केंद्रातील सत्तापालट

Submitted by बेफ़िकीर on 16 May, 2014 - 08:09

मोदी सरकार आलेले आहे. तळागाळात पोचलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहणार्‍या आणि प्रत्यक्षात सत्ता प्राप्त करू न शकणार्‍या भाजपला ह्यावेळी मतदारांनी सुस्पष्ट बहुमत प्रदान केलेले आहे.

ब्राह्मणांचा पक्ष, संघाच्या तत्वज्ञानावर चालणारा पक्ष, हिंदूत्ववादावर जिवंत राहू शकणारा पक्ष, जातीधर्मांंमधील तेढ वाढवण्यास जबाबदार असलेला पक्ष, राममंदिरासारखे नॉनइश्यूज पेटवत ठेवून त्यावर जिवंत राहणारा पक्ष अशी अनेक टीकात्मक बिरुदे मिरवणार्‍या भाजपला एकदाचे स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. हे बहुमत असे आहे की निव्वळ भाजप हा एक पक्षच सरकार स्थापन करू शकेल, करेल. सहकारी पक्षांची सरकार बनवण्यासाठी भाजपला आवश्यकता नसेल. १९८४ नंतर प्रथमच संसदेत एक स्पष्ट बहुमतात आलेल्या पक्षाचे स्थिर सरकार असेल. प्रदीर्घ इतिहास असलेला, गांधी नेहरुंच्या वैचारीक साच्यात घडलेला काँग्रेस पक्ष अभूतपूर्व पराभवाला सामोरा गेलेला आहे.

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आणि कित्येक दिग्गज नेत्यांनी भाजप ह्या पक्षाची धुरा आपापल्या कालावधीत समर्थपणे किंवा जमेल तशी वाहिली. त्यातल्यात्यात अडवानींची रथयात्रा एक प्रकारची नवसंजीवनी देणारी ठरली होती. नरेंद्र मोदींचे वैशिष्ट्य हे की ज्या ज्या आघाडीवर जे जे प्रयत्न करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न त्यांनी नेटाने केले. पैसा खर्च करणे, देशभर प्रचार करून देश ढवळून काढणे, सर्व प्रकारच्या माध्यमांंमधून प्रभावी प्रचार करणे हे उपाय कोणत्याही नेत्याने केलेच असते. किंबहुना हे उपाय काँग्रेसनेही केलेच. पण नरेंद्र मोदींचे वेगळेपण अनेक बाबींमध्ये जाणवले. स्वतःचे व्यक्तिमत्व पंतप्रधानपदासाठी बोलीवर लावण्याआधी मोदींनी गुजराथमध्ये अनेक गोष्टींचा कायापालट करून दाखवला. एखादी लाट यावी आणि ओसरून जावी असे आपल्या नावाचे होणार नाही ह्याची खबरदारी घेत त्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे स्वतःचेच मार्केटिंग केले. पक्षांतर्गत विरोध मोडून काढताना त्यांच्या जमेला गुजराथमधील विजयांची मालिका आणि इतर राज्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेली 'क्रेझ' या दोन गोष्टी असतील हे त्यांनी नक्की केले. पक्षाबाहेरील लोकांना भाजपतर्फे मोदी पुढे केले जातात की अडवानी ह्या गोष्टीशी आत्ताआत्तापर्यंत घेणेदेणेही नव्हते. पण अचानकच ही परिस्थिती पालटली. अचानक देशभरात मोदी हे नांव असे काही गाजू लागले की अडवानी हे नांव त्याच पक्षातील एका नेत्याचे आहे ह्यापलीकडे अडवानी ह्या नावाची जादूही राहिली नाही. प्रचाराची पातळी स्वतःच्या भाषणांमध्ये तरी घसरू न देता मोदींनी आत्मविश्वासाने व मिश्कील शैलीत भाषणे केली. त्यांची देहबोली गेले जवळपास तीन महिने एखाद्या जेत्यासारखीच होती. पण हे सगळे असूनही, भारतीय मतदाराने केवळ 'मोदींकडे पाहून' भाजपला मतदान केले आहे का?

तर तसे मानायला वाव नाही.

