ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव

Submitted by मामी on 4 April, 2014 - 14:14

जरा कल्पना करा...

एका दीडशे वर्ष जुन्या पण अजूनही ती शान तशीच राखलेल्या ब्रिटिशकालीन बंगल्याच्या व्हरांड्यात बसून तुम्ही साग्रसंगीत चहा पित आहात. खानसाम्यानं तुमच्यासमोर आणून ठेवलीय टीकोजीनं झाकलेली किटली, नाजूक नक्षीदार कपबशा, पेस्ट्रीज आणि गरम स्नॅक्स...

किंवा

व्हरांड्यासमोरच्या काळजीपूर्वक राखलेल्या बागेत सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून तुम्ही गरमागरम आलूपराठे खात आहात...

किंवा

मस्त गार वार्‍यावर डुलणार्‍या पपनसांच्या झाडाखाली तुमचं दुपारचं जेवण सुरू आहे. फाईव्ह कोर्स लंच! ते ही तुम्हाला आदबीनं आणून सर्व्ह केलं जातंय. त्यातल्या सॅलडमध्ये आजूबाजूच्या बागेतली हर्ब्ज आणि नॅस्टरशियमची पिवळी, केशरी नाजूक फुलं त्यात सजली आहेत.

किंवा

खळखळ वाहणार्‍या नदीच्या शेजारी झाडाखाली टेबल-खुर्च्या मांडून तुमच्या फर्माईशीनुसार बनवलेल्या जेवणाचा तुम्ही स्वाद घेत आहात.

किंवा

समोर पसरलेली दरी आणि त्यातील उतरंडीवरील चहाचे मळे बघताना भर दुपारी तुमचं मन
बर्फ़ीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें
आँखों में भीगे-भीगे लम्हें लिये हुए
च्या जादुई शब्दांवर आणि अगदी तश्श्याच प्रत्यक्षात समोर दिसणार्‍या जादुई वादीमध्ये तरंगत राहिलंय.

किंवा

संध्याकाळी सूर्य मावळताना, त्या दरीतल्या वस्त्यांमधले आवाज, खमंग वास, दाटून येत असलेलं धुकं आणि संध्याकाळची हुरहुर मनात आत आत साठवत तुम्ही एका वेगळ्या मनस्वी जगात खोल, अगदी आतवर जात राहिला आहात....

आणि हे सगळं होत आहे समोरच दिसणार्‍या कांचनजंगाच्या साक्षीनं!!!

************************************************************************************************************

नाही, नाही, मी काही कादंबरी लिहीत नाहीये. याची देही याची डोळा घेतलेले अनुभव आहेत हे - दार्जिलिंगच्या ग्लेनबर्न टी-इस्टेटवर. एक आगळा वेगळा luxurious colonial experience!

दार्जिलिंग मध्ये अनेक प्रसिध्द टी-इस्टेट्स आहेत. त्यातल्या काही टी-इस्टेट्स वर आपल्याला जाऊन राहता येते . यापैकी ग्लेनबर्न टी-इस्टेटचे नाव आम्ही आमच्या काही मित्रमैत्रिणींकडून ऐकले होते. त्यातून आमचे भटकंती बायबल - www.tripadvisor.com - वरही या टी-इस्टेटचे छान रिव्हूज वाचून आम्ही हीच निवडली. २०१३च्या दिवाळीत दार्जिलिंग-सिक्कीम भेटीत दोन रात्री इथे राहून आलो. त्या तीन दिवसांत नितांत सुंदर, अविस्मरणीय आठवणी गाठोड्यात बांधून घेऊन आलो. गाठोडं अगदी जपून ठेवलंय मी मनाच्या एका नक्षीदार कप्प्यात!

...इतर कोणत्याही टी-इ प्रमाणेच ग्लेनबर्न ही देखिल एक जगड्व्याळ परिसंस्था आहे. १८५९ मध्ये चहाच्या एका स्कॉटिश कंपनीने ग्लेनबर्न टी-इस्टेट सुरू केली. नंतर अनेक वर्षांनी चहाच्या मळ्यांच्या धंद्यात असणार्‍या कलकत्त्याच्या एका भारतीय कुटुंबाने ही इस्टेट विकत घेतली. आज याच कुटुंबातील तिसरी आणि चौथी पिढी या चहामळ्याचा कारभार बघते.

