औषधे : नेहमीच जगवतात पण कधीकधी मारतात देखील !

Submitted by SureshShinde on 9 February, 2014 - 14:48

lead_2.jpg

रात्रीचे दहा वाजले होते. दिवसभरातील पाहिलेल्या आणि लक्ष्यात राहिलेल्या पेशंटांचा विचार करीत नुकतीच पाठ टेकवली होती, एव्हड्यात मोबाईल वाजला. स्वतःवर थोडासा वैतागुनच मोबाईलवर दिसणारा नंबर पहिला. +१ म्हणजे अमेरिकेतून आलेला दिसल्यामुळे पटकन स्लाईड करून कानाला लावला आणि उत्तरलो, "हलो, मी डॉक्टर शिंदे बोलतोय !"
"अरे, मी सुर्यकांत शहा बोलतोय, जाड्या शहा ! ओळखलेस का?"
जाड्या शहा माझ्या बरोबरच एमबीबीएस होवून अमेरिकेत गेला व नंतर न्युरोलोजी शिकून तेथेच स्थायिक झाल्याचे मला माहीत होते.
"अरे मित्रा, तुला कसा विसरणार ! बोल, कशी आठवण केलीस ?"
"तुझी प्र्कटीस जोरात दिसतेय ! या महिन्याच्या अमेरिकन जर्नल ऑफ न्युरोरेडीऑलॉजिमध्ये तुझे आर्टिकल वाचले. व्हेरी इम्प्रेसिव्ह ! ह्या जर्नलमध्ये आर्टिकल एक्सेप्ट होणे सोपे नाही. व्हेरी क्रेडीटेबल ! कॉन्ग्रटस् ! तुझे अभिनंदन करण्यासाठी खास तुझा नंबर सर्च करून फोन केलाय."
जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे फोन नंतर बराच वेळ चालला होता. पेशंट सुनील ताकवले आणि त्यानंतरच्या घटना पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

"सर, मी सौ. मनीषा ताकवले. माझे मिस्टर खडकवासल्याला काम करतात. गेले वर्षभर ते आजारीच आहेत. वर्षापूर्वी त्यांना डाव्या अंगावरून वारे गेल्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. काही दिवसानंतर बरे होवून घरी आले, त्यानंतर सहा महिने कामावर हेखील जात होते. पण हळूहळू त्यांची तब्ब्येत बिघडत चालली आहे. सुरुवातीला त्यांना भरभर चालता येणे कमी झाले. लघवी करतांना त्रास होवू लागला. लवकर होत नसे. हळू हळू त्यांच्या वागण्यात बदल होवू लागला. असंबद्ध बोलू लागले. म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. पण दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत अधिकच खराब होत चालली आहे. आता तर ते माणसेही ओळखत नाहीत. अर्धवट शुद्धीवर असल्यासारखे झाले आहेत. काय करावे काहीच सुचेनासे झाले आहे. माझा पूर्ण धीरच सुटला आहे."
ताकवले बाई मोठ्या धीराच्या दिसत होत्या. हातातल्या रुमालाने डोळे पुसून व थोडेसे थांबून त्या पुढे म्हणाल्या, "तुमच्या एका पेशंटकडून माहिती मिळाल्यामुळे मी मोठ्या आशेने आपल्याकडे आले आहे."
"पण सध्या आपला पेशंट कोठे आहे ?"
"ते एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांचे उपचार चालू आहेत पण … " ताकवले बाई अंमळ थांबल्या.
"मी त्या हॉस्पिटलमध्ये येवून त्यांना तपासू शकणार नाही. तुम्हाला त्यांना रुबीमध्ये हलवावे लागेल म्हणजे मला त्यांना उपचार करता येतील."
"माझी हरकत नाही. आम्ही आजच त्यांना हलवतो. तुम्ही तसे रुबीसाठी लेटर द्याल तारे बरे होईल."

