आयोजन

Submitted by vaiju.jd on 8 March, 2014 - 07:00

।।श्री ।।

एकदा महिला मंडळातल्या एका मैत्रिणीचा फोन आला ,”अगं आपल्या त्या ’—’ चे मिस्टर गेले गं! झाले आहेत आठ दहा दिवस, उशिराच कळले आहे, भेटून येऊ या! जमेल कां आज दुपारी?” मी ’हो’म्हटले. बातमी अचानकच आलेली आणि ही मैत्रीण हवीहवीशी लाडकीच सगळ्यांची! गोरी, घारी,ठसठशीत नाकडोळ्यांची , म्हणजे नवरात्रात अष्टमीला तांदुळाचा मुखवटा करतात नां देवीचा ,अगदी त्याच्यासारख्या चेहेऱ्याची! सतत हसतमुख , प्रसन्नवदना, उत्तम गाणारी, आणि जेव्हा भेटेल तेव्हा कधीही कुणाशी मागचे हिशेब न काढता सद्यस्थितीला धरून बोलणारी, वागणारी! विचारपूस करणारी!

मागचे हिशेब म्हणजे आधीच्या घडलेल्या प्रसंगातले काही लक्ष्यात ठेवून संधी मिळाली की त्याची सव्याज परतफेड करायची आणि नंतर ’कसे सुनावले! ठणकावले! कशी उतरवून ठेवली’ अशी अज्ञानी प्रौढी मिरवायची.अश्या प्रकारे जुन्याचे हिशेब करून वर्तमानातले आपले वागणे ’न्याय्य’कसे ठरू शकते? कुणाला क्लेश देऊन आपण कसे सुखी होऊ शकतो? पण ही वृत्ती बऱ्याचवेळा प्रत्ययाला येते, आजूबाजूला वावरताना दिसते.

पण माझी ही मैत्रीण असा विचार न करणारी, त्यामुळेच साठीला येउनही चेहऱ्यावर एखादीही सुरकुती नाही, टवटवीत चेहरा!

पण ’अशावेळी’ भेटायला जायचे! कशी असेल ? कशी असेल ? कशी दिसत असेल? मोठी ठसठशीत लालभडक टिकली कपाळावर नसताना तिचा गोरागोरा चेहरा पाहवेल? रडायला लागली तर?आपल्याला न हेलावता चार सांत्वनाच्या गोष्टी बोलायला सुचतील नां? असे काय काय मनात येत होते. पण भेटायला जायची मनापासून इच्छा होती.

आपल्या समाजात पतिवियोग झालेल्या स्त्रियांबद्दल फार चमत्कारिक वर्तणूक आणि समजूती आहेत , की त्यामुळे जिच्यावर हे संकट येते ती कल्पनेनेच आधी खचून जाते. एखादी व्यक्ती मृत्यू पावणे, त्यासाठी दु:ख होते हे स्वाभाविक आहे आणि उरलेल्याचे आयुष्य सुखाचे व्हावे म्हणून प्रयत्न करणे ही खरी सांत्वना पण काहीवेळा अगदी विपरीत चित्र दिसते.

त्या दिवशी आम्ही मंडळातल्या चारजणी भेटायला गेलो. दुमजली घर, खालच्या मजल्यावर मुलाचे इंटिरिअर डेकोरेशनच्या व्यवसायाचे ऑफिस, घराच्या मागच्या बाजूने वर जायला जिना, खाली बागेत झाडांबरोबर गवतही वाढलेले. आत जायचा रस्ता स्पष्ट दिसत नव्हता. गेट बंद होते. आम्ही गेटबाहेर फुटपाथवर थांबलो आणि कसे आत जायचे म्हणून बोलत होतो. एवढ्यात वरून आमची मैत्रीण डोकावली. “अगं, गेटची आतली कडी उघडा आणि सरळ मागच्या बाजूला वर या!”गेलो.

