सर्वात मोठा प्रज्ञाशोध

Submitted by नरेंद्र गोळे on 24 April, 2014 - 00:24

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध - बिगेस्ट टॅलँट हंट - असल्याचे सूचित करणारी एक (बहुधा हिरोची) जाहिरात दूरदर्शनच्या कुठल्याशा वाहिनीवर परवा पाहण्यात आली आणि विचारांचे एक मोठेच आवर्त मनात घोंगावू लागले. खरंच हा शोध आहे तसाच! म्हणूनच तो तशा प्रकारे लक्षात आणून देणार्‍या जाहिरात-संहिता-लेखकाचे (कॉपी-रायटरचे) मनःपूर्वक आभारच मानायला हवेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, प्रज्ञावंत उमेदवारांना, त्यांच्या मतप्रणालीचे समर्थन करणार्‍या पक्षांना, त्यांना मते देणार्‍या मतदारांना आणि एकूणच निवडणूक यंत्रणेला हा प्रज्ञाशोध असल्याची जाणीवच नसल्याचे दिसून येते. ह्याबाबत प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे.

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे खरोखरीच जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध’ आहे. उत्तमोत्तम प्रज्ञावंतांनी त्याकरता उमेदवारी करावी. लोकमताने निवड करवून, उत्तमांतील उत्तम उमेदवारांचा शोध घेतला जावा. त्यांनी परस्पर विनिमय करून, सर्वोत्तम उमेदवारास पंतप्रधानपदी नियुक्त करावे. ह्याकरताच खरे तर आपली निवडणूक प्रणाली अभिकल्पित आहे. तिचे वर्तमानातील दर्शन मात्र तशा स्वरूपात होत नाही. जर झाले, होऊ शकले, तर ती आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडून ह्या प्रज्ञाशोधास सार्थ ठरवेल ह्यात मुळीच संशय नाही.

शालेय प्रज्ञाशोध (स्कॉलरशिप) परीक्षांच्या माध्यमांतून मला पहिल्यांदा ’प्रज्ञाशोध’ शब्दाचा अर्थबोध झाला होता. ह्या संदर्भात मला, मी दिलेल्या, घेतलेल्या, असंख्य परीक्षांच्या आठवणी दाटून आल्या. पात्रतेचे निकष आठवू लागले. प्रज्ञेस धार चढवण्याकरताचे तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानादी[१] नियम आठवू लागले. मुळात प्रज्ञावंत असलेली मुले, हरप्रयत्ने अभ्यास करून परीक्षांची जय्यत तयारी करत असल्याचे प्रसंग आठवू लागले. कसोटीचे दगड ठरणारे, मौखिक परीक्षा घेणारे परीक्षक आठवू लागले.

निवडणूकांच्या ह्या हल्लीच्या आन्हिकांत मात्र ही एवंगुणविशिष्ट ’प्रज्ञा’च हरवलेली दिसून येत असते. खरे प्रज्ञावंत निवडणुकांत का उमेदवारी करत नाहीत? का ते आपल्या विशिष्ट प्रज्ञेची जाहिरात करत नाहीत? का ते आपले ते विशेष सामर्थ्य जनमानसाच्या लक्षात आणून देत नाहीत? का लोकही त्या सामर्थ्यांवरच लक्ष केंद्रित करत नाहीत? वर्तमान निवडणुकांच्या संदर्भात, ह्या सगळ्याचा घेतलेला हा शोध आहे.

प्रज्ञाशोधांची कारणमिमांसा

सामान्यतः प्रज्ञाशोध करण्याचा उद्देश निश्चित केला जातो. प्रज्ञाशोधाचा उद्देश देशाचे नेतृत्व करण्यास पात्र विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रोत्साहित करण्याचे, संसाधने उपलब्ध करवून देण्याचे असते. प्रज्ञाशोधाकरता उमेदवारी करणार्‍या प्रज्ञावंतांना त्यात उमेदवारी करावी असे वाटावे म्हणून योग्य ते प्रलोभन पुढे केले जाते. ते प्रलोभन म्हणजे शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप). प्रलोभनार्थ उद्युक्त होऊन उमेदवार तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधानादी प्रयत्नांनी सिद्ध होतात. परीक्षेने ती सिद्धता तपासून पाहिली जाते. अधिक संपन्न उमेदवारास शिष्यवृत्ती देऊन त्याचा गौरव केला जातो. मात्र, शिष्यवृत्ती देणे हा काही प्रज्ञाशोधाचा उद्देश असू शकत नाही. शिष्यवृत्ती हे केवळ प्रलोभनच असते.