त्याच रात्री उशिरा ताकवले रुबीमध्ये दाखल झाले. दुसय्रा दिवशी सकाळी मी त्यांना तपासले. सुनील ताकवले थोडासा स्थूल बांधा असलेला आणि सुमारे चाळीशीच्या आसपास असावा, हॉस्पिटलच्या कॉटवर छताकडे नजर लावून निपचित पडला होता. मी आवाज दिला पण सुनीलचा प्रतिसाद 'शून्य' ! खांद्याला धरून हलवलं तरी काहीच उत्तर नव्हते. सुनील एका वेगळ्याच विश्वात हरवला होता.
"ते काहीच बोलत नाहीत. रात्रंदिवस असेच पडून आहेत." सौ.
पुढील दहा मिनिटे मी त्यांना तपासत होतो. सुनीलचा मेंदू कोठलाही प्रतिसाद देत नव्हता. प्रतिक्षिप्त क्रियादेखील मंदावल्या होत्या. जणू या जगाशी पूर्ण संपर्कच तुटला होता. एखाद्या ग्यासच्या चुलीचा ग्यास पुरवठा अगदी कमीतकमी करून मंद ज्योत चालू ठेवावी तसा सुनीलचा मेंदू 'स्लो' झाला होता, सेमिकोमा मध्ये गेला होता. पांवलांवर थोडीशी सूज होती आणि त्वचा रक्त कमी असल्यामुळे दिसावी तशी पांढुरकी दिसत होती. बीपी नॉर्मल होते. डायबेटीस नव्हता. ईसीजी आणि छातीचा एक्सरे देखील नॉर्मल होता.
सौ सुनील माझ्या हालचालींचे निरीक्षण करीत शेजारीच उभ्या होत्या. त्यांना जास्त घाबरवून न देता त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देण्याचे कठीण काम मला करायचे होते. अर्थात मला हे नेहमीचेच होते. त्यांच्याकडे वळून मी म्हणालो,
"हे पहा, यांचा मेंदू खूप कमी काम करतो आहे. पूर्वी मेंदूला जसा त्रास झाला होता तसाच त्रास पुन्हा संभवतो. आपला पेशंट सध्या अर्धवट शुद्धीत म्हणजेच सेमिकोमामध्ये आहे. आपला मेंदू जागृतअवस्थेत येण्यासाठी 'रेटीक्युलर ॲक्टिव्हेटींग सिस्टीम' जबाबदार असते. या सिस्टिमला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे असा त्रास असावा असे मला वाटते. आज त्यांच्या मेंदूचा एमआरआय स्क्यान आणि एमआर ॲन्जिओग्राफी करून घेवू म्हणजे चित्र बरेचसे स्पष्ट होईल. तो पर्यंत रक्ताचे रिपोर्टदेखील येतील. तोपर्यंत योग्य ते उपचार सुरु केले आहेत. काळजी नसावी. शिवाय माझ्यापेक्षा सिनियर व अनुभवी न्युरोफिजिशियन डॉक्टर वाडिया यांना देखील आपला पेशंट पाहण्यासाठी रिफर केले आहे. म्हणजे माझी जबाबदारी आणि तुमची काळजी आणखी कमी होईल."
"डॉक्टर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. " असे म्हणून सौ ताकवलेंनी माझ्या खांद्यांवर आणखीच ओझे टाकले. डॉक्टर म्हणजे देव नाही ही जाणीव तिला करून देण्याची ही वेळ नव्हती. मी वॉर्डच्या डॉक्टरांना उपचारांबाबत योग्य सूचना देवून पुढील पेशंट पाहण्यासाठी निघून गेलो.
अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी डॉक्टर वाडियांचा फोन आला.
"शिंदे, युवर पेशंट इज व्हेरी इन्टरेस्टिंग ! उसका एमआरआय तो औरभी इन्टरेस्टिंग ! मेटाबॉलिक एनसेफ़लोपथी जैसा दिखता है. उसके सब ब्लड रिपोर्ट्स तो नॉर्मल है, साला गॉड नोज व्हाट ही इज ह्यावींग !" टिपिकल पारशी टोनमध्ये वाडिया सर बोलत होते. "थॅन्क्स फॉर इंव्होल्व्हिंग मी इन हिज केयर ! विल फॉलो ॲन्ड कीप इन टच !"
डॉक्टर वाडिया अतिशय मितभाषी आणि एखाद्या रक्तपिपासू जळवेसारखे ज्ञानपिपासू डॉक्टर आहेत.
