बोल ना बाबा

Submitted by संतोष वाटपाडे on 14 May, 2014 - 03:07

तू मोजत होतास ढेकळं
वेड्यावाकड्या बांधावर बसून
मी मोजत होतो आठ्या
तुझ्या कपाळावरच्या......

किती काळकुट्ट दिसत होतं
घामानं भिजलेलं तुझं कपाळ
किती दाहक वाटत होता तुझा घाम
नाकाच्या शेंड्यावरुन टपटप खाली पडणारा...

बरडावरच्या विहिरीत
तू रोज डोकावून पहायचास
आणि मी तुझ्या डोळ्यातल्या विहीरीत
काळाकभिन्न खडक बघायचो.....

तुझ्या निगरगट्ट हातावरच्या रेषा
किती अस्पष्ट झाल्या होत्या
भुईचा ऊर फ़ाडताना
नांगराची मुठ आजन्म पकडताना.......

स्वप्नांच्या भुसभुशीत जमिनीत
दररोज फ़ुलून येणार्‍या
अपेक्षांच्या कोवळ्या फ़ुलांना
तू कुस्करत होतास निष्ठूरपणे
इच्छा नसतानाही
अन आम्ही ती वाळलेली स्वप्ने
रोज आणत होतो जाळण्यासाठी
आयुष्याच्या दगडी चुलीत...

तुझ्या उराचा भाता धपापत असायचा
तेव्हा भाजून घेतले मी स्वतःला
लाल करवून घेतले सर्वांग
कोळशात गुंतवलेल्या लोखंडागत
हातोड्याचे घाव सहन करण्यासाठी.....

छप्परावरचं मेणकापड वितळून गेलंय बाबा
आत दाबलेल्या गवताचा चुरा झालाय
सारवलेल्या झोपडीत ऊन यायला लागलंय
यंदा पाऊस पडला तर
घर शाकारायचं ठरवलंयेस ना तू...
- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users