काय घडतंय मुस्लिम जगात? लेखमाला -१ प्रस्तावना

Submitted by शबाना on 3 April, 2014 - 09:37

या प्रस्तावनेवर आणखी पुढे लिहिले गेले. हा दुवा वाचल्यावर हा दुवा ही वाचावा

http://www.maayboli.com/node/48417

प्रस्तावना

मुस्लिम म्हणले की डोळ्यासमोर कडवे धर्माभिमानी, अतिरेकी, सामाजिकदृष्ट्या मागास, बुरखेवाल्या स्त्रिया, दहशतवादी कृत्ये अशी एक सर्वसामान्य प्रतिमा येतेच. काही वर्षाआधी या वाक्याने कोणी लेखाची सुरुवात केली आहे असे दिसताच माझी पहिली प्रतिक्रिया असायची की हे मुद्दाम मुस्लिम समाजाला एका विशिष्ट दृष्टीकोनातून रंगवण्याचे कारस्थान आहे. लगेचच या विरोधातले दाखले देणे सुरु झाले असते - तो अब्दुल हमीद नाही का देशासाठी शहीद झाला? अब्दुल कलाम नाही का एवढे मोठे शास्त्रज्ञ ? आमच्या ओळखीचे कित्येक मुस्लिम आहेत जे या पठडीत बसत नाहीत ई. ई. आणि हे खरेही आहे. असे अपवाद आहेत. एका समाजाची एकसंघ अशी प्रतिमा रंगवता येत नाही आणि भारतीय संदर्भात तर जाती, प्रदेश, भाषा अशा विविध घटकानुसार सगळेच समाज विभागलेले दिसतात. परंतु राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रतिमा किंवा मुस्लिम समाज म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या कुटील कारस्थानाचा बळी आणि तिथे जे काही घडते आहे ते या षड्यंतरला त्या लोकांची उस्फुर्त प्रतिक्रिया असे साधारण दोन मतप्रवाह दिसून येतात. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत, Arab Spring म्हणून ज्याचे वर्णन केले जात आहे, त्याकडे बरेच जण आशावादी दृष्टीकोनातून पाहत आहेत. तेलाच्या जोरावर प्रबळ झालेली राष्ट्रे, त्यांच्यातील अंतर्गत राजकारण, शिया- सुन्नी वाद, इराणचे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आवाहन, बऱ्याच देशातील राजेशाही किंवा एकाधिकारशाही या सगळ्या गदारोळात नक्की काय घडते आहे, का घडते आहे याचे विवेचन मात्र होताना दिसत नाही. या सर्व घडामोडींमध्ये काही समान धागे आहेत का? इस्लामचा आणि या सर्व अराजकतेचा काही संबंध आहे का? पाश्चिमात्य देशांची संस्कृती, विकासाची धोरणे आणि नमुने याच्या विरोधात मुस्लिम शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था अशी नवीन मांडणी प्रकर्षाने पुढे येत आहे.- याची नक्की दिशा काय राहणार? फक्त धर्म हाच आधार असलेल्या राष्ट्रामध्ये तो धर्म न स्विकारनारयांची काय स्थिती असणार? येणाऱ्या जागतिक व्यवस्थेत धर्मधिष्ठित राष्ट्रे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रे यामधील संबंध कसे असतील? आणि जरी धर्म एकच असला तरी वेगवेगळ्या ऐतिहासिक, वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक समूहांना तो कितपत एकत्र बांधू शकतो? असे अनेक प्रश्न यातून पुढे येतात. गेली दोन वर्षे इजिप्त,लिबिया, सिरीया, बहारीन येथील हिंसेच्या बातम्या तर गेली दोन दशकांच्या वर चाललेला इराक, अफगाणिस्तान इथला विध्वंस हा त्या त्या देशांपुरता सीमित राहणार नाहीये. आज या घटनांचे तीव्र प्रतिसाद मुस्लिम जगतात आणि बाहेर दिसत आहेत. इंग्लंडमध्ये दीड वर्षाआधी झालेला ली रग्बी या सैनिकाचा दिवसाढवळ्या झालेला खून आणि त्याचे समर्थन, या देशांमध्ये मुस्लिम इतर धार्मिक गटांमध्ये सुरु असलेली अस्मितेच्या राजकारणाची चढाओढ, यातून पसरणारी हिंसा आणि त्याप्रक्रियेत वाढणारे घेटोज सर्वच अंगावर काटा आणणारे आहे. गेल्या दोन दशकात भारतीय मुस्लिम समाजात होणारे बदल हे फक्त हिंदू धर्मांध शक्तींना प्रतिसाद म्हणून आलेले आहेत ही मांडणी पुरेशी नाही. हिंदू धर्मांध राजकारण या प्रवृत्तींना बढावा देत आहे पण त्यापलीकडे जाउन आणखी काही गोष्टींची मांडणी करणे आवश्यक आहे म्हणून हा प्रपंच.

