मरीनची गोष्ट

Submitted by Barcelona on 25 March, 2014 - 09:42

मरीनची गोष्ट

मरिनने बोलायला सुरुवात केली आणि अख्खा लंडनचा रॉयल अल्बर्ट हॉल टाळ्यांच्या गजरात बुडाला. त्या गजरात चार दिवसापूर्वीचे वसिली पेत्रेन्कोचे वक्तव्य जणू गटांगळ्या खात होते. वसिली हा दि नॅशनल यूथ ऑर्केस्ट्रा आणि रॉयल लिव्हरपूल फिलहार्मोनिकचा प्रिन्सिपल कंडक्टर! त्याच्या मते समोर एखादी गोड बाई बटान नाचवत ऑर्केस्ट्रा कंडक्ट करू लागली तर वादकाच चित्त एकाग्र कसे होणार? हे काम पुरुषांनीच करावे. एकटा वसिलीच नव्हे तर इतर अनेकांचे मत अशाच पद्धतीचे होते (फक्त कारणे वेगळी), - घरगुती जबाबदाऱ्या असल्या की स्त्रियांना कंडकटींग झेपणार नाही; काहींची मते जरा अधिक “रिफाइंड” होती - स्त्रियांनी वाटल्यास मोझार्ट कंडक्ट करावा पण मालरच्या भानगडीत पडू नये. पण जेव्हा ब्लोंड, आखूड केस असलेली, आपल्या गोऱ्या रंगाला साजेसा लाल किनारींचा काळा सूट घातलेली, हसरी ५७ वर्षाची मरीन अल्सोप बोलायला उभी राहिली तेव्हा ७ सप्टेंबर २०१३ रोजी तिने एक इतिहास घडवला होता. दि लास्ट नाईट ऑफ दि प्रॉम हा जणू लंडनचा सवाई गंधर्व महोत्सव समजा, पण ११८ वर्षाच्या इतिहासात माएस्त्रो म्हणून तिथे स्त्रियांना अलिखित मज्जाव होता. अशा ह्या लंडन संगीत सोहळ्याची मरीन पहिली माएस्त्रा! मरीन सहजपणे बोलू लागली “साल २०१३ असाव आणि एका स्त्रीच्या संदर्भात ‘पहिली’ हे विशेषण वापरलं जावं हा मला बसलेला धक्का आहे. माझ्या आयुष्यात मला पालकांनी सुबत्ता दिली नाही पण त्यांनी मला दिली - अमर्याद संधी”

खरच अमर्याद संधी! मरिन ९ वर्षाची होती तेव्हा तिला तिच्या शाळेच्या ऑर्केस्ट्रामधून काढून टाकले कारण लहानगी मरीन दुसऱ्या ओळीत व्हायलीन वाजवताना इतरांना जणू ‘लीड’ करीत होती. मग एका कॉन्सर्ट मध्ये तिने लिओनार्ड बर्नस्टीन ह्यांना कंडक्ट करतांना पाहिलं. मरीनला वाटले “अरेच्च्या ह्याला कसे कोण काढून टाकत नाही?” तेव्हा वडिलांनी मरीनला कंडक्टरचे काम काय असते ते सांगितले -जसं एखाद्या नाटकाचा दिग्दर्शक लेखकाची संहिता नटान्मार्फत प्रेक्षकांपर्यंत नेतो तसंच कंडक्टर हा कंपोजरचे संगीत वाद्कांमार्फात श्रोत्यांपर्यंत नेतो. मरीनने निश्चय केला मी कंडक्टर होईन. नंतर २-३ वर्षाने तिने तिचा हा निर्णय आपल्या व्हायलीन शिक्षिकेला सांगितला. हसून तिची शिक्षिका म्हणाली “अग लहान आहेस तू अजून, शिवाय मुली हे काम करीत नाही.” मात्र मरिनने हे जेव्हा आईला सांगितले तेव्हा आई तिच्या पाठीशी उभी राहिली. पुढच्याच शनिवारी आईने मरीनसाठी सुंदर लाकडी बटानचा सेट आणला. पण घरी मिळणारे प्रोत्साहन आणि संधी, आणि बाहेरच्या जगातील संधी ह्यात जमीन अस्मानाचा फरक होता. मरीनने व्हायलीन विषयात प्रख्यात ज्युलीयार्ड स्कूलमधून मास्टर्स पदवी मिळवली पण कंडकटींग हे अद्यापही स्वप्नच होते. मरीनला आता टॅन्गलवूड म्युझिक सेंटर आणि तिथली कंडकटींगची शिष्यवृत्ती खुणावत होती.