हॉलमध्ये पोहोचलो. दिवसकार्य होऊन गेले होते.. आमची मैत्रीण सोफ्याच्या खुर्चीवर बसली होती. चेहरा शांत. पाण्याचे तांब्या भांडे ठेवलेले. ’या’ म्हणाली. बसलो. सर्वसाधारणपणे विचारला जाणारा प्रश्न ,”कसे झाले?” तो कुणीतरी विचारला. त्यावर मैत्रीण म्हणाली,” जरा बँकेचे काम होते म्हणून स्टेशन कडे बँकेत गेले होते. काम करून बाहेर आले पण त्यांना अस्वस्थ वाटायला लागले म्हणून रिक्षा करून घरी आले. बेडरूममध्ये बेडवर पडले. हाक मारली तशी मी गेलेच. मुलगा सून धावत वर आले. मुलांनी डॉक्टरांना फोन केला पण त्यांच्या येण्यापूर्वीच त्यांना अटॅक आलाच होता. संपले सगळे! कालच सगळे पार पडून उदकशांत झाली.”

अशा कथनावर साधारण ,’अरेरे वाईट झाले!’,'अजून थोडेतरी जगायला हवे होते!’,'अचानकच झाले नाही सगळे!’ अशा स्वरूपाचे उद्गार निघतात. तसे ते आत्तापण झाले आणि शिवायही सांत्वनाचे काही बोलणे झाले.

पण मैत्रीण अगदी शांत होती. आमचे सगळे बोलून झाल्यावर ती म्हणाली,” आपले माणूस कितीही वय झाले तरी आपल्याला हवेच असते. त्याला मृत्यू यावा असे आपल्याला वाटतच नाही. आयुष्यभराचा जोडीदार गेला याचे दु:ख मोठेच आहे. पण खरे सांगू का तसे वाटले तरी मला पुष्कळ गोष्टी चांगल्या झाल्या आहेत असे वाटते आणि त्यामुळे मला असे टोकाचे दु:ख नाही झाले.

म्हणजे बघा, स्टेशनकडे बँकेत गेले होते ते, तिथे कित्ती रहदारी! अपरिचित माणसेच जास्त. सगळी सकाळची वेळ, कामाला चाललेली म्हणून घाईत! अशा वेळी ते जर वाटेत पडले असते तर काय माहीत कोणी पाहिले असते किंवा नाही! कुठल्याश्या हॉस्पिटल मध्ये पोहचवले असते तर रस्त्यावर मृत्यू म्हणून मृत्यपश्चातले व्याप झाले असते, मागे लागले असते. आपले माणूस गेल्याचे दु:ख सोडून इतरच गोष्टीतून मार्ग काढावा लागला असता. आम्हाला कळले तरी किती वेळाने असते कोण जाणे? पण हे सगळे टळले, ते व्यवस्थित घरी आले, मला हाक मारून त्यांना अस्वस्थ वाटते आहे हे सांगता आले. बेडरूम मध्ये त्यांच्या आवडत्या जागेवर झोपून त्यांना मृत्यू आला. त्यांची सगळी प्रिय माणसे मी, मुलगा , सून आणि आमचा छोटा नातूसुद्धा त्यांच्या भोवती होतो.आमच्याकडे बघत अगदी शांतपणे त्यांनी देह सोडला. त्यांना वेदनाही असह्य अशा झाल्या नाहीत.”

‘खरे तर साठीला निवृत्त झाले तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. डॉक्टरांनी तेव्हाच सांगितले होते, ‘ वाचला आहात , पुढचे आयुष्य बोनस मिळाले आहे हे लक्ष्यात घ्या.’ तेव्हाच काही झाले असते तर सगळेच जगायचे राहिले असते. आता सत्तरी आली. गेली दहाबारा वर्षे छान उपभोगून झाली. आता ’निर्वाणाची हाक’ आली तर उर बडवून त्याचे दु:ख करण्यासारखे काही वाटत नाही मला. ’ते’ही शांत होते , हे महत्वाचे!’

