काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग ९ केमालीझम आणि त्याच्या मर्यादा

Submitted by शबाना on 21 April, 2014 - 11:07

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417
http://www.maayboli.com/node/48419
http://www.maayboli.com/node/48436
http://www.maayboli.com/node/48520
http://www.maayboli.com/node/48629
http://www.maayboli.com/node/48631
http://www.maayboli.com/node/48638
http://www.maayboli.com/node/48639

केमालीझम आणि त्याच्या मर्यादा

Paasha.jpg

मुस्तफा केमाल आणि केमालीझम, आणि तुर्कस्तानच्या ५० वर्षाच्या इतिहासातील निर्णायक विचारप्रणाली. पश्चिमेत विकसित झालेल्या Positivism -प्रत्यक्षज्ञानवाद या राजकीय विचारप्रणालीवर केमाल्चे विचार आणि धोरणे आधारित होती. एकोणीसाव्या शतकात ऑगस्ट कोम्ट या विचारवंताने प्रत्यक्षज्ञानवाद विकसित केला. सहा तत्वांवर ही विचारसरणी आधारित आहे : प्रजासत्ताक, जनरंजकवाद, धर्मनिरपेक्षता, सुधारणा, राष्ट्रवाद, शासनवाद ( republicanism, populism, secularism, reformism, nationalism, statism). तुर्कस्तानच्या संदर्भात या विचारप्रणालीचे उपयोजन थोडे विस्तारात समजून घेउयात.

प्रजासत्ताकवाद : राजेशाहीचा त्याग करून तुर्कस्तानने लोकतांत्रिक शासनपद्धती अवलंबली . ओटोमान साम्राज्याप्रमुख हा आतापर्यंत शासनप्रमुख असे, टर्किश विधानसभेने ठराव करून सम्राटाला शासनप्रमुख पदावरून पदच्युत केले. त्याहीपुढे जाउन सम्राटाच्या खलिफा हे पदाच त्यानी नष्ट केले. तुर्कस्तानने घेतलेला हा खूप मोठा निर्णय. उदा. पोपला पदच्युत करून ते पद आणि त्या पदाबरोबर येणारी व्यवस्था यांना बडतर्फ करणे याच्याशीच या घटनेची तुलना होऊ शकते. ( सुलतान आणि खलिफा हे पद १५१९ पासून एकाच व्यक्तीकडे असे, आणि जरी तो ओटोमान साम्राज्याचा सुलतान असला तरी खलिफा हा समस्त मुस्लिम समाजाचा ( सुन्नी) धार्मिक नेता असे. या निर्णयाने मुस्लिम समाजात एक पोकळी निर्माण केली. खिलाफत ही संकल्पना आणि त्यावर आधारित व्यवस्था हे मुस्लिम समाजानी राजकारणात आतापर्यंत केंद्रीभूत असलेल्या घटकाला नाकारून प्रजासत्ताकाची स्थापना हा एक मोठा निर्णय होता.

जनरंजकवाद - polpulism हा शब्द popularly फक्त राजकीय प्रतिस्पर्ध्यांची टीका करताना आपण ऐकतो. परंतु राजकीय विचारप्रणालीत याचा अर्थ राज्य आणि समाजव्यवस्थेत असलेले सारे वर्ग, संप्रदाय व लिंगावर आधरित भेदभाव दूर करून जनता संघटनात्मक पातळीवर एकसमान आहे असे मानणे. शासन आणि जनता एकत्रित येउन राष्ट्र्बांधणीच्या कामात सामुहिकपणे सहभागी होतात. त्यांची उद्दिष्टे आणि मार्ग एकाच असतात असा आहे. केमालच्या तुर्कस्तानात अशी एकसंघता, एकता निर्माण करण्यावर भर दिला. महिलांना सर्वत्र समान संधी, त्यांचा राजकीय प्रक्रियेत समान सहभाग, आधीचा पेहराव सोडून फ्रेंच पेहरावाचा अंगीकार, धर्म आणि संप्रदायावर आधारित वैयक्तिक कायदे रद्द करून स्विस संहितेवर आधारित समान नागरी कायदा ही केमालने रुजवलेली काही populist धोरणे

