जीवाचे रान केले.
कोल्हापुरात महाडिकांना होणारा विरोध त्यांना स्वतःला माहित होता. त्यांनी कोणतीही गोष्ट गृहित न धरता प्रचाराचे रान उठवले. त्याचे फळ या दोघांनाही मिळाले. अशोक चव्हांनाना देखिल तिकिट अगदी निसटता निसटता मिळाले. आणि त्यांना हे नक्कि माहित होते कि हीच त्यांची पुर्न्वसनाची शेवटची वेळ आहे,

बाकि सगळ्यांनी बर्‍याच गोष्टी गृहित धरल्या. त्याचे तसे फळ त्यांना मिळाले.

अगदी मोदींनी ( स्वतः) प्रचारासाठी जेवढी मेहनत घेतली ती इतर कोणिही घेतलेली दिसली नाही. प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबुन होता. आमदार आपलाच आहे. इथे आपल्याला एवढे मताधिक्य आहेच. इन्फॅक्ट तेवढे मताधिक्य देणे ही त्याचीच जबाबदारी आहे या अपेक्षेत लोक राहिले. नाहि आले मताधिक्य तर त्याला जबाबदार धरु. स्मित

कोल्हापुरचा निकाल हा खरोखर एक रोल मॉडेल ठरला आहे कि अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये कसे निवडुन येता येउ शकते. सगळीकडे कमळ फुलले असताना स्थानिक २ आमदार महायुतीचे असताना देखिल घड्याळाला खासदारकि मिळते. ऑल क्रेडिट गोज टु प्रॉपर प्लॅनिंग अँड हॅविन थ्रेट ऑफ डीफिट.

बाकि हरले त्यांचे क्रेडीट गोज टु लॅक ऑफ प्लॅनिंग अँड अंडरैस्टीमेशन ऑफ द / फॉर पिपल. Happy

शेवटी हर कदम कुछ सिख मिलही जाती है Wink

बेफिकीरजी, छान , वस्तुनिष्ठ विश्लेषण !
<< पण हे सगळे असूनही, भारतीय मतदाराने केवळ 'मोदींकडे पाहून' भाजपला मतदान केले आहे का?>> याबाबत दोन मुद्दे -
१]चॅनेल्सवर अखंड चाललेल्या कालच्या चर्चेत एक महत्वाचा मुद्दा भावला - मोदींच्या सर्व प्रचारकार्यात त्यांच्याबरोबर एक प्रेरीत व व्यावसायिक "टीम" अविरतपणे काम करत असल्याचं जाणवत होतं तर काँग्रेसचा प्रचार हा अतिशय विस्कळीत व असंघटीत वाटत होता. यातून त्यांच्या नकळत कां होईना पण लोकांपर्यंत 'गूड गव्हर्नन्स'चा संदेश पोचला असावा ;
२] भ्रष्टाचार व निर्णयक्षमतेचा अभाव याला काँग्रेसइतकीच नोकरशाहीही जबाबदार आहे ही खदखदखदती जाणीव देशात नि:संशयपणे अगदीं तळागाळापर्यंत पोचली आहे. नोकरशाहीवर अंकुश ठेवण्याची धमक असलेला नेता, ही गुजरातमधे झालेली मोदींची प्रतिमाही लोकाना भावली असण्याची व या निवडणूकीत परिणामकारक ठरली असाण्याची दाट शक्यता मला तरी जाणवते.

कालच्या मोदी त्सुनामीनंतर आज वातावरण नित्यनेमाने चालू झाल्यावर श्री.बेफिकीर यांचा हा अभ्यासपूर्ण लेख शांतपणे वाचला.

