स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच !

Submitted by शबाना on 7 March, 2014 - 06:55

महाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मालिकेतून बराचसा कथाभाग समजलेला. सातवी आठवीत वाचलेल्या राधेय आणि मृत्युंजय मधल्या व्यक्तिरेखा अजूनही मनपटलावर कोरलेल्या. मग अनेक पुस्तकातून वेवेगळ्या अंगातून केलेले महाभारताचे, गीतेचे आणि कृष्णाबद्दलचे विवेचन- बरेचसे लक्षात राहिलेले पण विश्लेषण - विवेचन हे मुख्यतः भारतीय राजनीतीत घडणाऱ्या गेल्या दशकांच्या संदर्भातच.

गेल्या वर्षी मनु गीतेवर काहीतरी वाचत होती आणि अचानक तिचा काहीतरी प्रश्न आला म्हणून बोलताना ती म्हणाली -- मला माहित आहे महाभारत का घडले ते --त्या कृष्णाने कोणाचे तरी नाक कापले होते म्हणून ! थोडी बहुत गोष्टीत गल्लत ठीक आहे पण हे जरा जास्तच खटकणारे म्हणून आम्ही तिच्यासाठी महाभारतावर पुस्तके बघत होतो. १४ वर्षाच्या मुलीला कळेल आणि त्यातही अगदी गंभीर वाचणाऱ्या मनूला रुचेल असे पुस्तक काही सापडत नव्हते. अगदी अकराव्या वर्षी kightrunner, thousand splendid suns आणि नंतर शांताराम वाचणाऱ्या लेकीला बरीच पुस्तके आणून दिली -राधाकृष्णनचे Indian Philosophy आणि Discovery ऑफ इंडिया या दोन्ही पुस्तकांसमवेत. पण तरीही बर्याच गोष्टींचा घोळ डोक्यात चालूच आणि मला मिळणाऱ्या मर्यादित वेळेत त्याचे निराकरण शक्य नाही म्हणून थोडा लांबणीवर टाकलेला विषय…

मग एके दिवशी रीतुशी बोलताना तिने स्टार प्लस वरच्या या मालिकेबद्दल सांगितले. स्टारप्लस बघायचा म्हणजे जीव मुठीतच असे म्हणून आम्ही बघायला सुरुवात केली आणि आवडली ही मालिका! त्यात दाखवलेल्या बऱ्याच गोष्टी तर्क आणि माझे विवेचन सोडून बघायच्या असा निर्णय पहिले दोन तीन भाग बघतानाच घेतला होता. मुख्य उद्देश मुलांबरोबर कथाभाग समजावून घ्यायचा हाच होता. मनु नंतर डोके फाटेस्तोवर प्रश्न विचारत असतेच आणि तिच्याशी बरीच चर्चाही होते. पण माझ्या ७ वर्षाच्या लेकाला आतापर्यंत काही माहित नव्हते आणि त्याला हिंदीचा गंधही नाही. शाळेत Religious Education मध्ये यावर्षी Hinduism आहे त्यामुळे ten headed monster 'रवाना' , butter eater krishna मध्ये याला फार इंटरेस्ट ! गेल्यावर्षी भारतात गेलो तेव्हा छोटा भीम बघितला --तेव्हापासून सगळे छोट्या भीमचे टी शर्ट आणि मग कॉमिकस एवढाच पूर्वाभ्यास. पण बघायला सुरुवात केली आणि आतापर्यंत धारावाहीकेत सांगितलेली कथा त्याला कळली आहे. काही गोष्टीत मार्मिक प्रतीक्रिया असतात. त्याला त्याच्या पद्धतीने समजून घेऊ देत म्हणून मीही आता भाष्य करायचे सोडले आहे पण तरीही --

उदा एकलव्याचा अंगठा घेतला तेव्हा मी हळहळलेच -- so unfair! असे निघालेच तोंडातून. माऊची प्रतिक्रिया : it is fair mamma- Ekalvya did not ask Drona's permission to copy him. You cant just do such things! किती copyright बद्दल सजगता !