धर्मनिरपेक्षता : शासन आणि धार्मिक संस्था यांची पूर्णपणे फारकत- शासनव्यवस्था ही सर्वांसाठी समान असेल आणि तिथे कुणाही धार्मिक व्यक्ती किंवा नेत्याची लुडबुड नसेल, त्याचबरोबर धार्मिक कार्यात शासन हस्तक्षेप करणार नाही. धर्म आणि शासन याच्यात संघर्ष झालाच तर देशाचे संविधान आणि कायदा याला सर्वोच्च मानून निवडा केला जाईल असे तत्व केमालाने स्वीकारले. पाच शतकाच्या धार्मिक शासनव्यवस्थेस डावलून सर्व नागिरकांना समान हक्क देणाऱ्या या तत्वाचा आणि त्यावर आधरित कायदे आणि शासनपद्धती केमालनी स्वीकारली. हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय होता. मुस्लिम जगतात याचे पडसाद उमटलेच आणि केमाल आणि त्याच्या सहकार्यांना विरोधही झाला परंतु या तत्वाच्या कट्टर अंमलबजावनीमुळे तुर्कस्तान आजही इतर मुस्लिम राष्ट्रांच्या तुलनेत आपले वेगळेपण टिकवून आहे.केमालवर आधुनिक फ्रेंच कायद्यांचा प्रभाव होताच आणि धर्मनिरपेक्षतेची संकल्पना
( l aïcité) आणि कायदे त्याने फ्रेंच संहितेतूनच घेतले होते. तुर्कस्तानच्या सरकारने पहिल्यांदा क़ुराअनचे भाषांतर टर्किश भाषेत केले आणि त्याचे वितरण मोठ्या प्रमाणावर जनतेत केले . याआधी कुराण फक्त अरबी भाषेतच असे आणि त्याचा मतितार्थ, शिकवण ही धर्मगुरू लोकांपर्यंत पोहचवत असत. या भाषांतराच्या प्रकल्पात कुराण प्रत्यक्ष लोकांना त्यांच्या भाषेतून वाचता येऊ लागले आणि या मधल्या धर्मपंडित गटावर असलेले त्यांचे धार्मिक अस्तित्व त्यामुळे संपुष्टात आले. यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे अरबी लिपी न वापरता लाटिन लिपीचा अंगीकार. मुस्लिम जगतात अरबी भाषेला देवभाषेचा दर्जा दिला जातो. त्यामुळे हा निर्णय मुस्लिम जगाशी फारकत घेण्याइतका महत्वपूर्ण होता. मुस्लिम जगात बऱ्याच देशात हा लीपिबाबतचा संघर्ष राष्ट्रवादी आणि इस्लामिक या गटात दिसून येतो. केमालचे शासन धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत आग्रही होतेच आणि त्यांची लोकमान्य शक्तीही मोठी होती. परंतु असे असूनही धर्मनिरपेक्षतेचे हे तत्व स्वीकारायला तुर्कस्तानला १४ वर्षाचा कालवधी लागला. १९२४ च्या घटनेप्रमाणे इस्लाम हा तुर्कस्तानचा राष्ट्रीय धर्म होता. १९२८ साली हे कलम वगळण्यात आले आणि १९३७ साली laïcité,/ धर्मनिरपेक्षतेच समावेश संविधानात करण्यात आला.

सुधारणावाद : सामाजिक, राजकीय आणि जेवणाच्या सर्व क्षेत्रात सुधारणा करून आधीनुकतेवर आधारित समाजाची रचना करणे, हा विचार सुधारणामागे होता. या सुधारणा विचार, सामाजिक संस्था, व्यवस्था आणि कायदे यात सातत्याने कराव्या लागतील, फक्त १९२० ते ३० च्या दरम्यानची उद्दिष्टे गाठून पूर्ण विकास होणार नाही अशी दृष्टी त्यामागे होती. सुधाराच्या प्रयात्नातले एक उदाहरण म्हणजे जुने पेहराव टाकून देणे - तुर्की टोप्या गेल्या, अंगरखे जाउन कोट आले, स्त्रियांच्या चादरी ( अंगभर ओढण्या ) गेल्या. व्यक्तीची स्वताबद्दलची प्रतिमा ही तिच्या पेहरावातून व्यक्त होते त्यामुळे जे जे जुने, मागासलेले त्याचा त्याग करून नित्य नवीन गोष्टींचा अंगीकार हाच लोकांना पुढे घेऊन जाइल असा हा विचार होता. याच विचाराने प्रेरित इराणच्या शहाने इराणमध्ये अशा सुधारणा त्याकाळी लागू केल्या होत्या. आपल्याकडे जसे फेटे, पगड्या सामाजिक आणि धार्मिक स्तर दर्शवण्याकरिता वापरल्या जायच्या, त्याच धर्तीवर तुर्की समाजात सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर आधारित पगड्या आणि वेशभूषा असे.

