'एका पिढीचे आत्मकथन' - कविवर्य कुसुमाग्रज

Submitted by चिनूक्स on 26 February, 2014 - 22:56

ज्येष्ठ संपादक श्री. वामनराव ढवळे यांचं मराठी साहित्यक्षेत्रातलं योगदान लक्षणीय आहे. 'पारिजात', 'ज्योत्स्ना', 'समीक्षक', 'रागिणी', 'साहित्य', 'महाराष्ट्र साहित्य-पत्रिका' अशा अनेक महत्त्वाच्या साहित्यविषयक नियतकालिकांचं त्यांनी यशस्वी संपादन केलं. अनेक लेखक, कवी, टीकाकार केवळ ढवळ्यांमुळे लिहिते झाले. मुंबई मराठी साहित्य संघाचे ते एक खंदे कार्यकर्ते होते.

१९६७ साली वामनराव ढवळ्यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी भेट त्यांना द्यावी, असा प्रस्ताव समोर आला. अनेक कल्पना मांडल्या गेल्या. वामनरावांची साहित्याप्रती असलेली निष्ठा वादातीत होती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मराठीत लिहिणारे बहुतेक सर्व साहित्यिक वामनरावांचे स्नेही होते. मराठीत लेखन करणारी, स्वतंत्र भारतातली ही पहिली पिढी होती. या सर्वांनी ते लिहिते कसे झाले, त्यांच्या लेखनांतील चढउतार, आढावे आणि कमाई (साहित्यिक), भोवतालचे प्रवाह इत्यादीबद्दल आत्मपरीक्षणात्मक लिहावं, आणि हे लेखन ग्रंथरूपानं प्रकाशित करावं, असं ठरलं. लगेच महत्त्वाच्या लेखकांची यादी तयार केली गेली. चाळिसेक नावं ठरली. त्यांना पाठवायच्या पत्राचा मसुदा श्री. पु. भागवतांनी तयार केला. पु. शि. रेगे यांनी पत्रव्यवहाराची जबाबदारी स्वीकारली.

विनंतीनुसार अनेक लेख आले. पु. शि. रेगे, रा. भि. जोशी आणि डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये या संपादकमंडळानं या लेखांवर संस्कार केले. अगोदर 'मौजे'नं हा ग्रंथ प्रकाशित करावा, असं ठरलं होतं. पण या ग्रंथाचं वाङ्मयीन मूल्य लक्षात घेता मुंबई मराठी साहित्य संघानं असा आग्रह श्रीपुंनी धरला आणि अनेक अडचणींना सामोरे जात 'एका पिढीचे आत्मकथन' हा ग्रंथ प्रकाशित झाला.

वि. स. खांडेकर, के. वा. भोळे, कवी यशवंत, ग. त्र्यं. माडखोलकर, अनिल, श्री. के. क्षीरसागर, वि. ह. कुलकर्णी, रा. श्री. जोग, रा. भि. जोशी, शेष, अनंत काणेकर, प्रा. भ. श्री. पंडित, राजकवी काळेले, डॉ. वि. भि. कोलते, वा. रा. ढवळे, प्रभाकर पाध्ये, डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये, पु. शि. रेगे, प्रा. अरविन्द मंगरूळकर, बा. भ. बोरकर, प्रा. वा. ल. कुलकर्णी, डॉ. ना. ग. जोशी, दुर्गाबाई भागवत, कुसुमाग्रज, वा. रा. कान्त, इंदिरा संत, प्रा. वामन चोरघडे आणि डॉ. गो. के. भट या पहिल्या पिढीतल्या साहित्यिकांचं आत्मकथन असलेला हा ग्रंथ महत्त्वाचा खरा. दोनतीन तपांच्या वाटचालीचं सिंहावलोकन करताना आपले लेखनादर्श कोणते, कोणाच्या लेखनानं आपण प्रभावित झालो होतो इत्यादी बाबींविषयी प्रामाणिकपणे केलेलं कथन वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन पिढ्यांना उद्बोधक ठरेल, हे नक्की. साहित्यिकांच्या ज्या पिढीचं हे आत्मकथन आहे, ती पिढी आज काळाच्या पडद्याआड जाऊनही काही वर्षं उलटली आहेत. त्यामुळे हे लेख फार महत्त्वाचे आहेत.

कविवर्य कुसुमाग्रजांचा या ग्रंथातला लेख महत्त्वाचा ठरतो, कारण या लेखात ते त्यांच्या कवितांविषयी न लिहिता नाटकांबद्दल लिहितात. कुसुमाग्रजांनी अनेक साहित्यप्रकारांत यथेच्छ मुशाफिरी केली. त्यांनी कविता लिहिल्या, कथा लिहिल्या (शांताबाई शेळक्यांनी संपादन केलेला त्यांचा कथासंग्रह फार सुरेख आहे), कादंबर्‍या लिहिल्या, भाषांतरं केली, वेळोवेळी लेख लिहिले, संपादनं केली आणि नाटक-नाटिका-एकांकिकाही लिहिल्या. 'नटसम्राट', 'वीज म्हणाली धरतीला', 'ययाती आणि देवयानी' अशी त्यांची मोजकी नाटकं आजच्या पिढीला ठाऊक असली, तरी 'दूरचे दिवे', 'दुसरा पेशवा', 'वैजयंती', 'कौंतेय', 'राजमुकुट', 'ऑथेल्लो', 'आमुचे नांव बाबुराव', 'बेकेट', 'विदुषक', 'एक होती वाघीण', 'आनंद', 'मुख्यमंत्री', 'चंद्र जिथे उगवत नाही', 'महंत', 'कैकयी', (सदाशिव अमरापूरकर यांच्यासह लिहिलेले) 'किमयागार' अशी एकोणीस नाटकं आणि पाच नाटिका-एकांकिका लिहिल्या. यांपैकी अनेक नाटकांची इतर भारतीय व इंग्रजी भाषांमध्ये रूपांतरंही झाली.

यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त 'एका पिढीचे आत्मकथन' या ग्रंथातला कुसुमाग्रजांचा लेख मायबोलीवर पुनर्मुद्रित करत आहोत.