हिडींबा आली तेव्हा याला वाटले कदाचित हीच छुटकी -- अजून छोट्या भीमाचे साथीदार दिसत नाहीयेत ना ।

द्रौपदीचे पाच नवर्यात विभाजन यात एवढा वाद घालायचे काय हे त्याला पटतच नव्हते --but she has accepted it and all of them are happy ( pandav and droupadi) मग एव्हडा रडून ओरडून गोंधळ काय घालताय? that is their choice, what is so unrighteous about it ? सगळे सबटायटल्स-- अधर्मचा unrighteousness! माझ्यातल्या मम्मात्वाला आत्तापासूनच ललकार आहे -- पुढे जाउन we are happy why interfere असा म्हणताना दिसतोच आहे हा !

भीष्म पितामह अगदी उद्विग्न होतात तेव्हातर माहीला अगदी राहवत नाही, मी इमेल टाकू का त्याला समजवायला ? आता भीष्माचा इमेल असेल तर शेअर करा.!अर्थात अशा सत्कृत्यामागे माझीच प्रेरणा -- लंडनमध्ये लोक रस्त्यावर सिगरेट पीत असताना माहीला तो वास सहन होत नाही, मग काय करता येईल असे विचार करता मी त्याला सांगितले होते कि तू लंडनच्या मेयरला इमेल लिही. भीष्माच्या काळी इतकी child freindly public policy नव्हती हे कसे समजवायचे? आणि त्यापुढेही त्याचे अर्घ्य गंगेच्या पाण्यात पडत नसते -- माहीचे अनुभवजन्य विश्लेषण --टेम्परेचर मायनस खाली असणार म्हणून पाणी गोठले आहे.

मी अगदी वैतागून आता मग हा द्रौपदीच्या सुर्यनारायणास केलेल्या आवाहनावर काय टिपणी करतो म्हणून वाटच बघत होते . आता लिहायला छान वाटते पण बर्याच वेळेला या प्रश्नांत मला संवाद ऐकण्यावर, समजण्यावर पाणी फिरवावे लागते, खेकसून सांगावेसे वाटते -- है कथा संग्रामकी, आपल्यातच होईल, मुकाट्याने शांतपणे बघ. असा वैताग दिला कि खरेच भारतीय संस्कृतीच महान आहे हे पटते अगदी. मुलांनी एकदा सांगितले कि निमूट ऐकायला पाहिजेच. हा काय पाश्चात्य स्वैरपणा ---एका मागून एक प्रश्न ? पण काय करणार - जैसा देस वैसा --वागावेच लागते . बर्याच वेळेस मग त्याला झोपवून यु ट्युबवर परत तो भाग फास्ट फोरवर्ड करून बघायचा, याला पर्याय नसतो

पांडव हस्तिनापुर सोडून चालले आणि अर्जुन कुंतीच्या मांडीवर डोके ठेऊन रडू लागला --oh come on arjuna - you need to grow up, cant be with your mother all your life ! हस्तिनापुर आणि राज्यावरचा हक्क, कुंती सगळ्यांना सोडून जाताहेत म्हणून मी म्हणाले - बिचारे पांडव --why poor mamma they must seek new experience, it is good to learn new things !

परशुरामास जेव्हा कर्ण त्याच्याशी खोटे बोलला हे कळते आणि पुनीत इस्सार त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडतो तेव्हाही माहिला कळत नाही की हा चिडला तर आहे पण मग हा कर्णाला Hey कर्ण अशी का हाक मारतो ? hey dude असे तर प्रेमाने मित्राला हाक मारायची पद्धत न !