मी काही धार्मिक पंडित नाही आणि राजकारण, समाजकारण यात अनेक मान्यवर संशोधक महाराष्ट्रात आहेत. समोर दिसणाऱ्या प्रश्नांची उकल काही शास्त्रीय आधारावर, अभ्यास विवेचनावर व्हावी आणि त्यातून मानवी समाजाची प्रगती व्हावी एवढी माफक अपेक्षा ठेवणारी समाजशास्त्राची एक सामान्य विद्यार्थिनी आहे. शिक्षण, आरोग्य, आणि सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे आणि आधुनिक शासनव्यवस्थेत हे अधिकार सर्वांपर्यंत घेऊन जाण्याची कुवत हे आहे हे जाणून अशी यंत्रणा अस्तित्वात असावी म्हणून प्रयत्नरत असणाऱ्या अनेक नागरिकासारखी मीही माझ्या परीने क्रियाशील आहे. रोज टीवी वरच्या बातम्या बघून हळहळणाऱ्या आणि विषन्न होणाऱ्या, परिस्थितीचे आपापल्या परीने अवलोकन करून हे प्रश्न समजून घेणाऱ्यांपैकी मी आहे. या लिखाणातून परस्पर संवाद वाढीस लागेल,निकोप चर्चा व काम वाढीस लागेल अशी आशा जरूर आहे. काहीजणांच्या प्रस्थापित ठोकताळयांना यातून जरूर ठेच लागेल आणि माझा उद्देश नसला तरी काहीजण दुखावले जातील, त्यातून आत्मचिकित्सा व्हावी, वाद्विवादही व्हावेत, कदाचित माझाच दृष्टीकोन परिपूर्ण हे गृहीतक तरी काही अंशी बदलेल, असे वाटते.

हे मराठीतून का तर महाराष्ट्राची प्रबोधनाची परंपरा आहे ज्याचा माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम आहे. आज मी जी काही आहे ती बऱ्याच सामाजिक, राजकीय - ज्ञात -अज्ञात लोकांच्या परिश्रमाचे फळ आहे. वैचारिक, राजकीय आर्थिक सुधारणांमुळे मी माझ्या आयुष्याला देऊ शकले, या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकते, ज्या गोष्टी पटत नाहीत त्या निर्भीडपणे मांडू शकते, माझ्यामते ही मोठी देणगी मला अनेक लोकांच्या कामामुळेच मिळाली. या लोकांच्या ऋणातून मुक्तता नाही पण येणाऱ्या पिढ्यांना मला जे फायदे मिळाले ते तरी मिळावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे. नवीन विचार समजून, त्यावर क्रियाशील व्यवस्था येथे निर्माण होऊ शकते हा माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे - बऱ्याच गोष्टी उदा दाभोलकरांचा खून आणि वाढणारा धार्मिक उन्माद अशा प्रतिकूल घटनांमध्येही माझा हा विश्वास टिकून आहे कारण बुद्धीनिष्ठ, तर्काधिष्ठित परंपरांची पाळेमुळे इथे खोलवर रुजली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक पिढीत कार्यकर्ते, विचारवंत उभे राहताना दिसतात, प्रचलित व्यवस्थेशी टक्कर देताना दिसतात. ही विजीगिषु वृत्तीच येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असे विचार व व्यवस्था निर्माण करेल यात शंका नाही.

