अगतिकता: सुखाची गुरुकिल्ली!

Submitted by जिज्ञासा on 18 April, 2014 - 23:31

नुकतेच एका सुंदर टेड टॉकचे मराठीत भाषांतर केले. मूळ टॉक इतका सुरेख आहे की भाषांतर करताना कुठेही अडखळायला झालं नाही आणि आपल्या मराठी भाषेची गोडी आणि समृद्धी दोन्ही जाणवली. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीचे/अभिव्यक्तीचे एक परिमाण हेही असते की ती कलाकृती इतरांना प्रेरणा देते. आणि ह्या भाषांतरादरम्यान असेच झाले. ह्या टॉकशी संबंधित जे अनेक नवे विचार/पैलू डोक्यात येत राहिले ते कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. ह्या टॉकचे निरुपण/रसग्रहणच म्हणा ना. अर्थात मूळ टॉक ऐकून हा लेख वाचला तर तो अधिक भावेल पण स्वतंत्रपणे लेख म्हणून लिहिण्याचादेखील प्रयत्न केला आहे.

आपल्या भाषणात ब्रेने ब्राऊन म्हणतात, अगतिकता ही सुखाची किल्ली आहे. तिला दाबून टाकू नका. आजच्या जगात अनेक गोष्टी आपल्याला अगतिक करत असतात. महागाई, भ्रष्टाचार, प्रदूषण, “लोकं काय म्हणतील?” ई. ई. आणि ही अगतिकता चांगली गोष्ट आहे असं कुणी सांगितलं तर मी त्याला वेड्यात काढलं असतं. पण थोडा विचार केला तर जाणवतं की हे खरं आहे. असं कसं?

माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे नातेसंबंध. ह्या संबंधांमुळेच आपल्या आयुष्यातल्या अनेक बऱ्या-वाईट घटना घडत असतात. हे संबंध जोडण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आवश्यक असते पारदर्शकता. आपण जसे आहोत तसे जगासमोर/ त्या व्यक्तीसमोर येणे. पण तसे होत नाही. कारण आपल्याला प्रत्येकाला कुठेतरी, कशाचीतरी लाज/शरम वाटत असते. आपण स्वतःच्या आदर्श व्यक्तिचित्रापेक्षा कुठेतरी कमी असतो. ही कमतरता आपल्याला अगतिक बनवते. जे वेदनादायी असू शकतं. मग आपण मुखवटे चढवू लागतो. संबंध जोडण्यासाठी/टिकवण्यासाठी आपल्यापेक्षा वेगळे वागू लागतो. आणि याचा एकच परिणाम होतो – आपण अधिक अगतिक होतो! मग हे दुष्टचक्र भेदायचे कसे? आणि कुठे? तर ते भेदायचे अगतिकतेपाशी. जी ह्या साऱ्याचे मूळ आहे. हे मान्य करून की अगतिक असणं ही एक चांगली गोष्ट आहे. हे जिवंतपणाचं लक्षण आहे. हे स्वतःशी प्रामाणिकपणे कबुल करायला हवं. मग आपल्याला आपण जसे आहोत तसे जगासमोर येण्याची लाज वाटणार नाही! एकदा का तुम्ही पारदर्शक झालात की गोष्टी सोप्या होऊ लागतील! The truth shall make you free!

आणि ह्या सच्चाईने जगणारी अनेक माणसं या जगात असतात. ब्रेने ब्राऊन त्यांना “सहृदयी” म्हणतात. ह्या लोकांनी अगतिकतेला सकारात्मक पद्धतीने स्वीकारलेलं असतं. ही लोकं इतरांवर प्रेम करू शकतात, इतरांशी संबंध जोडू शकतात कारण त्यांचं स्वतःवर स्वतःच्या अगतिकतेसकट, गुणदोषांसकट प्रेम असतं. इथे मला आठवला इंग्लिश-विन्ग्लीश! त्यात शेवटी शशी तिच्या फ्रेंच मित्राला सांगते, “जेव्हा तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडत नसता तेव्हा स्वतःबद्दलच्या सर्वच गोष्टी आवडेनाश्या होतात. Thank you, मला स्वतःवर प्रेम करायला शिकवण्यासाठी, thank you for making me feel good about myself!” आपण कोणीच परफेक्ट नसतोच पण जसे असतो तसे स्वतःला स्वीकारणे हीच सकारात्मक बदलाची पहिली पायरी आहे.

