आधुनिकता आणि मुस्लिम राष्ट्रे

Submitted by शबाना on 2 April, 2014 - 09:58

काय घडतंय मुस्लिम देशांत -- या आगामी लेख मालिकेतून.

आधुनिकता म्हणजे नक्की काय?

सामाजिक आणि राजकीय शास्त्रात आधुनिकता ( modernity ) म्हणजे मध्ययुगीन कालखंडातून सरंजामी व्यवस्था नाकारून भांडवली, वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्र-राज्याची संकल्पना. बहुतांशी अरब राष्ट्रे या आधुनिकतेच्या अनुभवास त्याबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्य आणि समूहाच्या सीमा ओलांडून व्यापक जगाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आव्हानात तोकडी पडताना दिसतात. आधुनिकतेचा हा प्रवास तसा अवघडच आहे कारण या प्रक्रीयेमेध्ये बरीच उलथापालथ होते. उत्पादकतेची पारंपारिक साधने जाउन औद्योगिकरण, शास्त्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध, प्रशासनात आमुलाग्र बदल आणि याअनुषगाणे जीवनाच्या इतर क्षेत्रात येणारे सांस्कृतिक बदल यामुळे सम्जाअत असणाऱ्या प्रस्थापित समज, रूढी, सत्ताकेंद्रे आणि यावर अंकुश ठेवणाऱ्या व्यक्ती या सर्वांतच उलथापालथ होते. अस्तित्वात असणारी घडी आणि त्याबरोबर येणारी सुरक्षितता यांनाच तडा जातो. साहजिकपणे या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राज्यशक्तीविरुद्ध असूया व असंतोष निर्माण होतो. परंतु आधुनिकतेमुळेच पूर्वीची संथ जीवनशैली बदलून गतिमान बदल दैनंदिन जीवनात होत असतो. प्रस्थापित घडी चिरडून नवोन्मेशि असा हा बदल लोकांना हवा असतो. आपल्याकडे रेल्वे आल्यानंतरचा बदल किंवा तीन दशकांपूर्वी ठाणे बेलापूर पट्ट्यात शहर वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये हा आधिनिकतेचा प्रवास स्पष्ट दिसून येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा बदल बहुतांशी राष्ट्रात आणि समाजात झालेला आणि लोकांना भावलेला दिसतो. भांडवलशाही ज्यावर आधारित आहे ते पैसा आणि नफा हे दोन घटक आधुनिकतेच्या मुलाशी अस्तात. या दोन घटकांना, जडवादी विचारसरणीला मात्र फार सहजरीत्या मान्य केले जाताना दिसत नाही, किंबुहना त्यांचा अस्वीकार व त्याविरुध्द संतापाची भावना या समाजांमध्ये दिसून येते. जर्मन तत्ववेत्ता गटेच्या फ्वाईस्ट मध्ये हा विरोधाभास स्पष्ट दिसून येतो. फ्वाइस्ट हे आधुनिकतेच्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु त्याला आधीची परंपरागत सुस्त अशी समाजरचना बांधून ठेवते आहे. एका प्रकारे फ्वाइस्ट हा तिसऱ्या अप्रगत जगातील त्या वेळच्या बुद्धिवादी व्यक्तीचे प्रतीकच आहे. अप्रगत जर्मनीने इंग्लंड आणि फ्रान्सचा आदर्श ठेऊन आपली प्रगती केली - फ्वाइस्टला या प्रगतीचे त्याबरोबर येणाऱ्या बदलांचे आश्चर्यमिश्रीत कौतुक आहे, त्याला आपल्या संसकृती आणि परंपरांचा अभिमान आहे , पण त्याचबरोबर स्वतःच्या मागासलेपणाची लाज वाटते. मुस्लिम जगतात आधिनिकतेचा प्रवेश हा मुख्यतः वसाहतवादी राष्ट्रांच्या माध्यमातून झाला. हा बाल झपाट्याने आला असला तरी तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्याचा स्विकार मानसिकदृष्ट्या बराच अवघड होता. उदा. सुएझ कालवा बांधताना इजिप्तमध्ये आलेले भांडवल, तंत्रज्ञान, इमारती, प्रशासन हे तिथल्या स्थानिक जीवनशैलीपेक्षा फारच वेगळे होते. फ्रेंच जेव्हा ट्युनिशियामध्ये गेले तेव्हा तिथेही हीच प्रक्रिया दिसून आली. या प्रक्रियेत अनेक नव्या संधी उपलब्ध होतात परंतु त्याची जबर किंमत हि स्थानिक जनतेस द्यावी लाग्ते. बाहेरून येणारे लोक नुसते वेगळे दिसताच नाहीत तर त्यांचे आचारविचार ही वेगळे. या प्रक्रियेशी जे जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना विविध कारणांमुळे यात स्थान नाही त्यांची मात्र गोची होते. भूतकाळातील आपल्या स्थानाबद्दल,राजकारण, अर्थकारानातल्या भूमिकांबद्दल कमालीचे ममत्व याच प्रकियेतुन निर्माण होते.प्रचलित व्यवस्थेत एक प्रकारची निश्चितता असते, समाजास संभाव्य घडामोडींबद्दल ठाम खात्री असते. परंतु आधुनिकतेची प्रक्रियेत मात्र अनेक अनिश्चित आणि असंभाव्य अशा क्रिया या संथ समाजात प्रवेश करतात. मानसिकदृष्ट्या समाजासाठी हे एक मोठे आव्हानच असते. Fyodor Dostoyevsky या रशियन लेखकाने लिहिलेल्या Brothers Karamazov.या कादंबरीत grand inquisitor म्हणून एक दृष्टांत आहे -समाजात अपधर्म अगदी विकोपाला गेलेला असतो तेव्हा ख्रिस्त पुन्हा परतून येतो, लोकांमध्ये मिसळतो, लोक पुन्हा त्याचा आदर करतात, श्रद्धा ठेवतात. तिथल्या चर्चला याची बातमी कळल्यावर चर्चचे अधिकारी येतात आणि ख्रिस्ताला अटका करून दुसऱ्या दिवशी सकाळी शिरच्छेद करायचा आदेश देतात. त्या रात्री तुरुंगाधिकारी येउन ख्रिस्ताला सांगतो की त्याला, न्यायालयाला आणि चर्चला हे माहित आहे कि तू खरा ख्रिस्त आहेस. तुला अटक काही अनवधानाने केलेली नाही. परंतु तुझ्या पुनरागमनाने चर्चचे उद्दिष्ट आणि भवितव्य धोक्यात आलेले आहे. येथे हा अधिकारी पुढे ख्रीस्तास म्हणतो -मनुजास शांती आणि स्वातंत्र्याची ओढ असते, मृत्यू आणि स्वातंत्र्य यात तो स्वातंत्र्याची निवड करेल. स्वातंत्र्य - बरोबर आणि वाईट जाणण्याचे स्वातंत्र्य, सद्सद्विवेक्बुद्धी नुसार जगण्याचे स्वातंत्र्य -- परंतु हेच स्वातंत्र्य मनुजास अपार दुख्ही देते.