त्या रात्री झोपताना सुनीलचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा सुनीलच्या खोलीत शिरण्यापूर्वी मी बाहेरील कौंटरवर बसून सर्व रिपोर्ट्सचा अभ्यास केला. रक्तामध्ये हेमोग्लोबिनचे प्रमाण मात्र कमी होते. लघवीमध्ये थोडी प्रथिने दिसत होती पण किडनीचे काम व्यवस्थित असल्याचे दाखवीत होते. एमआरआय मध्ये संपूर्ण मेंदू पांढरा दिसत होता. नेहमी दिसणारे पांढरे आणि ग्रे म्हणजे करड्या रंगांचे विभाजन पूर्ण नाहीसे झाले होते. या प्रकारचा बदल अगदी क्वचितच दिसणारा असा होता. रेडीओलोजीस्ट देखील रिपोर्ट देताना गांगरले होते. पुस्तके पाहून आणि नेटवर पाहून पुरवणी रिपोर्ट देणार होते. असे का व्हावे याचा विचार करीतच मी सुनीलच्या खोलीत शिरलो. सौ सुनील वाट पाहत उभ्याच होत्या. सुनीलच्या परिस्थितीमध्ये तीसूभरही सुधारणा नव्हती. पेशंट तपासून मी कॉटशेजारी खुर्ची ओढून चक्क बसलोच.
"हे पहा, मी आणि डॉक्टर वाडिया यांनी आपल्या पेशंटचे सर्व रिपोर्ट पहिले आहेत. खरे सांगायचे तर अजूनही आम्हाला यांना नेमका काय त्रास आहे हे समजत नाहीये.यांच्या मेंदूवर काही केमिकल्स चा परिणाम तर झाला नाही न हे पाहावे लागेल.त्यांना काही विषाणूंचा संसर्ग झाला असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज त्यांच्या पाठीतील पाणी काढून तपासू आणि तो नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतही पाठवू. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही प्रदूषण तर नसेल ना याचाही तपास करावा लागेल.? मला थोडी आणखी माहिती हवी आहे. त्यांना गेल्या सहा महिन्यांत काय काय औषधे दिली आणि कोणती चालू आहेत ते जर सांगाल का ? "
सौ ताकवले यांनी लगबगीने चालू औषधे दाखविली. ती सर्वसामान्य व्हीटँमिन्स सदृशः औषधे दिसत होती.
"या व्यतिरिक्त मी काही आयुर्वेदिक आणि देशी औषधे देत होते." असे म्हणून त्यांनी एक जीर्ण कागद माझ्या हातात दिला.
गेल्या वर्षी ह्यांना पँरालीसिसचा त्रास झाल्यापासून मी वैद्यांच्या सांगण्यावरून महायोगराज गुग्गुळ च्या रोज आठ गोळ्या देत होते. या शिवाय 'सिंदूरभस्म' देखील मधातून देत होते. एव्हडे म्हणून पर्समधून एक प्लास्टिक ची डबी मला दिली. त्या डबीमध्ये स्त्रिया कपाळाला लावतात तशा रंगाची भुकटी दिसत होती.
"सर, सिंदूर म्हणजे मराठीमध्ये शेंदूर तर नव्हे !" माझ्याशेजारी उभ्या असलेल्या वॉर्ड डॉक्टर उद्गारल्या.
माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, शेंदूर म्हणजे लेड ऑक्साईड - रसायन शास्त्र इयत्ता आठवी !
"ओ गॉड ! युरेका ! सुनील आठदहा महिने चक्क लेड खात होता. नो वंडर ही ह्याज लेड एनसेफ़लोपथी !" मी जवळजवळ ओरडलोच !
माझा शोध ऐकून वाडियासर देखील अवाक् झाले.
"युवर हायपोथिसिस लुक्स ॲट्रक्टिव्ह बट हाऊ टू प्रुव्ह ?" सर म्हणत होते.
लेड पॉयझनिंग सिद्ध केल्याशिवाय त्यावर उपचार तरी कसे करणार ?
दिवसभर हाच विचार माझ्या मनात घोळत होता. ही सुमारे सातआठ वर्षांपूर्वीची घटना आहे. तेंव्हा पुण्यातील कोणतीही प्रयोगशाळा रक्तातील लेड लेव्हल मोजमाप करीत नव्हते. नेटवर सर्च घेतले असता बेंगलोर येथे डॉ. टी. वेंकटेश हे नँशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग मध्ये ही तपासणी करतात असे कळले. मी त्यांच्याशी तांतडीने संपर्क साधला आणि त्याच दिवशी सुनीलच्या रक्ताचा नमुना बेंगलोरला रवाना झाला.
दोन दिवस सुनीलचे 'रुटीन' उपचार चालूच होते पण परिस्थिती 'जैसे थे' च होती.
तो दिवस माझ्या चांगलाच लक्ष्यात आहे. माझा फोन खणखणला ,"मी बेंगलोरहून डॉक्टर वेंकटेश बोलतोय. तुमचा हा पेशंट जिवंत आहे का ?"
"हो, आहे ना. का बरे ?"
"अरे त्याची लेड लेव्हल १५४ मायक्रोग्राम आहे. नॉर्मल पाच पेक्षा कमी असते. एव्हडी लेव्हल मी प्रथमच पाहतो आहे. नेव्हर रीपोर्टेड बेफोर इन अवर लँब ! हा तोंडी रिपोर्ट आहे. लेखी रिपोर्ट पोस्टाने पाठवीत आहे. कसला पेशंट आहे हा ?"

