तोळाभर सुख....

Submitted by दुसरबीडकर on 14 May, 2014 - 16:08

तोळाभर सुख..

महादानं हिरीत डोकावून बगितलं.,हिरीला आसलेल्या बारकुल्या नळाचा निस्ता लेकरू मुतल्यावानी चुळूचुळू आवाज येत व्हता..!!मोटारीचा फुटबालबी झाकणार न्हायी इतकुस पाणी व्हतं..!!त्येच्यावर गणगण मव्हळाच्या माशा,किटकुल,आन वरच्या जांबाच्या झाडाचा सम्दा पालापाचुळा तरंगत व्हता..!!हिरीच्या भिताडातून निगालेल्या भुईउंबराच्या झुडपावर सुगरण खोप्याभाईर उदासवाणी बसल्यागत महादबाला दिसली..!!उगाच त्याच्याबी मनाची काह्यली झाल्यागत व्हवू लागली..!त्यानं डोक्शातली टोपी काडली अन थितचं जांबाच्या खोडाला रेटला. माथ्यावरचा घाम पुसून त्यान टोपी डोक्शात टाकली..!पैरणीच्या खिशामधनं चुनाळू भाईर काल्ढं.,आल्हादी उजव्या हातानं चुनाळाचं झाकण उघडून डाख्या हातावर ढवळी कलकत्ता तमाखू वतली.पुन्हा झाकण लावून चुनाळू कल्टी केलं..दुसर्या सईडीच झाकण उगडून बोटभर चुना काल्ढा,आन झाकण घट लावून पैरणीत ठिवलं. डाख्या हातावरची तमाखु सरक्या हाताच्या पैल्या बोटानं खसखस चोळली.दोनचार निबर देठदांडे आल्लाद वरत काल्डे आन खाली टाकले..,दोन-तीनदा तमाखु थापटून दोन बोटाच्या चिमटीत भरून दाताच्या अन व्हटाच्या मधी बार भरला..!
मिरग दोनचार दिसाव येवून ठेपला व्हता..!! आज न्हायी तं उद्या पाणी पडणारचं...!महादाचा ईचार चालू व्हता..!राहून राहून भकास झालेल्या रानाकडं त्याची नजर जात व्हती.जिमिनीला हे मोठ्ठाल्या भेगा पडल्या हुत्या..सितामाय जाईल यवढ्या..!बंधा उन्हाळा चाल्ला व्हता..पण रानाला ना नांगरट भेटली ना कल्टी..!!
'मायला ह्या वक्ताला जर माळवं आस्त त लगनसराईत बंबाट कमाय झाली आस्ती,आन सुमीच्या लगनात इतकी फजितीबी नस्ती झाली..पण हिरीला काय मनून फायदा??' म्हादबा मनालाच कावत हुता..!! दुसर्या पोरीच लगन दोन वर्सापासून आताशी जमल हुतं..मानपान,हुंडा,डाग-डागिने,पंगत याच्यात व्हत नव्त तितक म्हादबानं टाकल व्हतं.. वर पुन्यांदा दगडू दुकानदाराचे पंचिस हजार याजी घियाच काम पल्ड..! आता पेरनीचा टैम आला न म्हादबा हापकला व्हता. करणार त काय करणार,खिसा त मायझं बारा म्हैनं फाटकाच??ते तरी बर बँकावाल्याच लफडं नवतं ठिवल..आता दगडूबाचे पंचिस हजार पुल्ड्या सालालोक जातेल त लाह्यनी सुमनी पुना लगनाला येतीच..!!आन पैश्यापाय जर पेरणीच नाय झाली तं??
ईच्यारा ईच्यारात म्हादबान कच खाल्ली,डोक्स गरगराय लाग्ल..'
'औंदा पेरणीच हुती का नाय याचा गेम बसनां..पुल्ड्या हिरीत जीव द्याला जावं त पाण्याचा बी पत्ता न्हाय.' म्हादबाच चक्कर काय केल्या थांबना..डोक्याला पार मुंग्या आल्या,घाम फुटला,नगंनगं ते ईच्यार डोक्शात वस्तीला यिवू लागले..पटकन तोंडात बोट घालून व्हटातली तमाखू त्यान भाईर फेकली आन मांग कलंडला..!
ईच्याराच्या चक्रात त्याला तंद्री लागली..वसाड पल्डेल्या वावरातल्या भेगाडातून इचितर जनवारं भाईर निंगताना त्याला दिसू लागली..मधीमधी मांगच्यासाली फाशी घेवून गेलेला कुलप्याचा नामा,जांबाच्या झाडावं लटकून त्याला बलावू लाग्ला..! मधातच सुमनी नवरी व्हवून मायच्या गळ्यात पडून रडतांना दिसत व्हती..दगडूदुकानदार बायकुचा आंगठा घित व्हता!!वजेवजे म्हादबाची सुद हारपत व्हती..समदं डोक्शावरच आभाळ फिरत व्हत..!!

