तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

Submitted by पुरंदरे शशांक on 2 March, 2014 - 10:19

तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली .....

फाल्गुन महिना सुरु झाला की वेड्या मनाला एक ध्यास लागतो तो तुकोबांचा. इतरवेळेस त्यांचे भावभरले अभंग मनात रुंजी घालतच असतात पण फाल्गुन जसा जवळ येतो तसे त्यांचे इतर अभंग जास्त जवळचे वाटू लागतात - ज्यात त्यांची प्रखर विठ्ठलनिष्ठा अशी काही उफाळलेली दिसते की त्यापुढे त्यांना प्रपंच पार पार नकोसा वाटतो आहे.... - अशा त्या धुंदीतच ते एकटेच या लौकिकाकडे पाठ फिरवून त्या भामगिरी टेकडीवर जात असतील ..... आणि तिथे काय विठ्ठलाशी संवाद साधत असतील का आत्मसंवादात लीन होत असतील ??

त्यांच्या अभंगातून बुवा कायमच विठ्ठलाचा धावा करताना दिसतात - कधी प्रेमाने तर कधी आर्ततेने. कधी त्याच्याशी प्रेमाने भांडतातही - पण कधी ते असे काही बोलतात, लिहितात की तो भाव आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या उरात धडकीच भरवेल - आपल्या सुखासीन भक्तिच्या कल्पनेला जोरदार सुरुंगच लावेल - असे विविध भाव प्रकट करणारे बुवांचे हे आगळेवेगळे धगधगीत अभंग ....

आग लागो तया सुखा | जेणे हरि न ये मुखा |
मज होत का विपत्ति | पांडुरंग वसो चित्ती |
जळो ते समूळ | धन संपत्ती उत्तम कुळ |
तुका म्हणे देवा | जेणे घडे तुमची सेवा || २२८६||

या अभंगात ते म्हणाताहेत -----
रे विठ्ठला - माझ्या मुखात हरिनाम येत नसेल तर त्या सुखाची होळी झाली तरी चालेल रे. या चित्तात जर तू वसतीला येणार असशील तर विपत्ति (दु:ख) भोगायची माझी आनंदाने तयारी आहे. तुझ्यापुढे धन-संपत्ती, उत्तम कुळ हे सगळे सगळे अगदी तुच्छ तुच्छ आहे रे अगदी - अरे विठुराया, फक्त तुझी मनोभावे सेवा यापलिकडे मला काहीही प्रिय नाही रे .....

देवावर किती निस्सिम आणि जीवापाड प्रेम असावे याचे हे मूर्तिमंत उदाहरण. आपली सांपत्तिक, शारिरिक स्थिती कितीही उत्तम असली तरी त्यात जर भगवतप्रेमाला स्थानच नसेल तर तर तुकोबांना ते सगळे अतितुच्छ वाटतंय...
.... आपल्यासारख्या सर्व सामान्य मंडळींची जी मनोभूमिका असते त्याच्या नेमके उलट आहे हे... - आपल्या आयुष्यात पैसा-मान-कुलीनता यांना सर्वात जास्त महत्व (प्रायॉरिटी) असते तर बुवांच्याठिकाणी विठ्ठलप्रेमाला प्राणापेक्षाही जास्त महत्व आहे.....

देवाची जी निकड तुकोबांना आहे ती आपल्या पार आकलनापलिकडची आहे, कल्पनेपलिकडील आहे ..... आपल्या आसपास पाहिले तर असे दिसते की - कोणी एखादा आपल्या प्रिय व्यक्तिसाठी स्वतःचा जीव देतोय, कोणाला पैसाअडका प्राणापलिकडे प्रिय असतो तर कोणाला मान-किर्ती .... पण इथे तर "परमेश्वर" हा प्रत्यक्षात आहे का नाही इतक्या प्रचंड द्वंद्वाची गोष्ट असताना तुकोबांसारखा महापुरुष त्याकरता सर्व सुखावर पाणी सोडायला तयार आहे, सगळ्या आप्तेष्टांचा त्याग करायच्या गोष्टी करतोय - हे सगळे कोणत्या बळावर हेच कळेनासं होतं ....