१. काँग्रेसकडे करिष्माई नेतृत्व नसणे! मनमोहन सिंगांना वलय नाही, सोनिया गांधींचे वक्तृत्व 'आपलेसे' वाटत नाही आणि राजीवजींची पत्नी असण्याची जादू फार पूर्वीच संपलेली असणे! राहुल गांधींची प्रतिमा एक अपरिपक्व युवक अशी तयार होणे! राहुल गांधींचे वक्तृत्वही प्रभावी नसणे! इतर सर्वच नेते वरिष्ठ असूनसुद्धा कधी ना कधी गांधी - नेहरू घराण्यासमोर झुकणारेच नेते असल्याचे जनमानसाला ज्ञात असल्याने त्यांनाही काही खास वलय प्राप्त न होणे! थोडक्यात, ह्या सत्तापालटामागे मोदींव्यतिरिक्त जी कारणे आहेत त्यातील पहिले कारण हेही आहे की काँग्रेसकडे तूल्यबळ नेतृत्वच नव्हते. कणाहीन पक्ष झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत होती.

२. काँग्रेसशी आतून किंवा बाहेरून हातमिळवणी करणार्‍या पक्षांची व्याप्ती त्यांच्यात्यांच्या राज्यापुरती मर्यादीत होती. त्याशिवाय ह्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा खालावलेलीही होती.

३. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये 'मोदींची जादू चालते' हे सामान्य मतदाराला समजलेले होते. ह्या व्यक्तीला केंद्रातील निवडणूकांमध्ये हात दिला, साथ दिली तर काहीतरी बदल घडेल असा विश्वास निर्माण झालेला होता.

४. गेल्या कित्येक वर्षात भाजपकडून प्रथमच फारशी भावनिक आवाहने नसलेला आणि विकासाबाबत मुद्दे असलेला प्रचार झाला. गुजराथ पॅटर्न म्हणजे काय ह्याच्या खोलात कितीजण गेले आणि किती नाही हा भाग वेगळा, पण असे काहीतरी असते आणि इतर देशाला ते मिळू शकत नाही आहे कारण सरकार भाजपचे नाही आहे अशी एक भावना निर्माण झाली.

५. सामान्य माणसाला काहीतरी नवे, ताजेतवाने समोर आले तर आकर्षक वाटते. नैसर्गीकरीत्याच त्याच त्याच नेत्यांना वर्षानुवर्षे निवडून देण्याऐवजी मोदी हा फ्रेश चेहरा पसंत केला गेला.

६. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असलेले देशाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या कारकीर्दीत ओलांडले गेलेले अनेक विकासाचे टप्पे, इतर अ‍ॅचिव्हमेंट्स ह्या गोष्टींचे मार्केटिंग त्या पदावरील नेत्याने स्वतः केल्यास ते अधिक शोभून दिसते. राहुल गांधी हे 'घराण्यातील व्यक्तिमत्व' एक्झिक्युटिव्ह पॉवर्स नसतानाही काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीवर भाषणे ठोकत असताना मनमोहनसिंगांचा मुखदुर्बळपणा अदृष्यपणे नकारात्मक प्रभाव टाकत राहिला. त्यातच मेड इन कानपूर, मेड इन मिर्झापूर अशी सवंग व स्वस्त विधाने करून राहुल गांधींनी काही प्रमाणात स्वतःचे हसेही करून घेतले.

७. 'आपण काही ह्यावेळेस जिंकत नाही' ही भावना अनेक काँग्रेसी नेत्यांच्या देहबोलीत जणू आधीपासूनच ठासून भरल्यासारखी आली होती. परिणामतः अनेक काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून जनतेचे मनही दुखावले. सुशीलकुमार, मुलायम सिंग, अजितदादा ही अशीच काही उदाहरणे! जनमानसाची नाडी सापडल्यानंतरही तुम्ही त्यांना बरे वाटेल असे बोलला नाहीत तर काय होते ते ह्या निवडणूकीत सगळ्यांना समजले.

