हकीगत एका अपघाताची (२)

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 6 March, 2014 - 09:02

http://www.maayboli.com/node/48000

आता हा समोरचा इसम आपल्या वाहनाखाली सापडणार या कल्पनेनेच मी कमालीचा हादरलो आणि अगदी प्रतिक्षिप्त क्रिया घडावी त्याप्रमाणे मी स्वत:च्याही नकळत स्टीअरिंग पूर्ण ताकदीनिशी (पॊवर स्टीअरिंग नसल्याने ताकद जास्त लावावी लागत असे) डावीकडे फिरविले. फार मोठा आवाज होऊन माझे वाहन थांबले होते. घडले असे की, डावीकडे काही वाहने पदपथाला खेटून रांगेत उभी होती. त्यापैकी एका इंडिकाला माझे वाहन धडकले. इंडिकाचे उजव्या बाजूचे दोन्ही दरवाजे व बॊनेटचा काही भाग चेपला जाऊन माझे वाहन पुढे असलेल्या एका मारूती वॆगनार वर धडकून तिचा डिकीचा भाग ही चेपला होता. त्यानंतर माझे वाहन या दोन वाहनांच्या फटीतून आत घुसून पदपथावर आदळले होते. वाहनाचे उजवे चाक निखळून बाहेर आले होते. अर्थात ह्या सर्व घटना अक्षरश: क्षणार्धात घडल्या होत्या. वाहनातून खाली उतरून आजुबाजूला पाहिल्यावर काही मिनीटांनी मला ह्या सर्व बाबी ध्यानात आल्या.

समाधानाची बाब म्हणजे कुठल्याही व्यक्तिला किंचितसा धक्काही बसलेला नव्हता. उभ्या असलेल्या वाहनांचे अर्थात निर्जीव वस्तूंचे मोल रुपया पैशात चूकते करता येऊ शकते. परंतु कोणत्याही सजीवास इजा झाली तर ते नुकसान कसे भरून काढणार? अर्थात असा अपराध माझ्या हातून घडला नाही म्हणून मी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि बाजूला जमलेल्या गर्दीला उद्देशून आधी दिलगिरी व्यक्त केली आणि मग या वाहनांचे मालक कोण आहेत याबाबत चौकशी केली. गर्दीतले लोकही समजूतदार होते. त्यांनी आधी मला ही खात्री करून दिली की पादचार्‍यांपैकी कोणीही जखमी झालेले नाहीत. तसेच त्यांनी मला व माझ्या आईला काही इजा झाली आहे का याची विचारणा केली आणि आधी थोडा वेळ शांत बसण्यास सांगितले. आईच्या हाताला खिडकीचा पत्रा लागून किरकोळ जखम झाली होती. तिला जखमेवर रुमाल बांधून बसस्थानकावर पाठविले. ती आमच्या नातेवाईकांना तिथून दोन रिक्षांमधून घरी घेऊन गेली.

इकडे हळूहळू गर्दी पांगली आणि मग मी दोन्ही वाहनांच्या मालकांचा शोध घेऊ लागलो. काही वेळाने इंडिकाचा चालक समोर आला. "तुला दिसत नाही का? अशी कशी गाडी ठोकलीस?" वगैरे चालू झालं. मी त्याला शांतपणे सांगितले की झालेले नुकसान मी भरून देईन आधी मालकाला समोर बोलवा. त्याप्रमाणे काही वेळातच मालकाला बोलावून घेतले. आधी शांतपणे आम्ही दोघांनीही एकमेकांची ओळख करून घेतली. त्याचे नाव त्याने शेख असे सांगितले. मीही माझे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक ही माहिती त्यास दिली. "मग आता कसे करायचे बोला." त्याने मुद्यावर येत विचारले. मीही त्यास सांगितले की माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा असल्यामुळे विमा कंपनीकडून त्याला संपूर्ण भरपाई मिळेल. त्यावर त्याने याकरिता काय करावे लागेल हे विचारले. त्यावर मी आधी विमा कंपनीत संपर्क केला. साडेपाच वाजले होते आणि कार्यालय बंद व्हायची वेळ आली होती. समाधानाची बाब म्हणजे व्यवस्थापक पहिल्याच प्रयत्नात दूरध्वनीवर हजर झाले. त्यांनी आधी अपघाताचा पोलिस पंचनामा करण्याची सूचना केली.