पुण्यात एक उच्चविद्याविभूषित थोर समाजसुधारक होऊन गेले - श्री. म. माटे नावाचे ("उपेक्षितांचे अंतरंग" पुस्तकाचे लेखक). ते स. प. महाविद्यालयात प्राध्यापकी करायचे पण दलितांविषयी त्यांच्या मनात अपार कळवळा असल्याने सायंकाळी दलित वस्तीत त्यांना शिकवण्यास जात असत. सनातनी पुणेकर त्यामुळे त्यांना महारमाटे म्हणत असत - पण माटेमास्तरांना त्यांची तमा नव्हती, आपल्या कृतीतून दलितांचा थोडाफार का होईना उद्धार करावयाचाच असे जणू त्यांनी व्रतच घेतले होते. ते स्वतः नास्तिक असल्याने कुठल्याही भगवान -आचार्याला मी मानत नाही म्हणून आपल्या कुशल तर्कबुद्धीने कोणत्याही हिंदू धर्मग्रंथाचे वाभाडे सहज काढू शकत. पण जेव्हा तुकोबांचे अभंग त्यांनी वाचले तेव्हा त्यांनीही प्रामाणिकपणे अशी कबुली दिली की - "कोणत्याही आचार्य, भगवानाला न मानणारा मी या देहूच्या वाण्याला (तुकोबाला) मात्र पार घाबरुन आहे हो - कारण उद्या हा जर माझ्यासमोर येऊन म्हणाला की एवढी बडबड करतोस ना तर चल बरं माझ्या मागे.... - तर तिथे काही माझी धडगत नाही हो .. तुकोबांसारखा महापुरुष या इथे महाराष्ट्रात होऊन गेला हे आमचे थोर भाग्यच .... "

तुकोबांच्या चित्तात, अंतरंगात असे काय बळ होते हे तो एक विठ्ठलच जाणे - आपल्या तर मन-बुद्धी - तर्क-जाणिवेपलिकडचीच गोष्ट आहे ही ...
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही | विचारले नाही बहुमता || असे म्हणणारे बुवा कसे रहात होते ? काय विचार करत होते ? कुठल्या परमेश्वरावर एवढे विसंबून होते .... हे सारे सारे थक्क करणारे आहे .....

प्रपंच किती विचित्र आहे याचा पुरेपूर अनुभव बुवांच्या गाठीला होता. सुरुवातीला अगदी उत्तम चाललेला त्यांचा प्रपंच दुष्काळामुळे पार मोडीत निघाला - त्यांच्या व्यापाराचे दिवाळे निघाले - बायको व मुल मरण पावली. अशा या प्रपंचाच्या भेसूर बाजूकडे पाहून त्यांनी थेट विठ्ठलालाच साकडे घातले - या विनाशी संसारापलिकडील अविनाशी असे काही सुख असेल तर ते मला हवे आहे - प्रपंचातल्या या सतत सुख-दु:खाच्या गटांगळ्या खाऊन खाऊन मला त्याचा पार तिटकारा आलाय - तूच यातून काही मार्ग दाखव ..... - या विलक्षण ओढीने त्यांच्या अंतरात जी पराकोटीची भक्ति निर्माण झाली, जे अनावर भाव उचंबळून आले ते वाचतानाही आपल्या अंगावर काटा येतो - यात परमेश्वराकरता सर्वस्व ओवाळून टाकलेले आढळते - संपूर्ण शरणागतभाव आढळतो - सगळी ऐहिक सुखे त्यापुढे तुच्छ लेखलेली दिसतात .......

या अभंगात तर ते म्हणतात - तू मिळावा याकरता(तुझ्यासाठी) जर मला कोणी विष जरी दिले तरी मी ते अमृत म्हणून पिऊन टाकीन
आम्ही न देखो अवगुणा | पापी पवित्र शहाणा |
अवघी रुपे तुझी देवा | वंदू भावे करु सेवा |
मज मुक्ति सवे चाड | नेणे पाषाण धातु वाड |
तुका म्हणे घोटी | विष अमृत तुजसाटी || १६८२||

तर कधी म्हणताहेत -
नावडावे जन नावडावा मान | करुनि प्रमाण तूचि होई |
सोडुन देहसंबंध वेसने | ऐसी नारायणे कृपा कीजे |
नावडावे रुप नावडावे रस | अवघी राहो आस पायापाशी |
तुका म्हणे आता आपुलिया सत्ता | करुनि अनंता ठेवा ऐसे || २२८१||

ते देवापाशी असं मागणे मागताहेत की मला विजनवास दे, मला मान नको, देह आणि देहसंबंधी (नातेवाईक) यांचे जे व्यसन लागले आहे ते नष्ट होवो - अशी काही कृपा कर.
मला कुठल्याही भौतिक गोष्टींचे (रुप, रस) आकर्षण नसावे, तुझ्या पायाची आस मात्र चित्तात रहावो.