Kusumagraj1.jpg

सर्वच वाङ्मयप्रकारांत आपण लिहावे असे मला वाटायचे आणि त्याप्रमाणे मी अनेक प्रकारांत लिहिलेही. कथाकादंबरीपासून मी आज खूप दूर गेलो आहे. इतका की, या प्रकारांचे लेखन तर अलीकडे होत नाहीच, पण त्यांचे वाचनदेखील फार मर्यादित झाले आहे. पण काही वर्षे अशी गेली की, या वाङ्मयप्रकाराने मला खूप झपाटून टाकले होते. तीन कादंबर्‍या व पुस्तकांत समाविष्ट होऊ शकतील अशा साठसत्तर गोष्टी या काळात मी लिहिल्या आहेत. अनेक कथाबीजांची टिपणे-टाचणे जुन्या कागदपत्रांत मला आजही अचानक सापडतात आणि जुनी ओळखीची गावे अनेक वर्षांनी नजरेत आल्यासारखी वाटतात. विनोदी लेख-कथा, टीकात्मक लेखन, ललित निबंध इत्यादी वाङ्मयप्रकारही असेच माझ्यावर कमीअधिक स्वामित्व गाजवून दूर गेले आहेत. इतिहास, तत्त्वज्ञान, अध्यात्म, समाजवाद, मानववंशशास्त्र अशा काही विषयांच्या आकर्षणक्षेत्रांत मी काही काळ स्वैर आणि अनियमित असे भ्रमण केले, पण ते विषय लेखनापर्यंत कधी पोचलेच नाहीत. त्या विषयांच्या अभ्यासासाठी घेतलेली पुस्तके, न वापरलेल्या किमती कपड्यासारखी अद्यापही माझ्या संग्रहात आहेत. अनेक शाखांमधून आपले लेखन विस्तारित व्हावे ही इच्छा लेखकाच्या प्रकृतीतून उत्पन्न होते की, त्याच्या विविधांगी अनुभवांतून की, केवळ बहुमुखी पराक्रमाच्या मोहातून, हे मला सांगता येणार नाही. पण एवढे खरे की, कोणत्याही प्रांतात मला पाहुणेपणा वाटला नाही आणि असे असूनही एकेक शाखा नकळत मिटत गेली आणि शेवटी जिथून मी या प्रवासाला सुरुवात केली तेथेच - म्हणजे काव्य आणि नाटक यांच्या सरहद्दीतच - मी येऊन उभा राहिलो. त्यातील नाटक या विषयाकडे थोडेसे मागे वळून पाहण्याचा हा प्रयत्न.

आठवणीच्या सूत्राबरोबर खूप मागे गेल्यावर मला माझ्या खेडेगावातील रंगमंच दिसतो. भोवताली झाडे आणि भिंती असलेल्या बखळीत उभा केलेला. गॅसच्या बत्त्या... धूर ओकणार्‍या मशाली... रंगीबेरंगी कपडे... हार्मोनियमचे स्वर. आमच्या या गावात बाहेरची नाटके येणे अशक्यच होते. गाव लहान असले तरी आमचे घर सुसंस्कृत आणि त्यामानाने पुढारलेलेही होते. घरामध्ये नाटक बोलण्यात होते. पण फारसे पाहण्यात नव्हते. ही पाहण्याची इच्छा गावात सटीसहामासी होणार्‍या नाटकाच्या सोहळ्याने भागत असे. एरव्ही ग्रामीण उलाढालीत गुंतलेले बरेचसे बलुतेदार नाटकाच्या निशाणाखाली मोठ्या प्रेमभावाने एकत्र येत. नाटक गावाचे आणि ते उभे करायची जबाबदारी सार्‍याच गावकर्‍यांची. कोणाकडून कपडे, कोणाकडून दागिने, कोणाकडून जाजमे-सतरंज्या आणि बहुतेक सर्वांकडून कमीअधिक वर्गणी. नाट्यविषयक उत्साहाची आणि उद्योगाची एक प्रचंड लाट घराघरावरून वाहायला लागायची. नाटकाचा दिवस जवळ आला की एखाद्या शिंप्याचा हात मशीनपेक्षा हार्मोनियमवर अधिक चालायचा. एखादा लोहार नायकाची भाषणे घणावर ठोकीत बसायचा तर एखादा केशकर्तक धोपटी बाजूला ठेवून नायिकेचे आविर्भाव करताना दिसायचा. आमच्या गावी तेव्हा वर्षादोन वर्षाने बोहाडा होत असे. त्यातील सोंगे जातीजातीला वाटलेली असत. तशी जातीय वाटणी नाटकात नव्हती, पण तरीही बहुतेक सर्व जातींचा हार्दिक सहकार रंगमंचावर दिसत असे. घरातून बर्‍याच कपड्यांचे आणि वर्गणीचे साहाय्य गेल्याने आम्हा भावंडांना प्रेक्षागारात आघाडीच्या जागा मिळत असत. नाटके बहुधा पौराणिक किंवा संतचरित्रात्मक अशी असायची. तुकाराम, दामाजी, धनुर्भंग इत्यादी. अभिनय म्हणजे जोरदार अंगविक्षेप, भाषण म्हणजे मनसोक्त आरडाओरड आणि संगीत म्हणजे तारस्वराने पेटीला दिलेली साथ, असा मामला असायचा. पण गावातील रसिकतेची गरज ही नाटके भागवीत. आणि मुख्य म्हणजे, नाटक ही माणसांची मने पूर्णतः काबीज करणारी वस्तू आहे याचा प्रत्यय तेथे येई. रंगमंचावर आणि प्रेक्षागारातही. नाटकातील माझी प्रारंभिक गुंतवणूक ही असावी. पुढच्या काळात पाहिलेली अनेक नाटके विस्मरणात गेली आहेत, पण या नाटकांतील कित्येक दृश्ये आजही डोळ्यांसमोर ठसठशीतपणे उभी राहतात. याच सुमारास नाशिकला आजोळी गेल्यावर दोनतीन धंदेवाईक नाटकेही पाहायला मिळाली. ते तर सुदाम्याला घडलेले द्वारकेचे पहिले दर्शनच होते!