Lead.png

मी त्यांना पेशंटची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर ते म्हणाले, " ती दोन्ही औषधे आमच्याकडे पाठवा. आम्हाला त्याचे पृथःकरण करण्यास आवडेल. फ्री ! एक उत्सुकता म्हणून !"
"अवश्य! अवश्य पाठवू. धन्यवाद !"
"आम्हाला या पेशंटचा फोलो अप कळवा. वी आर इन्टरेस्टेड !"

आता प्रश्न होता पुढील ट्रीटमेंटचा ! या प्रकारची ही पहिलीच केस होती. लेड हे एक हेवी मेटल आहे. ते एकदा शरीरामध्ये शिरल्यानंतर शरीर त्याला बाहेर काढू शकत नाही. हा धातू मेंदू आणि हाडांमध्ये जावून चिकटून बसतो व शरीरक्रियेमध्ये बिघाड निर्माण करतो. पुस्तकांनुसार BAL नावाचे औषध वापरावे असे होते. दुसर्या महायुद्धामध्ये लेडच्या बुलेटस् शरीरात राहून विषबाधा करीत त्यासाठी उपाय म्हणून हे औषध शोधले होते. हे औषध शरीरात अडकून बसलेल्या लेड धातूला खेचून लघवीवाटे बाहेर काढू शकते. पुण्यातील एक कंपनी लेड-क्लियर या नावाने BAL इंजेक्शन तयार करत असल्याचे सौ ताकवले यांनी शोधून काढले आणि घेवूनही आल्या. रोज चार इंजक्शने असे पाच दिवस दयायचे ठरले. त्याच दिवशी पहिला डोस सुनीलच्या शरीरात गेला. दुसर्याच दिवशी सुनीलने माणसे ओळखण्यास सुरुवात केली. चार दिवसात खोलीत चालण्या इतपत प्रकृती सुधारली. एक आठवड्यानंतर पुन्हा ब्रेनचा एमआरआय केला आणि तो अपेक्षेप्रमाणे अगदी नॉर्मल आला. हातचे कांकण आरशात दिसत होते !
आजमितीला सुनीलची तब्ब्येत ठणठणीत आहे. डॉ. वेंकटेश यांनी त्या गोळ्या आणि भस्म यात भरपूर शिसे म्हणजे लेड असल्याचा रिपोर्ट देखील दिला.
---------------
ही केस आणि त्यातील एम आर आय च्या इमेजेस सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन न्युरोरेडीऑलॉजी जर्नलमध्ये प्रसिध्द झाल्याने केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटले. सुनीलची ही केस माझ्या मित्रावर्गामध्ये चर्चिली गेली. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात अशी एक समजूत असल्याने ही केस मी आमच्या फिजिशियन असोशियनच्य मासिक सभेमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरविले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आणखी तीन फिजिशियन मित्रांनी त्यांचे अनुभव आणि केसेस दाखविण्याचे ठरवले. त्या अविस्मरणीय मिटिंगमधील इतर केसेस ची संक्षिप्त माहिती येथे देवू इच्छितो

