इंग्रजीवरील प्रभुत्व

Submitted by विजय देशमुख on 11 February, 2014 - 22:26

आजकाल इंग्रजी भाषा आवश्यक झाली आहे. आपल्याला आवडो वा नावडो, कधीतरी कुठेतरी असं वाटुनच जातं की आता इंग्रजीवरही प्रभुत्व हवच. आपापल्या क्षेत्रांत आवश्यक असणारे संभाषण, प्रेझेंटेशन्स वगैरे फारशी जड जात नाही. ती सवयीने जमायला लागतात, पण आपल्या क्षेत्राच्या बाहेर विचार करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे फारसं जमत नाही. असं नाही की इंग्रजी बोलताच येत नाही, पण वेळेवर नेमके शब्द आठवत नाही किंवा काय बोलावं, ते सुचत नाही. कित्येकदा इतर लोकं धडाधड सिडने शेल्डॉन {माझ्या काळातली} वगैरे कादंबरी लेखकांची नावे घेतात, तेंव्हा वाटते की अरे, आपण काहीच वाचत नाही की काय?
जयपुर लिटरेचर फेस्टिव्हलबद्दलची पोस्ट वाचल्यावर त्यातला एकही लेखक ओळखीचा वाटला नाही. ओळखीचा तर सोडाच, कोणाचही नाव याआधी वाचलं नव्हतं. याला आळस म्हणावा की अज्ञान?
भारतात असतांना किमान आठवड्यातुन एकदातरी इंग्रजीतुन बोलणे होत होते, पण कोरियात आल्यापासुन ऑफिसात इंग्रजीच काय, कोरियनही बोलणे होत नाही. त्यामुळे आता सराव असा उरलाच नाही. बहुदा, जिथे इंग्रजीचं चलन नाही, त्या देशातल्या लोकांची परिस्थिती अशीच असावी.
आता मात्र हे अधिकच जाणवायला लागलय की इंग्रजीचं वाचन आणि संभाषण अधिक चांगलं व्हायला हवं. लेखनाचा विचारही त्यानंतर करता येईल. अभ्यासाच्या विषयाबाहेरचही ज्ञान मिळवण्यासाठी काय करता येईल? केवळ चारचौघात बोलण्यासाठी म्हणुन नव्हे तर एक अभ्यासक म्हणुन, स्वतःसाठी वेळ काढुन काहीतरी लिहिण्यासाठी, स्वतःचे विचार इंग्रजीतुन मांडण्यासाठी काय करता येईल? तुम्ही काय करता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं, हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. कोण वापर करतात ते नक्कीच महत्वाचं आहे, तुला काय म्हणायचंय ते पोचतंय.

अरे वा, आवडीचा विषय.. माझी कॉन्वेन्टमधील बायको तर काल वॅलेंटाईन डे ला सुद्धा माझ्याकडे गिफ्ट म्हणून ईंग्लिश शिकायचे वचन मागत होती.. Wink

आपली तर खरेच बोंब आहे यात, पण गरज आहे तिथे जमेल तसे न लाजता फाडतो काहीबाही, आणि फारशी गरज नसेल तिथे गप्प बसणेच इष्ठ समजतो.

तसेही आयुष्यातील सर्वात महत्वाचे आणि गरजेचे बोलणे म्हणजे मित्रांशी गप्पा या मातृभाषेतना (वा राष्ट्रभाषेतना) मारण्यातच तर मजा असते.. Happy

या निमित्ताने स्वताचाच एक जुना लेख आठवला. माय ईंग्लिश वॉल्कींग..! पुर्णपणे विनोदी अंगाने लिहिला असला तरी ९०-९५ टक्के सत्यघटनांवर आधारीतच होता. Happy

मध्यंतरी (काही वर्षांपूर्वी) रीमा लागू यांची एक मुलाखत पहायला मिळाली, त्यात कशावरून तरी इंग्रजी बोलण्याचा, मातृभाषेचा, विषय निघाला; तेव्हा त्या जे म्हणाल्या ते पटले होते. त्या म्हणाल्या होत्या --

"आपण ज्या भाषेत मनात विचार करतो ती आपली भाषा. बहुतेक वेळा आपण (मराठी माध्यमात वाढलेले लोक) इंग्रजी बोलतो तेव्हा मनातल्या मनात मराठीत विचार करतो आणि त्याचं इंग्रजी भाषांतर प्रकट संवादात वापरतो. पण कॉन्वेंट मधल्या मुलांचे तसे होत नाही. त्यांना विचारही इंग्रजीतूनच करण्याची सवय होते."