आपण सर्वसामान्य मंडळी काय प्रकारची भक्ति करतो व ती करताना त्या "सर्वसाक्षी प्रभूला" काय काय अटी घालत असतो, काय काय मागत असतो त्याला ही मोठी चपराकच म्हणावी लागेल.
तुकोबांची भक्ति ही पूर्णपणे अनकंडीशनल होती.... ऐहिक, भौतिक सुखाची अपेक्षा करणारी तर नव्हतीच तर त्या अवीट विठ्ठलगोडीपुढे ऐहिक सुखांना पण पूर्णपणे लाथाडून टाकणारी अशी प्रखर वैराग्यशील, उत्कट भक्ति होती.

याकरता किती निकराची अवस्था असावी, किती समर्पणाची सीमा गाठावी, किती तळमळीने साधना करावी, किती सजगतेने आपल्याकडेच पहावे हे तुकोबांच्या वेगवेगळ्या अभंगातून स्पष्ट होते ....
त्या अभंगाचा अभ्यास करायचा तो त्यासाठीच ......

काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥१॥
मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥
होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥२॥
अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥३॥
तुका म्हणे तुझे पाय आतुडती । ते मज विपत्ती गोड देवा ॥४॥११२८||
जर तू भेटणार असशील तर मला विपत्तीही (दु:ख) गोडच वाटेल

भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥८९६||

प्रेम गली अति संकरी ताने दो न समाये |
जहाँ मैं था वहाँ हरि नही; जहाँ हरि था वहाँ मैं नही ||
या कबीरांच्या उक्तीची सहजच आठवण यावी असे हे बुवांच्या अभंगातले चरण आहेत. प्रेमाची गल्ली इतकी अरुंद आहे की त्यात एकच राहू शकतो - दोन नाही. एकतर मी आहे नाही तर केवळ हरिच .....

सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥१॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥९०८||

देहसुख किंवा देहासाठीचे उपचार बुवांना जणू विषवत वाटताहेत.....

हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥१॥
बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥
जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥२॥
तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥३॥
तुका म्हणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥४॥९२९||

या माझ्या जीवाला एकच चाड (आवड, इच्छा, आस) आहे की हा जीव विठ्ठलरुपच व्हावा, अजून कसलीही इच्छा नाही - सगळा व्यवहार, संसार, लोकाचार तुटलाय ..... सगळा संसार संपून गेलाय .......

आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥१॥
जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥
जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥२॥
तुका म्हणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥३॥९३२||
देवाचे चरण हेच त्यांना अति मोलाचे वाटताहेत - त्यापलिकडे कसला सोसच नाहीये त्यांना ....

जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥
वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥
तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥३॥ ९३३||
एखादा उत्तम, अनमोल दागिना आपण जसा एखाद्या पेटीत नीट जपून ठेवतो तसं बुवांना त्यांच्या हृदयपेटीत विठ्ठलरुपी धन जतन करावेसे वाटते आहे. आणि यासाठी शुद्धभावाची किती गरज आहे तेही पहिल्याच चरणात ते सांगत आहेत. प्रत्यक्ष विठ्ठल जर त्या अंतःकरणात येऊन रहाणार असेल तर ते अंतःकरण त्याच्या इतकेच शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे हे बुवा आवर्जून सांगत आहेत.

तुकोबांचे असे विविध भावांमधील अभंग वाचताना आपण आपले भान जणू हरवून जातो - कधी नकळत त्या भावाशी एकरुप होतो तर कधी त्या भावाचा जणू दचका उरात बाळगतो.

इतकी वर्षे होऊनही ते अभंग अजूनही तितकेच टवटवीत, अम्लान दिसतात याचे कारण तुकोबांचे हे सारे अनुभवाचे, प्रचितीचे बोल आहेत - ती काही पोपटपंची नाहीये का कोणा ऐर्‍यागैर्‍या पंडिताची शब्दजुळवणी ....