१. डॉ. विनोद शहा, गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंट स्वतः डॉक्टर. डायबेटीसचे निदान झाले. मित्राने आयुर्वेदिक औषधाची कंपनी काढली होती. त्याच्या आग्रहामुळे त्याच्या कंपनीने काढलेले देशी औषध सुरु केले. चार महिन्यात सिव्हियर ॲनेमिया झाला. हिमोग्लोबिन १५ ऐवजी ३ झाले. पोटात दुखू लागले. अल्सरची शंका आल्याने डॉक्टर विनोद कडे आले. इंडोस्कोपिमध्ये अल्सर दिसला नाही. लेडची शंका आली. मुंबईला लेड तपासले. भरपूर सापडले. DMSA या गोळ्या औषधवाल्या मित्राने मागवून दिल्या. शेवट गोड. मित्राने कंपनी बंद केली.

२. डॉ. श्रीकांत वाघ, र्हूमँटॉलॉजिस्ट आणि एम. एससी (आयुर्वेद)
पुण्यातील एका वैद्यांची मुलगी अमेरिकेत. मुल होत नव्हते. वडिलांनी 'पुष्पधनवा' नावाच्या आयुर्वेदिक औषधाच्या गोळ्या अमेरिकेत पाठविल्या. मुलीच्या पोटात दुखू लागले. लेड पॉयझनिंग निदान झाले. गोळ्यांमध्ये भरपूर लेड सापडले. या कंपनीच्या या गोळ्यांवर त्या स्टेटमध्ये बंदी घातली गेली. गुगल करून शोधा म्हणजे ही बातमी सापडेल !

३. डॉ. उमा दिवटे , गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंटला बरेच दिवस जुलाब, अंगावर काळे डाग आणि हातापायांच्या नसांना सूज ! रक्तात सापडले 'आर्सेनिक' - हा एक आणखी जड धातू, हेवी मेटल !
देशी औषध घेत होता. ( आपल्या देशातील बंगालमधील अर्सेनिकच्या नैसर्गिक संकटाविषयी नवीन लेख भविष्यात लिहीन !)

----------
हा लेख लिहिण्यामागे आयुर्वेदीय औषधांवर टीका करावी, अपप्रचार करावा असा हेतू मुळीच नाही. आयुर्वेदाविषयी मला आदर आणि अभिमानच आहे. कृपया तसा ग्रह करून प्रतिसादही देवू नये हि विनंती आहे. काही कंपनीच्या औषधांबरोबरच्या माहितीपत्रकावर हेवी मेटल कंटेंट नसल्याचा क्रोमँटोग्राफ छापलेला मी पहिला आहे. सर्व औषध उत्पादकांना ही दृष्टी असावी हा उद्देश जरूर आहे.
शेवटी 'देह देवाचे मंदिर !' ही जाणीव प्रत्येकानं ठेवणे महत्वाचे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच वाचनीय आणि माहितीपूर्ण लेख.

पुण्यातील एक कंपनी लेड-क्लियर या नावाने BAL इंजेक्शन तयार करत असल्याचे सौ ताकवले यांनी शोधून काढले आणि घेवूनही आल्या.>>> सौ ताकवलेंचे कौतूक वाटले.

पुण्यातील एक कंपनी लेड-क्लियर या नावाने BAL इंजेक्शन तयार करत असल्याचे सौ ताकवले यांनी शोधून काढले आणि घेवूनही आल्या.>>> सौ ताकवलेंचे कौतूक वाटले. >>> मलाही वाचताना तेच वाटले Happy आधुनिक सावित्री.