And he describes the mission of the church in the following terms,and it's exactly this problem of freedom So it's: "Man prefers peace and even death,to freedom,to freedom of choice in the knowledge of good and evil.Nothing is more seductive for man than this.His freedom of conscience, but nothing is a greater cause of suffering."

अनिश्चितता मग ती दैनदिन जीवनातील किंवा आध्यात्मिक पातळीवरची असो समाजमानसात त्याचे पडसाद तीव्र असतात, त्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया तीक्ष्ण असतात, आणि हे फक्त मुस्लिम राष्ट्रेच नाही तर सगळीकडे आढळणारे सत्य आहे. एरिक फ्रॉम आणि डुरखाइम यांच्या लेखनातून या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे. फ्रॉम त्याच्या Fear ऑफ Freedom या पुस्तकात फ्रॉम म्हणतो कि स्वातंत्र्य एक प्रकारे नकारात्मक असते- जाचक परंपरा, रूढी, शासन यांना नाकारून त्यातून येणारे स्वातंत्र्य ! परंतु या स्वतंत्रतेबरोबरच एक प्रकारचा अभाव, रिक्तताहि येते. डुरखायीमने याचे वर्णन Anomie असे केले आहे. या अवस्थेत व्यक्ती व समूहाला मार्गदर्शन करणारे सर्व ढाचे कोसळलेले असतात, समाजमानस आणि समाजव्यवस्थापन यांना बांधणारी यंत्रणा कोसळलेली असते. भूतकाळातील निश्चितता जाउन एक प्रकारची संदिग्धता येते. फ्रोमच्या मते या स्थितीला जर बदलायचे असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याऐवजी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्ती रचनात्मक कामात सहभागी होते, इतरांबरोबर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. ही सकारात्मक स्वातंत्र्याची ओढ ज्या समाजात तीव्र बदल होतात तिथे अधिक जोमाने असते याचे कारण म्हणजे येणाऱ्या बदलांना स्वीकारत पण लवकरात लवकर आधीच्या निश्चिततेच्या स्थितीत जाण्याची एक निकड या समाजात असते. परंतु या निकडीपायीच हे समाज एकाधिकारशाहीस अंगिकारताना दिसतात. एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीत लोकांना काय विचार करावा, कसे वागावे याबद्दल ठोस मार्गदर्शन मिळते. जुन्या समाजव्यवस्थेत असणारी निश्चितता, अधिकारीव्यवस्था आणि जगण्यावाग्ण्याच्या निश्चित पद्धती हुकुमशाहीच्या माध्यमातून निर्माण होतानाचा एक आभास समाजास मिळतो. हा निश्चीततेचा आभास,सामाजिक आणि राजकीय पातळीवरची निष्क्रिय पण दृढ अशी प्रतिमा अशा हुकुमशाही किंवा अरब देशात असणाऱ्या social contract पद्धती वर्षनुवर्षे चालू राहण्यामागचे महत्वाचे कारण आहे.

जर आधुनिकतेमुळे इतके जटील प्रश्न निर्माण होणार असतील तर मग ही आधुनिकता हवीच कशाला ?

