आमचेही प्रवासवर्णन...

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 March, 2014 - 06:22

मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो. (आमच्याकडे आजकाल प्रत्येक वळणावर आढळणार्‍या भाजीच्या गाडीला मंडई म्हणण्याची प्रथा आहे. कसं भारदस्त वाटतं). आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो. आधी सौ बाहेर पडल्या नंतर मी. (लोक म्हणतात बायकोच्या तालावर नाचतो, पण हा जमाना Woman Empowerment चा आहे याचा कोणी विचारच करत नाही). दाराला कुलूप लावून शेजारीच असलेल्या लिफ्टचे बटन दाबले. तशी सौ ने हाक दिली, "अरे, आपले आता नेहमी जिन्यानेच उतरायचे आणि चढायचे ठरलेय ना. शेजारच्या गोडबोलेकाकूंनी ,"तुझ्या नवर्‍याची तब्येत सुधारलीय हो आजकाल." असे सांगितल्यापासून सौ. कायम सारख्या माझ्या पोटाकडे (त्याला ती ढेरी म्हणते) नजर ठेवून असतात. चक्क दोन इंच आणि दिड सेंटीमीटर वाढलीय तुझी ढेरी. असे ती मला येता जाता सांगत (हिणवत) असते. मी विरोध करायचा प्रयत्न केला पण या आधी कधीच मी माझ्या पोटाचा आकार मोजलेला नसल्याने ते आधी किती इंच आणि किती सेंटीमीटर वगैरे होते हे नक्की माहीत नाही. त्यामुळे खात्रीने नक्की किती वाढलेय हे मी सांगू शकत नाही. ती याचाच गैरफायदा घेते.

असो तर आम्ही (थोड्या-थोडक्या नव्हे) तब्बल साडे तेवीस पायर्‍या उतरून खाली आलो. जिन्याची सगळ्यात खालची पायरी अर्धी तुटलेली आहे म्हणुन साडे तेवीस. शेजारच्या गोडबोलेकाकूंच्या हातातून सुटलेला त्यांच्या मुलीचा गाऊन त्या पायरीवर पडला होता म्हणे. ( आमची ही फणकार्‍याने म्हणते, त्या गाऊनमध्ये गोडबोल्यांची सुमी पण होती हे नाही सांगत मेली) असो, तर साडे तेवीस पायर्‍या उतरून आम्ही आमच्या दुचाकीकडे निघालो. रस्त्यात मध्येच पसरलेल्या जगतापांच्या टिप्या*कडे पाहात आम्ही हळूच स्मित केले तर त्याने चक्क मान फिरवली.
(जगतापांची सुशी वाईट्ट मारु दिसते आणि ती कायम टिप्याबरोबर खेळत असते).

सौ.ने अर्थातच मला खिजवण्याची एकही संधी न सोडण्याची शपथ घेतलेली असल्याने, ही संधीदेखील सोडली नाही आणि टोमणा मारुन घेतलाच...
"परवा तू देशपांडे काकांना ऐकवण्याच्या मिशाने त्या चकण्या सुशीला आपली नवीन कविता (खरे तर सौ. 'नव-कविता' म्हणाली होती) ऐकवत होतास ना, तेव्हा ती कविता टिप्याने पण ऐकली होती. त्यामुळेच कदाचित त्याने मान फिरवली असावी.

(कधी कधी मला शंका येते, मी हापिसाला गेल्यावर आमची ही त्या 'गुप्तहेर खमणरावांची'** सेक्रेटरी म्हणून पार्टटाईम काम करते की काय? कमाई बरी होत असावी. कारण गेल्या आठवड्यात माझ्या पायजम्याच्या खिश्यात असलेल्या अकरा रुपये पंचाहत्तर पैशापैकी फक्त ९ रुपये आणि ३५ पैसेच गायब झालेत - ** खमणराव)

