शाळा - चार भिंतींच्या पलिकडची

Submitted by bnlele on 20 March, 2014 - 07:34

माझ्या वडिलांनी स्थापन केलेली शाळा- महाराष्ट्र विद्यालय, ही मध्य प्रदेशातील १९३५ साल पासून सुरू आहे.
गेल्या दोन दशका पूर्वी शाळेनी मराठी माध्यम विद्यार्थ्यांच्या आभावामुळे काढून केव्ळ हिंदी आणि इंग्रजीतून सुरू ठेवल आहे. खंत असली तरि शाळेचे विद्यार्थी देशभर पस्रलेले संघटित होऊन मराठी माध्यम पुन्रजिवीत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. संघटनेला भरपूर प्रतिसाद आहे; केवळ पुण्यात ३०० माजी आजवर तीनदा एकत्र आले आहेत आणि हजारवर माजींचे संपर्क साधले गेले आहेत. गेल्या १२ जानेवारीला झालेल्या सम्मेलना निमित्त मी लिहिलेल्या आठवणीं खाली देत आहे. कदाचित आवडेल वाटले म्हणून-------

शाळा - चार भिंतींच्या पलिकडची

काका आणि ओकमास्तर या द्वयीची शैक्षणिक क्षेत्रातली कारकीर्द केवळ महाराष्ट्र विद्यालयापुरतीच सीमित नव्हती.
ते सोनेरी पान मध्यप्रांत आणि देशातल्या अनेक अन्य राज्यात कौतुकानी स्मरणारे अनेक शिक्षाशास्त्री मी लहानपणापासून
पाहिले आहेत.
त्या दोघांची मैत्री एका स्वतंत्र लेखाचा विषय असला तरी विषयांतराचा क्षणिक अपराध मी करणार आहे.
ओकमास्तर रोज सकाळी सायकलवर फिरून हिंदी-मराठी कुटुंबांना भेटून प्रत्येकी एक रुपया देणगीदाखल रीतसर पावती देऊन गोळा करीत. फेरीच्या शेवटच्या टप्प्यात काकांच्या भेटीला येत. काका पण त्यांची आतुरतेने वाट पाहत असत. ते आले की "किती उशीर केलास रे रोठ्या" असे संबोधून स्वागत करायचे. कधीकधी एकमेकांना दंड थोपटून प्रेमानी गुद्देपण मारायचे. त्यांची सायकल शहरात सर्व परिचित होती, तिला सीट आणि हॅंडलच्या मधल्या भागात कॅनव्हासची मोठी बॅग लावलेली असे पावतीपुस्तक, वर्तमानपत्र, कागदपत्र ठेवण्या साठी. स्वार झाले की तोंडानी मोठ्यांदा श्लोक म्हणायचे. विशेष म्हणजे तोंडात एकही दात नसता उच्चार अतिशय स्पष्ट, पंडितांनी लाजावे असे !