मैत्रीण बोलायची थांबली आणि खरे सांगायचे तर मनावरचे सावट एकदम नाहिसे झाले. अभ्रे जाऊन आभाळ स्वच्छ व्हावे तसे वाटले. किती सुंदर विचार केला या मैत्रिणीने! तिने भागवत ,गीता, उपनिषद यातले काही वाचले असेल कां? तिला मृत्यूकडे योग्य ज्ञानयुक्त दृष्टीने पाहता आले! माणूस केव्हाही गेला तरी त्याच्या करायच्या, बघायच्या राहिलेल्या गोष्टींची यादी वाचली जाते, इथे किती विचाराने ही स्थिर राहिली आहे. कितीजणांना जमते हे? मला तिच्या समंजसपणाचे कौतुक वाटले. निघताना तिच्या पाठीवर हात ठेवत म्हटले,” काय बोलावे असा प्रश्न घेऊन आले होते. तुझ्या शहाणपणाने सगळे सोपे करून टाकलेस!”

खरे तर मृत्यू ही अटळ घटना आहे. तो त्याच्या वेळेला येणार, कोणतीही पूर्वसूचना न देता येणार,हे आपण सगळे जाणतो पण त्याकडे अनिच्छेने नकारात्मक दृष्टीने पाहतो. म्हणून तो आपल्याला जास्तच घाबरवतो. अस्वस्थ करतो. शांती हिरावून घेतो. त्या शेवटच्या क्षणी शांतता कशी मिळत असेल? त्या वेळेला अचानक तर हे होत नसेल. म्हणजे त्याची तयारी आधीपासून करायला हवी असणार. देहाची आसक्ती, प्रपंचातला मालकी हक्क, मुलांचे मायापाश, आप्तस्वकीयांमधले रमणे या सगळ्याचा एका क्षणात मनाने सुद्धा त्याग करून त्या पलीकडच्या जगात पाऊल टाकताना शांतता धारण करायची,त्यासाठी धैर्य,विवेक, वास्तवाची जाणीव, मृत्युच्या अपरिहार्यतेचा स्विकार,मृत्यूचे सौंदर्य अशा बऱ्याच गोष्टी आवश्यक आहेत. त्यासाठी आधीपासूनच जगतानाच पूर्वतयारी करावी लागत असणार. त्यासाठी आपल्या हिंदुधर्मात ’वानप्रस्थ’ सांगितला आहे. ज्यायोगे प्रपंचातून अलिप्तता यावी. आणि तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ’आवा, वेशीपासून येई घरा!’ असे होऊ नये आणि पुढचा संन्यासआश्रम स्वीकारता आला नाही तरी’ शेवटचा दिस गोड व्हावा!’ एवढे तरी जमायला हवे. त्यासाठी प्रपंचात असतानाच स्वत:च्या मृत्यूचे आयोजन करायला हवे.

आपण चार दिवस सहलीला जाताना आधीच कित्येक महिने किती आयोजन करतो. जातायेताची निश्चित तिकिटे, जायचे तिथले वास्तव्य, घालायचे कपडे, खाण्याचे पदार्थ, आणि सर्वप्रथम आर्थिक नियोजन! चार दिवसांच्या छोट्या मुक्कामाचे एवढे आयोजन, तयारी असेल तर अटळ अश्या मृत्यू समयाचे , तो क्षण सहज सुखाचा व्हावा म्हणून आधीच आयोजन करायला हवे , असे नाही कां वाटत?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या मैत्रिणीचे विचार अगदी वास्तववादी आहेत...पण हल्ली अश्या विचारांच्या माणसांना लोक कोरडी, जोडीदारावर प्रेम नसणारी वगैरे समजतात...तुम्ही मात्र ते नीट समजून घेतलेत, मान्य केलेत हे वाचून खरंच तुमचं अभिनंदन करावंस वाटलं...म्हणून ही प्रतिक्रिया.

धन्यवाद प्रमोद Happy
आपला जोडीदार गमावण्याचे दुःख असतेच. ते समजून घ्यायला हवे. त्या व्यक्तीने त्या दुःखाचा कसा स्विकार केला आहे आणि आपण त्याला कशी मदत करु शकतो हा विचार करायला हवा ना?
नाहीतर भेटायला जाण्यातल्या आपुलकीला काही अर्थच नाही!