''आवो.. ओ..सुमीचे दादा..आतामाय? काय बिनघोर पल्डा ह्यो माणूस..आवं उठा की..पाह्यटं चक्कर माराय आले न दुपारपस्तोर हिकडच उताने पल्डे..''
गिरजाच्या आवाजानं म्हादबाची तंद्री तुटली व्हती..घायबर-घुयबर त्यो उठला..काय बी कळनां गेलं व्हतं .डोळ्यात भेव दाटल व्हतं ... त्यो नुसताच निपचित बसला हुता..
''आवं..काय झालं??काय सपानबिपान पल्ड का? इतके काहून भेदरल्यावानी दिसून राह्यले...?''
गिरिजानं तिथीच टेकत काळजीन दादल्यालं पुसलं...तीच्या डोळ्यात आंधार दाटला व्हता..नवर्याच दुख नायी सांगतल तरी तिल उमजल व्हतं..!
''गिरिजे...मी मेलो त कस करशील वं ..?
म्हादबा डोळ्यान वल्ला होत इच्यारत व्हतां. .
''सुमीचे दादा ...यडं की खुळं तुम्ही..तुमास्नी आस कामुन व्हतय..मला बी कळतया...पण मंग ह्येच करायच त मंग लेकरा-बकरासगट मलं मारा पह्यलाखेप न मंग करा काय बी...!!
गिरिजाच डोळं पायताच म्हादबाच्या जिवाचा कल्ला झाला.. उसनं आवसान जिबीवर आणून त्यो म्हणला..
'' मंग काय करू??पेरणी कुठून करु..?कोण देतयं आता पैका??सगळ्यास्नी ठाव हाये.. दगडूबाचे पंचिस घेतले,पोरगी उजवली त म्हादबा भिकारी झाला,कोण देतं आश्या टायमात?? '.'
गिरिजानं म्हादबाच्या डोळ्यातनी पायलं...एका निर्धारान गळ्यातल्या मंगळसुतरालं तीनं हिसका देला..आन तटकन तोडून म्हादबाच्या हातावं ठिवलं..
''आवो ..गिरिजे हे काय करतीस .?पह्यलच तं तुलं म्या ऎक डाग केला नायी न तू हे मंगळसुत्तर द्या लागली?? सौभाग्याचं लेणं??बाकीच्या बया काय म्हणतेल??
म्हादबा कातर झाल्यागत बोलत व्हता..त्याला कायबी सुचनां गेलं व्हतं..
''सुमीचे दादा,बया काय म्हणतेल मलं गरज न्हायी...मह्या नवर्याचा जीव जर मलं ह्या तोळाभर सोन्यापरीस लय जास्त हाये..महा जीव तुम्हाल तोळाभर वाटला काय? हे घेवा..आन आजच माळेगावलं मोडायलं न्या..इसेक हजार येतेल..खत-बिजवाई करा आन यक बजारातल इस रुपयाच तुमच्या नावाच मंगळसुत्र आणा...तुम्ही है त महा सगळा संसार हाये..तोळाभर सोन्याचा न्हायी ..ह्या तोळाभर सोन्यानं तुमच्या जिवालं तोळाभर जरी सुख भेटल तं गिरजाचा जलम कामी आला आसं समजा..''
गिरिजा लय समाधानी डोळ्यातंन नवर्याला बगतं व्हती..
म्हादबाच्या डोळ्यातनं पाणी निंगून हातावरच्या तोळाभर सोन्यावर पडत हुतं..
जांबाच्या झाडावं कोकीळा लय आनंदात गात व्हती..मगाशी उदास बसेल सुगरण आनंदात झोका घेत व्हती.. हिरीच्या दगडातून नवा कोंब भाईर पडून वाढायं सुर्वात करत व्हता..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.
भाषेचा टोन छान जमलाय.
कथा नेहमीचीच असली तरी तुमचं लिखाण सुंदर आहे.
लिहित रहा.

chan

मेंढका...

मीही शेतकर्याचाच मुलगा असल्यामुळे अशी ससेहालपट जवळून बघितलीय..आपण प्रांजळ भावना शेअर केलीत..मनापासून आभार..

कंसराजजी ..
दिलसे शुक्रिया.. Happy

Sunder..

भाषा मस्त जमली आहे, कथा आवडली.

सावकारी कर्ज काढण्यापेक्षा आधीच ते सोने विकले असते तर...

निशिगंध84, भट्टी चांगली जमलीये. गोष्ट पकड घेते. म्हणूनच राग येतो. कळलं असेलंच कुणाचा आणि कशाला ते. Sad
आ.न.,
-गा.पै.

निशिगंध
आपली कथा वाचायला जरा अवघड गेली. नेटाने वाचत राहिलो व नंतर चपलतेने वाचनात रंगलो. ग्रामीण भाषेशिवाय व्भायक्वतींचे विश्व सादर करण्यात आपल्याला 100पैकी100 मार्क म्हणाना...
या बोलीला काही विशिष्ठ नाव?

vishal w.....

नंदिनीजी....

केदारजी...

गामा पैलवानजी...

urmilas....

शशिकांतजी... मनापासून आभार आपल्या रसिकतेला'...!!

हि भाषा मराठवाडी/वैदर्भीय / कोल्हापुरी मिक्सिंगचा प्रयत्न आहे..