असो, दुचाकी पाशी पोचल्यावर लक्षात आले की कुलूपाची चावी वर घरातच राहिली आहे. आमच्या दुचाकीचे कुलूप गेल्यावर्षी चोरीला गेले, तेव्हापासून मी दुचाकी नेहमी साखळीने बांधून ठेवतो. (खरे सांगायचे तर मी चावी मुद्दामच विसरून आलो होतो. दुचाकीचे टायर खुप लवकर झिजतात हो आजकाल. गुणवत्ता म्हणून कसली ती राहीलेली नाहीये बघा). सुदैवाने आमच्या बिल्डींगीपासून भाजी मंडईपर्यंत यायला कुणीही टांगेवाला यायला तयार नसल्याने आम्ही चालतच जायचे ठरवले. तसेही आमच्या कॉलनीच्या फाटकाबाहेर पडले की डाव्या हाताला शंभुसाचे मिरची कांडप यंत्र आहे, त्याच्या शेजारीच झोप्या मारुती. (नाही..नाही, इतिहास वगैरे काही नाही. रिकामटेकडे लोक दुपारची जेवणं झाली की तंगड्या पसरायला या मारुतीचा पार गाठतात म्हणून तो झोप्या मारुती) तर आम्ही तेथपर्यंत चालत जाऊन (तेवढ्येच क्यालरी बर्नींग पण होते हो) भाजी आणायची असे ठरवले. चालत चालत, रमत गमत, आजुबाजुचे निसर्गसौंदर्य (म्हणजे ती निसर्ग पाहत होती आम्ही सौंदर्य पाहात होतो) न्याहाळत आम्ही मंडईपर्यंत येवून पोचलो.
त्या कोपर्‍यावर बसलेल्या आज्जीबाईला मिरच्या आणि कोथिंबीर कडिपत्ता मागताच...

"मुडद्या, आतपाव मिरच्या मिळाचे दिस हायेत का हे? आन रुपयात कोतमीर कडिपत्ता तुझ्या काकानं तरी दिला व्हता का रे?" असे तीक्ष्ण शरसंधान करत चारचौघात आमची XXX काढली.

आम्ही पण अजिबात ऐकून घेतले नाही. "थांब थेरडे, तुझी तक्रारच करतो मुक्तपिठल्याच्या चौकीत म्हणजे कळेल तुला?" असा सज्जड दम दिला आणि सौभाग्यवतीच्या चेहर्‍यावरचे कौतुकाचे भाव बघत पुनश्च घराच्या दिशेने परतीच्या प्रवासास लागलो. त्यानंतर काही दिवसांनी त्यावेळी आमच्या सौभाग्यवतींच्या डोळ्यातले भाव कौतुकाचे नसुन कुत्सीतपणाचे असतील असा अतिकुत्सीत शेरा गोडबोलेकाकूंनी मारलाच. त्यावर मीही त्यांना ,"आजकाल तुमच्या सुमीचे वजन कमी झाल्यासारखे वाटतेय" असे म्हणून सुड घेवूनच टाकला. तर अशाप्रकारे आमचे हे मंडईप्रवासाचे प्रवासवर्णन पुर्ण झाले.

*टिप्या : हा जगतापांचा अतिशय गोंडस कुत्रा आहे.

*********************************

आगामी आकर्षणः पुढच्या वेळी, मागच्या वेळेस आम्ही दुचाकीच्या चाकात हवा भरून घेण्यासाठी शेजारच्या गल्लीतल्या वरल्ड्फेमस "मर्चीडेस सायक्ल शॉप' मध्ये गेलो होतो, त्या प्रवासाचे साद्यंत प्रवासवर्णन सादर करु.

तळटिप : प्रस्तुत लेख आम्ही सकाळ वृतपत्राच्या मुक्तपीठ या काही अभ्यासु लेखकांनी चालवलेल्या उपक्रमाने प्रेरीत होवून लिहिलेला होता. पण त्यांना आमचा हा लेख बहुदा जखमेवर मीठ वगैरे वाटल्याने साभार परत आला.