व्हरांड्यातल्या दोन खुर्च्यांवर बसून आपसात तासभर चर्चा करायचे. आईनी (तिला काकू म्हणायचे सगळे) दिलेले दुधाचे पेले अनेकदा त्यांना नेऊन दिल्याचे आठवते. त्या चर्चांचे गूढ मात्र मी शाळा सोडल्यानंतर काही काळानी उलगडले !
जनसंपर्कातून मासिक चिल्लर देणग्या गॊळा करण्याचे काम ओकमास्तरांचे. मोठ्या देणगीदारांचे क्षेत्र काकांनी हताळायचे
असा अलिखित करार पाळत असत. ब्रम्हाणीच्या एका मालगुजाराकडे अशा भेटीला गेले तेव्हा मी बरोबर होतो. मी तर त्या मालगुजारांना बघून घाबरलो; उघडबंब, भक्कम, केसाळ स्थूलकाया, टकलापर्यंत कपाळावर,दंडांवर, छातीवर लाल-पिवळ्या गंधाचे पट्टे ! माजघरात टपून बसलेल्या बोक्याचीच आठवण व्हावी ! आम्ही प्रवासात असताना काकांनी सांगितले की ते खूप श्रीमंत, सडाफटिंग असले तरी अत्यंत कंजूस आहेत. सहज मोठी देणगी मिळवणे थोडे कठीण असणार. कंटाळा आला तर जवळपास फिरून ये. दोघांची चर्चा चालू झाल्यावर मी बाहेर पडून त्यांच्या शेतांचा प्रचंड विस्तार पाहून अचंबित झालो. परत आलो तेव्हा मालगुजार उठून मागच्या कपाटाकडे वळले होते. काकांनी मला बस म्हणून खुणेनीच सांगितले.
मालगुजार एव्हाना जानव्यात लावलेल्या अनेक किल्ल्यांपैकी एका भल्यामोठ्या किल्लीनी तेवढेच मॊठे लाकडी कपाट उघडत होते. कपाटाची एक फळी उघडताच नोटांची बंडलंच बंडलं त्या कैदखान्यातून सैरावैरा खाली पडू लागली ! त्यांनी धोतराच्या सोग्यात पटकन घेतली आणि टोक निरीत खोचले. बाहेर पडणारे गठ्ठे पुन्हा आत कोंबून कपाट बंद करायला केवढी कसरत ! एक गुढघा आणि एका हातानी दार रेटून कपाट तात्पुरत बंद झालं पण कुलूप लावायला त्यावर खांद्याचा रेटा पण द्यावा लागला. घाम पुसत आपल्या गादीवरच्या लोडावर निपचित रेलून होते. काकांना म्हणाले "मोजून पंचवीस हजार ठेवा माझी देणगी म्हणून आणि बाकीचे परत द्या." रीतसर पावती देऊन आम्ही परत आलो. वयाची आठ-दहा वर्षे असता मिळालेला हा अनुभव ! असो. आवरता आलं नाही म्हणून विषयांतर केल्याचं सोंग केलं पण खरी गोष्ट ही की शाळेच्या तिसर्‍या मजल्याचं दोघांनी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यास त्यांनी जे अतोनात कष्ट घेतले त्याची झलक दाखवायची होती म्हणून.
हिंदी भाषिक राज्यात मराठी मुलांनी मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी अनेकविध उपायही केले. शाळेचे स्वतःचे प्रांगण नसताना प्रचार पत्रकात घोड्यावर बसणे, पोहायला शिकणे, मलखांब-जंबिया आणि तत्सम व्यायाम शिकणे अशा सुविधा देण्याचा उल्लेख असे. अर्थात, म्युनिसिपालटीचं गोलबाजारतलं मैदान, महाराष्ट्र व्यायाम शाळेची तरतूद विचारात घेऊन; पोहणं शिकण्यासाठी संग्राम सागरचा तलाव आणि एरवी फुकट शिकविणारे मराठी-हिंदी स्वयंसेवक डोळ्यासमोर ठेऊन. घोड्यावर बसणे आणि बंदूक चालविणे यासाठी काय योजल होतं ते कळल नाही.
शहरात एरवी आलेल्या सुप्रसिद्ध व्यक्तींना आवर्जून शाळेच्या भेटीला पाचारण करायचे आणि प्रार्थनेच्या किंवा अन्य सोईच्या वेळी मुलांशी त्यांचे संवाद घडवून आणायचे. संगीत तज्ञ पंडित विनायकबुवा पटवर्धन प्रार्थनेच्या वेळी आले असता त्यांनी राष्ट्रगीत म्हणायला शिकविल्याचे स्मरणात आहे. सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी कमाल कल्पकतेनी शाळेच्या चार भिंतीं पलीकडे काही उपक्रम तेवढ्याच जिद्दीनी राबविले गेले. काही ठळक - ज्यात मी भाग घेत असे ते नमूद करतो.