२००२ मध्ये या घराण्यातील नविन सुनेने ही इस्टेट पहिल्यांदा पाहिली आणि तिच्या कल्पने नुसार जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्याचे - बडा बंगला ( The Burra Bungalow) - पुनरुज्जीवन करण्यात आले आणि टी-इस्टेटवरील एक बुटीक हॉटेल जन्माला आले. टेकडीच्या शिखरावर वसलेल्या या देखण्या बंगल्याचे वर्णन कितीही केले तरी त्याची पूर्ण कल्पना येणं शक्य नाही. हे फोटोच थोडीफार ओळख करून देतील...

दर्शनी भाग

व्हरांडा

व्हरांड्यातील बैठक

पुढे २००८ मध्ये जरा खालच्या बाजूला अजून एक बंगला बांधण्यात आला - वॉटर लिली. हा नविन बंगला इतक्या चतुराईनं बांधला आहे की तोही जुन्या काळातला वाटावा.

बरा बंगलो मधून वॉटर लिली आणि दरी

मूळ बंगल्यातील ५ आणि नविन बंगल्यातील ४ अशा नऊ खोल्या आता उपलब्ध आहेत. प्रत्येक खोली अत्यंत सुंदर आणि वेगळी थीम, रंगसंगती घेऊन सजवली आहे. 'गुड अर्थ' नावाचा एक महागड्या पण अत्यंत देखण्या गृहसजावटीच्या वस्तू आणि अपहोल्स्ट्री आणि इतर तत्सम वस्तूंचा एक ब्रँड आहे. त्याचं फर्निचर, पडदे, गादीवरील चादरी, उश्यांची कव्हर्स, फ्रेम्स वगैरे निवडून अत्यंत रसिकतेने नटवलेल्या खोल्या बघून प्रेमात पडायला नाही झालं तर नवल.

किचनमध्ये किती किती त्या कितील्या!

आमची रुम ही बरा बंगलो मधील फायरप्लेस असलेल्या दोन रुम्सपैकी एक होती. लेकीच्या आग्रहाखातर आम्ही दोन्ही रात्री खोली गरम करण्यासाठी शेकोटी पेटवून घेतलीच. एका बाजूला कॉमन व्हरांडा आणि दुसर्‍या बाजूला एक छोटीशी पण सुबक, गोलाकार मॉर्निंगरुम. तिच्यातून बाहेर पडून बागेत जाता येईल अशी सोय. खोल्यांना कपाटांना कुलुपं वगैरे नाहीत. सगळं तुमचंच मग कुलुपांची काय गरज!

फायरप्लेस आणि अँटिक कपाट

रुममध्ये साग्रसंगित चहा

मॉर्निंग रुम

पलिकडे, सकाळच्या उन्हानं भरून वाहिलेली
<

व्हरांड्यातील आमच्या खोलीसमोरची बैठक

दारातून मांजरं येताहेत आणि जाताहेत. हक्कानं त्यांना हवं तिथे डुलकी घेताहेत. त्यांचंही आहेच ना हे सगळं!

आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन तरी काय करावे. टिव्हीला मज्जाव असल्याने एक वेगळीच नीरव शांतता आणि दूरवरून येणारे पक्ष्यांचे, माणसांचे आवाज, हिरवेगार चहामळे, भटकण्यासाठी छोट्या छोट्या पायवाटा. इस्टेटीतून वाहणार्‍या दोन नद्या - रंगीत नदी आणि रंग्डंग नदी. स्वर्गसुखच केवळ.

पायी भटकंती करताना घेतलेले फोटो

झेंडूची फुले आणि संत्र्याची झाडे

आणि या सगळ्यापेक्षाही आपला अनुभव दशांगुळे वर नेऊन ठेवणारं दृश्य म्हणजे या इस्टेटीला लाभलेली कांचनजंगाची पार्श्वभूमी. जाता येता सतत समोर दिसणारा, ढ्गांमागे लपून आपल्याशी लपाछपी खेळणारा, दिवसाभरात विविध विभ्रम दाखवणारा कांचनजंगा पर्वत किती बघू आणि किती नको असं झालं.