कालच्या अभूतपूर्ण म्हटल्या गेलेल्या विजयानंतर श्री.नरेन्द्र मोदी यानी अहमदाबाद येथे केलेल्या कृतज्ञतापूर्वक भाषणातील सर्वात उल्लेखनीय बाब कुठली असेल तर जातीधर्माला या विजय घटकामध्ये मतदारांनी आणले नसल्याबद्दल व्यक्त केलेला आनंद. आजच्या युवकाला...जो आजही कॉलेजचा विद्यार्थी आहे....ना संघ तत्त्वज्ञानाशी काही सोयरसुतक असेल असे वाटत नाही (हे माझे मत झाले आहे काहीशा भटकंतीनंतर) ना जातीच्या डाव्याउजव्या देण्याघेण्याशी. दलित आणि अन्य मागासवर्गीयांनी कमळापेक्षाही मोदी घटक प्रमुख आणि आपला मानल्याचे दिसले आहे आणि हा सारा करिष्मा आहे तो नरेन्द्र मोदी यांच्या शून्यातून पंतप्रधान पदापर्यंतच्या प्रवासाचा. घराण्याची कोणतीही लखलखीत अशी पूर्वपरंपरा पाठीशी नसताना तुमच्याआमच्यासारखा एक मुलगा जगण्यासाठी बाहेर पडतो आणि अंगी असलेल्या गुणांचा विकास करत करत अ ते ज्ञ चा अभ्यास करून अथक प्रयत्नाने कुठपर्यंत पोचू शकतो याची जादू सव्वाशे कोटी जनतेवर पडते त्या मागे ब्राह्मणांचा पक्ष, संघाच्या तत्वज्ञानावर चालणारा पक्ष, हिंदूत्ववादावर जिवंत राहू शकणारा पक्ष, जातीधर्मांमधील तेढ वाढवण्यास जबाबदार असलेला पक्ष....पैकी एकही गोष्ट मतदानाचे बटण दाबताना मनी आलेली नाही हे या केन्द्रातील सत्तापालटाचे इंगीत होय.

सत्तापालट झाल्याचे जनतेने स्वागत केले आहे. आता कुणीही सूडाची भाषा करणे गैर. खुद्द मोदी यानीही कालच्या आपल्या भाषणात हाच मुद्दा छेडला. ते म्हणाले काल तुम्ही एक निर्णय दिला आहे माझ्या बाजूने पण तो झाला म्हणून जे पराभूत झाले आहेत त्यांच्याबाबतीत मनी काही ठेवू नका. ते देखील देशकल्याणासाठी आपल्यासोबत आहेतच.....देशाच्या प्रगतीची काळजी करायची असेल तर काम करावे लागेल....ते करण्यासाठीच आपण आहोत.

"मोदी लाट" हे एक फसवे निरीक्षण आहे. मतदारांनी अत्यंत सुज्ञपणे नरेन्द्र मोदी आणि त्यांच्या साथीदारांना निवडून दिले आहे....काही अपेक्षा मनी ठेवून...त्या पूर्ण करण्याचे बळ मोदी याना नक्की लाभेल.

जनतेशी सुसंवाद साधताना केवळ आपले आश्वासक हास्य पुरेसे ठरणार नाही याची नक्की जाणीव मोदीना असल्याने सर्वप्रथम "गुजराथ" ला राजकारणातील रोल मॉडेल त्यानी बनविले....तेही मुख्यमंत्री या नात्यापेक्षाही त्या राज्याचे ते "सी.ई.ओ." बनले आणि शासकीय कर्मचार्‍यांच्या बरोबरीने दौर्‍यात वेळ न घालविता आपणही कार्यालयात हजर राहून प्रशासनाला जी सकारात्मक गती आणली ती राज्याच्या प्रगतीला पुढे नेणारी सिद्ध झाली. लोकसभा निवडणूक मतदारांनी हाही घटक आपलासा केला आहे. नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर भाषणे करून देशाला प्रगतीपथावर नेण्याची गोष्ट करणे आणि पंतप्रधान कार्यालयात कामाच्या फाईल्सना गती देणे या बाबी वेगळ्या आहेत. एक सीईओच हे करू शकेल.

महाराष्ट्रात मगरुर मस्तवाल व फक्त एका विशीष्ठ जातीचं राजकारण करणार्या व दलित ओबिसि ब्राह्मण जैन यांना सत्तेपासुन लांब ठेवणार्या दादा बाबा तात्या आप्पा टप्पा या गुढघ्यात मेंदू असणार्या पांढर्या हत्तींना जनतेने घरचा रस्ता दाखवला हि विशेष गोष्ट.

