माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते

Submitted by बेफ़िकीर on 4 April, 2014 - 01:24

खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
वाट पाहतो कामाची, करवादत असतो
घासाघीस सकाळी सुचते, मात्र दुपारी
मिळेल तितके घेतो, नशिबी कुदळ घालतो

माझे कुठलेसे पूर्वज शिकलेले होते
म्हणून आलो सधन घरामध्ये जन्माला
नाहीतर मी बसलो असतो खिन्न उकिडवा
कारण नसते कळले का हा जन्म मिळाला

मरतो मी की काय अता ही माझी भीती
त्यांना चिंता कसे जगावे पाळत नीती
सर्वांचा पूर्वज जर कोणी एकच होता
तर मग का ही वाटणीत असमान प्रीती

बघून कविता म्हणाल वा वा, ठरेन मोठा
तुम्ही मोकळे, मीही स्वतंत्र शब्द चिवडण्या
चला लोकहो विसरू त्यांना ...... ते तर साधे
सहाय्य करती कवितेसाठी विषय निवडण्या

खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
ऊन उन्हाळ्याचेही इतके टिकले नव्हते
दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट!! सुन्न करणारी कविता!

<<खिन्न उकिडवा बसलेला हा मजूर अड्डा
ऊन उन्हाळ्याचेही इतके टिकले नव्हते
दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते<< ___/\___

आह !

दर्द है !!

अचाट संवेदनक्षमता अन अफाट निरीक्षण शक्ति यांचा योग्य समन्वय साधला गेलाय !

प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीत जबरदस्त पंच जाणवतोय .

स ला म !

आवडली, काचेच्या तुकड्याने पत्र्यावर लिहिण्याचा प्रयत्न केला तर जसा आवाज येतो तसा अस्वस्थ करणारा ड्राय करकरीत नाद निर्माण होतोय असे वाटले वाचताना.

सलाम..........................................................काव्याला आणि कवीलाही

दोन वेळच्या अन्नासाठी किती खणावे
माझे पूर्वज इतकेसुद्धा शिकले नव्हते

क्या बात है ...अतिशय वेगळ्या बाजाची कविता .