हा खूप छान मुद्दा वाटतो.

मला वाटते सिनेमे, पुस्तकं, वोकॅब वगैरेमधून आपण हेच साध्य करीत असू - एक्स्प्रेशन मनात येतानाच हव्या त्या भाषेत येणे.

मला स्वतःला असे व्हायचे. आधी मराठी - मग त्याचं हिंदी/इंग्रजी.
त्यामुळे बोलण्याची एकूणच प्रक्रिया मंदगती (स्लो) असायची.
शिवाय कर्ता कर्म क्रियापदांचं सिक्वेन्सिंग, डायरेक्ट-इन्डायरेक्ट, had-better/would-rather यासारख्या वर्गात शिकलेल्या गोष्टींचं मोहोळ उठलेलं असायचं.

नोकरीत दरवेळी इंग्रजी बोलायची वेळ आल्यावरच हे सगळं हळू हळू सुधारत गेलं. अव्याहत इंग्रजी वाचन करणारी अमराठी मंडळी सहकारी म्हणून मिळाल्यामुळे कळत नकळत इंग्रजी सुधारायला बरीच मदत झाली.

हिंदी मात्र फिल्मीच रह गया हय.

सईचा मुद्दा माझ्या बाबतीत लागू पडतो. इंग्रजी शिकताना आम्ही ती व्याकरणासकट आधी शिकलो आणि मग बोलू लागलो. इंग्रजी माध्यमातली मुले आधी बोलायला शिकतात मग व्याकरण शिकतात.

देशोदेशी लोकांनी इंग्रजी भाषा आपल्याला हवी तशी वाकवली आहे. हे फक्त चायनातच नाही तर ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंडमधेही आहे. नायजेरियातली भाषा तर ब्रोकन इंग्लीश म्हणूनच ओळखली जाते.

मेकागोना.... हे नायजेरियातले वाक्य इंग्रजीत आहे, यावर विश्वास ठेवाल ? त्या माणसाला लिहून दाखवायला सांगितले तर तो Make I go now. असे लिहून दाखवेल. याचा अर्थ आता मला जाऊ द्या Happy

I am feeling hot असे वाक्य न्यू झीलंड मधे I am hot असे म्हणतात. आणि माझी लेक त्याचे मराठी भाषांतर
मी हॉटै... असे करते.

अशा लोकांत वावरताना मला जास्तीत जास्त शुद्ध बोलायचे भान ठेवावेच लागले.

दिनेश.....

तुमच्या वरील प्रतिसादावरून इंग्रजीविषयीची नेमकी हीच अडचण पु.ल.देशपांडे यानी "बिगरी ते मॅट्रिक" या लेखात छानपैकी मांडली होती. सार्‍या शालेय जीवनात त्या जॅक अ‍ॅण्ड जील वेन्ट अप द हिल ने पिडले होते. आता वेन्ट आले म्हणजे गो आले पाहिजे....मग गो ची रुपे....वेण्ट, गॉन, गोईंग, हॅव गॉन हॅज गॉन.....अशी अक्षरशः मारहाण असायची....म्हणजेच पु.ल. म्हणतात तसे मास्तरांच्या भीतीमुळे आम्हाला इंग्रजी कर्ता आला, कर्म आले, क्रियापद आले, फक्त इंग्लिश आले नाही.

ही गोष्ट ६०-७० वर्षापूर्वीची....आजही शालेय इंग्लिशच्या स्थितीत फार काही उच्च प्रतीचा बदल झाला असेल असे दृश्य नाही.

मामा छान पोस्ट.
इंग्रजी बोलणार्‍यां लोकांबद्दल एकेकाळी मला प्रमाणापेक्षा जास्ती आदर होता.(आता पण आहे :))
कारण मला तेव्हा अज्जिबातच जमायचे नाही बोलायला. इथेच शिकले बोलायला, लिहायला.
आता कामचलाऊ नक्कीच बोलू शकते.

दक्षिणा....