८. तांत्रिक विकास, परकीय गंगाजळी, इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ ह्या तीनही गोष्टींचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतोच. 'जे आहे ते काही बरोबर नाही, ह्यापेक्षा अधिक चांगले असू शकते' ही नैसर्गीक मानवी मनातील इच्छा अनेकदा बदल घडवून आणण्यास माणसाला प्रवृत्त करते. ह्याला अनुसरून लोकांनी बदल घडवण्यासाठीही मते दिली. प्रत्यक्षात भारतात जो काही विकास झाला व जो झाला असता पण झाला नाही ते सर्व काही काँग्रेसच्या कारकीर्दीत प्रामुख्याने झालेले आहे. बहुमत मिळाल्यामुळे भाजप पाच वर्षात काही जादू करून दाखवेल हा भ्रम आहे. खरे तर प्रशासनात असल्याची सवय नसलेल्या त्यांच्या कित्येक नेत्यांना नवलाई संपेपर्यंत गोष्टींवर नियंत्रण तरी आणता येईल की नाही असेच वाटत आहे.

९. दलित समाज, मुस्लिम समाज हे काँग्रेसपासून नेमके का दूर गेले (आणि खरंच दूर गेले का) ह्याबाबत मला काहीच समजत नाही आहे. पण असे मानायला वाव आहे की बहुधा ही मतेही काँग्रेसला मिळाली नाहीत.

१०. आम आदमी सारख्या पक्षांना प्रत्यक्षात ह्या निवडणूकीतून काहीच मिळाले नसेल, पण मतदानपूर्व काळात असलेले त्यांचे प्रचारातील अस्तित्व मात्र भल्याभल्यांची झोप घालवणारे होते. ते कोणाची मते खाणार, किती जागा मिळवणार हे प्रश्न डोक्याला भ्यंगा लावत असावेत अनेकांच्या! बरं तडजोडी करण्याइतकी त्यांची पात्रता तरी असेल की नाही आणि असल्यास ते तडजोडी करतील की नाही हेही सांगता येत नव्हते. नेमका आपच्या नेत्यांनी प्रचारही मोदींविरोधात प्रामुख्याने केला. आपोआपच त्यामुळे काँग्रेस आणि आप आतून सामील आहेत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सरकारात केजरीवालांनी घडवून आणलेले विनोदी 'पथनाट्य' आठवल्यामुळे बहुधा जनतेने ह्यावेळी त्यांना नाकारले.

११. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसे सिंधूदूर्गमध्ये राणेंना स्थानिक राकाँ वाल्यांकडून विरोध झाला तसाच तो अनेक नेत्यांना देशभरात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतर्गत सत्तापिपासा, मत्सर, कारस्थाने ह्यांनी काँग्रेस व मित्रपक्ष पोखरले असावेत असे सतत 'वाटत' राहिले खरे!

१२. मोदींनी वैयक्तीक व पक्षाचा प्रचार हा एखाद्या बिझिनेस मॉडेलप्रमाणे केला. सर्व माध्यमे, सर्व संभव प्रचारअस्त्रे त्यांनी नियोजनबद्ध रीतीने राबवली.

१३. प्रचाराची नवीन तंत्रे 'अविरत असंतुष्ट असलेल्या' तरुण पिढीला भावली. ही पिढी बाहेर पडली. मतदानाचा टक्का वाढला. हे वय असे असते की जे असते ते लाथाडावेसे वाटते व जे नसते तेच हवेसे वाटते. भाजपने भारताचा तरुण मतदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले.

१४. व्यावसायिक प्रचारतंत्राचा भाग म्हणा किंवा काही इतर, पण क्षणभरही भाजपने 'स्वतःचे काय होणार ह्याबाबत स्वतःच गोंधळलेले आहोत' हे कोणालाही भासवू दिले नाही. सातत्याने जेत्याच्या आवेशात वावरण्याचा परिणाम जनमानसावर निश्चित झालेला असणार!

एकुण काय तर सत्तापालट झालेला आहे. पण तूर्त तरी फक्त भाजप नेते, समर्थक, त्यांचे मतदार ह्या लोकांना एक वैयक्तीक आनंदच झाल्यासारखा दिसत आहे. हा आनंद फक्त एखाद्या सूड घेतल्यानंतरच्या आनंदाशी तुलना करण्याजोगाच आहे. सत्तेत आल्यावर काय काय करू शकणार हे इतक्यात कळणे शक्यच नाही.