आधुनिकतेच्या प्रक्रियेआधी अस्तित्वात असणारी स्थायी स्वरूपाची संरचना जशी होती तशीच का जोपासू नये? बाहेरच्या जगातील घडामोडींपासून सुरक्षित अशी घडी समूहाला किंवा राष्ट्राला लावणे अशक्य आहे का? काही शतकांपूर्वी जपानने हाच विचार करून आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या व अतर्गत विकासावर, संस्कृती जोपासन्यावर भर दिला कारण तिथल्या सत्ताधार्यांना माहित होते हि एकदा परकीयांबरोबर उठबस सुरु झाली कि त्यांच्याबरोबर जपान्यांनाही बदलावे लागेल. वेगवेगळ्या समूहांबरोबर येणाऱ्या संबधात हा स्पर्धात्मक घटक आढळतोच. केनिथ वाल्ट्झ यांनी त्यांच्या Theory ऑफ International Politics या पुस्तकामध्ये आंतराष्ट्रीय व्यवस्थेमुळे होणारे सामाजीकरण यावर सखोल विश्लेषण केले आहे. वाल्ट्झ यांच्या मते कुठलाही घटक मग तो राज्य,आर्थिक कंपनी, विद्यापीठातले विद्यार्थी असोत स्पर्धात्मक वातावरणाचा या सर्वांवर परिणाम होतोच. त्यांची इच्छा नसली तरीही नवीन रचनेत त्यांना सक्रिय सहभागी व्हावेच लागते. अन्यथा या प्रक्रियेत असणार्या इतर घटक नवीन रचनेतील बदल आपल्याला अनुकूल असे वळवून घेतात आणि जे या प्रक्रियेत उदासीन राहतात त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या स्पर्धात्मक वातावरणाचा परिणाम म्हणजे कालांतराने या नवरचना वेगवेगळ्या समाजात सारख्याच रुजताना दिस्तात. या नवरचना अर्थ- उत्पादन व्यवस्था राज्य-प्रशासनव्यवस्था, लष्कर अशा सर्वव्यापी असतात. उदा. राजेशाही व्यवस्था, सरंजामशाही किंवा सध्या अस्तित्वात असलेली वेस्ट मिनिस्टर प्रारुपातली लोकशाही या रचना जगभरच्या ज्ञात जगात त्या त्या वेळी रुजल्या- थोडेबहुत स्थानीय विभिन्नता असेल परंतु संरचना म्हणून एखादी संकल्पना सगळीकडे रुजू होत असताना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे आणि पुढे जाणे या दोन प्रखर उर्मी त्यात आढाळतात. अर्थातच अशा एकजिनसी संरचनेला विसाव्या शतकात तात्त्विक आणि इतर पातळीवर खूप विरोध झाला आहे. जगभरात अनेक चळवळी पुढे आल्या आहेत. विकल्पात्मक राजनीती, कलाकृती इत्यादीतून या स्पर्धात्मक सरनचनेवर टीका व पर्यायाने आधुनिकतेचा नकार होताना दिसतो. हा खरेतर फार खोलात जाण्याचा, वेगवेगळे मतप्रवाह असलेला विषय मी अगदी थोडक्यात फक्त प्रक्रिया समजून घेण्यापुरताच इथे मांडला आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

इस्लामिक जगतातहि आधुनिकतेच्या प्रारुपास नाकारून वैकल्पिक संरचनेची कल्पना आणि व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदा. इराणच्या इस्लामिक राज्यक्रांतीनंतर लिहिलेल्या १९७९ च्या संविधानाची प्रस्तावनेत त्यानी आधुनिक अर्थशास्त्रात अभिप्रेत अशा जडवादी विचारसरणीस नाकारले आहे. " जडवादी विचारसरणीचे उद्देशच नफा आणि संपत्ती कमावणे हा आहे. या विचारसरणीत आर्थिक व्यवहार आणि सत्ता हीच समाजरचनेची अंतिम उद्दिष्टे आहेत. याचा परिणाम म्हणूनएक भ्रष्ट िध्वंसकारी प्रक्रिया मनुष्याच्या विकासात दिसून येतात. इस्लाममध्ये अर्थव्यवस्था हे फक्त एक मध्यम आहे- ज्याचा उपयोग अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापुरताच करणे अपेक्षित आहे …" हे उद्धृत करण्यामागचा उद्देश म्हणजे इराणने पर्यायी राजनीतीचा पुरस्कार केला आणि अशी राज्यव्यवस्था निर्माण केली . संविधान प्रस्तावना हे त्या त्या देशांच्या मुख्य धोरणामागची मुल्ये अधोरेखित करणारे महत्वाचे दस्तैवज आहे. इथे इराण स्पष्ट म्हणतो कि आम्हाला जगात चाललेल्या, अस्तित्वात असलेल्या अर्थव्यवस्थेशी घेणेदेणे नाहि. आम्ही नवीन अर्थ व्यवस्था निर्माण करु. खरेच अशे व्यवस्था ते निर्माण करू शकले का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. फक्त वैकल्पिक अर्थव्यवस्थेपुरताच हा प्रश्न सीमित नाहि. आतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धात्मक पातळीवर सारेच मुस्लिम देश तोकडे पडतात मग ते लष्करी सामर्थ्य असो किंवा अंतर्गत विकासाच्या निकषांवर- साक्षरता,आरोग्य, राजकीय सहभाग इ. ( इराण आणि पाकिस्तानकडे असलेली अनुशस्त्रे ही लष्करी सामर्थ्याची प्रतीके जरूर आहेत परंतु गेल्या ५० वर्षात झालेली मुख्य युद्धे उदा १९६७ सालचे इस्रायेल विरुद्धच्या युद्धात मुस्लिम राष्ट्रांना सांघिक माघार घ्यवी लागली आणि या देशतील राजवटीवर त्याचा दूरगामी परिणाम झाला - हे मुद्दे आपण त्या त्या राष्ट्राचा/ भूभागाचा अभ्यास करताना जास्त सविस्तररित्या पाहणारच आहोत.