इंग्रजीच काय पण अन्य कोणतीही परकीय भाषा लख्खदिशी बोलणार्‍या व्यक्तीविषयी आपल्याला जो आदर वाटणे स्वाभाविक आहे. पण त्याचा अर्थ आपण त्याच्यापेक्षा कमी आहोत असा नसून त्याच्यासारखेच ज्ञान आपणही प्राप्त करून घेण्याची उर्मी आपल्या मनी दाटते.....तुला तसे वाटत राहिले म्हणूनच जिथे तुझी करीअर घडत आहे तेथील परिस्थितीशी तादात्म्य पावून तू छानपैकी इंग्लिशला आपल्या रक्तात भिनविले आहेसच....हीच खरी अभ्यासकाची कमाई. या ठिकाणी मातृभाषा लहान की थोर अशी समजूत आपल्या मनी आणण्याचा प्रकार बिलकुल गरजेचा नाही. त्याचे महत्व आपल्या ठिकाणी कायम आहेच. इंग्लिश जादाची आणि आवश्यक अशी गरज आहे आणि ती मिळविणे म्हणजे आपल्याच ज्ञानाची कक्षा विस्तारणे होय.

अशोक, शाळेत व्याकरणाचा पाया पक्का झाला आणि शिक्षण प्रसारक मंडळींच्या पोद्दार कॉलेजमधे पहिल्याच दिवशी सुखद अनुभव आला. पहिली दोन लेक्चर्स तशी डोक्यावरूनच गेली. मग उपप्राचार्य साठे आमच्या मराठीच्या
वर्गात येऊन सर्वाना दिलासा देऊन गेले. ते म्हणाले, तूम्ही मराठी आहात याची आम्हाला कल्पना आहे. तूमच्या बहुतेक प्राचार्यांना ( अमराठी देखील ) मराठी येते. एखादा मुद्दा समजला नाही तर तूम्हाला मराठीत प्रश्न विचारायची परवानगी आहे. उत्तरे मात्र इंग्लीशमधूनच दिली जातील.. खुप छान वाटले होते आम्हाला. नंतर एक दोन आठवड्यातच आमचा न्यूनगंड कुठल्या कुठे गेला.

दिनेश..... लकी होता तुम्ही आणि तुमचे समकालिन वर्गमित्र की ज्याना इंग्रजी मार्गदर्शनासाठी साठेसरांसारखे प्राध्यापक लाभले. असे शिक्षक फार मोठा चमत्कार घडवून आणतात परकीय भाषेच्या ज्ञानसंवर्धन आणि सखोलतेसाठी. वर्ग पटावरील संख्या हा देखील इंग्रजी शिकण्याच्या वा शिकविण्याच्या तंत्रात एक महत्वाचा मुद्दा ठरतो. मी कोल्हापूरच्या ज्या गोखले कॉलेजमध्ये शिकलो तिथे प्रथम वर्षाला [पी.डी. म्हणत त्यावेळी] तब्बल १५० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि तुकडी एकच....वर्गाची क्षमता कशीबशी ९०-१००. पण गोखलेची किर्ती एवढी मोठी की ज्याला त्याला त्याच कॉलेजमध्ये प्रवेश हवा असायचा....गर्दी झाली तरीही. वर्गात माईक स्पीकर्सची सोय नव्हती. इंग्रजी विषयाच्यावेळी मुले आरडाओरड करून वर्ग डोक्यावर घेत....त्या विषयाच्या प्राध्यापकांनाही काही स्वारस्य नव्हते त्या कशाबशा ४५ मिनिटांच्या दंग्याच्या वातावरणात इंग्रजी शिकविण्यात.....काहीतरी अगम्य बोलायचे....नोट्स नव्हता....प्रश्नोत्तरे नव्हती....समजले किंवा नाही याबद्दल कसलीही विचारपूस नाही. झाली बेल...चालले बाहेर.

बरबाद होऊन गेला होता तो वर्ग....आणि अशीच कच्ची मडकी पुढे पुढे गेली....आणि टी.वाय.ला कंपल्सरी इंग्लिश पेपरला कित्येक टर्म्स अडकली.

म्हणजेच आता माझ्यासारख्या आठदहा विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकायचेच असल्यास कॉलेजच्याबाहेर उपलब्ध असलेल्या ज्ञानगंगा म्हणजे नगर वाचन मंदिराचा आसरा घ्यावा लागला...."प्रज्ञा क्लासेस" सारखे खाजगी शिकवणीचे वर्ग लावायला लागले. तिथे मात्र मन रमले. अवांतर वाचनानेसुद्धा इंग्रजीवर पकड मिळविण्याचे यत्न यशस्वी ठरले हे मुद्दाम सांगत आहे. आजच्या दिवसातील विद्यार्थी अवांतर इंग्रजी किती वाचन करतो ? हा ऐरणीवरील मुद्दा ठरू शकतो.