अजुनही मोदींची लाट नव्हती असच लोक म्हणताहेत हे पाहुन आश्चर्य वाटते.

मोदींनी देशाला विकासाच्या वाटेवर नेण्याचा भरोसा दिला आणि त्या भरोश्याला भारतीय जनतेने भरभरुन
साथ दिली. कधी नव्हे तो लोक मत टाकायला घराबाहेर पडले. तरुण वर्गाला ही मोदींनी साद घातली.

मोदीलाटेमुळे बिहारचे नितीश सरकार पडले! आजच्या मटातील लेख .....
http://maharashtratimes.indiatimes.com/

नाही म्हणायला केजरीवालने मोदींना थोडावेळ चॅलेंज केल होत. पण त्यावेळीही मोदीं कडुन केजरीवालवर
पलटवार झाला नाही. केजरीवालने मोदींवर किती आरोप केले हे सर्वांना आठ्वत असेलच.

आआपने संपुर्ण भारतभर एका वर्षाच्या आत अनेक मान्यवर उमेदवार लोकसभेसाठी उभे करुन ,
फक्त भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्याची स्वप्ने दाखवुन भुलवण्याचा प्रयत्न केला. शेवटी काय झाल, चार उमेदवार फक्त निवडुन आले.

>>अजुनही मोदींची लाट नव्हती असच लोक म्हणताहेत हे पाहुन आश्चर्य वाटते. <<

नि:संशय मोदि लाट. आता जाणकारांनी अडवाणींसारखं विश्लेषण करुन काहि वेगळा शोध लावला असेल तर वाचण्यास उत्सुक... Happy

<< अजुनही मोदींची लाट नव्हती असच लोक म्हणताहेत हे पाहुन आश्चर्य वाटते. >> " इंदिरा लाट", "मोदींची लाट" इ. शब्दप्रयोग ऐकायला बरे वाटले तरी ते खूपच संदिग्ध असतात असं मला वाटतं. आतांच्या संदर्भात, केवळ "मोदींची लाट" म्हणून थांबून मोदींच्या व्यक्तिमत्वाचे/ प्रतिमेचे कोणते पैलू, त्यानी जाहीर केलेल्या धोरणांतील नेमका कोणता भाग देशातील सर्व स्तरातील लोकाना नेमका आत्तां कां भावला याचा वेध न घेणं भाबडेपणा नाहीं का होणार ? आणि, असा विचार व अशी चर्चा करणं म्हणजे मोदींच्या प्रभावापुढे किंवा त्यांच्या कर्तृत्वापुढे प्रश्नचिन्हच उभं करणं असा त्याचा अर्थ काढणं खरंच उचित आहे का ?

मोदिंची लाट, तरंग, सुनामी - काय वाट्टेल तो शब्द सोयीनुसार निवडा. या संदर्भात मला आलेल्या लिंकमधील हा एक उतारा...

>> या लोकप्रियतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. गेल्या दहा बारा वर्षात नरेंद्र मोदी या माणसाविषयी माध्यमातून लोकांसमोर मांडलेली प्रतिमा अत्यंत क्रुर व नालायक अशीच आहे. ती खरी असेल तर लोकांमध्ये मोदीविषयक अत्यंत कटूता व प्रतिकुल मत असायला हवे. पण गेल्या दोनतीन वर्षात क्रमाक्रमाने जितके मोदींच्या विरोधात बोलले व लिहिले जाते आहे; त्याची उलटीच प्रतिक्रिया उमटते आहे. गुजरातबाहेर अजून कुठलेही कार्य वा कर्तृत्व गाजवलेले नसून देखिल देशाच्या अन्य भागात मोदीविषयक आकर्षण वाढतच चालले आहे. अशावेळी आपल्या मताशी व विश्लेषणाशी सुसंगत मतचाचण्यांचे निष्कर्ष येत नसतील; तर मग आपले विश्लेषण व त्याचे निकष जाणकारांनी नव्याने तपासून बघण्याची गरज असते. पण सत्य तपासण्यापेक्षा आपल्याच गृहीत व समजुतींना चिकटून बसले; मग विरोधाभास अपरिहार्य असतो. मोदींच्या बाबतीत बहुतांश माध्यमे, पत्रकार व अभ्यासकांची तीच दुविधा होऊन गेली आह". <<

लेख भाऊ तोरसकरांचा गेल्या वर्षीचा आहे; हि त्याची ओरिजिनल लिंकः http://bhautorsekar.blogspot.in/2013/05/blog-post_28.html

मोदी यान्च्या सरकारला शुभेच्छा...