सुर्योदयामध्ये कांचनजंगा पाहण्यासाठी पहाटेपासून फिल्डिंग लावून बसलो

पहिल्या किरणांचा स्पर्श

सकाळच्या उन्हात न्हाऊन निघालेला कांचनजंगा आणि दरीतलं धुकं

भर दुपारी

संध्याकाळी

जश्या मालकांच्या अनेक पिढ्या इथे आहेत तश्याच मळ्यात काम करणार्‍या कुटुंबांच्याही अनेक पिढ्या इथे नांदल्या आहेत. इस्टेटीच्या हजारएक एकर्सच्या जागेत अनेक छोट्या छोट्या वस्त्या आहेत, शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, मैदानं आहेत आणि मैदानात अत्यंत आवडीनं फुटबॉल खेळणारी उत्साही मुलं आहेत. या आडजागी त्यांना वाहतुकीचे साधन म्हणजे इस्टेटीच्या गाड्या, अथवा स्वतःच्या मोटरसायकली अथवा दिवसातून एकदा येणारी प्रायव्हेट बस.

ग्लेनबर्नची परंपरा ब्रिटीश आहे आणि ती इथे कसोशीनं जपली आहे. भारतात आलेले ब्रिटीश कशा पद्धतीनं रहात असत याची एक झलकच आपल्याला इथे दिसते. फर्निचर, खानसाम्यांची आदब, आत्यंतिक स्वच्छता, एकत्र जेवण, जेवणा आधीची ड्रिंक्स सगळंच जपलंय इथं. त्यातून इथे येणार्‍या पर्यटकांतही इंग्लंड आणि युरोपमधून येणारे जास्तच. आम्ही होतो तेव्हा तर आम्हीच फक्त भारतीय. केअरटेकरही ब्रिटिश. तिची हेल्पर - लाराही ब्रिटीश. एक अमेरीकन भारतातल्या टी-इस्टेटवर रिसर्च करत होता. एक ब्रिटिश डॉक्टर दरवर्षी ग्लेनबर्नला येऊन महिना-दोन महिने राहून मळ्यातल्या कामगारांकरता असलेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा देते. ती ही होती. एक जगभर हिंडणारं ब्रिटिश जोडपं होतं. ते भारताच्या इतक्या प्रेमात की अनेकदा भारताला भेट देत राहतात. ग्लेनबर्नलाही त्यांची ती तिसरी का काय भेट होती. एक जर्मन कुटुंब होतं. रात्रीच्या जेवणाआधी कॉकटेल लाउंजमध्ये आणि मग जेवताना टेबलाभोवती बसून प्रचंड बडबड करायचे सगळे जण. जगाच्या कोणकोणत्या कोपर्‍यातून, वेगवेगळे संदर्भ धरून काळाच्या एका तुकड्यापुरते एका सुंदर जागी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. मात्र त्या जेमतेम १५-१६ जणांच्या घोळक्यात दोन लारा आणि दोन जेन्या होत्या. गंमतच!

डायनिंग रुम

कॉकटेल लाउंज

कॉकटेल लाउंज संध्याकाळी

एकदा या टीइस्टेटचे बुकिंग केले की ते सर्वतोपरी आपली काळजी घेतात. विमानतळावरून नेण्या-पोहोचवण्याकरता त्यांची गाडी येते. आपल्या दिमतीला एक टीमच हजर असते. आपल्याला टी-इस्टेटची सैर करवून आणण्यासाठी एक स्थानिक बरोबर असतो. पायी अथवा त्यांच्या गाडीतून ही सैर आपल्याला करता येते. टी-इस्टेटवरच त्यांची चहाची फॅक्टरीही आहे. ती पाहून त्याबरोबर टी टेस्टिंगचा अनुभव घेता येतो. तिथल्या छोट्या छोट्या वस्ती मध्ये पायी भटकून येता येतं.

चहाची फुलं

झूम आउट - चहाचं झाड

अजून झूम आउट - चहाचा मळा

पण हायलाईट म्हणजे नदीकाठची पिकनिक. इस्टेटीच्या एका सीमेवर रंग्डंग नदी वाहते. त्या नदीच्या ज्या काठापर्यंत या इस्टेटीची हद्द आहे, तिथे एक छोटेखानी कॅम्प हाऊस बांधले आहे. चालत अथवा गाडीने तेथपर्यंत जाऊन, तिथे नदीकाठी लंच घेऊन, हवे असतील काही खेळ खेळून संध्याकाळी परत येता येते.