जगभर पसरलेल्या मुस्लिम समाजाची आणि प्रामुख्याने मुस्लिम देशांमध्ये सध्या ज्या राजकीय, वैधानिक आणि सामाजिक घडामोडी चालू आहेत त्यांचा परामर्श या लेखमालेत घ्यायचा प्रयत्न आहे. ही सर्व राष्ट्रे त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भौगोलिक स्थान या महत्वाच्या घटकांमुळे बरयाच अंशी एकमेकापासून वेगळी आहेत. यातील प्रवृत्ती प्रत्येक देशाचा इतिहास आणि वर्तमान हा एक सखोल अभ्यासाचा विषय आहे. या लेखमालेत फक्त काही विशिष्ट घटकांचा वविचार केला आहे. ज्यांना यात अधिक रस आहे त्यांनी त्या त्या देशाचा/ घटकाचा स्वतंत्र अभ्यास करावा. या लेखातील बहुतांशी मजकूर मी कोपेनहेगेन विद्यापीठातून केलेल्या Constitutional Struggles in Muslim World या कोर्सवर आधारित आहे*. हा मजकूर वापरण्यासाठीची संमती मी कोर्सचे संचालक प्रा अफसा यांच्याकडून घेतली आहे भारतीय संदर्भातील प्रश्नान्वरची भूमिका मात्र माझी आहे. या विचारमंथनातून निर्माण होणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, किंबुहना यातून अधिक प्रश्न समोर येताना आपल्याला दिसतील. या प्रश्नांची उकल करण्याआधी काही मुद्दे थोडे स्पष्ट करते .

तीन महत्वाचे मुद्दे - पहिला हा कि संबंधित अभ्यासात एक विशिष्ट वैधानिक किंवा धार्मिक ग्रंथास प्रमाण मानून त्यानुसार परिस्थितीचे विश्लेषण केले नाही. उदाहरणार्थ कुराण किंवा त्या त्या देशांच्या राज्यघटना यांचा संदर्भ जरूर घेतला आहे. परंतु हा संदर्भ काय घडते आहे ते सांगण्यासाठी आहे- काय घडले पाहिजे याचे विवरण करणारे नाही. बहुतांशी इस्लामिक ग्रंथांचा आधार आदर्श समाज आणि राज्यरचना कशी असावी असा असतो -इथे सध्या काय आहे आणि ते तसे का आहे याची चर्चा केली आहे .

दुसरा मुद्दा हा कि ही सर्व राष्ट्रे सार्वभौम राष्ट्रे आहेत, त्यांच्या स्वताच्या वेगळ्या राज्यप्रणाली आहेत. या राज्यप्रणाली, त्यानुसार असलेल्या शासनसंस्था आणि प्रशासनव्यवस्था कितपत विकसित आहेत यावर या देशांचा विकास अवलंबून आहे. या सर्व देशांमध्ये आधुनिक शासनव्यवस्था निर्मितीमध्ये अनेक त्रुटी दिसून येतात ज्यांचा प्रत्यक्ष संबंध लोकांच्या दैनंदिन जीवनावर पडतो. या त्रुटीमागची कारणमीमांसा थोडक्यात केली आहे

तिसरा मुद्दा या देशांमध्ये सध्या जो असंतोष उफाळून आला आहे, त्यांचे आणि त्यातून पुढे येणारे विकल्प याचे विवेचन. बहुतेक ठिकाणचा असंतोष हा लोकांच्या मुलभूत गरजा शासनाने भागवल्या नाहीत या कारणास्तव आहेत - उदा. मुलभूत सोयी, रोजगार, राजकीय सहभागाचा अभाव ईत्यदि.

