हकीगत एका अपघाताची (३)

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 7 March, 2014 - 06:20

http://www.maayboli.com/node/48001

त्यानंतर २५ तारखेचा विवाहसोहळा २६ चा प्रजासत्ताक हे दिवस निघून गेले. दिनांक २७ जानेवारीच्या सायंकाळी माझ्या घरच्या दूरध्वनीवर (त्या काळी माझ्यापाशी भ्रमणध्वनी संच नव्हता) श्री. शेख यांनी संपर्क केला आणि मला तातडीने त्यांच्या CREATIVE ACADEMY या शिकवणी वर्गावर बोलवून घेतले. त्याप्रमाणे मी तिथे गेलो असता आधी हवापाण्याच्या गप्पा झाल्या आणि मग ते मुद्द्यावर आले.

शेख: पोलिस ठाण्यात पुन्हा जाऊन आलास का?
मी: नाही.
शेख: मी जाऊन आलो. ते मला तीन हजार रुपये मागत होते.
मी: कशाबद्दल? अपघात तर तुमच्या वाहनाकडून झालेला नाही, उलट तुम्ही तर पीडित आहात.
शेख: तरीपण पोलिसांना पैसे द्यावेच लागतात.
मी: हो पण तुमची तर त्यांच्याशी ओळख आहे ना?
शेख: अरे, ओळखीचं काय घेऊन बसलास; पोलिस तर स्वत:च्या सख्या बापालाही सोडत नाहीत. तुला अजून बोलावले कसे नाही? तुझ्याकडूनही ते पैसे मागणार आहेतच.
मी: माझ्याकडून? ते कशाबद्दल?
शेख: अरे, तुझी गाडी तू चालवत नसून तू फक्त शेजारी बसला होतास आणि कोणी तरी एक बाई तुझी गाडी चालवत होती. पोलिसांकडे तसे सांगणारा एक साक्षीदार देखील आहे - समोरच्या सावली उपाहारगृहातला एक कर्मचारी.

हे ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटले. एक तर त्या दिवशी माझ्या सोबत माझी आईच फक्त वाहनात होती. पन्नाशीची महिला टेम्पो ट्रॆक्स सारखे अवघड वाहन कशाला चालवेल? शिवाय त्या दिवशी अपघातानंतर आई लगेचच निघून गेली होती. श्री. शेख किंवा त्यांच्या चालकाने तिला पाहिलेच नव्हते. पोलिस तर बरेच उशिरा आले होते त्यांना तर अपघाताच्या वेळी आईच्या वाहनात असण्याविषयी काही ठाऊक असणे शक्यच नव्हते. तरीही आता श्री. शेख जे काही सांगत होते ते ऐकल्यावर पोलिसांचा काहीतरी डाव असणार असा मला संशय आला. एक तर माझ्या वाहनाचा तृतीय पक्ष विमा उतरविलेला होता (जो की कायद्याने बंधनकारक आहे) त्यामुळे माझ्या वाहनामूळे जर कोणाचे काही नुकसान झाले तर ते विमा कंपनी माझ्यातर्फे भरून देणार. परंतु जर अपघातावेळी वाहन चालविणार्‍या व्यक्तीकडे वैध परवाना नसेल तर मात्र विमा कंपनीची जबाबदारी संपली. अशा वेळी नुकसान भरपाई करुन देणे वाहन मालकावरच बंधनकारक असते. अर्थात माझी आई वाहन चालवित होती असा पंचनामा पोलिसांनी तयार केला तर ते मला मोठे नुकसानीचे ठरणार होते. तरी याविषयी श्री. शेख यांचेसोबत अधिक चर्चा न करता मी तेथून निघून आलो.

त्यानंतर २९ जानेवारी २००७ रोजी मला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मी नको म्हणत असतानाही वडिलांनी सूटी घेतली आणि तेही माझ्यासोबत आले. पोलिस ठाण्यात पोचताच हवालदार जानरावांनी आमचे हसून स्वागत केले. हल्ली पंच म्हणून प्रतिष्ठीत व्यक्ती मिळविणे किती अवघड जाते, लोकांना आग्रह करकरून बोलवावे लागते, मोठ्या कष्टाने पंचनामा बनवावा लागतो. या पंचांच्या चहापाण्याचा खर्चही पोलिसांनाच करावा लागतो वगैरे रडकथा जानरावांनी ऐकविली. तर आमच्या वाहनाच्या अपघाताचा पंचनामा करण्याचा काही मेहनताना त्यांना हवा होता असे त्यांनी शेवटी प्रत्यक्षच सांगितले. मी अशी कुठलीही रक्कम देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यावर "आम्ही तुमची केस कोर्टात कशी प्रेझेंट करू त्यावर तुम्हाला काय दंड होईल ते अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही आमची सोय पाहा, आम्ही तुमची सोय बघतो" अशी मखलाशी जानराव हवालदारांनी केली.