आपल्या मनाला, चित्ताला जर भगवद्भक्तिचा किंचितसा ओलावा निर्माण व्हावा असे कोणाला मनोमन वाटत असेल तर त्याने भावपूर्वक या अभंगांचा अभ्यास करावा - त्यावर निर्मळ मनाने चिंतन करावे - आकाशापेक्षाही व्यापक झालेल्या तुकोबांच्या मनात थोडके का होईना डोकवावे असे वाटले तर हे अभंग जणू असे गवाक्षच आहेत ज्यातून बुवांच्या अंतरंगाचे थोडेफार दर्शन आपल्याला घेता येईल .....
आपण आपल्या चित्ताच्या, मनाच्या टाचा उंच करुन करुन त्यात डोकवावे - पण तिथे डोकावताना निर्मळ भावच ह्रदयात असला पाहिजे - तिथे डोकवताना एकच काळजी घ्यावी की इथे माझ्या मनातला कोणताही विपरीत भाव - मी कोणी विद्वान, मी कोणी समाजसुधारक, मी कोणी इतिहासकार, मी कोणी प्रवचनकार, मी कोणी भाषाकार - नसावा - तो भाव त्या खिडकीला, त्या गवाक्षाला वेगळीच चौकट, वेगळाच रंग देउन जाईल... आणि मग ते बुवांचे दर्शन राहिल बाजूला आणि त्या खिडकीच्या चौकटीलाच मी केव्हा पकडून जाईन हे माझे मलाही कळणार नाही .....
संत होवोनिया संतांसी पाहावे | तरीच तरावे तुका म्हणे - ही उक्ति यासाठी कायम ध्यानी ठेवणे गरजेचे आहे ....

बुवा स्वतःकडेच जेवढ्या त्रयस्थतेने पहात होते तेवढी त्रयस्थता कोणाला भाग्यवशातच प्राप्त होईल - पण निदान बुवांच्या अभंगांकडे बघताना आपले सर्वच्या सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवणे फार फार गरजेचे आहे - इथे फार भक्तिभावाची अपेक्षा नसली तरी निदान निर्मळ दृष्टीची नक्कीच अपेक्षा आहे - या दृष्टीचा फायदा झाला तर आपल्यालाच .... बुवा तर मान-अपमान, स्तुती-निंदा या सगळ्यांच्या पार पार पल्याड आहेत ....

अशा भावाने बुवांचे जे दर्शन घडेल ते कधी आपल्या चित्ताचे क्षालन करणारे असेल .....
तर कधी बुवांच्या आंतरिक उमाळ्याचे आपल्याच ठिकाणी होणारे किंचित दर्शनही असेल ....
..... हे अभंग कधी आपल्याला जगण्याची जिद्द देतील तर कधी आपण किती खुजा विचार करतोय याची जाणीव करुन देत अंतर्मुख करुन सोडतील ......

.......आणि असे हे अभंग वाचता वाचता बुवांच्या त्या त्या भावाशी तद्रूप होता होता - जर बुवाच आपल्या डोईवरुन, अंगावरुन अति प्रेमाने हात फिरवित आहेत असा भाव एखाद्या भाग्यवान सद्भक्ताच्या मनात आला तर त्यात आश्चर्य ते काय !!!
मला स्वतःला तरी हीच जीवनाची सार्थकता वाटेल .... ती लाभावी याकरता त्यांच्याच पवित्र चरणी प्रार्थना.

जय जय राम कृष्ण हरि ......

--------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इतकी वर्षे होऊनही ते अभंग अजूनही तितकेच टवटवीत, अम्लान दिसतात याचे कारण तुकोबांचे हे सारे अनुभवाचे, प्रचितीचे बोल आहेत - ती काही पोपटपंची नाहीये का कोणा ऐर्‍यागैर्‍या पंडिताची शब्दजुळवणी ....>>
अगदी खरेय.. सुंदर, तळमळीचे बोल , तुकोबा या विषयाला साजेसे.