रंग्डंग नदी आणि नदीकाठची पिकनिक

कॅम्प-हाऊस

नदीवर जाण्याचा रस्ता मात्र मुद्दाम खडबडीत ठेवला आहे. त्यामुळे रोड- राफ्टिंग लेवल ५ चा आनंद मात्र आपसुक मिळतो. Happy

ग्लेनबर्नवरून बागडोगराला परत जाताना कांचनजंगाच्या पार्श्वभूमीवर दिसणारे दार्जिलिंग

उजवीकडल्या पलिकडल्या डोंगरावर दिसते ती मकाईबारी टी-इस्टेट असं आमच्या गाडीवानानं सांगितलं.

भारी बडबड्या होता तो. गाडी चालवता चालवता आमची चांगलीच करमणूक केली त्यानं. आपल्या खास दार्जिलिंग हिंदी उच्चारांत त्यानं दार्जिलिंगला येणार्‍या पर्यट्कांची निरीक्षणं नोंदवली ..

"शाब, बोंगाली बाबू आते हे तो सब्बेरे सब्बेरे उठके सनराईज देखनेके लिये जाते है तो पूरा ढकके जाते है. जो जो मिलेगा वो शब पेहन लेगा. स्वेटर, कोट, मोजे, हातमे ग्लोव, कानटोपी शब शब पेहनेगा. उपरसे रूम का चादर भी लपेट के ले जायेगा. और फिर भी उदर जाके ' ठंडी हे, ठंडी हे ' बोलता रहेगा...

दुसरा वो मद्रासी लोग आता है. वो सीधा लुंगी पेहनके सनराईज देखने को जायेगा. मगर उदर जाके फिर गाडी से बाहर नही जायेगा. गाडी मे बैठके बार बार कॉफी पियेगा .... "

लै हसवलं गड्यानं.

*************************************************************************************************************

दार्जिलिंग ते सिक्कीमच्या रस्त्यावर एक व्ह्यु-पॉइंट आहे. तेथून तीस्ता आणि रंगित नदीचा अत्यंत विलोभनीय आणि नेत्रदिपक संगम दिसतो.

समोरून येणारी फिक्या हिरव्या रंगाची ती तीस्ता नदी. आणि डावीकडून येऊन तिला मिळणारी गडद हिरव्या रंगाची ती रंगित नदी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हा सगळ्यांना जागा आणि फोटो आवडले हे आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद, मंडळी.

आम्ही गेलो तो सिझनही छान होता. मुख्य थंडीची सुरुवात होण्याआधी पण थंडीची चुणुक दिसेल इतपत.

सायो, हो, पावसाळा टाळाच.

@ अगो, सुजा, स्वप्नांची राणी
मांजरी आपल्या जवळ येत नाहीत. दरवाजा उघडा असेल तर पटकन एका दारानं येऊन दुसर्‍या दारानं जात होत्या. दरवाजे बंद ठेवले तर काही त्रास होणार नाही. मला तरी खूप मांजरी नाही दिसल्या. बेडवर चढून बसल्या नाहीत. एकतर आमच्या 'Planter's Suite' मधला four poster bed चांगलाच उंच होता. तो चढण्याकरता एक छोटंस स्टूल लागेल असा. त्यामुळे मांजरी वर चढल्या नसणार. Happy

पण मायबोलीवर हे एवढ्या उशीरा का बरं आले? >>> मंजूडी, केव्हाचं लिहायचंच होतं. मनासारखी भट्टी जमत नव्हती.

अमामी, हो महाग आहे खरं हे प्रकरण!

Rate Rs. 26500 per night
plus taxes,
plus travel - day trip to darjeeling
plus air fare of mumbai to kolkata and bagdogra and return,
taxi to and from airport.
transport from airport to estate and return to airport.
One will stay for at least a day in kolkatta on the way return. and shop around - sarees food and paintings, artifacts etc
practically getting in touch with Burfee. bying masks and such silly stuff also.
We also end up ordering lot of room service on holidays and taking stuff from the fridge in the room. internet connection also costs extra. If you add other destinations nearby, cost goes up again.
comparatively, Goa Cidade de goa room cost for 3 nights is around 28500.00 plus other costs and air fare included comes to around 50 k in off season.

