औषधे : नेहमीच जगवतात पण कधीकधी मारतात देखील !

Submitted by SureshShinde on 9 February, 2014 - 14:48

lead_2.jpg

रात्रीचे दहा वाजले होते. दिवसभरातील पाहिलेल्या आणि लक्ष्यात राहिलेल्या पेशंटांचा विचार करीत नुकतीच पाठ टेकवली होती, एव्हड्यात मोबाईल वाजला. स्वतःवर थोडासा वैतागुनच मोबाईलवर दिसणारा नंबर पहिला. +१ म्हणजे अमेरिकेतून आलेला दिसल्यामुळे पटकन स्लाईड करून कानाला लावला आणि उत्तरलो, "हलो, मी डॉक्टर शिंदे बोलतोय !"
"अरे, मी सुर्यकांत शहा बोलतोय, जाड्या शहा ! ओळखलेस का?"
जाड्या शहा माझ्या बरोबरच एमबीबीएस होवून अमेरिकेत गेला व नंतर न्युरोलोजी शिकून तेथेच स्थायिक झाल्याचे मला माहीत होते.
"अरे मित्रा, तुला कसा विसरणार ! बोल, कशी आठवण केलीस ?"
"तुझी प्र्कटीस जोरात दिसतेय ! या महिन्याच्या अमेरिकन जर्नल ऑफ न्युरोरेडीऑलॉजिमध्ये तुझे आर्टिकल वाचले. व्हेरी इम्प्रेसिव्ह ! ह्या जर्नलमध्ये आर्टिकल एक्सेप्ट होणे सोपे नाही. व्हेरी क्रेडीटेबल ! कॉन्ग्रटस् ! तुझे अभिनंदन करण्यासाठी खास तुझा नंबर सर्च करून फोन केलाय."
जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे फोन नंतर बराच वेळ चालला होता. पेशंट सुनील ताकवले आणि त्यानंतरच्या घटना पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

"सर, मी सौ. मनीषा ताकवले. माझे मिस्टर खडकवासल्याला काम करतात. गेले वर्षभर ते आजारीच आहेत. वर्षापूर्वी त्यांना डाव्या अंगावरून वारे गेल्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. काही दिवसानंतर बरे होवून घरी आले, त्यानंतर सहा महिने कामावर हेखील जात होते. पण हळूहळू त्यांची तब्ब्येत बिघडत चालली आहे. सुरुवातीला त्यांना भरभर चालता येणे कमी झाले. लघवी करतांना त्रास होवू लागला. लवकर होत नसे. हळू हळू त्यांच्या वागण्यात बदल होवू लागला. असंबद्ध बोलू लागले. म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. पण दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत अधिकच खराब होत चालली आहे. आता तर ते माणसेही ओळखत नाहीत. अर्धवट शुद्धीवर असल्यासारखे झाले आहेत. काय करावे काहीच सुचेनासे झाले आहे. माझा पूर्ण धीरच सुटला आहे."
ताकवले बाई मोठ्या धीराच्या दिसत होत्या. हातातल्या रुमालाने डोळे पुसून व थोडेसे थांबून त्या पुढे म्हणाल्या, "तुमच्या एका पेशंटकडून माहिती मिळाल्यामुळे मी मोठ्या आशेने आपल्याकडे आले आहे."
"पण सध्या आपला पेशंट कोठे आहे ?"
"ते एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांचे उपचार चालू आहेत पण … " ताकवले बाई अंमळ थांबल्या.
"मी त्या हॉस्पिटलमध्ये येवून त्यांना तपासू शकणार नाही. तुम्हाला त्यांना रुबीमध्ये हलवावे लागेल म्हणजे मला त्यांना उपचार करता येतील."
"माझी हरकत नाही. आम्ही आजच त्यांना हलवतो. तुम्ही तसे रुबीसाठी लेटर द्याल तारे बरे होईल."