मी विचार करायला थोडा वेळ मागून घेतला आणि बाहेर जाऊन सार्वजनिक दूरध्वनी केंद्रावरून वकिलांना संपर्क केला. वकीलांनी सांगितले, "अशा केसेसमध्ये पोलिस जे सांगतात त्याप्रमाणेच करा, फायद्यात राहाल. गुन्हा कबूल केला तर आर्थिक दंड होईल आणि फार तर कोर्ट उठेपर्यंत कोर्टातच बसवून ठेवतील. गुन्हा कबूल नाही म्हणालात तर जामिन घ्यावा लागेल, वकील द्यावा लागेल. वकीलाची फी, प्रत्येक तारखेला हजर राहणे यात मोठा खर्च होईल आणि यातून इतकेच सिद्ध करता येईल की वाहनाचे ब्रेक फेल झाले यात तुमचा दोष नव्हता सबब तुम्हाला आर्थिक दंड होणार नाही. अर्थात पोलिसांनी जर केस चूकीच्या पद्धतीने प्रेझेंट केली असेल तर तो दंड देखील टाळता येणार नाहीच."

"पण समजा मी आता न्यायालयात गुन्हा कबूल आहे असे म्हंटले आणि मला तुरूंगवास झाला तर?" मी एक शंका व्यक्त केली.

"असे काही होणार नाही" वकील हसून उत्तरले, "तुम्ही पोलिसांचे ऐका, ते तुम्हाला सहकार्य करतील."

वकिलांसोबतचे संभाषण आटोपून हताश मनस्थितीत मी पोलिस ठाण्यात पोचलो. माझा चेहरा पाहूनच वडील काय समजायचे ते समजले आणि त्यांनी चटकन पाचशे रूपये हवालदार जानरावांना दिले. पाचशे रुपये मिळताच जानराव एकदम खूश झाले. मग त्यांनी अजून एका हवालदाराला बोलावले. "हे मुंगसे हवालदार. यांच्यासोबत उद्या तुम्ही कोर्टात जा." मग वडिलांनी मुंगसे हवालदारासोबत अजून काही बातचीत केली. त्यात वडिलांच्या बालपणी त्यांच्या नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शाळेत कोणी मुंगसे नावाचे शिक्षक होते त्यांचा उल्लेख झाला. त्यांच्या संदर्भाने या मुंगसे हवालदाराची आणि वडिलांची ओळख निघाली. त्यानंतर मुंगसे यांनी वडिलांना दुसर्‍या दिवशी निश्चिंत होऊन कामावर जायला सांगितले आणि मी एकट्यानेच मुंगसे हवालदारासोबत न्यायालयात जायचे असे ठरले.

(क्रमशः)

http://www.maayboli.com/node/48031

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिसकेस म्हणजे अवघड परिस्थिती अस्ते! वाहनाबाबतची म्हणजे अधिकच अवघड.

[निवेदन: कथेचा अंतिम भाग वाचल्यावर मी माझे वरील विधानाबाबत स्पष्टीकरण देउ इच्छितो.
वरील विधानातून 'पोलिसकेस" म्हणजे अवघड परिस्थिती, म्हणजेच डिपार्टमेण्ट/पोलिस वाईट असा अप्रत्यक्ष अर्थ निघू शकतो वा कोणी काढू शकते, तो मला मान्य नाही व वरील विधानात तसे मला अपेक्षित नाही, व केवळ पोलिसकेसमधिल तांत्रिक बाबी पूर्ण करण्याची पद्धत अवघड असू शकते असे मला सुचवायचे आहे,

कथेचा अंतिम भाग वाचल्यानंतर लक्षात आल्यावर मला हे विश्लेषण देणे गरजेचे वाटले व कोणत्याही परिस्थितित "पोलिस/डिपार्टमेण्द - जनतेकरता जनतेचे मित्र" या गृहितकाला धक्का लागेल असे विधान करणे /माझेकडून अजाणता नकळतपणे होणे / विधानातुन कोणी तसे अनर्थ काढणे, हे मला उचित वाटले नाही, सबब वरील विधानाबाबत, त्याचे मला अपेक्षित अर्थाबाबत हा खुलासा केला असे.]

चेतन सुभाष गुगळे,

ही गोष्ट वाचून कलियुगाविषयी एक भाकीत आठवलं. ज्याच्याकडे पैसे असतील त्यालाच न्याय मिळेल अशी परिस्थिती असेल. Sad

आ.न.,
-गा.पै.