मित्रहो,
आपल्या प्रतिसादांमुळे मी आणखी काही मुद्दे सांगू इच्छितो …

१. @अनेक सन्माननीय आणि अभ्यासू सदस्य >>>रस सिंदूर मध्ये पारा आणि गंधक असते. महायोगराज गुग्गुलमध्ये मात्र लेड बरोबरच आणि अनेक इतर मेटल्स म्हणजे पारा, टीन ,चांदी , लोह , अभ्रक , केंव्हा केंव्हा सुवर्ण असतात.
नेटवर शोधले असता महायोगराज गुग्गुळ जास्त दिवस घेवू नये असे दिसते. या औषधाच्या विषारी परिणामांचा अभ्यास करण्यासाठी चार महिने उंदरांना हे औषध देवून पहिले असता काहीही विषारी परिणाम दिसला नाही.
हा दुवा पहा :
Mahayograj guggulu: Heavy metal estimation and safety studies
www.ncbi.nlm.nih.gov › ... › Int J Ayurveda Res › v.1(3); Jul-Sep 2010‎
http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2996572/#!po=8.33333
"Heavy metal content measurement indicated levels of 25.8 µg/g for lead, 0.07 µg/g for mercury and 5.19 µg/g for arsenic."
या औषधाच्या गुणावगुणांची चर्चा करून काही स्पष्टीकरण देखील दिले आहे. जिज्ञासुंनी अवश्य पाहावे.
माझ्या पेशंटने सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस आणि रोज आठ गोळ्या (म्हणजे थोडा जास्त डोस ) घेतला होता.
शिवाय आम्ही लेड व्यतिरिक्त पारा , अर्सेनिक इत्यादी धातू मोजले नव्हते. पण आम्ही वापरलेला antidote - chelating agent ही सर्व मेटल्स शरीरातून बाहेर काढू शकतो.
या सर्व धातूंचा परिणाम ज्यांच्या शरीराची वाढ चालू आहे अशा लहान मुलांवर जास्त दिसतो.
म्हणूनच काही सुविद्य सभासदांनी सुचविल्याप्रमाणे ही औषधे तज्ञांच्या देखरेखीखाली घेणे आवश्यक आहे आणि त्या तज्ञांना देखील या औषधांच्या परिणामाची माहिती असणे आवश्यक आहे. किंबहुना त्या औषधांना "schedule X " असे ठरवून केवळ योग्य प्रिस्क्रिप्शन द्वारेच उपलबद्ध केले पाहिजे, असे मला वाटते.

.@dmugdha >>>धान्य साठविण्यासाठी पार्याच्या गोळ्या वापरतात. हे कितपत योग्य आहे ? : मेथीलमर्क्युरी आणि पारायुक्त बुरशीनाशक धान्यामध्ये वापरल्यामुळे अनेक जणांना विषबाधा होवून माणसे दगावल्याच्या घटना खूप आहेत.
अधिक माहितीसाठी हा दुवा पहा :
http://download.journals.elsevierhealth.com/pdfs/journals/0736-4679/PIIS...

३.@जान्हवी१९>>> MMR व्ह्याकसीन आणि मर्क्युरी विषबाधा यावर खूप चर्चा झाली आहे. शास्त्रज्ञांना ते मान्य नाही. पण मेडिकल शास्त्र नेहेमीच बदलत असते. मी निरीक्षणाला महत्व देतो. एका व्यक्तीच्या निरीक्षणाने (anecdote ) डेटा तयार होत नाही, पण अनेक निरीक्षणांनी जरूर होतो , किंबहुना त्यालाच आम्ही epidemiological research - समूहरोगशास्त्र संशोधन म्हणतो. म्हणून शंका निरसन होईपर्यंत ते संयुग , thiomersal , टाळणे उत्तम !
एकदा मेंदूमध्ये निर्माण झालेला दोष हा स्त्रक्चरल बदल असेल तर नंतर chelating drug देवून काही फायदा होईल असे वाटत नाही.