कित्येक ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही असे दिसत आहे. सुशीलकुमारांसारखे दिग्गज स्वतःच्या बालेकिल्ल्यात कोसळलेले आहेत. सोनिया व राहुल ह्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पण हे सगळे बघताना मनात येते की जो पक्ष गेली सव्वाशे वर्ष भारताच्या कणाकणात स्थान मिळवून होता, ज्याला गांधींसारख्यांचा परीसस्पर्श झालेला होता तो असा कस्पटासमान फेकला कसा काय गेला? ह्याला मोदी लाट म्हणणे हा मतदारराजाचा अपमान ठरेल. मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान केलेले आहे. फक्त मोदी हवेत म्हणून नव्हे, फक्त काँग्रेस नको म्हणून नव्हे, फक्त बदल हवा म्हणून नव्हे तर सुजाणपणे, नेत्यांची बेताल वर्तने व भ्रष्टाचार ह्यांचा सूड घेण्यासाठी, आपल्या हातात असलेला मतदानाचा हक्क बजावून आपले सामर्थ्य दाखवून देण्यासाठी मतदान केले गेलेले आहे. तीन दशकांनी आपल्यासारख्याच कोट्यावधी लोकांनी एक स्थिर सरकार पुन्हा आणलेले आहे. बहुतेक आता पाच वर्षे त्रिशंकू सरकारचे भय वाटू नये. मोदी लाट, मोदी लाट असे म्हणून सूज्ञ मतदारांचे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये.

मात्र भाजपपुढे अनेक आव्हाने आहेत. काँग्रेसपुढे एकच आव्हान आहे. पुन्हा नव्याने बस्तान बसवणे!

सत्तापालटाची कारणमीमांसा, तुमची काही खास मते, माझ्या लेखनात काही तृटी असल्यास त्या, ह्या सर्वांवर अवश्य मनमोकळेपणे लिहावे अशी सर्वांना विनंती!

बाकी ह्या सत्तापालटामुळे परराष्ट्रांच्या मनात काय काय आले असेल ह्यावरतीही येथील तज्ञांनी आपली मते मांडावीत अशी विनंती!

धन्यवाद!

जय लोकशाही!

======================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच्या डेक्कन हराल्डमधील राजदीप सरदेसाई यांचा 'मोदी शुड थँक मेनी , फ्रॉम मनमोहन टु मनी अय्यर ' हा लेख मस्तं आहे.
जमल्यास वाचा.

http://www.deccanheraldepaper.com/svww_index1.php

ह्या सरकारने पहिल्यांदाच भारतात सेक्युलर ह्या शब्दाला खरा अर्थ दिला आहे.

सर्व जाती - धर्माची गणित बेरीज वजाबाक्या मोदीने मोडून काढल्या आणि सामान्य लोकांनी भाजपाला मत दिले आहे.

चला आता ५ वर्षांनी मंदीर वगैरे बांधता आले नाही की बोंबलता येणार नाही बहुमत नव्हते म्हणुन काही ही करु शकलो नाही
१० वर्ष नुसते बसुन होते आणि संसद चालु न देणे हेच काम करत होते. आता ५ वर्षात काम करुन दाखवणे हेच भाजपाच्या हाती (की मोदीच्या) आहे अन्यथा परत ५ वर्षांनी इंडिया शायनिंग चे वाजपेयी होतील Biggrin

पहिल्यांदाच भारतात सेक्युलर ह्या शब्दाला खरा अर्थ दिला आहे. >> या आधी बहुमत मिळालेल्या पक्षांना काय विशिष्टच लोक मतदान करुन बहुमत द्यायची काय ? Uhoh कैच्याकै लॉजिक लावतात भाउ Wink