अर्थात या सर्व प्रकरणांत वाङ्मय नावाच्या गोष्टीशी कोठे मुलाखत होण्याचा संभवच नव्हता. नाटक हे पाहायचे आणि ऐकायचे, पडदा उघडल्यावर ते सुरू होते आणि शेवटचा पडदा पडल्यावर संपते, याच्या पलीकडे त्याला अस्तित्वच नव्हते. नाटक ही एक संकरित कला आहे आणि वेगवेगळ्या कला आपली सामर्थ्ये घेऊन तिच्या दिमतीला रंगमंचावर उभ्या राहतात. नाटकाच्या मूळ प्रवाहात या कला बेमालूमपणे एकजीव झाल्या असल्यास फार चांगले. ती आदर्श परिस्थिती. पण तसे न घडले तरीही कित्येकदा या साहाय्यक कला आपल्या संवादी विलासाने प्रेक्षकांना प्रभावित करतात, आणि यात काहीच गैर नाही. प्रेक्षकांचे वेगवेगळे थर नाट्योद्योगात ओढून घेण्यास हे विलास कारणीभूत होतात. त्या काळात मला संगीताची आवड फारच मर्यादित होती. माणसाच्या आवाजापेक्षा पेटीचा आवाजच जास्त बरा वाटायचा. पण नटांच्या पाठीशी असलेले मोठमोठे चितारलेले पडदे मात्र आपल्याला दुसर्‍या एखाद्या जगात घेऊन जात आहेत असे वाटत असे. पडद्याप्रमाणेच नटांच्या अंगावरील रंगीबेरंगी कपडे, डोक्यावरील शिरस्राणे, कमरेवरच्या तलवारी यांचे दृश्यही मनोवेधक होते. दृश्याप्रमाणेच श्राव्याचेही महत्त्व होते. पण तेथेही शब्दांच्या अर्थापेक्षा त्याच्या नादाचा मोह अधिक होता. पुढील आयुष्यात मला आपल्या भजनी लावणारा शब्द प्रथमतः नादाच्या द्वाराच माझ्या मनामध्ये शिरला. पुढील काळात, अर्थापर्यंत पोचल्यावरही, शब्दाच्या नादाची ही मोहिनी कधीच कमी झाली नाही. आजदेखील एखादे नाटक वा काव्य मनातल्या मनात वाचीत असता, मध्येच एखाद्या विशेष सुंदर आशयसंपन्न शब्दांचा ताटवा लागला तर ते शब्द मोठ्याने उच्चारल्यावाचून म्हणजेच पर्यायाने ऐकल्यावाचून माझे समाधान होत नाही. शब्द म्हणजे नुसता अर्थाचा भारवाहक असत नाही. त्याला नादाचे, रूपाचे सौंदर्य असते. एक जिवंत व्यक्तित्व असते. अस्पष्टपणे का होईना, पण नादाच्या द्वारे येथे त्याचा पहिला परिचय होत होता. वाङ्मयाच्या अथवा लेखनाच्या दृष्टीने मी काव्यामध्ये अगोदर गुंतलो, हे खरे. पण शब्दाची, विशेषतः नाटकी शब्दाची मोहिनी मला त्याही अगोदर जाणवली होती. कोठून तरी जमवलेली मोडकीतोडकी वाक्ये भावंडांसमवेत, गच्चीवर पडदे वगैरे लावून म्हणणे आणि घरातून मनाईहुकूम जारी होईपर्यंत आवाज चढवीत नेणे हा एक नेहमीचा खेळ होता. 'राणा भीमदेवा'तील एक वाक्य कोठेतरी ऐकलेले-अद्यापही मला आठवते: 'हे स्वर्गस्थ शक्तींनो, आम्हा रजपुतांचा आक्रोश स्वर्गाची कपाटं फोडून तुमच्या कानांपर्यंत अजूनही पोचत नाही काय?' स्वर्गस्थ शक्ती म्हणजे काय, आणि कपाटं फोडणं ही काय भानगड आहे हे काहीच समजत नव्हते. पण समजणे हा भागच गौण होता. त्या वाक्याच्या (आणि आमच्याही) नादाने आम्ही भारावून जात होतो.

पुढील काळात गडकरी आणि बालकवी यांची भेट झाली. या दोन दिव्यांवरच माझ्या लेखनाची वात पेटली असे म्हणावयास हरकत नाही. या दोघांची शब्दकळा भिन्न असूनही अत्यंत सुंदर आणि संपन्न आहे. सात स्वरांतील प्रत्येक स्वराचे वैशिष्ट्य तो इतर स्वरांच्या संदर्भात आला म्हणजे समजते. किंबहुना अशा संदर्भातच त्याची जडावस्था संपते आणि तो जिवंत होतो. शब्दाचेही असेच होते. इतर शब्दांच्या संदर्भात तो जिवंत होतो आणि त्याच्या स्वभावाचे विविध विलास प्रगट होतात. भाषेच्या या वाङ्मयीन सौंदर्याचा आणि सामर्थ्याचा पहिला प्रत्यय मला या दोघांच्या लेखनात आला. शब्दांचा आशयाशी असलेला संबंध आता लक्षात आला होता. त्यात साठविलेल्या भावना, कल्पना आणि विचार ही केव्हा स्पष्टपणे तर केव्हा अंधुकपणे मनात घुसत होती आणि वास्तवापेक्षाही अधिक तीव्र, अधिक उत्कट अशी प्रतिक्रिया तेथे उत्पन्न करीत होती, अर्थात येथेही भाषेच्या नाव, लय यांसारख्या पूर्वपरिचित गुणांची महती होतीच. गडकर्‍यांची मुरली ही अशी नादलयीचा विलक्षण वेगवान ओघ असलेली कविता. या कवितेची किती गायने मी केली वा करविली असतील त्याची गणतीच नाही. प्रारंभीच्या ओळीत एकदा प्रवेश केला की, शेवटापर्यंत जाण्यावाचून गत्यंतरच नसे. नादलयीच्या त्या लाटांतून वाहताना तपशीलवार अर्थाची चौकशी करण्याचे भानच उरत नसे. आणि तरीही राधाकृष्णाच्या एकरूप प्रेमाचे एक धुंद आणि रंगीत धुके हवेमध्ये भरून जाई. बालकवींच्या बहुतेक आणि गडकर्‍यांच्या कित्येक कवितांतून आणि नाटकांतून शब्दशक्तीच्या सामर्थ्याचा आणि सौंदर्याचा जो आविष्कार झाला आहे तो आधुनिक मराठीत तरी अजोड आहे असे मला वाटते. तेव्हाचे माझे इतर वाचन कमी नव्हते. मिळतील त्या कादंबर्‍या आधाशीपणाने वाचीत होतो. आपटे, नाथमाधव, दातार, सरस - सुरस ग्रंथमाला इत्यादी. दातारांनी केलेली रेनॉल्ड्सची रूपांतरे तर कल्पनेच्या वावटळीवर कोठल्या कोठे घेऊन जात. पण वाचनाच्या प्रेमात पडणे वेगळे. गडकरी - बालकवींचे साहित्य मला वाङ्मयाच्या प्रांतात घेऊन गेले. या तळावरून प्रत्यक्ष लेखनात प्रवेश होणे फारसे दूर नव्हते. मनात कोंदटणार्‍या अशब्दाला शब्द आणि निराकाराला आकार सापडू लागले. सुरुवातेच्या काळात हे शब्द आणि आकार तर अनुकरणात्मक होतेच, पण आशयही अनेकदा अनुकरणात्मक असायचा. हे लेखन बहुतांशी कवितेचे होते. नाट्यलेखनाचे काही किरकोळ प्रयत्न केले. पण अतूट नाते जडाले होते ते कवितेशी. इतर अनेक कवी व नाटककार पुढे वाचनात आल्यानंतर प्रारंभिक दैवतांविषयीची भक्ती अधिक डोळस झाली आणि लेखनावरील त्यांचा एकजिनसी अंमल नाहीसा होऊन स्वत:च्या वेगळ्या वाटा दिसू लागल्या. या काळात नाटकासंबंधीचे माझे प्रेम स्टेजकडे वळले. शाळा-कॉलेजच्या चारपाच नाटकांतून कामे केली. पण त्यांत गडकरी नव्हते. शेवटी कॉलेजच्या एका वर्षी 'राजसंन्यासा'तील शेवटचा प्रवेश एका मित्राबरोबर संमेलनात मी सादर केला आणि गडकर्‍यांचे नाट्य समुदायासमोर स्वतःच्या मुखाने उच्चारण्याचे समाधान मिळवले. सिनेमा पाहण्याचे प्रमाण नाटकाच्या मानाने खूप अधिक असले तरी 'किचकवध', 'सत्तेचे गुलाम', 'स्वयंवर', 'एकच प्याला', 'मानापमान' अशी काही चांगली नाटके शाळा-कॉलेजच्या काळात पाहावयास मिळाली आणि त्यांचे दर्शनही मनावर खोल ठसा उमटवून गेले. तेव्हाच्या वातावरणात सिनेमाचा विलक्षण प्रभाव होता. व्यावसायिक नाटकाला उतरती कळा लागली होती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात सिनेमा पुराच्या पाणलोटासारखा शिरत होता. या वावटळीत मीही सापडलो आणि कॉलेज संपल्यावर सिनेमाकंपनीची दारे धुंडू लागलो.