आधुनिकतेस मुस्लिम राष्ट्रांचा प्रतिसाद

आधुनिकतेच्या आव्हानाला जो प्रतिसाद मिळाला त्याचे ढोबळ चार भागात वर्गीकरण करता येइल. आधी चर्चा केल्याप्रमाणे अरब आणि मुस्लिम देशांना स्वताच्या दैदिप्यमान अशे भूतकाळाची प्रतिमा आणि सांप्रतकालची त्यांची वास्तविकता यांचा मेळ घालणे कठीण जाते. आधुनिकतेमुळे आरपार बदललेल्या नव्या वैश्विक समीकरणात त्यांच्या या स्वप्रतिमा आणि अस्मितेच्या कल्पनांमुळे स्वतःला समाधानकारकरीत्या बसवणे अवघड दिसते. हा प्रश्न जसा मुस्लिम आणि अरब राष्ट्रांचा आहे तसाच तो वसाहतवादाच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक देशांचा आहे. हा वसाहतवाद जरी भौतीकरीत्या गेल्या ५० वर्षात संपुष्टात आला असला तरी या देशांवर, समाजमनावर त्याचे ओरखडे अजूनही आहेत. एके काळी साम्राज्य स्थापनाऱ्या या बलाढ्य शक्तींना पश्चिमेच्या छोटाशा राष्ट्रांनी नामोहरम करून आजही त्यांचे ऐतिहासिक आणि सांप्रतचे स्थान वैश्विक परीघावर अगदी नगन्य केले आहे. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने जग झपाट्याने जवळ आले, उत्पादनाच्या आणि बाजाराच्या पद्धती बदलल्य. पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे एक बातमी पोहचायला महिने कधी कधी वर्षे जात. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी घटना तुम्हाला आपल्या घरी किंवा जिथे कुठे असाल तिथे अगदी सविस्तर कळू शकते. ज्ञान, तन्त्रज्ञान आणि त्यावर आधारित वैश्विक क्रयव्यवस्थेने सर्व स्थानिक संदर्भ जणू नामशेष करून टाकले आहेत. ज्या देशांमध्ये औद्यागिक क्रांतीमुळे ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली त्या देशांमध्येही सामाजिक आणि राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणावर झाल्या. औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत वसाहतींचा वाटा हा फक्त कच्चा माल पुरवणाऱ्या आणि तयार मालाचा खप असणाऱ्या अर्धविकसित बाजारपेठ एवढाच होता. परंतु या प्रक्रियेत मालाच क्रयविक्रय, त्यानुषंगाने निर्माण होणारे छोटे उद्योग, विस्तारणारे सेवा क्षेत्र, निर्माण होणारी संपत्ती, शहरीकरण आणि त्याच जोडीने येणारे बकालीकरण हा बदल अनेक समाजात अभूतपूर्व असा होता. मुख्य म्हणजे या बदलाच्या आणि घडामोडींच्या नाड्या परकियांच्या हाती होत्या. वसाहतवादाच्या या संदर्भात आधुनिकीकरणाची प्रक्रिया स्वकीयांना त्यांच्यावर लादलेली वाटणे साहजिक होते. या प्रक्रियेत आपण नगण्य आहोत, निष्प्रभ आहोत हे उमजल्यावर या समूहांना वाटणारी दुर्बलतेची, हताशपणाची भावना या कालखंडात या सर्व देशांमध्ये रुजली. भूतकाळाचे स्वप्नरंजन,आधीच्या व्यवस्थेचे गुणगान आणि आधुनिकतेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व गोष्टींबाबत कमालीचा अस्वीकार या गोष्टी या सर्व समाजात दिसून येतात. प्रचलित साहित्य, कला यामध्ये गतकाळाचे अगदी रुमानी प्रतिबिंब दिसून येते - चिनुआ अचेबे या विख्यात नायजरियन लेखकाची Things Falling Apart, या कादंबरीत आफ्रिकन टोळीप्रमुखाची कथा सांगितली आहे. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे आधीची शेतीपद्धती व त्यावर आधारित समाजाचा कसा ऱ्हास होतो याची ही कहाणी. इराणी साहित्यात जलाल -अल- अहमद, अरब लेखक सादेक हेदायात यांच्या लोकप्रिय लिखाणातूनही भूतकाळाचे असेच गौरवीकरण दिसून येते. हा भूतकाळ मात्र धर्म आणि धार्मिक सत्ता यांच्याशी अतूटपणे बांधला गेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आधुनिकीकरणाला प्रत्युत्तर म्हणून भूतकाळ आणि अनुषंगाने तेव्हाची धार्मिक व्यवस्था हा पर्याय समोर येताना दिसतो.

