लाभले आम्हास भाग्य.... - मराठी भाषा दिवस २०१४ - मुग्धानंद

Submitted by संयोजक on 25 February, 2014 - 04:38
mbd2014whitelogo.jpg मुलाखत – स्वाती कपूर –खारकर

२ वर्षांपूर्वी नवीन नोकरीवर रुजू झाले ते धाकाधुकीतच, कसे असतील लोक? माझे सहकारी? लीगल डिपार्टमेंट म्हणजे सगळेच वकील..... कसे जमवून घेईण मी त्यांच्याशी? अशातच माझी ओळख झाली अतिशय गोड अशा , विभागात सगळ्यात लहान असलेल्या स्वातीशी. अतिशय चुणचुणीत अशा या पंजाबी मुलीने मला एकदम आपलेसे केले.

मराठी भाषा दिनाच्या स्पर्धांची घोषणा वाचली, आणि ठरविले की स्वातीचीच मुलाखत घ्यायची. तिला हा विचार सांगितल्यावर तर हसायलाच लागली. पण तरी प्रश्न काढलेच.

प्रश्न : नमस्कार स्वाती, मायबोलीच्या “लाभले आम्हास भाग्य” स्पर्धेसाठी मुलाखत द्यायला तयार झालीस त्याबद्दल धन्यवाद. मला सांग, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? आणि थोडे तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल पण सांग.

स्वाती : तसे सांगायचे झाले तर आम्ही पंजाबी. मुळचे अमृतसरचे. आमचे बरेचसे नातेवाईक दिल्ली, अमृतसर भागात आहेत. माझा जन्म मात्र मुलुंड, मुंबईचा. आईचे बालपण पण चेम्बुर, घाटकोपर भागात गेलेले. आम्ही तिघी बहिणी आहोत; त्यातली मी मधली. वडीलांचा स्वत:चा उद्योग आहे. आई गृहिणी आहे. बालपण खूप मजेत गेले आमचे.

प्रश्न : मराठीशी पहिल्यांदा कधी संबंध आला? आणि कसा?

स्वाती: माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. पण मराठी आम्हाला शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथी पासून तिसरी भाषा म्हणून होती. मला अजूनही आमच्या पाठ्यपुस्तकातील “फुलवेड्या माई”, “अंगणातला पोपट” असे धडे आठवीतात.

प्रश्न : मराठी भाषेत आणि तुझ्या मातृभाषेत काही साम्यस्थळे आढळतात का?

स्वाती: तसे मला काही विशेष जाणवीत नाही. कारण लिपी वेगळी आहे. पंजाबी ही गुरुमुखी मध्ये आहे, तर मराठी देवनागरीमध्ये. पण मराठी साहित्य हे खूप समृद्ध आहे, खूप मोठी परंपरा त्याला लाभली आहे.

वाचलेली पुस्तके : शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके

आवडती गाणी: ही गुलाबी हवा, मन उधाण वाऱ्याचे, झिणी झिणी वाजे बिन, कांदेपोहे ई. खूप आहेत. बहुतेक सगळ्या कोळीगीतांवर नाच केलेलां आहे.

आवडता अभिनेता/ अभिनेत्री : उमेश कामत, शशांक केतकर. अभिनेत्री विशेष कोणी नाही.

प्रश्न : मराठी येत असल्याचा काही विशेष फायदा जाणवतो का? त्याबाबतीतला काही प्रसंग/किस्सा?

स्वाती: हो. मराठी चा सगळ्यात फायदा होतो तो म्हणजे आर. टी. ओ. वाल्यांशी वाद घालताना. मराठीत चार वाक्ये ऐकविली की फार अडवीत नाहीत. तसेच भाजीवाले ई. शी घासाघीस करताना आवर्जून मराठीत बोलतेच.

प्रश्न : पटकन तोंडात येणारी मराठी शिवी कोणती?

स्वाती: मूर्ख

प्रश्न : मराठी खाद्यसंस्कृती बद्दल काय मत आहे तुझे? आणि आवडते खाद्यपदार्थ? न आवडणारे?

स्वाती: मराठी खाद्यसंस्कृती पंजाबी खाद्यसंस्कृतीशी तुलना करता जास्त आरोग्यपूर्ण आहे. चौरस आहाराला खूप जास्त महत्व आहे. म्हणूनच भात आणि साधे वरण हा पण माझा अतिशय आवडता पदार्थ आहे. गोड पदार्थात अर्थातच पुरणपोळी. आणि सी.के.पी. पद्धतीचे कानवले....

न आवडणारे असे विशेष काही नाही, पण हो, वालाचे बिरडे.

प्रश्न : महाराष्ट्रीय वेशभूषा/ साज- श्रुंगार याबाबतीत काय मत आहे?

स्वाती: मला नऊवारी साडी खूप आवडते. आणि नथ पण. महाराष्ट्रीय वेशभूषा खूप साधी पण आपले वेगळेपण जपणारी आहे.

प्रश्न : धन्यवाद स्वाती... आपल्या मातृभाषेसोबतच मराठीला आपलेसे करण्याचा तुझा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. आता आपल्या मुलाखतीतील सगळ्यात महत्वाचा प्रश्न..... मला वाटते की या प्रश्नाचे उत्तर आपण ध्वनीमुद्रित करुया.


Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. मराठी उच्चार पण छान आहेत स्वातीचे (उत्तर भारतिय /पंजाब्यांचे मराठी उच्चार खूप मजेशीर असतात). आणि हिचं तर नाव पण मराठी आहे. Happy

प्रश्न : पटकन तोंडात येणारी मराठी शिवी कोणती? ... हा हा हा.. हा प्रश्न विचारणार्‍या तुम्हीही धन्य Happy

खूप छान! खर तर दक्षिण मध्य/ मध्य मुंबईत (जिकडे चाळसंस्क्रूती आहे) लहानाचे मोठे झालेल्या बिगरमराठींना शक्यतो आपल्यापेक्षा चांगली मराठी येते.. मी एका अय्यरला मराठीत भांडताना बघितले...

हो. मराठी चा सगळ्यात फायदा होतो तो म्हणजे आर. टी. ओ. वाल्यांशी वाद घालताना. मराठीत चार वाक्ये ऐकविली की फार अडवीत नाहीत.>>

शासकीय भाषा - मराठी असल्याचा अजून एक फायदा - लोक (मी सुध्दा) मराठीत (भाउ/ ताई) बोलून भावनिक जवळीक साधून काम लवकर होण्यासाठी विनवणी करतात...