एका सिनेमाकंपनीत असतानाच मी माझे पहिले नाटक लिहिले. मोलियरच्या 'मायझर' या नाटकावरती ते आधारलेले होते. कॉलेजच्या अखेरच्या आणि नंतरच्या काही वर्षांत मी इंग्रजी नाटकांचे वाचन बरेच केले होते. मराठीतील बहुतेक नामांकित नाटककार मी वाचले होते. पण गडकरी-खाडिलकरांच्या जवळपास येईल असा तिसरा नाटककार मला आढळला नव्हता. देवल-किर्लोस्कर चांगले होते पण जमिनीवरून चालणारे. त्या दोघांची आकाशगामी झेप यांच्यात नव्हती आणि कोल्हटकर-वरेरकर हे तर त्या मानाने फारच फिके आणि कोमट वाटायचे. तळे संपल्यावर समुद्राकडे वळावे त्याप्रमाणे मी विलायती नाटकांकडे वळलो आणि तेथील पर्वतप्राय लाटांचे कल्लोळ पाहून स्तिमित झालो. शेक्सपियर, शॉ, इब्सेन, सिंज, गॉल्सवर्दी, ऑस्कर वाईल्ड, मेटरलिंक, मोलियर हे या लेखकांत प्रमुख होते. मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करण्याची, माणसाच्या मनात खोलवर जाण्याची या नाटकांची ताकद असामान्य होती. माझ्या या वाचनाला बारकाईची मर्मग्राही नजर नव्हती अथवा कोठल्या विशिष्ट संप्रदायाची बैठकही नव्हती. प्रवाहात पडलेल्या ओंडक्यासारखे असायचे ते. चांगला ओघ सापडला तर शेवटच्या पानापर्यंत जायचे, तो न मिळाला तर हटातटाचा अवलंब न करता पुस्तकाबाहेर यायचे. आवडल्या-नावडल्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न नव्हता. कलाकृतीच्या अंतरंगाकडे जाणारा अभ्यास नव्हता अथवा टिपणेटाचणेही नव्हती. नाही म्हणायला, सिंजचा संग्रह वाचल्यावर 'शेक्सपियरच्या नंतर हाच-' अशा आशयाचे टिपण वहीत करून ठेवल्याचे मला आठवते. आवडत होते ते वाचीत होतो आणि पुढे जात होतो. अशा वाचनाचा लेखनाच्या दृष्टीने काही परिणाम झाला असेल का? या प्रश्नाचे उत्तर देणे मला स्वतःलाच कठीण वाटते. पण एक नक्की आहे की, चांगल्या साहित्याचे वाचन संपूर्णतः परिणामरहित कधीच असू शकत नाही. विशेषतः संस्कारक्षम वयात आणि लेखकाच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे.या नाटककारांच्या सरधोपट वाचनामुळे आधुनिक नाटकाचे नवे आकार आणि आविष्कार माझ्या मनावर फारसे बिंबले नाहीत हे खरे. तसे घडले नाही म्हणून 'दुसरा पेशवा' आणि 'कौंतेय' ही माझी स्वतःची नाटके लिहिताना मी माझ्या पूर्वीच्या प्रेमाकडे - म्हणजे गडकरी - खाडिलकरांकडे वळलो. एक प्रवेश गंभीर, एक प्रवेश विनोदी, अशा तेव्हासुद्धा (१९४७मध्ये) जुनाट वाटणार्‍या साखळीपद्धतीचा मी अवलंब केला. पण आकार-घाटात नाटके जुन्या वळणाची असली तरी माझे बाजीरावाचे आणि कर्णाचे चित्रण, आणि एकूण कथासूत्रे ही गडकरी - खाडिलकरांपेक्षा नाटकाच्या नव्या प्रवाहाशी अधिक मिळतीजुळती होती. नकळत का होईना, पण ही दृष्टी घडविण्यास त्या नाटकांच्या वाचनाने साहाय्य केले असले पाहिजे.