४. @स्वाती२>>>आपल्याला हवे आहे ते पुस्तक हे आहे का? कळवा !
cosmetics.jpg

या अतिशय अभ्यासपूर्ण चर्चेबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार !

नाही डॉक्टर . मी इथल्या लोकल लायब्ररीतून काही पुस्तके आणली होती. त्यातल्या नक्की कुठल्या पुस्तकात माहिती होती ते आता लक्षात नाहिये. बहुतेक Organic Body Care Recipes by Stephanie Tourles. सवड झाल्यास लायब्ररीत चक्कर टाकेन या आठवड्यात कन्फर्म करायला.

सुंदर लेखन. तुमच्या आधी वाचलेल्या एक दोन लेखांप्रमाणेच एकदम वाचनीय.

एक छोटी शंका - नॉर्मल लेड लेव्हल ५ च्या खाली असते असे त्या बंगलोर च्या डाँ चे मत वरती लिहीलेले आहे. पण त्याखालील चित्रात १० च्या खाली लेव्हल धोकादायक दिसते. कदाचित माझ्या समजण्यात चूक झाली असेल पण लेखात त्रुटी राहू नये म्हणून विचारतोय.

म्हणून तोपर्यंत ते संयुग , thiomersal , टाळणे उत्तम ! >> पण मग MMR हे वॅक्सीन इतके सर्रास कसे दिले जाते? कोणी डॉक्टरही कधी काही धोक्याची सूचना वगेरे देत नाहीत.

धन्यवाद !! खुपच छान महिती.

सुंदर लेखन. तुमच्या आधी वाचलेल्या एक दोन लेखांप्रमाणेच एकदम वाचनीय.+१

डॉक्टर साहेब तुमचे लेख माहितीपूर्ण आणि उत्कंठावर्धक असतात, त्यामुळे नवीन माहिती व रंजन दोन्ही साध्य होतं. नवीन नवीन माहितीसाठी धन्यवाद.
असेच लेहिते राहा. Happy

@अश्विनी डोंगरे :>>>>सध्या वापरत असलेल्या MMR vaccine मध्ये thiomersal नसते. हे संयुग जंतुनाशक व preservative असल्यामुळे फक्त multidose व्हायल मध्ये असते.

सर तुमचा ब्लॉग सुद्धा वाचला.. अप्रतिम ..

एकच वाटतंय, तुम्हाला काही असेही अनुभव आले असतील, ज्यात प्रयत्नांची शर्थ करूनही रुग्ण वाचला नाही - तरीही तुम्ही नेहमी असे अनुभव मांडता जिथे यश मिळाले

तुमच्यामधे एक प्रतिभावान लेखक आहे - अप्रतिम मांडणी..

@प्रज्ञासा@:एकच वाटतंय, तुम्हाला काही असेही अनुभव आले असतील, ज्यात प्रयत्नांची शर्थ करूनही रुग्ण वाचला नाही - तरीही तुम्ही नेहमी असे अनुभव मांडता जिथे यश मिळाले>>>हा प्रतिसाद थोडासा आपकी अदालतचे रजत शर्मा स्टाईलचा वाटला! Happy
कधी कधी अपयश येतेच ! मृत्यू जन्माइतुकाच अटल आहे. अपयशाच्या भीतीने प्रयत्नच करणे सोडल्यास 'वर' जावून हिशोब काय सांगणार ? आणि हो, माझ्या प्रत्येक अपयशातून माझे प्रबोधन निश्चितच होते, पण कथा लिहिण्याचा उद्देश वाचकांचे प्रबोधन करावे हा आहे. Happy
आपल्या सुरेख प्रतिसादाबद्दल आभार !

सर - पकी अदालतचे रजत शर्मा - अजिबात नाही - मला म्हणायचं होतं की - वाईटातही फक्त चांगलं घेण्याची कला / प्रवृत्ती Happy

डॉक्टर किंवा इतर जाणकार, मसुरडाळीबद्दलच्या माझ्या शंकेचं निरसन कराल का? तिला जो केशरी/अबोली रंग असतो तो शिशामुळे येतो असं ऐकलं, त्यात कितपत तथ्य आहे? आणि तथ्य असेल तर ते प्रमाण कितपत हानीकारक होऊ शकतं?