वि.सु. : आमच्या शेजारच्या गोडबोलेकाकुंचा जर तुम्हाला फोन आला तर त्या सांगतील की आमच्या बिल्डींगीला लिफ्टच नाहीये. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण ते खरेच आहे. बिल्डींगीला लिफ्ट असली की स्टेटस वाढतो असे एका थोबडापुस्तिकेवरच्या स्नेह्याने सांगितल्याकारणे आम्ही तसा उल्लेख केलेला आहे. पण गोडबोलेकाकुंचा तुम्हाला फोन येणारच नाही कारण त्यांच्याकडे फोन नाहीये आणि त्या शेजार्‍यांकडे फोन करायला गेल्या की लगेच शेजार्‍याचा (आमचा पण) फोन बिघडतो. ठेंगा !

ईरसाल म्हमईकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असंच काही नाही . ठाण्याला उतरायचं आणि घोडबंदर मार्गे बोरीवली गाठायचं.

आयुष्याची १४ वर्षे मुंबईत काढलीयेत राव आम्ही पण , म्हणून तर ईरसाल "म्हमईकर" Happy
अर्थात विमान सोडून बोटीने प्रवास करायचा म्हंटलं की वेळ हा लागणारच Wink

वेळ लागणार आणि बोटपण लागणार .
आताच विशालराव लेखनात डोकावलो .दालने बरीच आहेत .दम खातोय .दुर्ग भटकंती आवडते म्हणून वज्रगड - ,लिंगुबाचा - पाहायला गेलो .उघडत नाही .पर्थचा सूर्यास्त छान फोटो आहेत .बाकीचे लेख वाचायला महिने लागतील इतके लेखन आहे .केवळ भन्नाट आहे .

आमचा पासपोर्ट जप्त झाला आहे .

आता त्या राजकुमारांच्या कथेसारखे झालं .राजा सांगतो मला जे सांगितले तेच तुम्हाला सांगतो सातवी खोली उघडू नका .सातव्या खोलीचीच चावी शोधणार ते राजकुमार (?)हे सांगायला नको .लागू दे शॉट डोक्याला .कुठे गेलं ते वर्तुळ ?

विशालराव आम्हाला समजून घेतील ही आशा बाळगतो .

Biggrin लिहिलंस का प्रवासवर्णन?

शेवटी कोथिंबीर काय भावानं मिळाली? कोथिंबीरवाल्या आजी अंगावर खेकसणारच! पुढच्या वेळी प्रवासाला जाताना तिथला विनिमयदर माहिती करून घे. त्याकरता इथे एक बाफ काढलास तर लगेच माहिती मिळेल.

आंतरराष्ट्रिय प्रवासाचे वरणन लौकर टाका हो राव नैतर आमच्यावर आंबट "वरण"न वाचायची वेळ येईल. उन्हाळा वाढलाय आता.

मामी... काही आठवलं कोथिंबीरीवरून ?

मामीचे माहित नाही, पण मला आठवलं Happy

ह्यांना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ओळखते. ह्यांनी स्वतःला वाहून घेतलाय निसर्गसेवेला. सुमधुर आवाज आणि स्थूल व्यक्तिमत्व हि ह्यांची खासियत. गुटखाबंदीवर ह्यांनी मोर्चे काढले आहेत आपल्या शेतात. लिखाण आणि खाणे ह्याचबरोबर पिणे ह्यांचा शौकीन. भूभूत्कार आणि श्वास ह्यांच्यावर प्रचंड हुकुमत असलेला माणूस. त्रिवार दंडवत. होतकरू तर आहेतच पण विलक्षण चपळ आहेत. खोखो टीम चे माननीय कप्तान आहेत हे. सार्वजनिक कार्यात एक नंबर. कमावलेला आवाज आणि शरीरयष्टी ह्यांचा सुरेल संगम. गझल लिहितात आणि अत्यंत प्रेमळ. जो आवडे सर्वांना तोचि आवडे देवाला. दानशूर माणूस. पण मी, माझे, मी कसा शूर वीर, मी कसा ध्येयवादी, मी किती हुशार, माझे किती लाड होतात.. नेहेमी फक्त मी मी आणि मी असाच जोशींचा स्वभाव. तुमचा लेख लिहिण्यामागचा हेतू काय होता हो? नाही म्हणजे काहीच काम नसेल तर लसूण वाटावे किंवा प्राणायाम करावा. लेख लिहिलाच पाहिजे असे काही नाही.

Pages