गतकाळातील संकल्पनावर आधारीत अशा समाजरचनेचे हे स्वप्न थोड्याफार फरकाने सर्व मुस्लिम जगतात आढळते. परंतु सद्यपरिस्थितिस सामोरे जाताना वेगवेगळ्या देशात वेगवेगळे मार्ग अवलंबलेले दिसतात. ढोबळमानाने याचे चार प्रकारात विभाजन करता येईल. हे विभाजन फक्त सैद्धांतिक पातळीवर आहे- प्रत्यक्षात एकाच देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यांचा देशाच्या धोरणांवर कमीजास्त फरक पडत असतो आणि काही देशात तर आमुलाग्र बदल झालेले दिसतात. यातील पहिला मार्ग आहे तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९व्या शतकात तुर्कस्तान, इराण, इजिप्त असे देश. पाश्चात्य देशांत प्रचलित अर्थ- राज्य आणि प्रशासन व्यवस्था या देशांतील तत्कालीन सत्ताधारी आणि अधिकारी वर्गाला जवळची वाटतात. उदा कैरो विद्यापीठाची स्थापना झाल्यावर इथे इस्लामिक धर्मशास्त्राऐवजी आधुनिक शास्त्रांचा अभ्यास सुरु होतो. ओटोमान साम्रज्याच्या लष्करी प्रशिक्षणात, संघटनात्मक बांधणी आणि संरचनेत जर्मनीचा मोठा सहभाग दिसून येतो. ओटोमान साम्राज्यात या अनुकरनास तन्झीमात- सुधाराची चळवळ असे नाव दिले आहे. या चळवळीच्या प्रमुखपदी सुरुवातीला तत्कालीन सुलतान होता परंतु लवकरच एका तरुण मिलिटरी अधिकाऱ्याने आपण आणखी गतीने हे बदल घडवून आणले पाहिजेत या उद्देशाने बदलाची सूत्रे हाती घेतली. हा तरुण, केमाल पाशा पुढे अतातुर्क - तुर्कांचा पिता म्हणून ओळखला जाऊ लागला. केमाल पाशा आणि त्याच्या तरुणतुर्क सहकाऱ्यांनी तन्झीमातचा विचार सोडून फ्रान्सच्या धर्तीवर आधारित धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची घोषणा आणि स्थापना पहिल्या महायुद्धादरम्यान केली. तुर्कस्थानात गेल्या दहा वर्षात धर्माचे सामाजिक जीवनात स्थान या विषयावर चर्चा आणि बदल चालूच आहे. थोडे विस्ताराने हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु संपूर्ण अनुकरण यामार्गे आधुनिकतेचा अंगीकार हा पहिला दृष्टीकोन यात धर्मनिरपेक्ष समाजरचना अंगभूत आहे.

आधुनिकतेच्या अंगीकारातला दुसरा दृष्टीकोन हा धार्मिक उदारमतवाद हा आहे. नवीन बदलांना आत्मसात करताना आधीच्या प्रथा, परंपरा आणि धर्म यांना बाजूला सारण्याची गरज नाही. धर्मपरंपरांमध्ये आवश्यक ते बदल आणून आधुनिकतेमुळे येणारी आव्हाने स्वीकारण्याचा हा गट पुरस्कार करतो. या गटाचे प्रतिनिधित्व मोरोक्को आणि ट्युनिशिया हे देश करताना दिसतात. या देशांतील परिस्थितीचा सविस्तर विचार आपण नंतर करुयात परंतु येथे हे विभिन्न दृष्टीकोन समजाऊन घेताना यांचा उल्लेख केला आहे. इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह. येणाऱ्या काळानुसार बदल आवश्यक आहेत आणि ते बदल इस्लामिक कायद्याचे विवेचन, स्पष्टीकरण देऊन कायद्याच्या आधारावर संमत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्युनिशिया, मोरोक्को ५७-५८ मध्ये कौटुंबिक कायद्यात केलेले बदल. मोरोक्कोत हेच बदल २००४ मध्ये पुन्हा करण्यात आले. कौटुंबिक कायदे असोत किंवा इतर क्षेत्रातील बदल असोत अनेक मुस्लिम विचारवंत इस्लामचे वेगळ्या अंगाने स्पष्टीकरण देऊन अनेकासे बदल सामावून घेतात. परंतु या दृष्टीकोनात इस्लामिक कायद्याचे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सार्वजनिक कायद्यांचीच सर्वोच्चता मानली जाते.

तिसरा दृष्टीकोन हा परम्परावाद्यांचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देश. यांची मांडणी आणि दृष्टीकोन म्हणजे आम्हाला बदलाची काहीही गरज नाही. इस्लामिक शासन आणि इस्लामिक समाज हा आपल्या जागी फक्त योग्यच नव्हे तर इतर समाजांपेक्षा आणि विशेषतः पतित अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान आम्हाला बदलायची गरजच नाही. आधुनिकतेच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनेक तन्त्रज्ञानावर आधारित अनेक बदल मात्र यांनी अंगिकारले आहेत. हे तन्त्रज्ञान चालवण्यासाठी लागणारी मानवी संसाधनेही हे समाज आयात करतात. पाश्चात्य देशातील बनणाऱ्या सर्व सुख सुविधांचा उपभोग या देशात सर्रास केला जातो परंतु तेथील समाजाचे नियमन मात्र ते पूर्णपणे या प्रक्रियांपासून अलिप्त राहून करतात.