ब्रेने ब्राऊन म्हणतात, ज्या गोष्टी तुम्हाला अगतिक करतात त्या तुम्हाला सुंदर बनवतात. मला आठवले ते बाबा आमटे, अभय बंग, नसीमा हुरजूक, सिंधुताई सपकाळ! ही समाजकार्य करणारी माणसे सदैव अगतिक असतात – अनंत अडचणी, पैशाचा प्रश्न, एकूणच विपरीत परिस्थिती. पण जर तुम्ही त्यांना विचाराल तर ह्या अगतिक करणाऱ्या गोष्टीच त्यांना काम करण्याची प्रेरणा देत असतात. त्यांच्या देखण्या हातांतून “सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहोळे” घडवीत असतात! नुकतंच मी Harvard Business Review मधल्या एका लेखात वाचलं, त्यांनी जगातील सर्वोत्तम कंपन्यांमधल्या उच्चपदस्थ व्यक्तिंना विचारलं की तुम्हाला सर्वाधिक आनंद/समाधान कशातून मिळतं? उत्तर काय होतं माहित्येय? अवघड प्रश्न/समस्या सोडवण्यात! क्ष आकडी पगार किंवा य आकडी बोनसमध्ये नाही! हे वाचताक्षणीच पुन्हा क्लिक झालं! त्या अवघड समस्येतली अगतिकताच प्रेरणादायी ठरत असते! सामाजिक कार्यकर्त्यांना आणि बड्या कंपन्यांच्या उच्चपदस्थांनादेखील!

लहान मुलांकडे पाहिलं की अगतिकतेमधलं सुख कळतं! लहान असताना किती अगतिक असतो आपण! पण जसे मोठे होऊ लागतो तसे आपण अगतिकता नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंततो. ही अगतिकता नाहीशी करण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी certain, predictable करायला जातो! ते चुकीचे आहे! त्याने जगण्यातली मजाच निघून जाते! थोडीशी insecurity, अगतिकता आपल्याला सतत सुंदर, नवीन आणि अधिक उत्तम काहीतरी करण्याची प्रेरणा देते. माझाच अनुभव. PhDच्या दुसऱ्या वर्षात माझे सगळे प्रयोग फेल जात होते. मला फार निराश वाटायचं! मला failures ची सवय राहिली नव्हती. ही अगतिकता मी खूप वर्षांत अनुभवली नव्हती. आता PhDच्या पाचव्या वर्षात कळतंय की हे क्षेत्रच असं आहे. Research ही अगतिक होऊन करण्याची गोष्ट आहे. तुम्ही अज्ञाताच्या मागावर असता आणि अपयश हा त्याचा अविभाज्य भाग आहे. आणि त्या अगतिकतेतच संशोधनाचा आनंद दडलेला असतो! जो आता मला अनुभवता येतो!