एक महत्वाची बाब इथे नमूद कराविशी वाटतो - अभ्यसान्तर्गत असलेली सर्व राष्ट्रे जरी मुस्लिम असली तरी ती एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. मुस्लिम म्हणले की इस्लामची साचेबंद व्यवस्था असेल आणि ती सर्वत्र सारखीच असेल असा एक गैरसमज प्रचलित आहे. याचे एक कारण म्हणजे मुस्लिम व्यक्ती किंवा समाज हा इस्लामच्या नियमानुसारच चालणार आणि म्हणून त्याचे सर्व व्यवहार धर्माच्या निकषावरच घासून बघितले पाहिजेत. बरेच मुस्लिम आणि पाश्चिमात्य विचारवंत इस्लामच्या दस्तऎवजी स्वरूपात सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची मांडणी करू पाहतात. इथे मात्र सामाजिक आणि राजकीय शास्त्रांच्या प्रचलित प्रणाली वापरून हा अभ्यास मांडण्याचा प्रयत्न आहे कारण इस्लामचा ग्रंथ जरी एक असला तरी त्याचा अनुवाद व अंमलबजावणी व्यक्ती, काळ, स्थळानुसार बदलतेच. मुल्सिम राष्ट्रांच्या इतिहास व भौगोलिक स्थानानुसार काही गटात हा अभ्यास मांडला आहे. एकूण नऊ विभागात ही मांडणी विभागली आहे. प्रत्येक भागातील लोक, इतिहास, सद्यपरिस्थिति, राजकीय आव्हाने यावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परंतु यातील प्रत्येक घटकावर एक पुस्तक निघेल इतका हा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुढील अभ्यासासाठी काही संदर्भग्रंथांचा उल्लेख मध्येच केला आहे. प्रांतवार विभागांची सूची पुढीलप्रमाणे आहे

१. ओटोमान साम्राज्य आणि आजचा तुर्कस्थान

२. इजिप्त आणि मगरीब राष्ट्रे - लिबिया, अल्जिरीया, मोरोक्को, टयूनिशिया, मोरेटानिया

३. सौदी अरेबिया आणि गल्फराष्ट्रे

४इराण आणि शिया

५ पूर्वेकडची राष्ट्रे - सिरीया, जॉर्डन, लेबनॉन आणि इराक

६ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान

७. मलेशिया आणि इंडोनेशिया

८. सब -सहारन आफ्रीका -

९. सार्वत्रिक आव्हाने आणि पुढील दिशा

लिखाणाच्या ओघात बऱ्याच प्रश्नांवर माहिती मिळू शकेल आणि शक्य तसे काही प्रतिसाद मी देऊ शकेन .परंतु द्वेषमुलक किंवा व्यक्तिगत टीकेकडे मात्र मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन. आधी उल्लेख केल्याप्रमाणे निकोप चर्चा व्हावी एवढाच हेतू या लिखाणामागे आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंट्रेस्टिंग लेखमाला !

भारतीय मुसलमान आणि हिंदू एवढीच मांडणी न होता जागतीक स्तरावर तुम्ही लेखमाला लिहिणार त्यामुळे उत्सूकता आहे.

मुस्लिम देशामधील विरोधाभास देखील तुम्ही मांडणार आहात हे वाचले. ते माझ्यामते त्या सुचितील सार्वत्रिक आव्हाने आणि पुढील दिशा ह्यावर जास्त भर असेल तर उचित होईल कारण तसा जनरल इतिहास बहुतेकांना माहिती आहे. अर्थात तो तसा का झाले हे मांडाणे उचित आहेच पण त्यात खूप वेळ खर्ची घालावा का हा प्रश्न देखील विचारणे उचित होईल.

वाचतेय. सविस्तर लिहिणे.
सगळ्यांनाच सगळ्या ऐतिहासिक बाबी माहित नसतात, त्यामुळे आज होणार्‍या अतिशय गुंतागुंतीच्या वाटणार्‍या घडामोडी त्यात्या प्रदेशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर समजून घ्यायला नक्कीच आवडतील.

पुलेशु Happy

उत्तम!!
लगे रहो Happy

>>जनरल इतिहास बहुतेकांना माहिती आहे
केदार, जनरल जागतिक इतिहास??
मला तरी केवळ चित्रपटीय इतिहास माहित आहे (उदा लॉरेन्स ऑफ अरेबिया)

ही लेखमाला वाचण्याची अत्यंत उत्सुकता आहे.++++१०००००

जी टिका, सकारात्मक किंवा नकारात्मक व्हायची ती होईल पण अश्या विषयाला हात घालायची तुम्ही जी हिंमत केली त्याबद्दल अभिनंदन

बाकी लेखमालेच्या प्रतिक्षेत

प्रस्तावना आवडली.
तुमचे मराठीवरचे आणि विषयावरचे प्रभुत्वही दिसून येत्येय.
एखाद्या पी एच डी च्या थेसिससारखी मांडणी वाटत्येय.
ही लेखमाला वाचण्यास अत्यंत उत्सुक आहे.