'मायझर'चे रूपांतर रंगभूमीवर आलेच नाही. आमची सिनेमाकंपनी मोडकळीला आली होती. पगारावाचून आणि कामावाचून दिवस काढणार्‍या कामगारांनी नाटक बसवायचे ठरविले आणि त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर - मी कंपनीचा लेखक असल्याने टाकली. मोलियरच्या नाटकाचा आराखडा घेऊन आणि गडकरी छापाचे संवाद व गाणी लिहून मी नाटक लिहिले आणि तालमीची जमवाजमव सुरू केली. तेवढ्यात कंपनी पूर्णतः मोडली आणि आम्ही सर्व वेगवेगळ्या दिशांना निघून गेलो. मी सिनेमाचा नाद सोडून वृत्तपत्रांत शिरलो. पुण्यामुंबईच्या. ती पाचसात वर्षे दुसर्‍या महायुद्धाची आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अंतिम लढ्याची होती. वृत्तपत्राच्या किनार्‍यावर बसणार्‍यांनाही प्रवाहात असल्याची गडद धुंद होती. नाटक नावाची वस्तू या काळात माझ्यापासून खूप दूर गेली. मी कविता लिहीत होतो, कथा लिहीत होतो आणि भरपूर वृत्तपत्रीय लेखन करीत होतो. कवितेतील गडकरी वळण केव्हाच सुटले होते, आता गद्यलेखनही त्यातून, निदान त्याच्या प्रदर्शन वळणातून मुक्त झाले. मुंबईमधील वास्तव्यात वा. रा. ढवळे यांच्या स्नेहामुळे मी साहित्य संघाच्या परिसरात आलो आणि येथे डॉ. भालेरावांनी माझ्याकडे नाटकाची मागणी केली. मी अडगळीत पडलेले मोलियरचे रूपांतर त्यांना दिले. ते त्यांनी बॅगमध्ये घातले आणि आठपंधरा दिवसांनी पुन्हा नाटकाची मागणी सुरू केली. आपण पहिल्या परीक्षेत नापास झालो आहोत हे मी ओळखले. पण डॉक्टर पुन्हा नाटक मागताहेत, तेव्हा आपल्या लेखनावरील त्यांचा विश्वास अद्याप ढळलेला नाही हा एक दिलासा होता.

नंतर त्यांनीच सुचवलेल्या नाटकांतून मी वाइल्डच्या 'आयडियल हजबंड' या नाटकाची निवड केली आणि 'दूरचे दिवे' हे स्वैर रूपांतर त्यांच्या स्वाधीन केले. नाटक सर्वांना आवडले. त्याचे प्रयोगही उत्तम झाले आणि संघाचा नाटककार हा सन्मान मला मिळाला. भालेरावांची भेट ही माझ्या नाट्यलेखनाच्या संबंधात अत्यंत महत्त्वाची घटना होय असे मी मानतो. नाटकाच्या पुनर्वसनाचा जो प्रचंड उद्योग त्यांनी हाती घेतला होता त्याच्याशी अनेकांप्रमाणे त्यांनी मलाही बांधून घेतले. हे घडले नसते तर नाटककार होण्याच्या माझ्या आकांक्षेचे पुनरुज्जीवन झाले असते की नाही, याची शंका वाटते.

'दुसरा पेशवा', 'कौंतेय' ही स्वतंत्र आणि 'वैजयंती', 'राजमुकुट' ही रूपांतरीत नाटके मी साहित्यसंघाच्या वार्षिक उत्सवांसाठी लिहिली आणि त्यांतच त्याचे सुरुवातीचे प्रयोग झाले. 'दुसरा पेशवा'चा नायक पहिला बाजीराव आणि 'कौंतेय'चा कर्ण या दोघांनीही माझ्या मनावर बरेच दिवस स्वामित्व गाजवले होते. ज्या मानसिक भूमिकेतून ही स्वभावाने सिद्ध झाली अथवा त्या व्यक्तींचे विशिष्ट रूप सिद्ध झाले तिच्यात कितीतरी वेगवेगळ्या विचारधारा आणि वेगवेगळ्या निष्ठा तोपर्यंत एकत्रित झालेल्या होत्या! मी स्वातंत्र्यप्रेमी होतो, सत्यशोधक होतो, समाजवादी होतो आणि मराठी इतिहासाचा भाविक वाचकही होतो. माणसाने आपल्या वैचारिक साधनेसाठी मार्क्सच्या जाहीरनाम्याशिवाय दुसरे काही वाचण्याची गरज नाही असे एकीकडे वाटत होते आणि त्याचबरोबर म. गांधींच्या अहींसात्मक प्रतिकाराची आणि प्रेमात्मक संतत्वाची जाणीवही मन भारून टाकीत होती. नास्तिकतेचा पाठपुरावा करीत होतो, पण आत कोठेतरी झंकारणारी आस्तिकतेची एकतारी बंद होत नव्हती. सामान्यावर श्रद्धा होती आणि असामान्याच्या पूजनाकडेही ओढ होती. एकाच देवळाच्या आवारात अनेक देवांची देवळे असावीत तशी ही मानसिक अवस्था होती. विचाराच्या कोणत्याही एकेरी मार्गावर पाय ठरणे प्रायः अशक्य होते. पण असे असूनही काही गोष्टी जास्त पटत, इतरांच्या मानाने. बाजीराव आणि कर्ण यांचे मला झालेले आकलन या मनस्थितीशी संवादी असे होते. नुसत्या थोर पराक्रमी माणसावर काव्य किंवा कादंबरी होऊ शकेल, पण नाटक होणे कठीण. बाजीराव निधडा सेनानायक होता किंवा दिल्लीपर्यंत त्याने मराठ्यांचे निशाण नेले या गोष्टी महत्त्वाच्या खर्‍याच. पण नाटकाला अपुर्‍या. त्याने मस्तानीवर प्रेम केले आणि तिला जवळ ठेवले याचे महत्त्व मर्यादित. लैलामजनू छापाच्या काव्याला हे प्रकरण फार तर प्रेरक झाले असते. पण मला नाटक सापडले ते बाजीरावाचा आपल्या परिवाराशी, दरबाराशी आणि प्रजाजनांशी मस्तानी प्रकरणी जो प्रखर विरोध निर्माण झाला त्यामध्ये. बाजीरावाचा पराक्रम, त्याचे राजकारण, तळाच्या थरातून नव्या, विशेषतः अब्राह्मण सरदार मित्रांची त्याने केलेली उभारणी, मस्तानीवरील तुफानी प्रेम, भावासंबंधी वाटणारी माया, त्याचे मद्यपान आणि मांसभक्षण, मस्तानीच्या मुलाची मुंज व्हावी हा आग्रह, पुण्यातील ब्राह्मणांचा त्याने ओढवून घेतलेला रोष, त्याचे सतत घराबाहेर राहणे आणि घरापासून दूर थोड्या आजारानंतर निधन पावणे, या सर्व घटनांच्या अन्वयातून बाजीरावाचे एक जबरदस्त, शेक्सपीअरिय उंचीचे चित्र माझ्या मनासमोर उभे राहत होते. मोगलांच्या सरहद्दी उद्ध्वस्त करणारा हा महापराक्रमी माणूस प्रेमाच्या सरहद्दीसमोर दुबळा ठरत होता. पावलोपावली शरण जात होता. तो जसा दिल्लीच्या पठाणांना जुमानीत नव्हता तसा पुण्यातल्या ब्राह्मणांनाही जुमानीत नव्हता. सनातनी समजुतींचे तट फोडण्याची त्याची ताकद त्याच्या समरांगणी कर्तृत्वाची दुसरी बाजू होती. तो अगतिक होता ते फक्त धाकट्या भावापुढे - म्हणजे काळजीने स्वीकारलेल्या एका प्रेमापुढे आणि कर्तव्यापुढे. दुनियेतील पहिले बाजीराव आणि दुसरे बाजीराव यांच्यातला हा फरक सनातन आणि नेहमीच्या व्यवहारातही कमीअधिक प्रमाणात दिसणारा आहे. दुसर्‍या बाजीरावाने मस्तानीसारख्या रखेल्या ठेवल्या असत्या तरी सगळा कारभार बिनबोभाट झाला असता. त्यातून कोणतेही पेच वा ताण उत्पन्न झाले नसते. कर्व्यांनी समाजविरोध पत्करून विधवेशी विवाह केला तेव्हा विधवांशी संबंध ठेवणारे काही कमी नव्हते. पण ही असामान्य माणसे प्रस्थापिताच्या पलीकडे, अदृश्यात असलेले एखादे स्वप्न, एखादे सत्य, एखादा न्याय, एखादी निष्ठा पाहतात आणि जे पटले ते प्रस्थापितात आणण्याच्या प्रयत्नात त्याच्याकडून मिळणारे शासनही स्वीकारतात. एखाद्या नीतीला बांधलेला समाज अनीतीला सवलत देतो, पण प्राणपणाने विरोध करतो तो नव्या नीतीला. मस्तानीवर अवैध प्रेम करणारा बाजीराव, विचाराने नव्हे तर असामान्याच्या ठिकाणी असलेल्या मनःप्रवृत्तीनेच बंडखोरीच्या एका तळावरून दुसर्‍या तळावर जात होता. त्याच्या महान पराक्रमाइतकीच त्याची ही बंडखोरी मला जाणवत होती, त्याच्या जीवनातील असह्य ताण जाणवत होते, त्याला झालेले वा त्याने स्वतःला करून घेतलेले शासनही जाणवत होते. बाजीरावाच्या मला जाणवलेल्या या रूपाभोवती नाटक बांधण्याचा प्रयत्न मी केला होता. हे नाटक मी अलीकडच्या काळात लिहिले असते तर त्याचे स्वरूप कदाचित बदलले असते, तंत्र नक्कीच बदलले असते, पण त्याच्या मूळ आशयसूत्रात मात्र काहीही फरक पडला नसता.