साऱ्या भौतिक अडचणींपेक्षाही माणसाला सर्वात अगतिक बनवणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे मानवी नातेसंबंध. आपल्या ज्ञानाच्या आणि ताकदीच्या जोरावर आपण एकवेळ पृथ्वीची परिवलनाची दिशा बदलू शकू पण आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींनी कसे वागावे हे नियंत्रित करणे त्याहून कठीण आहे! खरे की नाही! मानवी नातेसंबंध आपल्यापैकी प्रत्येकाला अगतिक बनवत असतात. शहाणपण ती अगतिकता स्विकारण्यात आहे. माझी एक मैत्रीण आहे. १४-१५ वर्षांची आमची मैत्री! ह्या इतक्या वर्षांत तिचा मला मोजून १० वेळा देखील स्वतःहून फोन आला नसेल! दर वेळेला मीच हिला म्हणायचं, “बाई गं! कशी आहेस? भेटूया का?” एकदा मला वाटलं सारखं मीच का म्हणून असं म्हणायचं? आणि मी तसं म्हणणं सोडून दिलं! अर्थात पुढचे ७-८ महिने आम्ही आजिबात संपर्कात नव्हतो आणि माझं मन मला खात होतं! एक दिवस अचानक आमची भेट झाली! I was so happy to see her! मागचे ७-८ महिने एका क्षणात पुसले गेले. आणि माझ्या लक्षात आलं की आमची मैत्री टिकवण्याची अगतिकता मला फार आनंद देत होती! मी उगीचच माझा इगो मधे आणून त्या अगतिकतेमधलं सुख कमी करत होते. आणि आमची मैत्री या गोष्टीवर अवलंबून नव्हतीच! कारण आता गेली २ वर्षे आमची भेट, संवाद नाहीये पण मैत्री तशीच टिकून आहे! पण आपण ह्या गोष्टींचा फार इश्यू करतो. दर वेळी मीच का फोन करायचा? “मीच का?” असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर believe me तुम्ही अत्यंत भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात. तुम्ही सहृदयी आहात! आणि हे तुमचं बलस्थान आहे, कमकुवतपणा नव्हे!

ह्या टॉकने मला दिलेली सर्वात मोठी गोष्ट अशी की मी स्वतःला हा प्रश्न विचारला की कोणत्या गोष्टी मला अगतिक करतात? पारदर्शक करतात? आणि मला दोन शोध लागले – एक नवा, एक जूना. जूना शोध असा की आपल्या माणसांच्या संपर्कात असणं ही माझी गरज आहे. आणि मी ते करत राहिलं पाहिजे कारण त्या अगतिकतेतून मला आनंद मिळतो. आणि दुसरा शोध खरोखर “Aha moment” होता. तो म्हणजे माझं लिहिणं ही माझी अगतिकता आहे, गरज आहे! माझं लिखाण मला पारदर्शक बनवतं. आणि मला आनंद देतं. माझं लिखाण माझ्या मनाचा आरसा आहे. जेव्हा मला लिहावंसं वाटत नाही तेव्हा माझं मन उदास असतं. It is the truth that makes me free and happy! मला लिहिलं पाहिजे आणि लिहीत राहिलं पाहिजे! (भले कोणी वाचो न वाचो!)
आता हे एवढं वाचल्यावर टॉक तर तुम्ही बघालच पण हा ही विचार जरूर करा की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अगतिक करते, जी तुम्हाला अधिक पारदर्शक करेल? तिला दाबून टाकू नका. कदाचित तीच गोष्ट तुमच्या आनंदाचं निधान असेल!

TED talk चा दुवा: http://www.ted.com/talks/brene_brown_on_vulnerability

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हे एवढं वाचल्यावर टॉक तर तुम्ही बघालच पण हा ही विचार जरूर करा की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अगतिक करते, जी तुम्हाला अधिक पारदर्शक करेल? तिला दाबून टाकू नका. कदाचित तीच गोष्ट तुमच्या आनंदाचं निधान असेल!

किती चांगला विचार आहे मानवी संबंध टिकवुन धरायला किंवा आणखी चांगले बनवायला.