त्यावर मी श्री. शेख यांना आपण निगडी पोलिस ठाण्यात जाऊ असे सूचविले. त्यावर त्यांनी पोलिसांनाच इथे बोलावून घेतो असे सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्कही केला. तिथले हवालदार जानराव यांच्याशी श्री. शेख यांचा परिचय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांशी ओळख कशी काय? हे मी विचारले असता श्री. शेख उत्तरले की त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गात बाहेरचे काही समाजकंटक येऊन विद्यार्थिनींना छेडतात त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता पोलिस ठाण्यात यावे लागल्याने पोलिसांसोबत ओळख झाली. अधिक माहिती घेतली असता श्री. शेख हे पूर्वी टाकळकर क्लासेस, निगडी येथे ही शिकवत असल्याचे कळले. तेव्हा मी त्यांना त्यांची व माझी १४ वर्षांपूर्वीच भेट झाल्याचे निदर्शनास आणून दिले. आता वातावरणात मोकळेपणा आला होता. त्यांनीही मला सध्या काय चालु आहे असे विचारले. तेव्हा मी नुकताच वितरण व्यवस्थापकाच्या जबाबदारीतून मोकळा झालो असल्याचे सांगितले. आता औद्योगिक सल्लागार म्हणून कार्यरत असून सायंकाळच्या वेळी खासगी शिकवणी वर्गही घेत असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी आमच्या CREATIVE ACADEMY त देखील ये असे आमंत्रण दिले.

आमचे बोलणे चालू असतानाच हवालदार जानराव तेथे आले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही दोन्ही वाहने तातडीने पोलिस ठाण्याच्या आवारात घेऊन या असे त्यांनी सांगितले. श्री. शेख यांची इंडिका बर्‍यापैकी चेपली असली तरीही तिचा चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडला गेला आणि किल्ली फिरवताच ती सुरूही झाली. त्यानंतर ती लगेच पोलिस ठाण्याच्या आवारात हलविली गेली. माझे वाहन मात्र सुरू होण्याच्या स्थितीत नव्हते. मी घरी संपर्क करून वडिलांना बोलावून घेतले. वडिल स्कूटर घेऊन आले. मग त्यांच्यासोबत जाऊन मी क्रेनची शोधाशोध केली. क्रेनचालकाला पाचशे रुपये देऊन माझे वाहन पोलिस ठाण्याच्या आवारात खेचून आणले. आत गेल्यावर घटनेचा वृत्तांत लिहीण्यास सुरुवात झाली. मी सर्व घटनाक्रम कथन केला. त्यानंतर इंडिकाचालकास तुमच्या वाहनाचे किती नुकसान झाले असे विचारले असता त्याने तीन हजार रुपयांचे असे उत्तर दिले. त्यावर हवालदार जानरावांनीच अरे इतके कमी कसे असेल? असे म्हणत चल मी सात हजार लिहीतो असे म्हणत सात हजार लिहीले देखील. श्री. शेख नेमके हा वृत्तांत लिहीते वेळी तिथे हजर नव्हते. इतक्या कमी रकमेचे नुकसान त्यांनी मान्य केलेच नसते. त्यानंतर आम्हा दोघा वाहन चालकांचे परवाने पोलिसांनी स्वत:कडे जमा करून घेतले व वाहनाची मूळ कागदपत्रे जमा करण्यास सांगितले. माझ्या वाहनात नेहमीच मूळ कागदपत्रांच्या छायाप्रती असतात आणि घरात मूळ कागदपत्रे. काही वेळातच मी घरून मूळ कागदपत्रे आणून ती पोलिसांच्या स्वाधीन केली. वाहनाची मूळ कागदपत्रे मिळताच पोलिसांनी माझा परवाना मला परत केला. श्री. शेख यांच्या वाहनाची मूळ कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने त्यांच्या चालकाचा परवाना पोलिसांनी स्वत:जवळच ठेवून घेतला.

आता पंचनामा करण्याचे काम पोलिस दुसर्‍या दिवशी करणार असे त्यांनी सांगितले. तथापि दुसरा दिवस अर्थात २५ जानेवारी रोजी आमच्या परिचितांचा विवाह सोहळा, त्यानंतर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सुटी होती. पोलिसांनी सांगितले की, पंचनामा लिहीण्याचे काम आम्ही आमच्या सोयीने करून घेऊ तुम्ही यायची गरज नाही. आता थेट न्यायालयात ज्या दिवशी जायचे त्याच दिवशी तुम्ही पोलिस ठाण्यात या. आम्ही तुम्हाला तसे कळवू. आता कुठलीही चिंता न करता घरी जा. लवकरच पुन्हा भेटूयात.

(क्रमशः)

http://www.maayboli.com/node/48010

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users