निवडणुकीत मनसे, आप, बसपा, सपा, कॉन्ग्रेस, जनता दल सर्वान्चे पानिपत झाले...

लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष असायला हवा असतो. तो तसा नसणे हे चिन्ताजनक आहे असे वाटते. अनेक राज्यात भाजपाला भरभरुन विजयी केले आहे गुजराथ, म प्र, उ प्र, महाराष्ट्र, हिमाचल, बिहार, उत्तरान्चल, छत्तिसगढ येथे विरोधाला स्थानही नसणे आश्चर्य वाटते.

मावळते पन्तप्रधान डॉ. मनमोहन सिन्ग यान्नी देशाचे पन्तप्रधान म्हणुन गेली दहा वर्षे दिलेल्या महान योगदाना बद्दल त्यान्चे शतश: धन्यवाद.

मोदी याना भावी कार्यासाठी शुभेच्छा... Happy

लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष असायला हवा असतो. तो तसा नसणे हे चिन्ताजनक आहे असे वाटते<<<

खरेच की, हा एक मुद्दा मिस झाला माझ्याकडून! धन्यवाद उदय! Happy

<< लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष असायला हवा असतो. तो तसा नसणे हे चिन्ताजनक आहे असे वाटते >> म्हणूनच मला तरी कोणत्याही मोठ्या लाटेपेक्षां मर्यादाशील अशी नियमित भरति -ओहोटी लोकशाहीसाठी अधिक आश्वासक वाटते. मोठ्या लाटेचं त्रांगडं असं असत कीं , कुणी सांगावं, आज नेस्तनाबूद झालेली काँग्रेस उद्यां त्याचमुळें 'सहानुभूतिच्या लाटे'वर स्वार होवून येत्या विधानसभा निवडणूका जिंकूनही जाईल !

राहुल गांधी राजकीय दृष्ट्या रिटार्ड आहे हे पुन्हा एकदा सिध्दं झालं. त्याचबरोबर 'आपटार्ड' झालेल्या लोकांचं विमान जमिनीवर आलं !
...
आणि काँग्रेसचं तर काय.... दहावं झालंच आहे.. तेरावं कोण घालणार ते बघायचं !

लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष असायला हवा असतो. तो तसा नसणे हे चिन्ताजनक आहे असे वाटते<<<

विरोधि पक्षा कडे २०० हुन अधिक जागा आहेत.१९८४ मध्ये त्याहुन कमी जागा होत्या. तरी देखिल १९८९ मध्ये ( साडे चार वर्षानी ) ११४ विरोधी लोकानी लोक्सभेचा राजिनामा देउन राजिव गांधी सरकारला राजिनामा देण्यास भाग पाडले होते. They still have power if united.If government does something wrong they will get united. it happened in 1989.

मोदी ईफेक्टः---

मोदी सरकार बनणाच्या तयारीत असतानाच आता पर्यंत भारतात १ लाख कोटी रुपयांचा विदेशी गुंतवणूक
आल्याच कळत, झी टीव्ही

काल मुला़खती दरम्यान नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे की "हे येणारे सरकार मनमोहन सिंग यांचे नाही. आता सरकार बदललेले आहे"

एका वृत्तवाहिनीवरील 'डिबेट'मध्ये गडकरी आणि पाकिस्तानातील सुरक्षा विश्लेषक तारिक पीरजादा यांच्यात ही चर्चा झाली. पीरजादा चर्चेदरम्यान 'आमच्याकडे न्यूक्लीअर वेपन्स आहेत', असे गडकरींना म्हणाले. गडकरींनी पाकिस्तानला इतिहासाची आठवण करून देत त्यांच्या भूमिकेवर सुनावले. 'पाकिस्तानसोबत आम्हाला शांतता हवी पण, कुरापत केल्यास त्याचे सडेतोड उत्तर देण्यात येईल. हे मनमोहनसिंह यांचे सरकार नाही! पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदत बंद करावी, अन्यथा त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल', असा गर्भित इशारा गडकरी यांनी चर्चेदरम्यान दिला.