छान, सकारात्मक प्रेरणा देणारा लेख !
[ 'अगतिक व्हा', हें भाषांतर मात्र खटकतं; 'व्हल्नरेबल' जर मूळ शब्द असेल तर त्याचं ' अगतिक' हें भाषांतर तितकंसं योग्य वाटत नाही व 'अगतिक' मधून जो नकारात्मक संदेश जातो, तो तर ह्या लेखातील मूळ संदेशालाच बाधा आणतो, असं मला वाटतं]

[ 'अगतिक व्हा', हें भाषांतर मात्र खटकतं; 'व्हल्नरेबल' जर मूळ शब्द असेल तर त्याचं ' अगतिक' हें भाषांतर तितकंसं योग्य वाटत नाही व 'अगतिक' मधून जो नकारात्मक संदेश जातो, तो तर ह्या लेखातील मूळ संदेशालाच बाधा आणतो, असं मला वाटतं]+ १

मी भाषातज्ञ नाही पण मलाही असच वाटल खर.

भाऊ +१
'व्हल्नरेबल'चं 'अगतिक' हे भाषांतर पटलं नाही. (पण चपखल प्रतिशब्दही सुचला नाही हे मान्य करायला हवं. विचार करते आणि आठवला की/तर लिहितेच. Happy )

नितीनचंद्र, दिपाली, दवबिंदु, खूप धन्यवाद!

भाऊ, स्वाती_आंबोळे, खरंय! Vulnerability ला योग्य मराठी प्रतिशब्द काय या प्रश्नावर मी देखील बरेच दिवस अडले होते. बऱ्याच जणांना विचारलं पण मग शेवटी अगतिक हा शब्द वापरायचा ठरवला कारण vulnerable ला देखील एक नकारात्मक छटा आहे जी अगतिक ह्या शब्दात येते आणि संपूर्ण भाषणाचा उद्देश हा त्या शब्द/भावनेची नव्याने ओळख करून देणे हाच आहे तेव्हा अगतिकता हाच शब्द वापरायचे ठरवले! अर्थात अजून चपखल शब्द मिळाल्यास हवाच आहे! आणि हो! प्रतिसादासाठी धन्यवाद!

गूगल केलं तर आघातयोग्य, अतिसंवेदनशील, कमजोर हे शब्द बरे वाटले पण अगदी तीच शब्दछटा येत नाहीये. त्यातल्या त्यात मला आघातयोग्य आवडतोय.

जिज्ञासा,

लेख आवडला. आपण आपला या जगातला वेळ आनंदाने घालवायला या जगात आलो आहोत. तेव्हा ज्या कशात आपल्याला आनंद सापडेल ते सरळ करून टाकावे! Happy

जाताजाता : व्हल्नरेबल = हानीप्राप्य ... ?

आ.न.,
-गा.पै.

जिज्ञासा, तुमची अडचण रास्तच आहे कारण चपखल बसेल असा प्रतिशब्द मलाही डोकं खाजवूनही नाही सुचला. पण " वाटूं दे कीं जरा असुरक्षित !" हें भाषांतर/ रुपांतर ' बी व्हल्नरेबल ' या शिर्षकाच्या कांहींसं जवळचं होईल असं वाटतं.
चूकभूल देणे घेणे ! Wink

मवा, अतिसंवेदनशील हा शब्द देखिल आवडला होता. आघातयोग्य = vulnerable हे फिट बसतंय पण आघातयोग्यता = vulnerability हे थोडं ओढूनताणून बसवल्यासारखं वाटतंय!

गा.पै., धन्यवाद! हानिप्राप्य चांगला आहे. vulnerable = prone to something ह्या अर्थाच्या जवळ जातोय. पण पुन्हा हानीप्राप्यता हे noun म्हणून किचकट वाटतंय.

भाऊ, तुम्ही म्हणता ते पटतंय. म्हणजे अगतिक व्हा हे शीर्षक म्हणून इतकं छान नाहीये! सायो म्हणतात तसं हतबल टाईप वाटतं! अगतिकता: सुखाची गुरुकिल्ली कसं वाटेल? मी शीर्षक बदलण्याचा प्रयत्न करते! मूळ talk चं शीर्षक खूप सकारात्मक आहे!