राष्ट्रवाद : तुर्कस्तानच्या निर्मितीत आणि त्यांनतर प्रत्येक व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून, सर्व सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थांमध्ये तुर्की राष्ट्रवाद अगदी ओतप्रोत भरलेला दिसतो. ओटोमान साम्राज्यात एकाच वेळी अनेक राष्ट्रीयता, वांशिक आणि भाषिक समूह एकत्र नांदताना दिसतात. तुर्क मात्र १९-२३ च्या स्वातंत्र्यलढ्यापासून एक वेगळी तुर्की अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. तुर्की इतिहास, भाषा, चालीरीती यावर नव्याने संशोधन केमालप्रणीत शासन सुरु करते. तुर्की स्वतःला भाषिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या वेगळा समाज म्हणून स्थापन करताना दिसतात. खरेतर नव्या आधुनिक समाजाची रचना करताना इतिहासात आपली पाळेमुळे शोधणे आणि त्यावर आपली अस्मिता फुलवणे हे विरोधाभासीच आहे. परंतु नित्झेने मांडलेल्या usable past या संकल्पनेत या वागण्याचे स्पष्टीकरण दिसते. बरेचसे समुदाय आणि देश इतिहासाचे सोयीस्कर असे संदर्भ घेऊन आपली दुसऱ्यांपासून वेगळी अशी अस्मिता निर्माण करायचा प्रयत्न करताना दिसतात. केमालच्या तुर्कस्तानातही राष्ट्रवाद जोपासताना वेगळ्या तुर्की अस्मितेची गरज होतीच आणि त्यानी ती तुर्की भाषा, इतिहास, संस्कृती यामध्ये शासनप्रणीत संशोधन करून निर्माण केली. अर्थातच घडलेल्या इतिहासापेक्षा हा शासंननिर्मित इतिहास वेगळा असतोच आनि तो त्या त्या राज्यकर्त्यांच्या धोरणांना साजेसा असा असतो. केमालने धार्मिक अस्मितेवर आधारित राज्याची निर्मिती न करता तुर्की अस्मितेवर आधारित राष्ट्रवादाची स्थापना तुर्कस्तानात केली.

शासनवाद : राज्याच्या अर्थव्यवस्थेत शासनाचा सहभाग हा फक्त नियंत्रण किंवा नियामानापुरता न ठेवता शासन उत्पादन प्रक्रियेत सक्रिय भाग घेते. सोविएत किंवा भारतात शासनाची उत्पादनप्रक्रियेत सक्रिय भूमिका नव्वदच्या दशकापर्यंत होती. १९२० पासून शासनाने विविध उद्योग्धन्द्यांची स्थापना केली आणि ते अनेक दशके चालवलेही. शासनव्यवस्थेची ही सक्रिय आर्थिक भूमिका म्हणजेच शासनवाद हा विसाव्या शतकात अनेक देशात लोकप्रिय धोरणापैकी एक होते. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत हे चित्र पालटलेले दिसते आणि सगळीकडेच उदारीकरणाची लाट येउन शासकीय उद्योग्धन्द्यांचे खाजगीकरण झालेले दिसते. टर्किश राजकारणातही हा मोठा बदल गेल्या २० वर्षात दिसून येतो आणि जास्तीत जास्त उद्योगांचे खाजगीकरण हे जुन्या केमालवादी व्यक्तींना न पटणारी अशीच गोष्ट आहे. उदा टर्किश विमानसेवेचे खाजगीकरण. टर्क हवाईल्लोरीची तुलना आपल्या एअर इंडिया च्या आधीच्या प्रतीमेशीच होऊ शकते. परंतु खाजगीकरणानंतर मात्र या हवाईसेवेत खूपच चांगला बदल घडून आलेला दिसतो. केमालच्या या विचारधारा आणि धोरणे यापासून टर्किश राजकारणाने बरीच फारकत गेल्या काही वर्षात घेतेली आहे. AKP पक्षास मिळालेल्या पाठींब्यामागे केमालच्या वरील तत्वांचे बरेचसे खंडन झालेले दिसते. परंतु अजूनही तुर्की राज्यघटना आणि समाजमनात या तत्वांना फार महत्वाचे स्थान आहे. केमालच्या कारकिर्दीत अनेक सफल बदल त्याने घडवून आणले त्यापैकी महत्वाचे म्हणजे :