बेफिकीर,

लेख उत्तम आहे यात वादच नाही. मोदींची लाट असं म्हणून सुज्ञ मतदाराचं श्रेय हिरावून घेऊ नये हेही मान्य. पूर्वीच्या लाटा (१९७१,१९८०, १९८४) भावनिक होत्या, तर मोदींची लाट सर्वस्वी वेगळी आहे. तिच्यागील शक्ती १९७७ च्या जनता लाटेसारखी आहे. मात्र यावेळी कडबोळे नसून एक ठाम नायक उभा आहे.

एक विधान जरा विस्तृतपणे तपासावंसं वाटलं.

>> पण हे सगळे बघताना मनात येते की जो पक्ष गेली सव्वाशे वर्ष भारताच्या कणाकणात स्थान मिळवून होता,
>> ज्याला गांधींसारख्यांचा परीसस्पर्श झालेला होता तो असा कस्पटासमान फेकला कसा काय गेला?

इथे गांधींसारखे म्हणजे नक्की कोण? खुद्द गांधी काँग्रेसचे सभासद कधीच नव्हते. तसेच १९४६ साली 'सत्तेची चटक लागल्याने कसे अध:पतन होते हे मला दिसले आहे' असे उद्गार काढले. म्हणूनच की काय, स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी या मताचे ते होते. तसेही पाहता गांधीच्या वेळची काँग्रेस वेगळी आणि आत्ताची वेगळी आहे (सलिल्_गुमास्ते यांनी वर म्हंटल्याप्रमाणे).

आ.न.,
-गा.पै.

काल मुला़खती दरम्यान नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे की "हे येणारे सरकार मनमोहन सिंग यांचे नाही. आता सरकार बदललेले आहे"
----- असे विधान गडकरीन्नी केले ? तसे असेल तर ते अत्यन्त अपरिपक्व आणि बेजबाबदार आहे.
सर्व आघाड्यावर एकाच वेळी तुम्हाला कामे करता येणार नाहीत... देशाच्या विकासावर लक्ष केन्द्रीत करायचे असेल तर पाकसोबत स्वत: ला गुन्तवणे मुर्खपणाचे ठरेल. प्रत्येक वेळी बरोबरी पाकशी करु नका... त्यान्च्यापासुन वेगळे रहा, ठेवा... त्यान्च्या कडे गमावण्यासारखे खुप नाही आहे.

पाक कुरापती काढतच रहाणार, त्याला उत्तर द्यायला सक्षम यन्त्रणा अस्तित्वात आहे. मोदी सरकार आले आहे हे जग बघतेच आहे. मुलाखती द्वारे पाकला उत्तरे देणे किवा धमकावणे यातुन काय साध्य होणार आहे?... आपल्या बेताल वक्तव्याने अतिरेकी भरतीला उधाण येणार नाही हे पण पहायला हवे... शेवटी सैनिकान्ना लढायला लागते....

युद्धाची भाषा करणार्‍या राजकीय नेत्यान्ची (मग ते कुठल्याही पक्षाचे असतील) किती मुले/ मुली/ रक्ताचे नातेवाईक सैन्यात आहेत?
तुम्ही बेताल मुर्खासारखे वक्तव्य जेव्हा करतात त्या वक्तव्यामुळे १०० नवे अतिरेकी भरती होण्यास मदत होते... शेवटी साफसफाईची कामे सैनिकान्नाच करावी लागतात.

भाजपाला बहुमत मिळाले आहे तर विकासावर लक्ष द्या आणि बदल करुन दाखवा. कोट्यावधी भारतीय किमान २० वर्षे डोक्यावर घेतील...

Pages