जिज्ञासा,

vulnerable = prone to exploitation या अर्थी शोषणेय असा वापरता येईल काय? या अर्थाच्या जवळपास जाणारा शोचनीय (= शोक करण्याजोगा) असा एक शब्द प्रचलित आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुरेख लेख जिज्ञासा Happy
<,मला आठवले ते बाबा आमटे, अभय बंग, नसीमा हुरजूक, सिंधुताई सपकाळ! ही समाजकार्य करणारी माणसे सदैव अगतिक असतात – अनंत अडचणी, पैशाचा प्रश्न, एकूणच विपरीत परिस्थिती. पण जर तुम्ही त्यांना विचाराल तर ह्या अगतिक करणाऱ्या गोष्टीच त्यांना काम करण्याची प्रेरणा देत असतात>> +१

सुंदर लेख...
फक्त कंपन्यांमधल्या उच्चपदस्थ व्यक्तिंच्या मतांबद्दल जेवढं पाहिलंय आणि ऐकलंय त्यावरून एवढंच म्हणेन, त्यांच्या बोलण्यावर आंधळेपणे विश्वास ठेवू नये.
Those should be taken with a pinch of salt.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत…
लेख अर्थातच उत्तम आणि खूप आवडला Happy

चपखल प्रतिशब्दही
तसे एका भाषेतील एखादा शब्द जो अर्थ व्यक्त करतो, तोच अर्थ दुसर्‍या भाषेतहि एकाच शब्दात व्यक्त करता येईल असे नसावे. विशेषतः इंग्रजी व मराठी सारख्या भाषांमधे.
जरी कुणि म्हंटले की इंग्रजी भाषेतील काही शब्द मूळ संस्कृत मधून आले आहेत नि मराठीचे तर अनेक, तरी पण इंग्रजीत अनेक शब्दांचे मूळ संस्कृत नाही. तेंव्हा सर्वच शब्दांना एका शब्दात प्रतिशब्द देणे कठीणच.

आता कुणि प्रथितयश लेखकाने असा शब्द तयार करून अनेकदा वापरला, नि लोकांनी तो स्वीकारला तर तसे करता येईल. पण मराठी वाचकांची संख्या किती किंवा किती लोकांना याची गरज वाटते हाहि प्रश्न आहे.
त्यातून आजकालचे पुण्या मुंबईचे मराठी बोलणे ऐकल्यावर कळतच नाही ही नक्की कुठली भाषा आहे. त्यात व्हल्नरेबल शब्दच सोपा होईल वापरायला.

तेंव्हा सध्या एक जरी नाही तरी दोन तीन शब्दात vulnerable चा अर्थ लिहीलात तरी चालेल, बरे होईल.

माझ्या पुरते बोलायचे तर vulnerable म्हंटले तरी मला कळेल,

जिज्ञासा....

माफ करा, पण काहीसा उशीराच मी हा लेख पाहिला, वाचला....अन् खूप प्रभावित झालो यातील विचार मांडणीवर. "सुखाची गुरुकिल्ली" अशी खरोखरी कुठे असेल का ? असलीच तर ती मिळविण्यासाठी भौतिक संबंध उपयोगी पडतील की मानसिक जडणघडण त्यासाठी योग्य असावी ? पैसा तर अंबानींनाही हवा असतो तर दुसरीकडे देवळाबाहेर बसलेल्या एखाद्या अपंगालाही....म्हणजेच दोघांच्याही दृष्टीने सुखाची गुरुकिल्लीची व्याख्या एकच असू शकते का ? हजार नोकर हाताखाली असलेला उद्योगसम्राट सुखी मानावा तर नवीन दिवसासाठी त्याचे सारे कामगार सहा वाजता उठत असतील तर याला पाच वाजता उठावे लागते....कारण ? कारण तेच की त्याची सुखाची गुरुकिल्ली त्याला स्वस्थपणे झोपू देत नसते. म्हणजेच कोणत्याही सुखाची व्याख्या ही सापेक्ष असते. सुख म्हणजे काय व त्याची व्याखा करताना आपण त्यात स्वतःला सामावून घेऊ शकू काय ? या प्रश्नाचे उत्तर प्रथम शोधणे महत्त्वाचे ठरते. उथळ सुखासाठी रजनीशाच्या आश्रमात जाऊन तीन महिने काढलेला एक मित्र मला माहीत आहे (होता म्हणतो आता)....काय मिळविले तिथे त्याने सुख सुख म्हणजे ? उगाच रजनिशी कपडे घालून दाढी वाढवून चिपळ्या घेत "हरे रामा हरे कृष्णा" चा गजर परदेशी कातडीबरोबर करून तीन महिन्यानंतर आला कोल्हापूरात....आणि एक आठवडा असा वागला की जणू काही त्या अदृष्य शक्तीचा हा आता प्रेषितच झाला. काही दिवस गेल्यावर संपला याचा सारा ज्वर आणि मग मिसळपाव, मटणमासे सुरू झाले नित्यनेमाने. बापाने आणि थोरल्या भावाने काही दिवस नखरे सहन केले आणि मग पुढच्याच महिन्यात जुंपला त्याला कारखान्याच्या टर्नरशीपला..... भौतिक सुखासाठी असे राबायलाही हवे हे समजल्यावर उतरली त्याची झिंग.