चौथा आणि सर्वात महत्वाचा गट - महत्वाचा यासाठी के मुसलीम आणि इतर समाजात हा गट राजकीय मंचावर जास्त चर्चिलेला, लोकांच्या मनात, कल्पनेत आज मुस्लिम म्हणून जी साधारण कल्पना आहे तीत असणारा असा हा मुस्लिम मुलतत्ववादी गट. या गटांतर्गतही खूप विभिन्नता आहे, खूप सक्रियता आहे. सैद्धांतिक दृष्ट्या आज हा गट सर्वात जास्त उत्पादक/ सक्रीय आणि प्रभावशाली आहे. या गटाने आधुनिकतेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानास प्रतिसाद देण्यात धर्मनिरपेक्षवादी गट आणि उदारमतवादी सुधाराकांचा गट अयशस्वी झाल्यामुळे इस्लामवर आधारित शासनप्रणाली आणण्याची हा गट आपली जबाबदारी मानतो. अशी शासनप्रणाली जी आधुनिक जगात पाश्चात्य जगताशी टक्कर घेऊ शकेल. यांच्यामते इस्लाम हा मूलतः भांडवलशाही किंवा समाजवाद या पाश्चात्य संकल्पनापेक्षा श्रेष्ठ आहे. हा गट अरब आणि मुस्लिम देश ज्यांनी पूर्णतः किंवा अंशत: पाश्चात्यांचे अनुकरण केले त्यांच्या असफलतेचा हवाला देत इस्लामच्या मुलतत्वांवर आधारित अशी प्रणाली विकसित करण्याचे ध्येय राखतो. प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते आणि अशा व्यवस्थेस कार्यान्वित करणारे शास्तेही आहेत. अयातुल्ला खोमेनींच्या मते इस्लाम ही तिसरी आणि सर्वश्रेष्ठ समाजप्रणाली आहे. ही विचारसरणी सर्व मुस्लिम जगतात गेल्या ३०-४० वर्षात लोकप्रिय झाली आहे.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन,

लेख उत्तम लिहलाय.

मुस्लिम जगत हे किमान मला तरी पडद्याआडच जग वाटत. आपण लिहलेल्या तीन विचारांपैकी परंपरावादाचा पगडा मुस्लीम समाजावर जास्त आहे अस माझ मत आहे.

हिंदु समाजाने १०० वर्षांपुर्वी जुन्या व कालबाह्य झालेल्या रुढी परंपरांच ओझ झुगारुन दिल आणि अधुनिकतेकडे वाटचाल सुरु केली.

माझ्या लहानपणी बुरखा वापरणार्‍या स्त्रीया फार कमी होत्या. लोकसंख्या वाढ्ते आहे हा जरी भाग पाहिला तरी गेल्या १० वर्षात बुरखा वापरणार्‍या मुस्लीम स्त्रीयांची संख्या वाढ्ते आहे.

माझ्या मुलीने सांगीतलेली माहिती तर आणखीनच आश्चर्यकारक आहे. २००६ साली माझ्या मुलीबरोबर पुण्याच्या इंजिनियरींग कॉलेजमधे प्रवेश घेतलेल्या मुस्लीम मुलीने बुरखा घालुनच व्याख्याने आणि प्रात्यक्षिके ऐकणे /पहाणे सुरु केले हा माझ्यामते मोठ्ठा विरोधाभास होता.

मुस्लीम परंपरावादी विचारवंत आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान आम्हाला बदलायची गरजच नाही. हे मात्र फारसे पटत नाही याची कारणे अशी

१) तलाक सहजासहजी देता येतो आणि मेहेरकी रकम इतकी तुटपुंजी आहे की त्यावर आयुष्य सन्मानाने जगता येईल अशी शक्यता नाही. सबब घटस्फोटाचे वाढते प्रमाण अधुनिक समाजात वाढते हा विचार आकडेवारीच्या पार्श्वभुमीवर किती टिकेल याची शंका वाटते.

२) मुस्लीम कायद्यानुसार एका ऐवजी चार पत्नींची मुभा असलेली कुटुंबसंस्था कोणत्या उच्च दर्जाच्या कुटुंबव्यवस्थेचा मानक प्रस्थापित करतात हा संशोधनाचा विषय व्हावा.

मी चर्चा केल्या प्रमाणे तलाकपिडित महिलांची सोय व्हावी या साठी बहुपत्नीत्व हे शरीयत मधे मान्यता पावल असा विचार मला एका मुस्लीम विचारवंताने सांगीतला.

मुळात दुसरी / तिसरी किंवा चवथी पत्नी हिचा त्या कुटुंबातला दर्जा पहिल्या ( लाडक्या किंवा जिने घरावर नियंत्रण प्राप्त केले आहे अश्या ) पत्नी पेक्षा कितीतरी कमी असणार हे सांगायला कुणा विचारवंताचा आधार घेण्याची गरज नसावी.

३) वेश्या व्यवसाय हा विषय स्वतंत्र आहे यावर मला मत प्रदर्शन करता येणार नाही कारण अभ्यास नाही.

परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात परंपरावादी मुस्लीम विचारसरणीने संपुर्ण मुस्लीम समाजावर टाकलेला प्रभाव मात्र आश्चर्यकारक आहे. केवळ भारतातच नाही तर युरोपात सुध्दा हा विचार प्रभावी आहे.

केवळ बुरखा म्हणजे परंपरावाद असे मानण्याचे कारण नाही परंतु तो घरात पोचला याच प्रतिक म्हणजे बुरखा आहे अस मला वाटत.

मध्यंतरी सय्यदभाई यांची मुलाखत पहाताना मुस्लीम समाजात किती सुधारणांची गरज आहे हे जाणवले पण अश्या समाजसुधारकांची संख्या मोजकी आहे आणि त्यांचा प्रभाव वेगाने पुसला जातो.

परंपरावादाच्या मुळाशी सारे जग इस्लाम बनवण्याची निती खोलवर बसली आहे अस मला वाटत. प्रत्येक समाजाला अधुनिकतेचे आकर्षण असते जी परंपरेला झुगारुन अधुनिकता आत्मसात करण्याचा प्रयत्नात असते. यामुळे मुळच्या संस्कृतीचा प्रभाव कमी होत होत समाजा समाजातले अंतर कमी होते. हेच नेमके टाळण्यासाठी मुस्लीम परंपरावादी विचारवंत जुन्यातल्या जुन्या परंपरेचा पुरस्कार करतात जेणे करुन संपुर्ण जग दारेइस्लाम ची वाट मोकळी होते.