१९२२ साली सल्तानातीचे उच्चाटन करून १९२३ साली प्रजासत्ताकाची स्थापना व त्यवर आधारित शासनव्यवस्था

१९२४ साली खिलाफतीचे आणि खलिफा पदाचे उच्चाटन आणि सर्व मुस्लिम जगाशी फारकत घेऊन धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना.

१९२३ साली लोसानचा करार करून तुर्कस्तानच्या सीमा बळकट केल्या, सव्हायच्या तहातील आणि त्याधीही ओटोमान साम्राज्याच्या कालावधीत घातलेल्या जाचक अटी झुगारून देऊन स्वबळा वर सीमेवरच्या राष्ट्रांबरोबर- रशिया, आर्मेनिया, ग्रीस - स्वतंत्र करार केले.

१९२४ मध्ये शरीयावर आधारित कायदेपद्धती बंद करून शासनप्रणीत समान कायदयावर आधारित न्यायालये सुरु केली आणि रुजवली.

१९२५ मध्ये धार्मिक पेहराव, पगड्या इ, तसेच धार्मिक फतवे आणि दरवेश संस्थाने ( lodge ) आणि पद्धती बंद केल्या. त्याचबरोबर इस्लामिक कॅलेंडर बंद करून ग्रेगरियन कॅलेंडर लागू केले.

१९२६ मध्ये इस्लामिक कायदा रद्द करून आधुनिक दंडविधान कायदा लागू केला. याचवर्षी समान नागरी कायदा, दिवाणी आणि फौजदारी असे नवीन कायदेही लागू केले. स्त्रियांना राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत यावा यासाठी अनेक योजना सुरु केल्या गेल्या.

१९२८ साली राष्ट्रीय शिक्षण कारिणी स्थापन करून समान शिक्षण पूर्तीसाठी शिक्षणव्यवस्था निर्माणाची प्रक्रिया सुरु केली. याच वर्षी टर्किश भाषा आणि लाटिन लिपी लागू केली

१९३१ साली राष्ट्रीय इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली गेली

१९३४ मध्ये कायदा करून नवीन कुटुंबाची नावे - आडनावे घेत येतील अशी व्यवस्था केली. आधीची नावे ही पुरोहितांनी दिलेली व धार्मिक स्थान दर्शवणारी अशी होती. हा कायदा करतानाचं तुर्की विधानसभेने ठराव करून केमालला अतातुर्क -- राष्ट्रपिता अशे पदवी बहाल केली.

१९३७ मध्ये बर्याच चर्चेअंती धर्मनिरपेक्ष राज्याची स्थापना हे तत्व संविधानात समावेश करून त्यानुसार राष्ट्र्निर्मितीचे प्रयोग सुरु केले.

केमालने लाटीन लिपीवर संस्करण करून नवीन टर्किश लिपी लागू केली . १९२९ पासून तुर्कस्तान मध्ये वापरण्यात येते. याआधी ऑटोमन साम्राज्यात अरेबिक आणि पर्शिअन लिपी वापरली जात असे. टर्किश टोळ्या वापरत असलेल्या ओर्खोन भाषेत Cyrillic, Arabic, Greek, Latin आणि काही आशियायी भाषांतील शब्द संमिश्रण दिसून येते. केमालचा लाटिन भाषेतील संस्करणाचा प्रयोग हा त्याच्या एकंदरीत अरबी जगाशी फारकत घेऊन पश्चिम युरोपीय देशांच्या अनुकरणाच्या धोरणाचाच भाग आहे.