@Saee : डॉक्टर किंवा इतर जाणकार, मसुरडाळीबद्दलच्या माझ्या शंकेचं निरसन कराल का? तिला जो केशरी/अबोली रंग असतो तो शिशामुळे येतो असं ऐकलं, त्यात कितपत तथ्य आहे? आणि तथ्य असेल तर ते प्रमाण कितपत हानीकारक होऊ शकतं?>>>>

मसूर डाळीला इंग्लिशमध्ये रेड लेन्टील म्हणतात व ती पूर्ण लेन्टील(पल्स) अथवा डाळ अशा दोन स्वरुपात मिळते. केशरी डाळ ही विषारी डाळ असते व ती या दोन्ही मसूरमध्ये भेसळ करण्यासाठी वापरतात. केशरी डाळ स्वस्त असते पण ती सातत्याने चार सहा महिने खाल्याने 'ल्यथिरिसम' नावाचा आजार होतो ज्यात दोन्ही पाय कायमचे पॅरालायीज, लुळे होवू शकतात. भारतातील बर्याच राज्यात ह्या डाळीवर बंदी आहे. अशा भेसळयुक्त डाळीचा रंग उठून दिसण्यासाठी लेंड क्रोमेट किंवा मेटानिल येलो यांचा वापर करतात जे आरोग्याला विघातक आहेत. केशरी डाळ अथवा भेसळीसाठी वापरलेले रंग हायड्रोक्लोरिक आम्ल वापरून ओळखतात.
भेसळ टाळण्यासाठी ….
१. उत्तम 'ब्रांड' असलेले व पूर्ण सीलबंद असलेले प्याकेट वापरा.
२. ISO किंवा FPO मार्क पाहून खरेदी करावी.
३.मसूर डाळ गोल गरगरीत, लालसर गुलाबी(केशरी/अबोली) व दिसण्यास सुंदर असते, या उलट केशरी डाळ काळसर, ओबडधोबड, खुंटाच्या आकाराची, चौकोनीसर असते.

महत्वपुर्ण लेखन,

लक्षात घ्यायला हवे की आपण डोकेदुखी आणि सर्दी पडश्याची जशी अ‍ॅलोपॅथी औषधे सहजपणे घेतो तशी काही आयुर्वेदीक औषधे सुध्दा बेलाषक पणे घेतो जसे की त्रिभुवन किर्ती. पण रसायने किंवा गुग्गुळ सारखी औषधे मात्र आयुर्वेदीक मान्यताप्राप्त तज्ञांच्या सल्याने घ्यायला हवीत.

खुप खुप धन्यवाद डॉक्टर! आमटी-कोशिंबिरीसाठी मी बरीच वापरते मसुरडाळ, त्यात भेसळ असू शकते हे डोक्यातही आलं नव्हतं कधी. आता विकत घेताना या सर्व बाबी लक्षात घेईन.

धन्यवाद डॉक्टर. अतिशय उत्तम माहिती दिल्याबद्दल.......

बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. ज्या औषधांमधील घटक लिहिलेले नाहीत, त्यांचं प्रमाण माहित नाही अशी औषधे घेणे टाळा

खुप छान लेख. डॉक्टर मी तुम्हाला एक ई मेल केला होता. माझ्या आईला While Matter disorder हा आजार आहे. या लेखामधील डॉक्टर वाडिया हे मुम्बई चे आहेत का? Dr. Wadia Pettarusp?

माझी आई डॉक्टर वाडिया कडे उपचार घेत आहे. हा आजार पुर्ण पणे बरा होत नाही असे डॉक्टर म्हणत आहेत. गूगल करुन पण पाहिले. आई आयुर्वेदिक औषध पण घेत आहे. रक्त चाचणी करुन घ्यावी का? काहीच काम करत नाही आहे. तब्येत खराब होत चालली आहे. तुम्ही काही सुचवु शकाल का?

शक्य असेल तर एक व्हीजीट शक्य आहे का? धन्यवाद.

Pages