कृष्णाने रुक्मिवर सुदर्शन चक्र सोडून फक्त अर्धे डोके भादरले तेव्हां तर असल्या मशीन मिळाल्या तर शाळेत कोणाकोणावर सोडता येईल अशी यादी आम्ही केली होती. विश्व के कल्याण कि योजना सोडून हा कृष्ण आता जॉन, मग बेन , मग जेम्स अशा मुलांची डोकी भादरत असतानाचे चित्र दिसत होते. भीतीपण वाटत होती हा -तो सर्वज्ञानी कृष्ण आमचे असले बेत ऐकत असेल तर? अजून आमची डोकी शाबूत आहेत -- माफ केले असावे त्याने बहुदा कारण आम्ही त्याची आळवणीही तितकीच करतो न- पुढे येईल याबद्दल !

भिमासारखे पाय आपटणे-- नंतर दुखतात म्हणून गुपचूप शांत बसणे -- मान्य नाही करायचे. पाउस असला तरी छत्री बंद करून युधीष्टीरासारखा भाला बनवून फिरवणे. रागवायचे नाटक म्हणजे धृतराष्ट्रासारखे डोळे वर करणे. हातावर उपरण्यासारखा टॉवेल घेऊन घरभर भटकणे - महाभारत ड्रेस आहे हा! --हे दैनदिन जीवनात महाभारतासारख्या 'ग्रंथोमें महान' ग्रंथामुळे आलेले काही मुलभूत बदल .

दुर्योधनाने हत्तीवर उडी मारून मालिकेत प्रवेश केला तेव्हापासून बिचाऱ्या घरच्या सोफ्याने हजार शाप नक्कीच दिले असतील दुर्योधनाला आणि त्या स्टंट डायरेक्टरला।

शकुनिमुळे डोळा मारणे आम्ही मात्र बंदच केलंय, फार वाईट असं मत आहे डोळा मारला की, काहीतरी कपट असाच त्याचा अर्थ ! मला मात्र काळजी उद्या भारतात गेलो आणि याला तिथल्या कॉलेजात हा गेला तर एव्हडे बेसिक स्किल माहित नसले की याचा तिथे कसा निभाव लागणार ?

सकाळी शाळेला उशीर होत असताना toilet seat वर बसून जोरात अगदी गांडीवधारी अर्जुना आ}} आ}}} अशी तान हा जेव्हा छेडतो तेव्हा तू जे काय धरलयस ते सोड आणि तयार हो लवकर -- हे अर्थात माझ्या मनात! काय बोलतोय आणि काय करतोय याच्यात काही ताळ असेल का हे समजण्यासाठी तरी निदान आपल्या लेकरांना म्हराटी शिकवणे किती महत्वाचे ते अशा वेळेला कळतं -- शिकवायचंच अशी प्रतिज्ञा काही आपण करणार नाही -- महाभारतातल्या कोणाच्या प्रतिज्ञेमुळे काय काय घडलं याचा कार्यकारणभाव लावून आणि समजावून दमायला झाले आहे!

शीर्षक गीत तर फार आवडलंय आम्हाला -- धर्म, अधर्म, आदी, अनंत सगळीकडे गुणगुणत असतो आणि नको तिथे फेकत पण असतो -- मम्मा this is adharm ; झोप म्हणले कि, पुस्तक ठेव, चोकलेट नको आता-- अशा वेळी सगळाच धर्म अधर्माचा मामला !

मला गाण्यापेक्षा शब्द ( lyrics ) मध्ये जास्त रस त्यामुळे अर्थही मीच सांगितला सगळ्या शब्दांचा - संदर्भसहित स्पष्टीकरण देऊन. एकदा आज नको बघायला, उद्या बघुयात, एक दिवस नाही बघितले तर काही बिघडत नाही असे म्हणले तर मम्मा this is जीवन का संपूर्ण सार हैं, मग बघायलाच पाहिजे न हे हि ऐकवलेच !