दर वर्षी स्नेहसम्मेलनाच्या सुरवातीला शाळेचे वेळापत्रक संपूर्णपणे विद्यार्थ्यांवर सोपविलेले असायचे.मुख्याध्यापक, शिक्षक, चपरासी अशा भूमिका नियोजनानुसार विद्यार्थीच पार पाडायचे. स्थानिक शिक्षक प्रशिक्षण कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या भूमिकांचं मूल्यांकन करायचे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे सलग दोन महिने लोहार-सुतार फर्निचर दुरुस्ती करीत. स्वेछेनी मुलं त्यांना मदतीला आमंत्रित असायची. सुतारकामाचे धडे अनेक मुलांबरोबर मीही घेतले. भोजराज नावाच्या एका सुताराला ओक मास्तरांनी सातवी/आठवीत निशुल्क प्रवेशच दिलेला होता आणि त्या शिवाय एक नथ्थू नावाचा सुतार कामासाठी असायचा. रामभाऊ ठोसर फावल्या वेळात फ्रेटवर्क शिकवीत आणि त्यांचे बंधू- केशवराव फोटोग्राफी.
ओकमास्तर नित्य नेमानी गोलबाजाराच्या मैदानावर मुलांना सकाळी सहा वाजता या म्हणायचे, त्यांना तासभर धावायला सांगायचे आणि नंतर भिजवलेले मूठमूठ चणे द्यायचे. शाळेतर्फे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नाममात्र खर्चात अमरकंटक आणि पचमढीच्या सहलीही आयोजित केल्या. या प्रयासांचं शैक्षणिक महत्व वेगळ्यानी सांगायची आवश्यकताच नाही. या व्यतिरिकत्त शाळेच्या आतल्या चौकात वर्गांच्या बाहेरच्या भिंतींवर बरेच फळे केलेले होते. त्या फळ्यांवर र्शिक्षकांच्या देखरेखीत मुलांनी पाक्षिकं चालविण्याला प्रोत्साहित करायचे. सुवाच्य हस्ताक्षर असलेली मुलं मजकूर लिहिण्यात अभिमान बाळगायची. शैक्षणिक उपयोगी लेख-कविता, व्यंगचित्र मुलांची स्वतःची असायची. "मार्मिक" नावाचं पाक्षिक संपादित केल्याची आठवण आहे.
कुणी गोखले नांवाचे मास्तर काही काळ क्रिकेट आणि बेस बॉल शिकवायला होते त्याची पुसट आठवण आहे.
दत्तोपंत गोडबोले, रामभाऊ ठोसर, ‌ऋषिमास्तर चित्र कलेचे वर्ग अतिरिक्त वेळेत घ्यायचे; तसेच स.भ.देशपांडे गायनाचे आणि रामदास नृत्याचे वर्ग घेत. शिक्षण पद्धतीचे जे अभिनव प्रयोग आज सत्तर वर्षांपूर्वी आपल्या शाळेत केले गेले त्यामुळे मराठी माध्यमातून शिकलेले अनेक विद्यार्थी देशाच्या स्तरावर त्या संस्कारांच्या बळावर अनेक उच्च पदांवर पोहोचले. काळाच्या ओघात निस्वार्थी ज्ञानोपासना लयाला गेली आणि स्वार्थाच्या चिखलात लडबडली हे सत्य आजच्या पिढीतील सर्वांनी जाणून घ्यायला हवं. कुठे काय चुकलं त्याचं मर्म कळलं तर उत्कर्षाचा मार्गही सापडेल.
शाळा आणि विद्यार्थी-हित हेच दोघांच्या मनात अहर्निश होते. या संदर्भात त्यांनी केलेले दोन प्रयोग ठळकपणे आठवतात. शालेय परीक्षांच्या वेळी पर्यवेक्षक न नेमता विद्यार्थ्यांवर संपूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयोग अनेकांचा विरोध सारून काही काळ अंमलात आणला गेला. पूर्व परंपरेच्या वेढ्यात कां, केव्हा, कसा गडगडला याची मिमांसा नक्कीच उपयोगी आणि मार्गदर्शक ठरेल.
दुसरा अभिनव प्रयोग होता त्यानुसार वार्षिक परीक्षेऎवजी आठवडी परिक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा. किती वर्षे अमलात आला हे मात्र आठवत नाही आणि त्यात बदल कशामुळे झाला हे सुद्धा कळल नाही.
त्या वेळचे विद्यार्थी इंग्रजीसुद्धा शिकले होते म्हणूनच इतका उत्कर्ष करू शकले. घरा बाहेर हिंदी आणि रोजगार-विश्वात इंग्रजी असल्यामुळे मराठी माध्यम गौण ठरवणे गैर आणि संकुचित विचार निश्चित आहे. मराठी संस्कृतीत जन्माला आलेल्या व्यक्तीच्या मनात येतात ते विचार मूलतः मराठीच्या पोषाखातच असतात. इतरांशी संवाद साधायला त्यांच्या भाषेचा पोषाख बुद्धिपुरस्सर आपल्या व्यक्तिगत क्षमतेनुसार चढवला जातॊ हे निर्विवाद सत्य आहे. म्हणूनच पालकवर्ग, विद्यार्थी समुदाय यांच्या बरोबर शाळेच्या मंडळाच्या कार्यकारिणीने नियमित कार्यक्रम आखून परिवर्तन घडवणे गरजेचे आहे.
पूर्वी दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात एखादा परिसंवाद आयोजित करून शाळा, पालक, आणि विद्यार्थी यांच्या विभिन्न समस्यांवर निमंत्रित विद्वानांशी चर्चा घडल्यामुळॆ आपसातले संबंध दृढ होत. शिवाय मराठी समाजाची प्रतिमा उज्वल होण्यास मदतही व्हायची. व्यक्तिगत स्वार्थ नियंत्रित असायचे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत तीन भाषांचे प्रावधान आहेच. अपरिपक्व मनातच भाषांविषयी द्वेष, तिरस्कार उद्भवतात याकडे दुर्लक्ष होता कामा नये. ओघात आले त्याचा उल्लेख करावासा वाटला.
जगातील भाषांपैकी संस्कृत ही भाषा संगणक प्रणालीसाठी सर्वोत्तम असल्याचं संशोधन जर्मनीसारख्या परदेशांनी शोधून मान्य केलं आणि त्यांच्या विद्यापिठातून अभ्यासक्रम सुरु केले. या बाबतीत आपण काय करू शकतो याचा विचार आपल्यायेथील संबंधितांनी करावा. नव्याने व्यवहारात आलेल्या संगणक संस्कृतीचा विचार करून समन्वित प्रयत्नांनी गत वैभवाला उजाळा देणारे जागृत सैनिक शाळेतून अविरत तयार होतील यात शंका नाहीच.
एका काळी जबलपुरात विभिन्न २१ महाराष्ट्रियन संस्था एकजुटिनी वेगवेगळे उपक्रम राबवीत असल्या तरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हिताचे पोषक-पूरक कार्यही जवाबदारीनी करीत. टिळक वाचनालय, महाराष्ट्र व्यायाम शाळा, नाट्य समाज, वनिता भगिनी मंडळ, गायन समाज आदि संस्थांचा नामोल्लेख करायलाच हवा. या खेरीज निवृत्त झालेले अनेक तज्ञ विभिन्न शालेय विषय होतकरू-गरजू विद्यार्थ्यांना स्वतः हून शिकविण्यात पुढाकार घेत. समाजाच्या त्या नेतृत्वाला सहस्र सलाम !
अशी ही चार भिंतींच्या पलीकडची शाळा मधल्या काही दशकांत वाट चुकली हे खरं आहे. पण अजूनही आशेचे किरण आहेत. काळ बदलला असला तरी निस्वार्थ ज्ञानदानाचा होम पुन्हा जागृत करण्याचा झेंडा माजी विद्यार्थी संघटित प्रयत्नांनी रोवतील असा विश्वास आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारावून गेलो आहे .माजी विद्यार्थी त्यांना मिळालेल्या आणि अनुभवलेल्या आदर्शाँचा नक्कीच कित्ता गिरवणार .चांगली नोंद करुन ठेवलीत .