धन्यवाद, शशांकराव,
सकाळीच वेगळे विचार वाचावयास मिळाले.
शाळेत असतांना पालखीपुढे नाचत सुरेल आवाजात
'नामा म्हणे तुझ्या नित्य महाद्वारी, चिंतन करीतो आनंदाने
हेचि घडो मज जन्मोजन्मांतरी'
म्हणत असू त्याची आठवण ताजी झाली. छान ! छान जाणार आजचा दिवस !

>>>>..... हे अभंग कधी आपल्याला जगण्याची जिद्द देतील तर कधी आपण किती खुजा विचार करतोय याची जाणीव करुन देत अंतर्मुख करुन सोडतील ......>>>>
अगदी खर आहे.
छान समरसून लिहिलंय शशांक तुम्ही.

शशांक जी....

शारीरिक दृष्टीने विचार केला असता आज पहाटेपासून मी काहीशा दमलेल्या अवस्थेत होतो....खूप प्रवास आणि अपुरी झोप ही प्रमुख कारणे होती....आंघोळ, औषधे, चहा झाल्यावर एका धाग्याच्या निमित्ताने इथे आलो आणि प्रथम पृष्ठावरच तुमच्या "तुका म्हणे देह वाहिले विठ्ठली....." या शीर्षकाने माझे लक्ष वेधले. सारा थकवा क्षणात दूर झाला, ज्यावेळी तुमचे मन प्रसन्नचित्ती करणारे लिखाण वाचल्यानंतर......तुकोबारायांच्या लिखाणात उसाचा रस आहेच पण ज्यावेळी तुमच्यासारखा एक अभ्यासक त्या रसाचे गुणधर्म तितक्याच गोडीने आमच्यासारख्यांना विलक्षण प्रभावीपणे लिखित स्वरूपात समजावून सांगतो त्यावेळी रायारचनेची ही ताकद किती प्रभावी आहे याची स्पष्ट जाणीव होते.

"...विठ्ठल जर त्या अंतःकरणात येऊन रहाणार असेल तर ते अंतःकरण त्याच्या इतकेच शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे...." हे फार भावले मला. विठ्ठल वसती करेल तिथेच जेथील अंत:करण निखळ शुद्ध असेल तरच. अन्यथा "आहे माझ्या घरी सोन्याची नगरी, तर ये भगवंता आता तू दारी...!" अशी उर्मट भावना बाळगणार्‍यांनाने ती अपेक्षा बाळगण्यात काय अर्थ आहे ?

वाचनाची देखणी अनुभूती दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.

अतिशय सुरेख लेख Happy

इतकी वर्षे होऊनही ते अभंग अजूनही तितकेच टवटवीत, अम्लान दिसतात याचे कारण तुकोबांचे हे सारे अनुभवाचे, प्रचितीचे बोल आहेत - ती काही पोपटपंची नाहीये का कोणा ऐर्‍यागैर्‍या पंडिताची शब्दजुळवणी ....>>>>>>>अगदी अगदी.

शशांकजी ____/\____. शब्द नाहीत माझ्याकडे. तुमची रसाळ वाणी. धन्यवाद आमच्याशी शेअर केल्याबद्दल.

अतिशय सुंदर लेख, हे तुकोबारायांचे अभंग म्हणूनच पाण्यावर तरंगले , त्यांची भक्ती वैराग्यशील, उत्कट होती म्हणूनच ते सदेह वेकुंठला गेले माझ्या आवडी चा त्यांचा अभंग " हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडीने हेचि माझी सर्व गोडी ...... विठ्ठल... विठ्ठल ....

प्रेम गली अति संकरी ताने दो न समाये |
जहाँ मैं था वहाँ हरि नही; जहाँ हरि था वहाँ मैं नही ||

व्वा. सुंदर.
धन्यवाद, शशांकजी.

अप्रतिम लेख शशांकजी! तुकोबारायांना डोळ्यासमोर उभं केलंत!
आ.न.,
-गा.पै.

अतिशय सुंदर लिहिलंय, मनापासुन उमटलंय हे शब्दाशब्द्दात दिसते... अग्दी परत परत वाचण्याजोगा लेख आहे.

तुकोबांबद्दलचे अपार प्रेमच या सार्‍या प्रतिसादातून व्यक्त होतंय -
बुवांचेच शब्द आहेत सारे - ते तुम्हासमोर मांडताना - "मी तो हमाल भारवाही" याचीच जाण येते ...
हरि हरि ...