कृष्णाच्या बासरीची मोहिनी बृहत विश्वावर - माही कसा अपवाद असणार ? रितू मावशीने बासरी पाठवली होतीच. सगळ्या घरात कृष्ण होऊन बासरी फुंकत आणि थुंकतही असतो. एका शनिवारी यू ट्युब वर enchanted flute of krishna असा विडीओ शोधून त्याची प्रक्टिस चालली होती आणि शेजारी मोठा टॉवेल घेऊन enchanted थुंकी साफ करणे चालले होते, तेव्हा हा साईड इफेक्ट कळाला. बरेच दिवस आमची बासरी शाळेच्या पँटच्या बेल्टला लटकून शाळेत ही गेली आहे. मोरपिसाची मागणी झाली आहे मावशीकडे -- कसा खोवणार त्याची उत्कंठता आहेच.

अर्जुन, कृष्ण तर हिरो आहेतच पण बकाबका खायचे तेव्हा आम्ही भीम पण होतो -- मग सगळेच demi -god आहेत, जे काही करतील ते चांगलेच, पणसोयीस्कर रित्या . पोहायला गेलो तेव्हा त्याला मी सांगितले बघ अर्जुन आवडतो ना तुला , त्याने किती प्रक्टिस केली धनुष्यबाण चालवण्याची मग तुही न थकता आज पाच फेऱ्या मारायच्या. डुबुक डुबुक करून महाशयांचे उत्तर --I can't change what I am mamma, can I? काय कपाळ उपदेश करणार आपण ? उलट त्या सौरभ जैनसारखे मधाळ हसून प्रत्येक वेळेस --think about it- ( स्वयं विचार किजिये) असे मलाच ऐकवतो !त्यातल्या त्यात हे बरे की पुरुषपात्रांचाच जास्त प्रभाव आहे, नाहीतर ती किंचाळणारी अंबा ( मला तर ती PMS मध्ये असतानाच तिच्या रोलचे शुटींग केले आहे असे वाटते ) , कल्याण हो, कल्याण हो असे म्हणत सतत अश्रू ढाळणारी कुंती( ही तरुणपणाची न सुटलेली निरूपा रॉय) , मेंगळटपणे फिरणाऱ्या अंबिका आणि अंबालिका, भयानक डोळ्यांची द्रौपदी यातले कशाचे अनुकरण केले असते, ते कळत नाही.

छोटेपणीच्या अर्जुनाने अभिनय छान रंगवला होता. त्या मुलाचा चेहराही अगदी निग्रही आणि बोलका. युधिष्ठिराचे काम करणारा मुलगा मात्र, 'पौगंडावस्थेतल्या मुलांच्या समस्या', अशा कार्यक्रमात दाखवणाऱ्या मुलांसारखाच अगदी शेळपट - मला तो शब्द ऐकूनच कसले कसले गंड आठवतात आणि काय त्या चर्चा, मस्त गळपटल्याल्या दगडू परब, त्याची मित्रकंपनी आणि पराजक्ता यांना बघून तरी आता अशा चर्चासत्रांना बंदी घालतील अशी आशा करूयात !

राम ला रामा, कृष्णला कृष्णा तसे रावण चा उच्चार त्याच्या शिक्षिका रवाना असा करतात. महिच्याच भाषेत इथले लोक महाभारतला, माहाभरटा म्हणतात - त्याच्या इथल्या उच्चारात . अरे सांग तुझ्या शिक्षिकांना असे त्याला सांगितले तर it is ok Mamma that's how British people speak, do they come to change your words -- असे म्हणून मोकळा झाला आहे तो. मी हे त्याच्या शिक्षिकेला पालकसभेत सांगितलं, तेव्हा दोघीही हसलो त्यावर. त्यानंतर मला एक तास त्यांच्या वर्गावर बोलायला बोलावलेही ! आता माही वर्गातला या विषयावरचा तज्ञ म्हणून सर्वमान्य झाला आहे. महाभारतावरची घरी असलेली कॉमिक्स घेऊन जातो तो व्याख्यान झोडायला ! आणि मध्येच येउन आता अमक्याची , तमक्याची मूर्ती दे दाखवायला असा हट्टही असतो. दिवाळीला लक्ष्मीची दिली, राम सीतेची दिली आम्हाला रक्षाबंधनला राखीचीपण हवी होती -- त्याला देवीच वाटली ! रितू म्हणून माझी मैत्रीण आहे तिने मुर्त्या, पुस्तके ईचा पुरवठा चालू ठेवला आहे.