बाजीरावाप्रमाणेच कर्ण या पौराणिक, झांशीची राणी या ऐतिहासिक आणि गणपतराव बेलवलकर (नटसम्राट) या काल्पनिक व्यक्तींनी मला झपाटून टाकले होते. या सर्व नाटकांनी लेखनासाठी बराच कालावधी घेतला आहे. चारसहा महिन्यांत नाटक पुरे करणे मला कधीच जमलेले नाही. 'आमचं नाव बाबूराव' हे एकच नाटक याला अपवाद आहे. आजवर प्रकाशित झालेल्या नाटकांत तरी. 'कौंतेय', 'वीज म्हणाली धरतीला', 'ययाति-देवयानी', 'नटसम्राट' या सर्व नाटकांचे लेखन पूर्ण होण्यास वर्षादोनवर्षांचा काळ लागलेला आहे. याची कारणे, नाट्यविषयाचा आराखडा बदलण्याची माझी पद्धत आणि लेखनविषयक शिस्तीचा अभाव ही असावीत असे मला वाटते. वरील सर्व नाटके शोकांतिका आहेत. एखाद्या कथानकाच्या नव्हे, तर व्यक्तित्वाच्या प्रभावाने सुचवलेली अथवा सुरू झालेली. मला जाणवलेल्या एखाद्या शोककारणासह ही माणसे धुक्यासारखी मनात शिरत. ते धुके नाहीसे होऊन त्यातून काही रेखाबद्ध आकार उभे राहावयास अवधी लागे आणि या आकाराभोवती सुसंवादी असे प्रसंग वा कथासूत्र जमून यायला आणखी काही काळ जावा लागे. कथासूत्र अगोदर नसल्याने बरेचसे लेखन विस्कळीतपणाने होणे अपरिहार्यच होते. 'दुसरा पेशवा' व 'कौंतेय' यांचे काही मधलेच प्रवेश अगोदर लिहिले होते असे आठवते. 'नटसम्राट'चा पहिला अंक प्रथमतः लिहिला आणि पूर्ण लिहिला. पुढील दोन अंकांनी बराच अवधी घेतला पण शेवटच्या अंकातील मुक्त काव्ये आणि चोरीच्या प्रवेशातील शेवटची भाषणे ही प्रायः पहिल्या अंकाबरोबरच्या कच्च्या स्वरूपात लिहिली होती. अशी तुटक लिहिण्याची पद्धत चांगली असे सुरुवातीला वाटायचे. पण आता ते चुकीचे आहे हे लक्षात येते. नाटक व्यक्तीवरून सुचले तरी त्याचा कच्चा का होईना, पण पूर्ण आराखडा मनात तयार झाला आणि मुरला हणजे त्याचा एकसंधपणा कोठे हरवत नाही अथवा त्यात विषमतेचा दोष निर्माण होत नाही - निदान अधिक प्रमाणावर. अर्थात मी टिपणे टाचणे तयार करीत नव्हतो असे मात्र नाही. कौंतेय-पेशवाचे आठवत नाही, पण पुढील नाटकांची भरपूर टाचणे मी केली आहेत. कथानक बांधणे अथवा नाटकाच्या आकारात त्याची उभारणी करणे हा पहिल्यापासून माझा 'वीक पॉईंट' आहे. प्रसंगाची बांधणी पक्की झाल्यावर संवादलेखन करणे अला कधीच जड वाटले नाही. किंबहुना चांगला प्रसंग नसतानाही संवादाच्या बळावर नाटक पुढे रेटण्याचा यत्न मी अनेक ठिकाणी केला आहे असे आता मला आढळून येते. या उणिवेमुळेच - मला वाटते - मला टिपणे करीत करीत माझा रस्ता शोधावा लागतो. वीज, ययाती, नटसम्राट या नाटकांतील अनेक प्रवेशांचे तरजुमे मी कथेसारखे वेगवेगळ्या प्रकारे लिहिले होते. पण कच्चे - कितीही आकर्षाक वाटले तरी गळून पडते आणि नाटकाच्या सूत्राशी सांधा जमेल ते अखेरी शिल्लक राहते. 'ययाती'मध्ये शेवटच्या प्रवेशात शुक्राचार्य मला आणायचा नव्हता. पण तो आणता येईल का, हे तसा प्रवेश प्रत्यक्ष लिहूनच बघितले. 'वीज'मध्ये इंग्रजांचा प्रवेश शेवटची सलग प्रत तयार करतानाच आवश्यक वाटला. 'नटसम्राट'मधील स्टेशनच्या प्रवेशाऐवजी एक जंगलातला प्रवेश मी तयार केला होता आणि त्यात 'मॅक्बेथ'मधील काही भाषणांचा व डाकिणींच्या आभासाचा उपयोग केला होता. विठोबा सुचला तेव्हा उत्साह वाटला आणि त्याची अनेक पल्लेदार भाषणे - नाटकाच्या आठवणी सांगणारी व विनोदी - त्या भरात मी लिहून काढली होती. अर्थात पुढे त्यांच्यावर काट मारावा लागला. नाटकातील पात्रे जशी सजीव होऊन आपल्या गतीने - अडखळत का होईना चालायला लागतात, त्याप्रमाणे नाटकाचा ओघही अखेरी आपल्या गतीने वाहतो आण प्रवाहात घुसलेले निकामी द्रव तीरावर टाकून पुढे जातो. नाटकाच्या शेवटच्या पडद्यापर्यंत येऊन ठेपलो, म्हणजे आपण इतका प्रवास - चांगला वाईट राहो - पण सुखरूप केला याचे मला नेहमीच नवल वाटते.