तुम्ही लिहिता...."...मानवी नातेसंबंध आपल्यापैकी प्रत्येकाला अगतिक बनवत असतात...." - जरूर बनवतात तसे. पण म्हणून आपणही कितपत त्याबाबतीत अगतिक व्हावे याचीही सीमारेषा आखणे गरजेचे असते. जावई सुधाकर झाला आहे म्हणून आपल्या सिंधूने सदैव त्याची आरतीच केली पाहिजे असे निदान आजच्या वैज्ञानिक युगात तरी कुण्या आईबापानी मानू नये. अशा व्यक्तीच्याबाबतीत त्या मुलीने किती अगतिक व्हावे शिवाय का व्हावे ? हाही प्रश्न असतोच.

विषयाची व्याप्ती फार मोठी आहे.

Vulnerability = अगतिक असे म्हटले गेले आहे....वरील काही प्रतिसादकांनी अन्य पर्यायी शब्द सुचविले आहे. दुर्गा भागवत यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध झालेल्या शासन व्यवहार कोशात "दुबळेपणा" असा अर्थ सुचविला आहे. तुमचे "...मानवी नातेसंबंध आपल्यापैकी प्रत्येकाला अगतिक बनवत असतात..." हेच वाक्य "...मानवी नातेसंबंध आपल्यापैकी प्रत्येकाला दुबळे बनवत असते...." असे केले तर तेही योग्य दिसेल असे वाटते.

लेख आवडला.
इथे vulnerable म्हणजे दुबळेपणा नव्हे तर भावनिक पातळीवरचा मोकळेपणा. अहंकार बाजूला ठेवून केलेली एक प्रकारची स्विकृती. अशा स्विकृतीत एक प्रकारचे धैर्य असते. अपयश मिळेल का? नातेसंबंधात दुखावले जाऊ का? या भितीने बरेचदा आपण पॉसिबिलीटीज नाकारतो.

अशोक.
तुमचा लेख छान आहे.
सुख म्हणजे काय, हे प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. पुनः मन चंचल! म्हणजे आज ज्यापासून सुख मिळाले त्यापासून उद्या पण मिळेल हेहि नक्की नाही.

जसे बँकेत सेफ डिपॉझिट व्हॉल्ट मधे दार उघडायला दोन किल्ल्या लागतात तसे सुखाचे दार उघडायला बर्‍याच किल्ल्या लागतात. शिवाय खरे, अंतिम सुख मिळवायला अनेक दारे उघडावी लागतात. एकच गुरुकिल्ली नसते, त्यामुळे इतर किल्ल्या टाकून देता येत नाहीत. म्हणून अगतिकता म्हणा, दुबळेपणा म्हणा या किल्लीचाहि उपयोग असतो.