लेलेकाका - अतिशय मस्त लिहिलंत सगळे ....
सगळे डोळ्यांसमोर उभे राहिले .... ते मालगुजारांचे वर्णन वाचून हसू येत होते तर दुसरीकडे तुमचे पिताश्री आणि ओकमास्तर यांच्या कर्तृत्वाकडे बघता मन खूप खूप समाधान पावत होते.....
हे सगळे वाचताना असं वाटत होते - कुठे गेले हे सगळे लोक, त्यांच्या जगावेगळ्या असामान्य निष्ठा ....

या सगळ्या मंडळींची कधी नव्हे ती नितांत गरज आहे - संपूर्ण राष्ट्रालाच........

या अशा सार्‍या मंडळींच्या चरणी सादर प्रणामच ....

तुमची लेखनशैली अतिशय सुंदर - कृपया, असेच अजूनही लिहा ना ....

आमच्या माजिविद्यार्थि परिषदेला मी अशा शाळेच्या आठवण्णींचा संग्रह - सर्वांकडून लेख मागवून पुस्तक रुपात प्रसिद्ध कराव अस सुचवल आहे. मराठी माध्यमाच पुनःरुज्जीवन करायला आर्थिक मदत ही उभी करण शक्य होईल या हेतूनी.
प्रयत्न क३एला तर महाराष्ट्राबाहेरील मराठी शाळांचा उपयोगी सल्ला/मदत कदाचित मिळेल.
किती कसा प्रतिसाद इतर सदस्य देतात ते कळेल अश्ही अपेक्षा आहेच.