But I have read a lot on the problems of tea estate labour class and would like to experience that life from the memsaab point of view at least once. # YOLO type expense hai ye.

plus travel - day trip to darjeeling
>>> अमामी, हे बहुतेक फ्री ऑफ कॉस्ट ग्लेनबर्ग तर्फे आहे. आम्ही आधी दार्जिलिंगमध्ये राहून दार्जिलिंग बघितलं. असं केल्यास जास्त उत्तम. ग्लेनबर्न मध्ये राहून फक्त तेच एंजॉय करावं.

transport from airport to estate and return to airport. >>> याची सोय ग्लेनबर्नतर्फे होते. आम्हाला तर त्यांनी गँगटोकवरून पिकअप केलं.

We also end up ordering lot of room service on holidays and taking stuff from the fridge in the room. internet connection also costs extra. If you add other destinations nearby, cost goes up again. >>> फ्रिज नाही, जे काही हवं ते ऑर्डर दिली की करून देतात. सकाळी टिपिकल, युरोपियन ब्रेकफास्ट (आम्ही याला काट देऊन आमचा वेगळा नाश्ता बनवून घेतला.) दुपारी ब्रिटिश लंच (सूप, सॅलड, किश इ.) हे आम्ही एक दिवस जेवलो. मग दुसर्‍या दिवशी नदीकाठी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. दुपारच्या चहाबरोबर स्नॅक्स. रात्री भारतीय आणि युरोपियन पद्धतीचं एकत्र sit-down डिनर. ऑल इन्ल्युसिव.

परतीच्या प्रवासाकरता पुन्हा सँडविच, केक्स, पाणी वगैरे भरभरून आपल्या गाडीत ठेवतात.

हे नेहमीसारखं हॉटेल अथवा रिझॉर्ट नाही. कोणाकडे पाहुणे म्हणून राहिला जाणे + एक्झॉटिक लोकेशनवरचे लक्झुरीयस हॉटेल असं क्रॉसब्रीड आहे हे. म्हणूनच त्याच्याकडे एक 'अनुभव' म्हणून पहायचं.

मस्त वाटलं वाचुन.. मलाही आवडेल हा अनुभव घ्यायला. सेवेंटीजच्या चित्रपटात असे बंगले पाहिल्याचे आठवतेय.

टॅरिफ वाचले त्यांचे पण त्या बदल्यात जे देताहेत तेही तेवढेच दर्जेदार आहे हा विश्वास मामीच्या रिव्युने दिला. मला जायचे तर आहेच त्या भागात एकदा. तेव्हा नक्कीच इथे भेट देईन.

दार्जिलिंगला तेथिल प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती आणि तेव्हाच तो झू खूप आवडला होता. एखादा युरपमधील झू असावा इतका सुरेख आणि स्वच्छ. अनेक प्रकारचे प्राणी अन पक्षी व्यवस्थित सांभाळलेले दिसत होते. सर्व प्राणी निरोगी दिसत होते आणि प्रत्येकासाठी योग्य असे लँडस्केपिंग केलेले दिसत होते. इथे दिसलेले पट्टेरी वाघ तर चांगलेच उंचेपुरे, मजबूत आणि तुकतुकीत होते. ते पिंजर्‍यात असूनही बघायला भिती वाटली.

या झू मधिल स्पेशल सेंटरमधे रेड पांडा आणि स्नो लेपर्डची पैदास करण्यात येते.

आज हे सांगण्याचे कारण “The Earth Heroes” Award 2014 करता दार्जिलिंग झू ची निवड झाली आहे. जगभरातील ३०० पेक्षाही जास्त झू मधून ही निवड झाली असून हे पारितोषिक पटकवणारा हा भारतातील पहिलाच झू आहे.

या प्राणीसंग्रहालयाची काही प्रचि :

<

माहितीच्या खाली फोटो आहेत. प्राणी सपाटीवर नसल्याने काही प्राणी अगदी खाली जाऊन बसले होते आणि फोटोत दिसत नव्हते. त्यामुळे काही निवडक फोटोच देत आहे.

ढाण्या वाघ :

Pages