प्रचिती म्हणींची - मराठी भाषा दिवस २०१४ - जिज्ञासा

Submitted by जिज्ञासा on 26 February, 2014 - 23:05

म्हातारी मेल्याचे दुःख (२२ फेब्रुवारी २०१३)

काल हैदराबादमध्ये पुन्हा दोन बॉम्बस्फोट झाले. सकाळी उठल्यावर चहा पिताना ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकताना पाहिली. “पुन्हा??” असा विचार मनात येतो तेवढ्यात खोलीत माझी रूममेट आली तशी लगेच तिला ही ब्रेकिंग न्यूज दिली. तिने डीटेल्स विचारले तेव्हा तोंडातून अभावितपणे शब्द निसटले, “ज्यादा नहीं, अभी तक सिर्फ पॉंच!” बोलल्याक्षणीच खाडकन्‌ तोंडात मारून घ्यावीशी वाटली.

संध्याकाळी घरी आल्यावर ‘उंच माझा झोका’ बघत होते. गेल्या दोन तीन दिवसांचे एपिसोड्स बघायचे राहिले होते म्हणून एकदमच बघत होते. रमाबाईंच्या धुळ्याच्या शेजाऱ्यांची लहानपणीच विधवा होऊन माघारी आलेली मुलगी, तिचे ते भ्रमिष्टासारखे वागणे आणि तिकडे विठ्ठलपंतांनी सुभद्राकाकूंवर, आपल्याच बायकोवर केलेली मनमानी. ताईकाकूंचे असहाय्य समजुतीचे बोलणे ऐकताना वेदनाही होत होत्या आणि संतापही! (स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारणाऱ्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा कसला आलाय अभिमान?)

कालचा एपिसोड बघताना मन मागे गेले. सातवीत असताना जेव्हा मी ह. ना. आपट्यांची “पण लक्षात कोण घेतो” ही कादंबरी वाचून संपवली होती तेव्हा रात्रीचे १२:३० वाजून गेले होते. पुस्तकाच्या शेवटाने डोकं सुन्न झालं होतं. पलंगावर पडल्यावर सवयीने केसांपाशी हात गेला. क्षणभर ते सारे केस नाहीसे झाल्याची कल्पना मनात आली आणि ब्रम्हांड आठवले! भयंकर रडले होते मी तेव्हा, अगदी ओक्साबोक्शी. शेवटी आत्याने समजूत काढली होती की पुस्तकातले सारे काही खरे नसते. पुस्तकातल्या गोष्टींचा इतका परिणाम होऊ द्यायचा नाही मनावर. आता हे असे काही होत नाही. वै. वै.

ती सातवीतली मी आणि आजची “सिर्फ पॉंच!” म्हणणारी मी! सिर्फ पॉंच? इतकी निबर कशी आणि कधी झाले मी? कुठे गेली माझी संवेदनशीलता?कालपासून माझे मन मला फार खाते आहे! म्हातारी मेल्याचे दुःख तर आहेच पण सावधान! काळही सोकावतो आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users