तुर्कस्तानच्या धर्तीवर अनेक राष्ट्रांनी असे सुधारांचे प्रयोग केले होते परंतु या बहुतांशी राष्ट्रांत प्रतिक्रांती होऊन धार्मिक शक्ती सबळ झाल्याचे दिसते. तुर्कस्तानमध्ये हे बदल रुजले आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनेक दूरगामी बदल घडून आले. अगदी शून्यातून स्वबळावर या राष्ट्राची निर्मिती करण्यात केमाल आणि त्याच्या साथीदारांना यश ही मिळाले. आज तुर्कस्तान एक संपन्न आणि स्थिरता असलेला देश म्हणून ज्ञात आहे. परंतु केमालीझमच्या बऱ्याच मर्यादा गेल्या दशकांमध्ये पुढे आल्या आहेत. आर्थिक क्षेत्रातील शासनाचा अनुत्पादक सहभाग, राष्ट्रीयता रुजवनेहेतू सोयीस्कर इतिहासाची ( मिथकांची ) निर्मिती, राष्टवादी आणि populist धोरणे राबवताना केलेली एकजिनसी समाजाची कल्पना आणि त्यामुळे अस्तित्वात असलेल्या विविधतेचा मानसिक दृष्ट्या नकार, या महत्वाच्या मर्यादा केमालीझमचा प्रभाव आणि पकड तुर्कस्तानमध्ये कमी होण्यास कारणीभूत आहेत. परंतु सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लष्कराचा राजकारणातील प्रभाव आणि नियंत्रण. स्वातंत्र्यलढ्यातील लष्कराच्या निर्णायक भूमिकेमुळेच आजचा तुर्कस्तान भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या उदयास आला. त्यामुळे लष्कर आणि लष्करी अधिकारी यांना मानाचे स्थान तुर्की राजकारण आणि जनमानसात आहे. या लष्कराने केमालची धोरणे रुजवण्यात आणि अमलात आणण्यात मोलाची भूमिका निभावली. परंतु त्याच बरोबर केमालच्या विरुद्ध किंवा पर्यायी विचारांना तितक्याच ताकदीने चिरडलेही. त्यामुळे राजकीय लोकशाही रुजण्यात मर्यादा आल्या. १९६० साली लष्कराने त्यावेळच्या सरकारला पद्चुय्त करून सरकार ताब्यात घेतले तेव्हापासून येणाऱ्या सगळ्या सरकारांवर लष्कराची करडी नजर असते. १९७१ साली पुन्हा लष्कर सरकारचा ताबा घेते आणि पुढचे दोन वर्षे मार्शल लौ लागू करते. १९८० सालचे लश्करि बंडात बराच रक्तपात होऊन अनेक लोक पश्चिम युरोपात शरणार्थी म्हणून स्थलांतरित होतात. पुढचे तीन वर्षे लश्कराचे राज्य चालते. १९९७ आणि २००७ साली मात्र लष्करी अधिकारी शासनास त्यांच्या मागण्यांचे अधिपात्र देतात आणि त्यांना अभिप्रेत असलेले बदल जर घडवून आणले नाहीत तर सरकारचा ताबा घेण्याची तंबी देतात. लष्कराची ताकद आणि आतापर्यंतचा उठावाचा इतिहास बघून सरकार अर्थातच त्यांच्या मागण्या मान्य करते. लष्कराचा हा हस्तक्षेप हा तुर्कस्तान युरोप ( E U ) मध्ये सामील होण्यातला सर्वात मोठा अडसर आहे. परंतु गेल्या काही वर्षात हे चित्र पालटताना दिसते आहे. २०१० ते १२ दरम्यान तुर्कस्तानमध्ये २००३ मध्ये आयोजित उठावात लष्करी अधिकाऱ्यांच्या आततायी भूमिकेबाबत खटले भरले होते. हा उठाव काही प्रत्यक्षात झाला नाही पण गुप्तपणे त्याच्या तयारीत हे अत्याचार झाले होते. या खटल्यात अनेक लष्करी उच्च अधिकाऱ्यांना दोषी ठरवून शिक्षाही झाल्या. नागरी शक्तींच्या राजकारणातील वाढत्या प्रभावाचे हे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून गणला जात असला तरी युरोपिअन युनिअन मध्ये आजही तुर्कस्तानच्या समावेशाला घेऊन अनेक विवाद आहेत. पुढच्या भागात याच्या कारणांची चिकित्सा केली आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख ठीक.
पण केमालीझमच्या मर्यादा मात्र स्पष्ट झाल्या नाहीत.
<<या महत्वाच्या मर्यादा केमालीझमचा प्रभाव आणि पकड तुर्कस्तानमध्ये कमी होण्यास कारणीभूत आहेत>> हा निश्कर्ष तुमचा की इतर कोणाचा?