अशोक +.बरोबर

आपल्याला ही भाषा जेवढी अवघड वाटते तितकीच जर्मन जपानींना वाटते मग ते इतकी छान कशी बोलतात ?

कारण इकडे कर्ता कर्मातच
अडकलो आपण .सर्व चुकीचा भर देऊन शिकवले आम्हाला .

संस्कृतच्या प्रमाणे नाम ,धातू ची रूपे पाठांतर केले .
नंतर पाच गुणांच्यासाठी
'नो सूनर -दैन अॅज सून अॅज'
पाठ केले .
नंतर आयुष्यात
कधी 'सूनर' भेटले (कोणी बोलतांना ऐकले )नाही .
आठवीत शिंगे फुटल्यावर
"काउज हजबंड रनिँग रनिंग
केम अॅँड धप्पकन फेल्ल इन
द रिवर"छाप पिजे करण्यात गेले .
तरीही आमचे अकरावीतले
इंग्रजीतले गुण पाहून
शेकस्पिअरही हसला असता .
उत्तरे पाठ केली होती .
कधी हातात बैट धरली नव्हती पण माय फेवरिट गेमसाठी 'किंग अव गेम्स ,गेम अव द किंग्ज पाठ केलेला निबंध परीक्षेत आला .
आता पाटी इतकी गिरगोट्यांनी भरली आहे
ती पुसतापण येत नाही .
कॉमेडी इक्सप्रेसचा आशिष म्हटतो तसे
फोडूनच टाकतो .
नवीनच सुरुवात करतो .
घे भरारीतली सादरकर्ती
जूलरी म्हटते पण आम्ही ,
जुवेलरी म्हणजे दागदागिने
घोकलेले .
सगळेच उच्चार मोडून
नवीन करावे लागणार .

माझी मुले इंग्रजी माध्यमात शिकली आणि तांत्रिक शाखांकडे गेली त्यामुळे साहित्यिक इंग्रजीची बोम्बच आहे. कुठलेही अवान्तर वाचन नाही. क्लासिक तर सोडा पण साध्या इंग्रजी साहित्याचे ज्ञान नाही. पेपरमध्य स्पोर्ट्स आणि सिनेमांच्या पानांशिवाय वाचन नाही. त्यांचे इंग्रजी देखील इज, आर, वाज, आय,व्वी, देद, ही , शी, इट च्या पलिकडे नाही. इव्हन इंग्रजी माध्यमाच्या पोरांच्या संभाषण कौशल्याबाबत ही मी साशंक आहे. त्यात आता आणखी अ‍ॅक्रोनिम्स सदृश्य चॅट इंग्रजीची भर.

वर सबटाटल्स बद्दल बरेच लिहिले गेले आहे. पण सबटायटल्स हे काही उत्तम ट्रस्क्रिप्शनचे उदाहरण नाही. त्यातही बर्‍याचा हास्यास्पद अशी वाक्ये असतात.
आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्याना तरी कुठे चार वाक्ये घडघडा मराठीत सलग बोलता येतात? अं ..अं... अं तिथेही असतेच...

माझ्या मते,
कोणतीही नवीन भाषा शिकताना "जसे लहान मुल त्याची मातृभाषा शिकते" तशी शिकावी. तरच ती उत्तम प्रकारे बोलता येवू शकेल. म्हणजे कशी? तर नवीन भाषेतल्या दैनंदिन वापरातल्या व अत्यंत सोप्या शब्दांचे उच्चार व अर्थ जाणून घ्यावेत व ते आपल्या भाषेत बोलताना वापरावेत. हा शब्द-संचय वाढवत नेत छोटी वाक्ये शिकावीत. हे सर्व करताना ती भाषा कशी वाचावी व लिहावी याच्या फंदात आत्ताच पडू नये. आधी बोला, मग वाचा. Happy

'स्पोकन इंग्लिश' कोर्स चा काही फायदा होऊ शकतो? असल्यास कोणी पुण्यातील स्पोकन इंग्लिश इंस्टिट्यूट बद्दल माहिती देऊ शकेल?

If the mountaine will not come to Mahomet, Mahomet will goe to the mountaine.

..
अज ही म्हण ऐकली . अर्थ काय ?

Pages