पण कौतुक वाटते इथे ज्यापद्धतीने दुसरीच्या वर्गात नवीन धर्म आणि संस्कृतीबद्दल शिकवतात, माहिती देतात. त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तो हे काही करतो, डब्यात घेऊन जातो -- ते सगळं हिंदू धर्माच्या कक्षेत येत असावे असे त्याच्या मित्रांना वाटते -- उदा 'अरे यार' असे घरी ऐकून तो बऱ्याचवेळा शाळेत बोलताना म्हणून जातो ---त्याच्या प्रिय दोस्ताला बेनला हे हि हिंदू धर्माचे लक्षण वाटते. मायबोलीवरचे धर्मप्रेमी याबाबतीत मला माफ करतील अशी आशा आहे! गेल्यावर्षी त्यांना ख्रिश्चन धर्माबद्दल शिकवले. त्यानुसार जीझस हा देवाचा पुत्र . यावर्षी जेव्हा हिंदू धर्मातील देवांबद्दल शिकवायला सुरुवात केली तेव्हा जीझस हा देवाचा पुत्र आणि हिदु धर्मात देव म्हणून जीझसही त्याच बापाचा मुलगा म्हणून तोही हिंदू असा नविन सिद्धांत मांडून तो मोकळा. पुढच्या वर्षी इस्लाम शिकताना हा कोणाची संगती- नाती गोती कोणाशी लावतो ते पाहूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

-oh come on arjuna - you need to grow up, cant be with your mother all your life !>>>

हे मस्तच... Biggrin

त्यामुळे ten headed monster 'रवाना>>>>>>>>> Biggrin मला वाटलं १० हेडेड मॉन्स्टर कुठे तरी रवाना!
मस्तच!

अरे याSSर हिंदु धर्मचिन्ह . मजा आली ऐकुन. गोड आहेत सर्व गोष्टी आणि माउ पण.
माझी मुलगी आता ९ वर्षाची होइल कधी कधी महाभारत पहाते पण जास्त इन्टरेस्ट
सा रे ग म प आणि पक्के शेजारी मध्ये आहे.

साती+१.
<<-but she has accepted it and all of them are happy ( pandav and droupadi) मग एव्हडा रडून ओरडून गोंधळ काय घालताय? that is their choice, what is so unrighteous about it ? :>> यासाठी गालगुच्चा घ्यावा की उभे राहून टाळ्या वाजवाव्यात; असा प्रश्न पडलाय Happy

मस्त आहे पोरगा..लय महान आहे...आताच किती वैचारिक आहे..:)
जीसस हा देवाचा पुत्र आणि हिदु धर्मात देव म्हणून जीससही त्याच बापाचा मुलगा म्हणून तोही हिंदू असा नाव्वेन सिद्धांत मांडून तो मोकळा>>>> चला जीससच पण धर्मांतर्..भारी झाल हे..

जीसस हा देवाचा पुत्र आणि हिदु धर्मात देव म्हणून जीससही त्याच बापाचा मुलगा म्हणून तोही हिंदू असा नाव्वेन सिद्धांत मांडून तो मोकळा>>>> चला जीससच पण धर्मांतर्..भारी झाल हे..

>>>

मी हे 'जीएसचे' धर्मांतर झाले असे वाचले आणि धक्काच बसला. एकवेळ जीससचे होईल पण जीएसचे नाही होणार Wink

Pages