***

टंकलेखनसाहाय्य - मंजूडी, श्रद्धा

***

'एका पिढीचे आत्मकथन' या ग्रंथातील हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास अनुमती दिल्याबद्दल डॉ. रा. अ. भालेराव (प्रमुख कार्यवाह, मुंबई, मराठी साहित्य संघ) व श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे (कार्यवाह, साहित्य विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ) यांचे मनःपूर्वक आभार.

***

प्रस्तुत लेखाचे सर्वाधिकार मुंबई मराठी साहित्य संघाकडे सुरक्षित. प्रताधिकारधारकाच्या लेखी परवानगीशिवाय या लेखाच्या कोणत्याही माध्यमातील पुनर्मुद्रणास परवानगी नाही.

***

लेखातील कुसुमाग्रजांचे छायाचित्र कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या सौजन्याने. छायाचित्रकार अज्ञात.

***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्स, खूप छान लेख. तू नेहमीच काहीतरी वेगळ, नवख, दुर्मिळ, सकस असं वाचायला देतोस. तुझे आभार कसे मानावे कळत नाही! तुझा लोकसंग्रह अमाप मोठा आहे खरचं! केवढ्या कलावंतांशी तुझा परिचय आहे. मला नेहमी तुझ्या लोकसंग्रहाचा हेवा वाटतो. हे सगळ तुझ्याकडून शिकायला संधीच मिळत नाहीये.

मंजूडी, श्रद्धा - दोघींना धन्यवाद. लेख टाईप केल्याबद्दल.

चिनूक्स, खूप छान लेख. तू नेहमीच काहीतरी वेगळ, नवख, दुर्मिळ, सकस असं वाचायला देतोस. >> +१

निश्चितपणे अतिशय अभिनंदनीय असे हे चिनूक्स यांचे कार्य होय. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असो वा नसो, पण 'एका पिढीचे आत्मकथन' ह्या बहुमोल अशा सरस्वतीग्रंथाची ओळख आजच्या पिढीतील सदस्य वाचकांना करून देण्यात आली याचे श्रेय मायबोलीच्या संघास जाते. कुसुमाग्रज याना आजही शालेय व महाविद्यालयीन पातळीवरदेखील "कविवर्य कुसुमाग्रज" या पदवीने ओळखण्यात येते त्याला कारणीभूत आमचे शालेय पाठ्यपुस्तक मंडळ आहे. तथापि नाटककार म्हणून वि.वा.शिरवाडकर किती श्रेष्ठ होते यावर येणा-या काळातील विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे पुन्हा याच मंडळावरील जबाबदारी आहे. अशा या भीष्माचार्याचे स्वत:च्या नाट्यप्रवासावरील विचार वाचताना त्या क्षेत्रातील इतिहास नजरेसमोर आला.

"....नाटकाचा दिवस जवळ आला की एखाद्या शिंप्याचा हात मशीनपेक्षा हार्मोनियमवर अधिक चालायचा...." या वर्णनाने महाराष्ट्राचे नाट्यप्रेम किती प्रखर होते हे स्पष्ट दिसून आले.

[टंकलेखन करण्यात विशेष सहाय्य दिलेल्या मंजूडी, श्रद्धा यांचे अभिनंदन केले पाहिजे. लेख दीर्घ तर आहेच, पण लेखातील मराठी श्रीमंती अत्यंत अचूकपणे बोटातून उतरणेही तितकेच महत्त्वाचे होते....जे पूर्णतया झाल्याचे स्पष्टच आहे.]

मस्तच लेख आहे, आणि 'एका पिढीचे आत्मकथन' ह्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद Happy

धन्यवाद या लेखाबद्दल सर्वाँचेच.लेखक त्यांच्या ठराविक वाङमय प्रकारांनी ओळखले जातात पण त्यांनी इतर लेखनही तेवढेच समर्थपणे केलेले असते .लेखक एखादी कलाकृती योजतो त्याअगोदरच्या घटना आणि वैचारिक वाटचाल व्यक्त करतो ते फारच उद्बोधक ठरते .