निवडणुकांच्या प्रज्ञाशोधाचा उद्देश स्पष्ट आणि घोषित असाच आहे. देशाचे सरकार नियुक्त करणे हा. प्रलोभन मात्र स्पष्ट आणि घोषित नसते. ते तसे करता आले तर अधिक प्रमाणात, सत्पात्र प्रज्ञावंत, उमेदवारीस तयार होतील. समाजात मान-सन्मान मिळतो, मोठ्या लोकसंख्येचे अधिकृतपणे नेतृत्व करता येते, निवडून आल्यास पदाचा वापर, गैर-वापर करून स्वार्थाकरता संसाधनांचाच अपहार करता येतो, प्रजेवर राज्य करत असल्याचे समाधान प्राप्त होऊ शकते इत्यादी अस्पष्ट आणि अघोषित प्रलोभने असतात. त्यांचे प्रदान निश्चित स्वरूपाने होईलच ह्याची शाश्वती नसते. संविधानानुसार अधिकृत उपायांनी, अधिकृत संसाधने उपलब्ध करवून देण्याची, शाश्वती मिळू शकल्यास, सत्पात्र प्रज्ञावंत उमेदवारीस तयार होतील.

उमेदवारीची पात्रता, उद्‌घोष आणि प्रचार

देशाचे सरकार चालविण्याकरता, देशासमोरची आव्हाने, प्रश्न आणि समस्या काय आहेत ह्याची माहिती असायला हवी. देशाचा इतिहास, भूगोल, नागरिकत्व इत्यादींचे किमान ज्ञान असायला हवे. प्रचलित निकडींच्या विषयांवर उमेदवाराने आपली मते तयार केलेली असावीत. हा झाला उमेदवारांच्या पात्रतेचा भाग. देशधोरणांबाबतची त्याची मते मतदारांना ज्ञात व्हावीत म्हणून त्यांचा उद्‌घोष आणि प्रचारही समर्थपणे केला जावा. उमेदवारांच्या मतमतांतरांतील भेद मतदात्यांच्या नीट लक्षात यावेत म्हणून, जाहिरीत्या देशधोरणांबाबतचे परिसंवाद भरवून त्यात उमेदवारांना आपापली मते विषद करण्याची अधिकृत संधी दिली जावी.

एकदा का निवडणूक हा पात्रतेचा निकष नक्की केला की, मग प्रत्येक निवडणुकीच्या उमेदवारीकरताही निम्नस्तरीय निवडणूकांतील यशस्वीताच पात्रता ठरवेल. म्हणजे खासदारपदाकरता उमेदवार कोण ठरू शकतील ह्याची पात्रता म्हणजे, किमान एकदा तरी तो उमेदवार आमदार राहिलेला असावा. आमदार म्हणून निवडून द्यावयाचा उमेदवार किमान एकदा तरी पंचायतीत पंच, सरपंच म्हणून किंवा नगरपालिकांच्या निवडणुकांत नगरसेवक म्हणून निवडून आलेला असावा. ह्यामुळे किमान पात्रता निश्चित होऊन सहज म्हणून कोणीही, काहीही अनुभव नसतांना, उमेदवारी करू शकणार नाही. अचानक पंतप्रधान होऊ पाहणार्‍यांनाही आपसूकच चाप लागेल.

प्रचारातील मुद्दे, घोषित मते आणि अपप्रचार-निषेध

देशापुढील कळीच्या आव्हानांची, समस्यांची आणि प्रश्नांची एक यादीच सरकारने प्रकाशित ठेवावी. प्रत्येक उमेदवाराने व पक्षांनी त्यांबाबतची आपापली मते आणि धोरणेही उमेदवारीसोबतच घोषित करावीत. ह्या घोषणापत्रांचा अधिकृत अहवाल निवडणूक आयोगाने बाळगावा. निवडून आल्यानंतरच्या काळात उमेदवाराने वा पक्षाने त्याविपरित भूमिका घेतल्यास, त्यास ती तशी घेता येऊ नये. घ्यायची झाल्यास, तशा भूमिकेस वैधता प्राप्त करवून घेण्याबाबत कठोर कायदे असावेत.

