अत्यंत चुकीचे आहे

Submitted by बेफ़िकीर on 8 March, 2014 - 14:01

अपुल्यामधले आकर्षण अत्यंत चुकीचे आहे
जे तुझ्यामते ते कारण अत्यंत चुकीचे आहे

त्यांचा अभ्यास बरळला, त्यांचे वाचन बकबकले
मोठे होणे निष्कारण अत्यंत चुकीचे आहे

कोणीही नसण्यासाठी हा जन्म मिळाला आहे
कोणीही असणे आपण अत्यंत चुकीचे आहे

घरपण देणारा जेथे नसला तर बिघडत नाही
त्या घरास देणे घरपण अत्यंत चुकीचे आहे

काहीही नसणे जेथे कोणी स्वीकारत नाही
काहीही असणे हे पण अत्यंत चुकीचे आहे

जगण्याचे दडपण नसले तर मरण्याचे दडपण घ्या
दडपण नसण्याचे दडपण अत्यंत चुकीचे आहे

मी तुला भेटल्यावरती दोघांना हेच कळाले
ग्रीष्मास भेटणे श्रावण अत्यंत चुकीचे आहे

घ्या जगून काही वर्षे घ्या मरून काही वर्षे
कसलेही नसणे लक्षण अत्यंत चुकीचे आहे

दाराच्या आतच करण्या होतात नशीबावरती
बाहेर बांधणे तोरण अत्यंत चुकीचे आहे

जी 'मरा'पासुनी झाली ती तुझी मराठी भाषा
ती जगेल हे वेडेपण अत्यंत चुकीचे आहे

हे विश्व जन्मले आहे इतकेच ठसवण्यासाठी
की तुझे वागणे भूषण अत्यंत चुकीचे आहे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

दाराच्या आतच करण्या होतात नशीबावरती
बाहेर बांधणे तोरण अत्यंत चुकीचे आहे

जी 'मरा'पासुनी झाली ती तुझी मराठी भाषा
ती जगेल हे वेडेपण अत्यंत चुकीचे आहे >>>> हे २ खूप आवडले.

मतला , मक्ता जबरी, मक्त्यात वापरलेल तखल्लुस काय चपखल बसलय काफिया म्हणूनही ! जवाबच नही !! Happy

आपण, घरपण, पण, श्रावण, तोरण........स ला म !!

-सुप्रिया.

घ्या जगून काही वर्षे घ्या मरून काही वर्षे
कसलेही नसणे लक्षण अत्यंत चुकीचे आहे

लाजवाब शेर.

जगण्याचे दडपण नसले तर मरण्याचे दडपण घ्या
दडपण नसण्याचे दडपण अत्यंत चुकीचे आहे

व्वा..!

मी तुला भेटल्यावरती दोघांना हेच कळाले
ग्रीष्मास भेटणे श्रावण अत्यंत चुकीचे आहे

वा व्वा..!

मक्त्यातील भूषण खटकले. इतर ठिकाणी आपण बेफिकीर वापरता.

पुलेशु.

एकदम छान!
सगळेच शेर छान!

<< मी तुला भेटल्यावरती दोघांना हेच कळाले
ग्रीष्मास भेटणे श्रावण अत्यंत चुकीचे आहे

दाराच्या आतच करण्या होतात नशीबावरती
बाहेर बांधणे तोरण अत्यंत चुकीचे आहे >> हे देन शेर तर खूप आवडले!

मी तुला भेटल्यावरती दोघांना हेच कळाले
ग्रीष्मास भेटणे श्रावण अत्यंत चुकीचे आहे

फार फार सुंदर ! ग्रीष्माला मृगजळ समजतं आणि थोडाफार वळीव.

घ्या जगून काही वर्षे घ्या मरून काही वर्षे
कसलेही नसणे लक्षण अत्यंत चुकीचे आहे

कमाल.

मात्र मराठीवर मराठीत ताशेरे ओढणे अत्यंत चुकीचे आहे (रागावू नका जरा भाषाभिमान जागा झाला ).

कोणीही नसण्यासाठी हा जन्म मिळाला आहे
कोणीही असणे आपण अत्यंत चुकीचे आहे

व्वा…. जबरदस्त शेर.

घरपण देणारा जेथे नसला तर बिघडत नाही
त्या घरास देणे घरपण अत्यंत चुकीचे आहे

बहोत खूब…

काहीही नसणे जेथे कोणी स्वीकारत नाही
काहीही असणे हे पण अत्यंत चुकीचे आहे

काय सहजता आहे राव… सुंदर शेर
अख्खा शेर सानी मिसऱ्यातल्या 'काहीही' मधल्या 'ही' वर उचलला गेला आहे.

मी तुला भेटल्यावरती दोघांना हेच कळाले
ग्रीष्मास भेटणे श्रावण अत्यंत चुकीचे आहे

व्वा…. व्वा.

'तोरण' हि आवडला….

थोडक्यात काय तर अख्खी गझल अप्रतिम झाली आहे…

धन्यवाद….

अवांतरअवांतर
बेफी अप्रतिम गझल.
अगदी २-३ शेर छान समजले. बरेचसे समजले नाहीत.>. किती चालाख दक्षिणादेवी तुम्हाई, गझल अप्र्तिम पण शेर समजले नाही.

गझल चांगली आहे.

अगदी २-३ शेर छान समजले. बरेचसे समजले नाहीत.>. किती चालाख दक्षिणादेवी तुम्हाई, गझल अप्र्तिम पण शेर समजले नाही.>>>

कतरिना कैफ सुंदर आहे पण तिला अभिनय येत नाही या धर्तीवरचा प्रतिसाद वाटतो Proud