आक्रोश

Submitted by संतोष वाटपाडे on 18 March, 2014 - 21:47

चोरपावलांनी माझी माय आभाळात गेली,
माझ्या घरातली चुल तवा यकटी रडली...

झाली लेकरांची दैना,
घास पोटात जाईना,
हुबं घरटं पेटलं,
जाळ हिजता हिजना,
दुस्काळाच्या जाळामंधी गावं वसाड पडली,
माझ्या घरातली चुल तवा यकटी रडली..

माय राबली श्यतात,
माय रुजली बांधात,
माय गेली ढेकळात,
माय हिरीच्या पाण्यात,
दारामधी लावलेली गोड तुळस सडली,
माझ्या घरातली चुल तवा यकटी रडली...

कुडमुडं जोंधळ्याला,
आलं कणीस टपुर,
आता त्याला पाहायाला,
माय न्हाई वट्यावर,
बापासंगं राबताना जिनं तिफ़ण वढली,
तिच्यासाठी चुल दारी तवा यकटी रडली....

तिचं फ़ाटकं लुगडं,
पोटावरचा दगड,
कसा इसरू आज बी,
दिस झालेत रगड,
भरदिवसा घरात आशी घटना घडली,
माझ्या घरातली चुल तवा यकटी रडली...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users