संधीची एक मोठी गंमत असते. कुठलीही गोष्ट शिकायची संधी मागताना ती गोष्ट आपल्याला येते हे आधी सिद्ध करावं लागत. कंडकटींगची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आधी कंडकटींगचा अनुभव आहे हे सिद्ध करावं लागत. परंपरा काटेकोरपणे पाळणाऱ्या ऑपेरा, सिम्फनीच्या क्षेत्रात मरीनचे स्त्री असणे हे तिच्या प्रगतीच्या मार्गात अडसर ठरू लागले. कुणी कंडकटींगची संधी देत नाही पाहून मरीनने स्वतःच्या स्ट्रिंग bandमधील मित्र-मैत्रिणीच्या मदतीने एक ऑर्केस्ट्रा बनवला. चार वर्ष सतत अर्ज करूनही टॅन्गलवूड शिष्यवृत्ती हुलकावणी देत होती. आशा आणि निराशा जणू पाठशिवणीचा खेळ खेळत होत्या. अपयशाने खचून न जाता जास्त जोमाने मरीन पुढील वर्षाची तयारी करीत असे. शेवटी पाचव्या वर्षी मरीनसाठी टॅन्गलवूड म्युझिक सेंटरचे दरवाजे उघडले आणि लिओनार्ड बर्नस्टीन तिला ‘मेंटर’ म्हणून भेटले. वयाच्या ९ व्या वर्षी पाहिलेले स्वप्न आज वयाच्या ३०व्या वर्षी समोर वास्तव म्हणून उभे होते. लवकरच मरीन उत्तम विद्यार्थ्यासाठी असलेले पारितोषिक पटकावून उत्तीर्ण झाली. पुढे मरीन सान्ता क्रूझ, यूजीन, आणि कॉलोराडो ह्या लहान ऑर्केस्ट्रासाठी कंडक्टर/माएस्त्रो झाली.

अशातच २००५ साली एक संधी चालून आली - बाल्टमोर सिम्फनी ऑर्केस्ट्रा. अमेरिकेतील एक मोठा आणि नामवंत ऑर्केस्ट्रा. मरीनची तिथे निवड झाली आणि एक नवीनच वावटळ उठली. तेथील ८०-१०० वादकांचा ताफा जणू बंड करून उठला. नवीन माएस्त्रोच्या निवडीत सहभागी केले नाही म्हणून उघडपणे वादक नाराजी व्यक्त करू लागले. छुपा विरोध मरीनच्या स्त्रीत्त्वाला होता असेही ऐकीवात होते. वर्तमानपत्राचे रकाने अनावश्यक प्रसिद्धीने भरू लागले. वादकांची मर्जी नसताना पद स्वीकारावं तरी पंचाईत आणि न स्वीकारता निघून जावे तर व्यावसायिक अपयश तेही स्वतः ची काहीही चूक नसताना - मरीनची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली. एक दिवस मरीन जेव्हा वादकांची तालीम चालू होती तेव्हा आगंतुकपणे तिथे गेली आणि मला ५ मिनिटे बोलू द्या अशी विनंती तिने त्यांना केली. जाण्याआधी मरीनने त्या संस्थेचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता - बाल्टमोर ऑर्केस्ट्रा नामवंत असला तरी गेल्या काही वर्षात त्यांचे एकही रेकोर्डिंग झाले नव्हते, मिलियन डॉलरचे कर्जही डोक्यावर होते, एक ना एक अनंत अडचणी आणि त्यातून जन्माला आलेला वाद्कांमधला असंतोष. मरीनने आत्मीयतेने वादकांशी संवाद साधला आणि आपल्या भविष्यातील योजना त्यांच्यापाशी मांडल्या. मरीनने हे ही स्पष्ट केले कि वादकांचा पाठींबा नसेल तर ह्या पदाला अर्थ नाही आणि ह्या परिस्थितीत ती ते स्वीकारणार नाही. मरीनचे नेतृत्त्वगुण आणि संगीत कौशल्य पाहून वादकांनी लगेच तिला आपला पाठींबा जाहीर केला. आज आठ वर्षानंतर बाल्टमोर सिम्फनीवर कोणतेही कर्ज नाही, रेकोर्डिंग होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनतेचा फार मोठा पाठींबा बाल्टमोर सिम्फनीला मिळाला आहे.

जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी मरीनने दोन छान योजना आखल्या. अभिजात संगीताचे बलस्थान म्हणजे ते अभिजन, जाणकारांसाठी असते पण अभिजात संगीताचा ‘विक पोइण्ट’ म्हणजे ते अभिजन, जाणकारांसाठी असते. मरीनला हे संगीत जनतेसाठी खुले करायचे होते. बाल्टमोर सिम्फनीच्या प्रत्येक वादकानी एका शालेय विद्यार्थ्याला विनामूल्य शिकवावं अशी काहीशी पहिली योजना होती. बाल्टिमोर परिसरात अनेक गौरेतर आणि गरीब विद्यार्थी होते, त्यांना संगीत शिकायला संधी मिळत नसे. मरीनला सर्वांना संधी मिळावी हे मनापासून वाटे. मात्र ह्या योजनेसाठी वादकांनी पार्कींग कुठे करावे इथेपासून ते मोबदला किती इथेपर्यंत अनेक अडचणी मांडल्या. मरीन जवळजवळ एक वर्ष अडचणी ऐकत होती आणि सोडवत होती. शेवटी ३० विद्यार्थ्यांना शिकवता येईल असे लक्षात आले आणि योजना सुरु झाली . पण ह्या योजनेला विद्यार्थी आणि सेवाभावी लोक यांचा इतका प्रतिसाद मिळाला की आज तीन वर्षानंतर तिथे ६०० विद्यार्थी शिकत आहेत. लहान मुलांना संधी मिळावी तशीच मोठ्यांच्या अपुऱ्या स्वप्नांनाही पूर्तता यावी असे मरीनला वाटे. म्हणून ‘रस्टी म्युझिशियन’ हा प्रयोगशील/प्रायोगिक कार्यक्रम आखला. बरेच लोक संगीत शिकतात, ऑर्केस्ट्रामध्ये भाग घ्यायची इच्छा असते पण वेळ-पैसा ह्या अभावी जमत नाही. अशा हौशी लोकांना एक संध्याकाळ जर बाल्टमोर सिम्फनी बरोबर ऑर्केस्ट्रामध्ये भाग घ्यायला मिळाला तर? स्वप्ने उशिरा पूर्ण झाली म्हणून होणारा आनंद हिणकस थोडी ठरतो? मग त्या आनंदापासून का दूर राहायचं? मरीनने ४० लोक येतील अशा अंदाजाने वेबसाईटवर “रस्टी” ह्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि २४ तासात ४०० लोकांनी नाव नोंदवले. मरीनने कुणालाही वगळले नाही. स्वतः दोन दिवस सलग ८ तास ऑर्केस्ट्रा कंडक्ट केला, सर्व लोकांसाठी जणू संगीताचे अन्नछत्र तिने उघडले होते.

अशा अनेक अनुभवांनी समृद्ध आणि आपल्या ‘कंडकटींग’ कलेत वाकबगार मरीन! ती लंडनच्या दि लास्ट नाईट ऑफ दि prom साठी निवडली गेली ह्यात कुठलेच आश्चर्य नव्हते. समाधान, आशा आणि आनंद ह्यांच्या समेवर मरीनने आपले भाषण संपवले. टाळ्यांच्या कडकडाटात, वाद्यांच्या गजरात prom संपले. पण मरीनची गोष्ट अजून संपली नाही. ती संपवणार आहोत तुम्ही आणि आम्ही आपापल्या पद्धतीने. ज्याला वेळीच पांगुळगाडा मिळाला नाही असं आपल स्वतःच एक स्वप्न कुठेतरी कोपऱ्यात पडलय. आज त्याला थोडं ओंजळीत घ्या. मरीनची गोष्ट उन्हाची तिरीप होऊन त्या स्वप्नावर पडेल आणि पडलेल्या कवड्श्यानी आपलं घरदार उजळेल. मरीनची गोष्ट तेव्हा संपेल.

बाल्टमोर सिम्फनी लिंक - http://www.youtube.com/user/BSOmusic?feature=watch

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख (आणि सुरात असलेला) लेख! सिमंतिनी, मरिनची गोष्ट सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद! शेवटच्या परिच्छेदाला वरचा सा!

खूप मस्त लेख आणि शेवटच्या परिच्छेदातील शेवट्च्या ओळी म्हणजे, बावनकशी सोन्याचा लखलखता झळाळता कळसच जणू....

अनेकानेक धन्यवाद Happy

शेवटच्या तीन ओळी थेट भिडल्या... आत कुठेतरी काहीतरी लक्ककन हललं... धावता धावता कधी कधी अचानक येणारं नैराश्य हे यासाठीच होतं होय?? पुन्हा एकदा स्वतःला तपासून पाहीलं पाहीजे... बरंच काहीतरी आत तसंच बाकी राहीलं असावं... नुसतंच पडून राहीलेलं नी एव्हाना सडायला लागलेलं... वेळीच त्याच्यावर उपाय करायला हवा... धन्यवाद!

बाकी लेखनशैली खरंच खूप प्रसन्न आणि ओघवती! मरीन आतपर्यंत पोहोचली... Happy

Pages