भारतात मुस्लीम धर्माचे लोक सरकारी पदांवर/ राजकारणातल्या महत्वाच्या पदांवर कसे लोकसंख्येच्या मानाने कमी आहेत हे दाखवणारे पुस्तक एका मुस्लीम आयपीएस अधिकार्‍याने लिहले आहे. हे पुस्तक सच्चर आयोगाच्या आकडेवारीवर आधारीत आहे.

माझ्या मते याची कारणे परंपरावादातच लपलेली आहेत.

लिखाण माझेच आहे. बऱ्याच पुस्तकांचा संदर्भ आहे आणि या विषयावर बऱ्यापैकी लिहून झाले आहे. निर्णय होत नाहीये कसे प्रसिध्द करायचे - मायबोलीवर प्रसिध्द करून थोडी चाचपणी करते आहे. इंग्रजी मध्ये असे लिखाण वाचायला सोपे जाते - जर तुम्ही त्या क्षेत्रात/ विषयात काम करत असाल किंवा तुम्हाला रुची असेल तर. मराठीत असे लिहायची पहिलीच वेळ त्यामुळे मलाच थोडे क्लिष्ट वाटत होते. बघुयात लोकांना कसे आवडते त्यावर पुढचे भाग इथे द्यावेत का याचा विचार करता येईल.

शबाना,

लेख आवडला. बरीच मेहनत घेतलेली दिसतेय! Happy

इस्लामी जगताने आधुनिकतेस दिलेले चार प्रकारचे प्रतिसाद चिंतनीय आहेत. लीबियाचा प्रतिसाद कोणत्या वर्गात मोडतो याची उत्सुकता आहे. जर कर्नल गदाफी नसता तर बहुतेक उदारमतवादाकडे झुकला असता (शेजारच्या ट्युनिशियाप्रमाणे). म्हंटलं तर लीबिया इटलीची वसाहत होता खरा, पण तत्पूर्वी ओथमन (ऑटोमन) साम्राज्याच्या परीघावर होता. त्यास वसाहती राष्ट्र म्हणता येईल का?

तसेच हा लेख (कदाचित लेखमाला) केवळ अरब जगतापुरता सीमित आहे का? असावासं वाटतंय. दोन प्रकारची उदाहरणे आहेत. पहिले मध्य आशियातील तुर्क/मंगोल राष्ट्रिकांचे आहे. त्यांचा रशियाशी असलेला संबंध वसाहतवादाच्या वळणावर जात असला तरी ही राष्ट्रिके बऱ्यापैकी स्वत्व राखून होती/आहेत. ही राष्ट्रिके मुस्लिम मानावीत का? दुसरं उदाहरण युरोपातील बोस्निया-हर्झेगोविना, अल्बानिया ही मुस्लिमबहुल राष्ट्रांचं आहे. मात्र तेथला इस्लाम ओथमन तुर्कांनी आणलेला होता. त्यामुळे त्यांची ओळख इस्लामी राष्ट्र अशी धरावी का?

खरंतर इस्लाममध्ये राष्ट्र ही संकल्पना मान्यताप्राप्त नाही. मिल्लत आहे, पण राष्ट्र नाही. मग आज ज्यास अरबी/इस्लामी राष्ट्रे म्हणतात ते नक्की काय आहे? इस्लामपूर्व संस्कृतींची प्रतीके आहेत का? तुमचे विचार वाचायला आवडतील. हे मुद्दे स्पष्ट झाल्यास चर्चा अधिक नेमकी होईल असं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

गा मा ,

माझे सगळे लेख एकाचवेळी मागता आहात -- आता पैलवान म्हणल्यावर भूक दांडगी असणार हे खरे Happy

एकूण नऊ भागात हा अभ्यास विभागाला आहे. प्रत्येक भागातील लोक, इतिहास, सद्यपरिस्थिति, राजकीय आव्हाने यावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परंतु यातील प्रत्येक घटकावर एक पुस्तक निघेल इतका हा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुढील अभ्यासासाठी काही संदर्भग्रंथांचा उल्लेख मध्येच केला आहे.

१. ओटोमान साम्राज्य आणि आजचा तुर्कस्थान

२. इजिप्त आणि मगरीब राष्ट्रे - लिबिया, अल्जिरीया, मोरोक्को, टयूनिशिया, मोरेटानिया

३. सौदी अरेबिया आणि गल्फराष्ट्रे

४इराण आणि शिया

५ पूर्वेकडची राष्ट्रे - सिरीया, जॉर्डन, लेबनॉन आणि इराक

६ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान

७. मलेशिया आणि इंडोनेशिया

८. सब -सहारन आफ्रीका

उभरती आव्हाने आणि पुढील दिशा

बाप्रे शबाना, भला दांडगा व्यापक पट आहे तुमच्या अभ्यासाचा! Happy अब आयेगा मजा! लवकर लिहा. खरोखरच भूक लागलीये. तुम्ही म्हणता ९ विभाग, पण ८ च विभागांची यादी दिलीत. बहुतेक मध्य आशिया राहून गेला. बरोबर? की जाणीवपूर्वक वगळलात?

आ.न.,
-गा.पै.