लेख आवडला. अगदी समर्पक पण मोदी सरकार इतक्या प्रचंड मताने निवडून येण्याच एक म्हत्वाच कारण आहे ...नवीन पिढी जी प्रथमच मतदानाला सामोरी गेली आणि दुसर अस कि फेस बुक आणि इतर तत्सम सोशलसाईट चा प्रचारा साठी केला गेलेला झक्कास उपयोग ...मुळात अभ्यास न करता परीक्षेला बसने आणि वर्षभर प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करून परीक्षा देणे यात फरक आहे ...कॉंग्रेस ने आम्हाला सर्व माहित आहे अशा आविर्भावाने निवडणुका कडे पहिले तर भाजपने सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांचा उपयोग केला होता ....भारतातील नवी पिढी,त्यांच्या आवडी निवडी आणि त्यांच्या परेंत पोहचण्याची साधने त्यांनी चांगलीच उपयोगात आणली ...आता इथून पुढे सत्ता धरी पक्षाने अगदी मोजून मापून पावले उचलली पाहिजेत नाहीतर ...ज्यांनी वर काढलं त्यांना अगदी तळाशी पाठवण्याच पण चांगलच माहित आहे हे विसरून चालणार नाही ...त्यांना या संधीच सोन करावच लागेल नाही तर अरविंद केजरीवाल होण्यास वेळ लागणार नाही ....:)

कैच्याकै लॉजिक लावतात भाउ >> तसं नाही भाजपा केवळ विशिष्ट जातीधर्माचीच पार्टी आहे असे म्हणले जाते हे बहुदा तुम्हाला माहिती नसावे, म्हणून तसे लिहिले.

पुण्याची विनिता - तुमचा प्रश्न इन्टरेस्टिंग आहे Happy

सर्वांचे आभार!

केदार - सहमत आहे.

मनमोहन सिंगांच्या प्रचारात सहभागी न होण्यावर आत्ता टीव्हीवर चर्चा चालू आहे. (सह्याद्री)

चांगला अनेक मुद्यांनी भरलेला लेख .कितीही सभा घेतल्या आणि दुसऱ्या पक्षांचे दोष ओरडून /नकला करून सांगितले तरी सामान्य माणसास पटवता येत नाही .देशभरातला मतदार शांतच राहिला .येउ दे बटनांची पेटी समोर मग बघा कसं करतो तुम्हाला टुंऽऽऽऽऽईऽऽ .एका घराण्याच्या पायरीशी केविलवाणे चेहरा पिढयानपिढ्या करून बसलेले ,एका समाजाच्या तुकड्यांवर जगलेले ,कोणा एकाची फजिती करण्यासाठी फक्त राजकारणात आलेले या सर्वाँना जाणत्या मतदाराने गल्ली दाखवली असं मी म्हणेन .

भाजपला मतदान केले आहे का? याची कारणे उत्तम लिहिली आहेत. हे गेल्यावेळेप्रमाणे कॉन्ग्रेस नको असे
मतदान झाले नाही तर भाजप ला पॉझिटीव्ह मते पण मिळालीत.
गेली बरेच वर्षे तमिळनाडु आणि ब.न्गाल स्वतःचे १०-१५ खासदार निवडुन देत. हे खासदार नेहमी
कामचलाउ सरकार मध्ये राहुन त्या सरकारला ब्लॅकमेल करुन आपल्या स्वतःसाठे आणि आपल्या राज्यासाठी अनेक काम करुन घेत. यावेळी मात्र अशा छोट्या पक्षा.न्चे काही चालणार नाही. भाजपा मध्ये फुट[पाडायला मात्र आता अनेक प्रयत्न होतिल.

भाजपामध्ये फूट पाडायला मात्रं अनेक जण तयार होतील.

मला ही एक क्षण असे वाटले होते.
पण फूट पाडणार कोण आणि का?
काँग्रेसला दिडशेच्यावर जागा असत्या तरी असे केले असते पण आता किती उड्या मारल्या तरी चान्स नाही.

आता किती उड्या मारल्या तरी चान्स नाही.
>> Happy मलाही असेच व्हावे असे वाटते. एखाद्या पक्षाला पुर्ण स.न्धी मिळाली पाहिजे.
जे काही होवो ते भारताच्या उत्कर्षासाठी होवो अशी प्रार्थना!

<भाजपला मतदान केले आहे का? याची कारणे उत्तम लिहिली आहेत. हे गेल्यावेळेप्रमाणे कॉन्ग्रेस नको असे
मतदान झाले नाही तर भाजप ला पॉझिटीव्ह मते पण मिळालीत.> +१
भा ज पा वर मात्र खरोखर खूप जवाबदारी आहे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायची.
आघाडी चं राजकारण हे कारण आता देता येणार नाही. BJP must deliver now !!