मराठी भाषा शाळेंतून लोप पावत चालली आणि वाचकवर्ग कमी होऊ लागला हे या लेखकांचे दुर्भाग्य होय .टिव्ही मालिकांसाठी लेखन करून काही लेखक उजेड पाडत आहेत .विनोद ,विडंबन हे साहित्य प्रकार राजकीय नेत्यांनी भाषणांतून जिवंत ठेवले आहेत .

इतर भाषिक लेखक इंग्रजी लेखनांकडे वळले .त्यातून त्यांना वैयक्तिक फायदा झाला पण त्यांच्या भाषा दुर्लक्षितच राहिल्या .

भारतात समाजातील अन्याय ,कौटुंबिक कलह ,आणि माफक प्रेम या तीन विषयांवरच साहित्यरचना कराव्या लागतात .समाजात असलेला धाडसीपणाचा अभाव लेखकांना अधिक विषय देऊ शकला नाही .

खुपच महत्त्वाचा लेख वाचायला मिळाला... मराठी भाषा दिनानिमित्ताने हा निवडक लेख वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल चिन्मय तुझे खुपच आभार. मंजुडी आणि श्रद्धा, तुम्ही मोठेच काम केलेयत.

मराठी भाषा दिनानिमित्ताने हा निवडक लेख वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल चिन्मय तुझे खुपच आभार. मंजुडी आणि श्रद्धा, तुम्ही मोठेच काम केलेयत. >> अनुमोदन.

छान लेख.

सात स्वरांतील प्रत्येक स्वराचे वैशिष्ट्य तो इतर स्वरांच्या संदर्भात आला म्हणजे समजते. किंबहुना अशा संदर्भातच त्याची जडावस्था संपते आणि तो जिवंत होतो. शब्दाचेही असेच होते. इतर शब्दांच्या संदर्भात तो जिवंत होतो आणि त्याच्या स्वभावाचे विविध विलास प्रगट होतात. >>> Happy

छान कल्पना.प्रास्तविकही माहितीपुर्ण.पहिल्या जागतिक मराठी परीषदेतील कुसुमाग्रजांचे अध्यक्षीय भाषणही असेच सुन्दर आहे.पाठ्यपुस्तकात ते भाषण घेण्यासाठी.त्याना परवानगी मागितली होती.त्यांच्या सहीचे पत्र आले.ते मला अनमोल ठेवा वाटते...

मराठी भाषा दिनानिमित्ताने हा निवडक लेख वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल चिन्मय तुझे खुपच आभार. मंजुडी आणि श्रद्धा, तुम्ही मोठेच काम केलेयत. >> अनुमोदन.++

'एखाद्या नीतीला बांधलेला समाज अनीतीला सवलत देतो, पण प्राणपणाने विरोध करतो तो नव्या नीतीला.' कसलं खर आहे हे. दुसरा पेशवा वाचलंच पाहिजे. पुढच्या भेटीत खरेदीच्या यादीत टाकतो, बाजारात उपलब्ध असेल ना?

धन्यवाद चिनुक्स! कुसुमाग्रजांचे विचार वाचून विचाराना नवीन दिशा मिळते.

मराठी भाषा दिनानिमित्ताने लाभलेली पर्वणी! धन्यवाद चिनूक्स, मंजूडी व श्रद्धा.
नास्तिकतेचा पाठपुरावा करीत होतो, पण आत कोठेतरी झंकारणारी आस्तिकतेची एकतारी बंद होत नव्हती. सामान्यावर श्रद्धा होती आणि असामान्याच्या पूजनाकडेही ओढ होती. एकाच देवळाच्या आवारात अनेक देवांची देवळे असावीत तशी ही मानसिक अवस्था होती.>> किती अचूक वर्णन!

सुरेख! कुसुमाग्रजांच्या व्यक्तिमत्वासारखाच विचारी, संयत, प्रांजळ.

चिनूक्स, मंजूडी, श्रद्धा - मनःपूर्वक आभार

'हार्दिक सहकार' Happy

शब्द आणि शब्द रचना पुन्हा पुन्हा वाचावे असे आहे. लेख खूपच आवडला.

चिनूक्स, मंजूडी, श्रद्धा - मनःपूर्वक आभार.

चिनूक्स, तब्बल महिन्याभराने हा लेख वाचत आहे.त्याच्या विषयातच खूप श्रीमंती आणि महत्वाची आशयसूत्रे साठली आहेत.
एक तर 'एका पिढीचे आत्मकथन' हे पुस्तकच आज एका महत्वाच्या ऐवजासारखे आहे, ते विस्मृतीत गेले आहे किंवा अनेकांना माहितीही नाही, त्याचे पुन:स्मरण ही अत्यंत महत्वाची गोष्ट या लेखाने साध्य झाली आहे, त्यातूनही मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने तू ज्या लेखाची विषय म्हणून निवड केली आहेस ती अत्यंत विशेष आणि चोखंदळ आहे.
कुसुमाग्रजांची नाटके हा तो विषय.
एका महाकवीने लिहिलेली नाटके आणि एका महानाटककाराने लिहिलेल्या कविता यात काहीतरी भुरळ घालणारा प्रतिभाविलास का असावा याचा विचार करताना कुसुमाग्रज आणि शेक्सपिअर यांची अटळ आठवण होते.
''बाजीरावाप्रमाणेच कर्ण या पौराणिक, झांशीची राणी या ऐतिहासिक आणि गणपतराव बेलवलकर (नटसम्राट) या काल्पनिक व्यक्तींनी मला झपाटून टाकले होते. ... वरील सर्व नाटके शोकांतिका आहेत''

कुसुमाग्रजांच्या मनोज्ञ आत्मनिवेदनातलं हे वाक्य त्यांना शेक्सपिअरीय मिती असलेल्या शोकात्म नायक-नायिकांची असलेली ओढ दर्शवतं .अशा नाटकांमधली दीर्घ स्वगते व संवाद कवितेच्या तीव्रतेने येतात नव्हे त्या मुक्तच्छन्द कविताच असतात.

नाटके लिहून समाधान झाले नाही म्हणून एकाहून एक सरस सुनीते लिहून काव्याभिव्यक्ती करणारा शेक्सपिअर आणि कविता लिहूनही शेष राहिलेल्या प्रातिभ अतृप्तीला एकोणीस नाटके लिहून शांत करणारे कुसुमाग्रज तत्वत: एकच आस प्रकट करतात.

म्हणूनच अशी काव्यात्म नाटके कित्येकदा मनोमंचावरच पहावीशी वाटतात !

आभार या अनमोल लेखासाठी.