आ़जकाल मला वाटते की सर्वांची एक महत्वाची किल्ली मन आहे. मन ठरवणार सुखी का दु:खी. मग ज्यामुळे सुखी वाटेल ते तसे व्हायला आणखीन एक दोन किल्ल्या लागतील. नि त्या मिळेस्तवर पुनः सुखाची कल्पना बदलली की? आयुष्यभर नुसते सुख कसे मिळेल याची धडपड करत जगायचे?!

तुकाराम शहाणे - ते म्हणाले जन्ममरणाच्या फेर्‍यात (नि त्याबरोबर येणार्‍या दु:ख, वेदना) खुशाल घाल, आम्हाला तुझी सतत भक्ति करण्यात आनंद आहे. तसे प्रत्येकाने सुखाच्या मार्गावर जेंव्हा एखादे दार उघडेल, त्यात आनंद मानला तर काही वाईट नाही.

झक्की,

>> आ़जकाल मला वाटते की सर्वांची एक महत्वाची किल्ली मन आहे.

१००% सहमत. तुकोबाराया म्हणून गेलेत :

॥ मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण ।
॥ मोक्ष अथवा बंधन । सुख समाधन इच्छा ते ॥

आजकाल तुम्हाला जे वाटू लागले आहे, ते खरंतर चिरंतन सत्य आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

सशल, सुजा, बोबडे बोल, morap, मनीमोहोर, रान्चो, मी देवी, अकु, सगळ्यांचे मनापासून आभार!

अशोक मामा, तुमची प्रतिक्रिया आवडली! पहिल्यांदा जेव्हा मी हे भाषण ऐकले तेव्हा मलाही असेच काहीसे वाटले होते! पण मी जेव्हा भाषांतराचे काम करायला सुरुवात केली तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकल्यावर मला त्या भाषणातून नक्की काय म्हणायचे आहे ते समजू लागले. तुम्ही मूळ talk नक्की ऐका! कदाचित अगतिकता ह्या नकारात्मक छटेच्या शब्दामुळे मूळ भाषणातला आशय नीट पोहोचत नाहीये!

स्वाती२, तुम्ही अचूक अर्थ पकडला आहे!

झक्की, गा.पै. खरंय मनाची ताकद फार मोठी असते! विनोबा भावे यांचं एक फार सुरेख वाक्य आहे, " जगातली सारी दुःखे दूर झाली की मन प्रसन्न होईल हा एक भ्रम आहे. उलट मन प्रसन्न असले की जगातील सारी दुःखे आपोआप दूर होऊ लागतील!"

" जगातली सारी दुःखे दूर झाली की मन प्रसन्न होईल हा एक भ्रम आहे. उलट मन प्रसन्न असले की जगातील सारी दुःखे आपोआप दूर होऊ लागतील!"
लाखमोलाचे वाक्य,

दु:खे जगात नसतातच, फक्त मनात असतात!

लाखमोलाचे, माफ करा. आजकालच्या अर्थव्यवस्थेत लाख रु. भिकार्‍याला सुद्धा कमी वाटतात, तर कोटी कोटी मोलाचे, किंवा खरे तर अमूल्य महत्वाचे वाक्य.

Vulnerability - संवेदनशीलता,(हळवेपण - हाही शब्द होउ शकतो पण यात भावनिक दुबळेपणाची छटा आहे).
या लेखातल्या Vulnerability शब्दाचे स्वाती२ यांचे interpretation अचूक आहे. दुसर्‍याच्या भावनांबद्दल विचार करणारा मनुष्य दुबळा असेलच असे नाही.

मला वाटतं प्रथम "अगतिकता" शब्दामुळे व आतां " सुखाची गुरूकिल्ली " शब्द वापरल्याने जरा गडबड होत असावी. 'व्हल्नरेबिलिटी' ही देखील सकारात्मक उर्जा आहे / होऊं शकते हा इथला मुख्य संदेश असावा.

Pages