एकूणच स्पष्ट बहुमत मिळाले हे चांगलेच झाले..... प्रादेशिक पक्षांची जत्रा पाहता आणि आप इफेक्ट पाहता हे लोक भाजपाची (पारंपारिक नाही पण काँग्रेसविरोधातुन भाजपाकडे वळलेली तरी) मते नक्कीच खाणार असे वाटलेले पण मतदार राजा सूज्ञ निघाला!

भाजपाच्या या विजयात सोशल मिडियातून झालेल्या प्रचाराचा फार मोठा रोल आहे..... इतक्या मोठ्या संख्येने मतदानाला गेलेले (शाईवाल्या बोटांचे फोटो व्हॉट्सअपवर टाकण्यासाठी का होईना) तरुण मतदार यंदा पहील्यांदाच बघितले!

लगेचच काही करिष्म्याची अपेक्षा ठेवणे म्हणजे बालिशपणा ठरेल..... बाकी काही होवो न होवो येत्या पाच वर्षात जनतेच्या बेसिक गरजांकडे जरी फोकस ठेवला तरी भाजपाला एक खुप मोठा मतदार वर्ग स्वताकडे कायमचा वळवता येईल Happy

आजच मोदीजींचं अहमादाबादमधल विजय सभेच भाषण ऐकल तर अनेकांना पडलेले प्रश्न उत्तर देऊन जातील. एक महत्वाचा मुद्दा मोदीजी बोलले.

" महात्मा गांधींनी स्वातंत्रसंग्रामाच जनआंदोलन बनवल. त्या आधी इंग्रजांच्या विरुध्द क्रांतीकारी लढत आणि संपुन जात. पण महात्मा गांधींनी खादी वापरणे म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग इतक साध सुत्र बनवल. जर विकास हा आधीच्या सरकारांनी सरकारी कार्येक्रम न बनवता जनआंदोलन बनवला असता तर आज देश अनेक वर्ष पुढे गेला असता. "

हा विचार कायमचा ठेऊन जर मोदीजींना विकास जनआंदोलन बनवता आले तर तक्कीच वेगाने देशाची प्रगती होईल.

कसे ? कधी इ प्रश्नांची उत्तरे काळच देईल.

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता…. मोदी आणि भाजप साठी हे खरं झालंय.

नवीन सरकार काम कितपत करेल हे आत्ताच सांगण कठीण आहे. ५ वर्ष आपण सगळेच आहोत बघायला तेव्हा कळेल. आत्तातरी चांगल्याची अपेक्षा करायला हरकत नाही.

पण आघाडी सरकार असतं तर बर झालं असतं अस माझं वैयक्तिक मत आहे. ह्यामुळे एकाधिकारशाही राहणार नाही आणि सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील.

अजून १. लोकसभेत बहुमत आणि राज्यसभेत अल्पमत. हि स्थिती निर्णय घेण्यासाठी, बिल संमत करण्यासाठी अडचणीत आणू शकते.

http://www.washingtonpost.com/blogs/worldviews/wp/2014/05/16/indias-ruli...

"Congress Party has long been a mainstay of Indian politics. It was the party that won India its independence, led by men like Mahatma Gandhi and Jawaharlal Nehru, India's first prime minister. Since 1947, the center-left party has remained the dominant party, and for the last 10 years it had led India under Prime Minister Manmohan Singh.

So what explains this historic defeat? The "WhyCongressLost.In" thinks it knows why: Rahul Gandhi.

The Web site is one of those delightful single serving Web sites that has popped up over the past few years. All it does is serve you up random quotes from Gandhi, including such gems as:

People call us an elephant.. We are not an elephant.. we are a beehive.. it's funny but think about it. Which is more powerful? an elephant or a beehive?

And:

You should stop asking your politicians how they’re gonna do it.

And also:

Dalit community 'needs the escape velocity of Jupiter' to achieve success.

Politics is everywhere...it is in your shirt...in your pants...everywhere. " Lol

जॉर्ज बुशच्या वक्तव्यांचं जसं पुस्तक निघालं होतं तसं राहुल गांधीच्या मुक्ताफळांचं काढायला पाहिजे Proud

Pages