इथे लेखात दिलेल्या सूचित केवळ मुस्लिम राष्ट्रे घेतली आहेत.
मात्रं काही देश मुस्लिम नसूनही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे उद.
भारत, इंग्लंड.
तर अश्या देशातील मुस्लिमांची चर्चा कोणत्या शीर्षकाखाली करणार आहात?

अश्या देशातील मुस्लिमांची चर्चा कोणत्या शीर्षकाखाली करणार आहात?<<<

साती, उत्तम आणि अतीशय महत्त्वाचा मुद्दा !! धन्यवाद !!

साती,

>> मात्रं काही देश मुस्लिम नसूनही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे उद.
>> भारत, इंग्लंड.

मला वाटतं त्यामुळे विषयाचा आवाका फार म्हणजे फारच वाढेल. मुस्लिम जगतात काय घडतंय असा विषय आहे. काही देशांत मुस्लिमांची संख्या लक्षणीय असली तरी त्यास मुस्लिम जगत असं म्हणता येणार नाही.

परंतु तुमचा मुद्दा ध्यानी घेण्याजोगा आहे. Happy अशा देशांकरिता स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल. उदा. : चीनमधल्या मुस्लिमांची आधुनिकतेवर काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्यायला निश्चितच आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

प्रस्तावनेतच अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घातल्याबद्दल धन्यवाद. मुस्लिम जग ही एकच एक अविभाज्य संकल्पना आहे या गृहितकाला जरी धक्का लागला तरी बरेच साध्य होईल.
द्वेषमुलक किंवा व्यक्तिगत टीकेकडे मात्र मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन>>> त्याच बरोबर लेखमालिका कशी लिहावी यावर जे सल्ले येतील त्याकडेही दुर्लक्ष केले तर बरे होईल!

चांगली सुरुवात. लेखमालिका वाचण्याची उत्सुकता आहे.

>कारण इस्लामचा ग्रंथ जरी एक असला तरी त्याचा अनुवाद व अंमलबजावणी व्यक्ती, काळ, स्थळानुसार बदलतेच.

काळानुसार ती बदलत नाहीये (किंवा इतर धर्मांपेक्षा खूप हळू बदलतेय) असा एक सूर , इस्लामविरोधी टीकांमधे नेहमी असतो. त्याबद्दल जास्त वाचायला आवडेल. फक्त इस्लामच नाही पण इतर धर्मांनांही काळाबरोबर बदल करावे लागले आणि जेंव्हा ते झाले नाही तेंव्हापुरते तरी ते ध्रर्म मागे पडले. अगदी अलिकडचेच उदाहरण म्हणजे समलिंगी विवाहाला नापसंती दिल्यामुळे , कॅथलीक ख्रीश्चनांमधे धर्माबद्दल निर्माण झालेली नाखुषी. बाकीच्या धर्मानी काळाबरोबर जे बदल केले ते अजून इस्लाममधे का आलेले नाहीत याबद्दलही वाचायला आवडेल.

प्रस्तावन खुपच छान झालिये.
अतिशय नाजूक अशा विषयावर लेखमाला काढण्याचे धारिष्ट तुम्ही दाखवले.

मी आवर्जून वाचणार आहे ही लेखमाला. खूप काही नव्याने गवसेल आणि अंधारलेल्या अनेक दिशा उजेडात येतील अशी आशा आहे. पोढील लेखांची अत्यंत आतूरतेने वाट पहाते आहे.

प्रस्तावना आवडली.
आज होणार्‍या अतिशय गुंतागुंतीच्या वाटणार्‍या घडामोडी त्यात्या प्रदेशाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर समजून घ्यायला नक्कीच आवडतील.>>+१

Pages