गा मा,

शेवटचा आकडा टाकायचा रहिला- पुढील दिशा .

मध्य आशिया मी तुर्कस्तान व ओटोमान साम्राज्यात घेतलाय कारण एकशे पन्नास वर्षाआधी हे भाग साम्राज्याचे भाग होते. हे लिहून झालंय - कसं - किती तुकड्यात पोस्ट करावे त्यावर जरा काम चालू आहे.

आधीच अवघड भाषा आणि विषय पण -- उगाचच लोकांनी दारे ठोठवायला नको सकाळ सकाळ या नोड्वर जाउन -- म्हणून थोडी काळजीपूर्वक आखणी --

तुमची गोष्ट वेगळी -- बऱ्याच माबोवाल्यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला त्यामुळे नक्कीच पचवाल -- इतरांसाठी थोडं काळजीपूर्वक पोस्टिंग हवं Happy

शबाना,

>> मध्य आशिया मी तुर्कस्तान व ओटोमान साम्राज्यात घेतलाय कारण पन्नास वर्षाआधी हे भाग साम्राज्याचे भाग
>> होते.

पण ओथमन साम्राज्य तर कास्पियन समुद्राच्या पूर्वेस नव्हतेच. मग आजचे किरगिझ, ताजिक, उझबेक, कझाख, तुर्कमेन (पूर्वीचे तुषार) आणि युगुर हे मुस्लिम लोकं कशात धरणार?

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही वर दिलेला चौथा गट तिसर्‍याचे extreme रुप आहे त्यामूळे तो वेगळा धरायचा का ? rigidity about islamic principles हा एक भाग सोडला तर त्यांच्यामधे फारसा फरक आहे का ?

तुम्ही केलेली मेहनत जाणवतेय. विषयाचा आढावा बघता वाहत जाउ शकणे साहजिक आहे. पण तुमचे वर्गीकरण नीट स्पष्ट झालेय. मधले काहि लेखकांचे संदर्भ कशा स्वरुपात येतात हे नीट उलगडत नाही. They are subject to interpretation अशा स्वरुपामधे होतेय. तिथे थोडे अधिक स्पष्टीकरण दिलेत तर चांगले होईल.

तुमची गोष्ट वेगळी -- बऱ्याच माबोवाल्यांच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला त्यामुळे नक्कीच पचवाल -- इतरांसाठी थोडं काळजीपूर्वक पोस्टिंग हवं >>त
Lol शबानांचा मायबोली अभ्यासक्रम पूर्ण झालेला दिसतोय.

गा.पै.जी

आपला ही अभ्यास खुप दिसतोय या विषयात.

मजा येईलच शिवाय खुप ज्ञान मिळेल ही लेखमाला आणि त्यावरची चर्चा वाचुन.

छान

shabana, malaa aavaDale he lekhan, ( mee anek varShe yaa deshaat vaastavya kelele aahe )
tareepaN ek vinanti, ithe maayaboli var lihitaanaa tumachee nehaeechee kheLakar shailee vaaparaan naa please.
gambheer Vishay kheLakar shaileet nakkeech maanDataa yeeel tumhaalaa.

Oman madhe tyaa maanaane khup aadhunik vichaaraanche lok aahet. tithale Sulatan Qaboos yaanee jaaNeevapurvak he kele aahe. tithe raahataanaa aapaN muslim deshaat rahaat aahot ase kadhee vaaTalech naahee.

tasech tumhaalaa na kanTaaLataa burakhaa, chaar baayakaa yaasaarkhyaa tyaach tyaach prashaNaachaa ithe saamanaa karaavaa laagaNaar aahe he paN laxaat asu dyaa.

( Oman madhe asale prashn naaheet Happy )

>>>> शबानांचा मायबोली अभ्यासक्रम पूर्ण झालेला दिसतोय. <<<<
तर तर, त्याशिवाय का..... Happy
लेखासोबतच प्रतिक्रियाही मायबोलीवरील जबरदस्त "अभ्यासू व व्यासंगी" लोकांच्या उपस्थितीची जाणिव करुन देतात बर का Happy

असामी,

>> तुम्ही वर दिलेला चौथा गट तिसर्‍याचे extreme रुप आहे त्यामूळे तो वेगळा धरायचा का ?

अत्यंत समर्पक निरीक्षण! मला वाटतं शबानांना या दोघांत फरक त्यांच्यात्यांच्या उद्दिष्टांवरून करायचा आहे. ३ वाल्यांचा इस्लामी राजवटीचे उद्दिष्ट गाठल्याचा दावा आहे. तर ४ वाले तेच उद्दिष्ट आजूनही गाठले गेले नाही असं म्हणताहेत.

३ वाले स्थितिवादी आहेत तर ४ वाले परिवर्तनवादी. मात्र हे परिवर्तन कसे घडवून आणावे यासंबंधी ४ वाल्यांत अनेक तट आहेत. (बरोबर ना, शबाना?)

नुकतीच बातमी आली की सौदी अरेबीय सरकारने नास्तिकांना दहशतवादी घोषित केल्याचा कायदा आणला आहे. माझ्या मते हे ३ विरुद्ध ४ या सामन्याचं फलित आहे.

आ.न.,
-गा.पै.

नितीनचंद्र, माझा कसला हो अभ्यास. हां, पण आवड आहे या विषयांची. आणि ते जी लावणं सोडा हो! उगीच वय वाढल्यासारखं वाटतं! Wink
आ.न.,
-गा.पै.