प्रचारात ह्याव्यतिरिक्तचे मुद्दे उपस्थित करतांना उमेदवार व्यक्तींच्या नावावरून, खासगी आयुष्यांतील विवक्षित घटनांवरून, किंवा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टीका करू नये. कारण निकष निवडणूकांत निवडून येणे हाच असणार आहे. इतिहासात तो उमेदवार कुठल्याही लोकप्रतिनिधित्वाच्या पदावर पदासिन असल्यास त्याने घेतलेल्या निर्णयांच्या उचितानुचिततेबाबतच चर्चा व्हावी. उमेदवारानेच आपण असे कोणकोणते निर्णय घेतले, त्यातले कोणते लोकोपयोगी ठरले आणि कोणते फारसे उपयोगी ठरू शकले नाहीत ह्यांची जाहीर चर्चा करावी. इतर उमेदवारांनी, पक्षांनी किंवा मतदारांनीही त्याबाबतचे मतभेद जाहीर करावेत.

लोकमानसातील प्रज्ञाशोधाबाबतची स्पष्टता

निवडणूका हा प्रज्ञाशोध आहे. समाजातील यच्चयावत प्रज्ञावंतांना उमेदवारीस प्रोत्साहित करणेच अंतिमतः समाजहिताचे आहे. निवडणुकांतील निवड हेच पात्रतेचे निकष असणार आहेत. निवडून दिलेल्या व्यक्तींना, लोकप्रतिनिधींना किमान सहकार्य आणि सन्मान देणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इत्यादी गोष्टीही लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे.

असे झाल्यास हा सर्वात मोठा प्रज्ञाशोध खर्‍या अर्थाने फलद्रुप होऊ शकेल. आपल्याला खरेखुरे समर्थ सरकार लाभू शकेल आणि आपला देश खर्‍या अर्थाने सुशासित होऊ शकेल. असे होवो हीच सदिच्छा!

[१] भारतीय अष्टांग योग संहितेत; यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही स्वकर्मांवर एकाग्रता साधून मुक्ती मिळवण्याकरताची अंगे म्हणून सांगितली गेलेली आहेत. यांपैकी सत्य, अहिंसा, अस्तेय (चोरी न करणे), अपरिग्रह (अनावश्यक गोष्टींचा साठा न करणे) व ब्रम्हचर्य (विकाराधीन नसतांनाची, शारीर-चर्या म्हणजे वर्तणूक) हे पाच यम (आयाम म्हणजे परिमिती, डायमेन्शन. आयाम, यमांच्या परिसीमा व्यक्त करत असतात, ह्या अर्थाने पाहिल्यास यम म्हणजे वर्तनपद्धती) आणि शौच (स्वच्छता), संतोष (समाधान), तप (कष्ट करून, हवे ते साध्य करण्याकरता केलेले अथक प्रयत्न), स्वाध्याय (अभ्यास) व ईश्वरप्रणिधान (म्हणजे जे जे कर्म आपण करत असतो ते सर्वप्राणिमात्रांच्या हितकारक असावे ह्याकरता समर्पित करण्याची भावना राखणे) पाच नियम सांगितलेले आहेत. आसन म्हणजे मानवी शरीरास स्वस्थतेने दीर्घकाळ (सुमारे पाच सहा मिनिटे) एकाच अवस्थेत स्थिर राहता येईल अशी अवस्था. प्राणायाम म्हणजे श्वसनशक्ती वाढवण्याकरता, तसेच शरीराच्या स्वस्थतासाधनार्थ केलेले शासोच्छवासाचे नियमन. प्रत्याहार म्हणजे प्रत्यंचेस (धनुष्याच्या दोरीस) बाणासह ओढून घेऊन बाण सोडण्यास सिद्ध (तयार) राहावे, तशासारखी मनस्थिती सिद्ध करणे. धारणा म्हणजे ज्या विषयावर मन एकाग्र करण्याची इच्छा असेल त्या विषयाची निवड करणे. ध्यान म्हणजे म्हणजे त्या विषयाचे चिंतन. तसेच समाधी म्हणजे, त्या विषयावर एकाग्रता साधून त्याबाबतीत सर्वप्राणिमात्रांच्या हितकारक काय ठरू शकेल ह्याबाबत मनाचा झालेला निश्चय. निर्णय. ह्या आठही अंगांनी योगसाधना केल्यास मोक्ष (मुक्ती, सर्वप्राणिमात्रांचे हित) साधू शकेल; असे आपल्या पूर्वसुरींचा हजारो वर्षांचा मौखिक परंपरेने संकलित केलेला अनुभव सांगतो.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users