मंगळ कार्य !

Submitted by अंड्या on 27 February, 2014 - 13:36

आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड?

ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.."

हा मला दुसरा धक्का .. !

एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्‍याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी?

शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्‍यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअ‍ॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही..

नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.."

तर कसले काय,
आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? <<<<<<
अण्ड्याभौ, तुमच्या या एका वाक्यापोटी अन लेखाचा एकन्दरीत सूर बघता मला हा विषयही त्याच रोखाने समजुन घ्यावा लागला! "वन्चित ठेवणे," ते देखिल "अन्धश्रद्धेपोटी" वगैरे बाबी पचल्या नाहीत. पटणे तर शक्यच नाही.

>>>> काही स्वच्छंदी अविवाहित लोक तर विवाहितांना कमनशिबी समजतात. <<<< LOL
सप्तमस्थान/सप्तमेश सॉल्लीड बिघडलेला अस्तो. कित्येक हेकट लोकान्चे बाबतीत प्रथमस्थानच महाभयन्कर बिघडलेले अस्ते.
पण विवाहित/वा अविवाहित, येऊन जाऊन प्रथम-सप्तम स्थानाचाच हा विषय, जोडीला चतुर्थ- पंचम स्थानाचाही विचार गृहसौख्य व संततीकरता करतात.

आता हे विचारू नका की त्या सध्या समलिन्गी विवाहविषयक कायद्याच्याबाबतीत चर्चेत असलेल्या "समलिन्गी(?)" लोकान्ना कुन्डलीमधुन कसे ओळखावे! माझा त्यावर अभ्यास नाहीये. माझ्यासमोर असे प्रकरण अजुन आले नाहीये Happy

का नाही पटले?
जन्माच्या वेळी मुलगा काळा आहे की गोरा, कुरूप आहे की रुपवान, पुढे जाऊन कर्तबगार बनणार आहे की निकम्मा, सदगुणांचा पुतळा बनणार आहे की व्यसनी हे माहीत नसतानाही त्यावेळी आकाशातले ग्रहतारे कुठे बागडताहेत त्यावरून याच्याशी लग्न करू नका रे बाबा असा आगावू धोक्याचा इशारा देणार्‍या कुंडलीविरांना मी काय कोणत्या आदराच्या नजरेने पाहावे तुम्हीच सांगा.

आणि आक्षेप एवढ्यासाठीच आहे की अश्याने न मानणार्‍यांनाही याचा फटका बसतो..

खरं म्हणजे आपण जी आरामखुर्चित बसून चर्चा करतोय ती मुळात होतच नाही .अंधश्रध्दावाली 'पार्टी' आहे का वगैरे काहीही कळणार नाही .

घटनाक्रम असा असतो .
१स्थळाची चौकशी
२पत्रिका पाहायचीय
३कुंडली पाहून दोन दिवसानी उत्तर "जमत नाही"/नको/योग नाही .
४का ? वगैरे सांगायला बांधिल नाही .विषय संपला .
५मुलगा/मुलगी निर्णय घेण्यास ९९टक्के असमर्थ कमीतकमी चार बुरूज आणि तीन तोफा किल्ला लढवण्यास सज्ज अथवा एकच खंदक आणि त्यात मगर असते .

LOL Srd

>>>>> जन्माच्या वेळी मुलगा काळा आहे की गोरा, कुरूप आहे की रुपवान, पुढे जाऊन कर्तबगार बनणार आहे की निकम्मा, सदगुणांचा पुतळा बनणार आहे की व्यसनी हे माहीत नसतानाही त्यावेळी आकाशातले ग्रहतारे कुठे बागडताहेत त्यावरून याच्याशी लग्न करू नका रे बाबा असा आगावू धोक्याचा इशारा देणार्‍या कुंडलीविरांना मी काय कोणत्या आदराच्या नजरेने पाहावे तुम्हीच सांगा. <<<

अण्ड्या, कित्ती ते वेड पान्घरून पेडगावला जाणे......
तुझ्या वरल्या सत्य(?)कथेतील ते लग्न न झाले ल्या पात्राचा काय आत्ताच कालपरवा जन्म झालाय का? Wink
तस असेल तर सव्वामहिना "नामाक्षरापेक्षा वेगळे" काहीही बघत नाहीत हे माहित करुन घ्या!

अन अण्ड्या, तू पदवीधर/डबलग्र्याज्युएट वगैरे असशीलच, गेलाबाजार येसेस्सी/नोनम्याट्रिक वगैरे....
तर तुला नोकरी देताना/काम देताना देणार्‍याने तुझ्या पदवीच्या सर्टिफिकीटाची नुस्ती सुरनळी बघितली की तुझ्या जनमापासून तू काळा की गोरा, कुरुप की रुपवान, कर्तब्गार की आळशी, हुषार की ढ अशी सगळी हिस्ट्री नजरेखाल्लून घातली?????? तर ती तुझ्या पदवीची सुरनळी तुला नोकरी द्यायला त्यान्ना पुरेशी वाटली तशीच ज्योतिषान्ना जन्मवेळची जन्मठिकाणची ग्रहस्थितीची कुंडली पुरेशी ठरते. आता कळ्ळ का?

Pages