त्याच रात्री उशिरा ताकवले रुबीमध्ये दाखल झाले. दुसय्रा दिवशी सकाळी मी त्यांना तपासले. सुनील ताकवले थोडासा स्थूल बांधा असलेला आणि सुमारे चाळीशीच्या आसपास असावा, हॉस्पिटलच्या कॉटवर छताकडे नजर लावून निपचित पडला होता. मी आवाज दिला पण सुनीलचा प्रतिसाद 'शून्य' ! खांद्याला धरून हलवलं तरी काहीच उत्तर नव्हते. सुनील एका वेगळ्याच विश्वात हरवला होता.
"ते काहीच बोलत नाहीत. रात्रंदिवस असेच पडून आहेत." सौ.
पुढील दहा मिनिटे मी त्यांना तपासत होतो. सुनीलचा मेंदू कोठलाही प्रतिसाद देत नव्हता. प्रतिक्षिप्त क्रियादेखील मंदावल्या होत्या. जणू या जगाशी पूर्ण संपर्कच तुटला होता. एखाद्या ग्यासच्या चुलीचा ग्यास पुरवठा अगदी कमीतकमी करून मंद ज्योत चालू ठेवावी तसा सुनीलचा मेंदू 'स्लो' झाला होता, सेमिकोमा मध्ये गेला होता. पांवलांवर थोडीशी सूज होती आणि त्वचा रक्त कमी असल्यामुळे दिसावी तशी पांढुरकी दिसत होती. बीपी नॉर्मल होते. डायबेटीस नव्हता. ईसीजी आणि छातीचा एक्सरे देखील नॉर्मल होता.
सौ सुनील माझ्या हालचालींचे निरीक्षण करीत शेजारीच उभ्या होत्या. त्यांना जास्त घाबरवून न देता त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देण्याचे कठीण काम मला करायचे होते. अर्थात मला हे नेहमीचेच होते. त्यांच्याकडे वळून मी म्हणालो,
"हे पहा, यांचा मेंदू खूप कमी काम करतो आहे. पूर्वी मेंदूला जसा त्रास झाला होता तसाच त्रास पुन्हा संभवतो. आपला पेशंट सध्या अर्धवट शुद्धीत म्हणजेच सेमिकोमामध्ये आहे. आपला मेंदू जागृतअवस्थेत येण्यासाठी 'रेटीक्युलर ॲक्टिव्हेटींग सिस्टीम' जबाबदार असते. या सिस्टिमला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे असा त्रास असावा असे मला वाटते. आज त्यांच्या मेंदूचा एमआरआय स्क्यान आणि एमआर ॲन्जिओग्राफी करून घेवू म्हणजे चित्र बरेचसे स्पष्ट होईल. तो पर्यंत रक्ताचे रिपोर्टदेखील येतील. तोपर्यंत योग्य ते उपचार सुरु केले आहेत. काळजी नसावी. शिवाय माझ्यापेक्षा सिनियर व अनुभवी न्युरोफिजिशियन डॉक्टर वाडिया यांना देखील आपला पेशंट पाहण्यासाठी रिफर केले आहे. म्हणजे माझी जबाबदारी आणि तुमची काळजी आणखी कमी होईल."
"डॉक्टर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. " असे म्हणून सौ ताकवलेंनी माझ्या खांद्यांवर आणखीच ओझे टाकले. डॉक्टर म्हणजे देव नाही ही जाणीव तिला करून देण्याची ही वेळ नव्हती. मी वॉर्डच्या डॉक्टरांना उपचारांबाबत योग्य सूचना देवून पुढील पेशंट पाहण्यासाठी निघून गेलो.
अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी डॉक्टर वाडियांचा फोन आला.
"शिंदे, युवर पेशंट इज व्हेरी इन्टरेस्टिंग ! उसका एमआरआय तो औरभी इन्टरेस्टिंग ! मेटाबॉलिक एनसेफ़लोपथी जैसा दिखता है. उसके सब ब्लड रिपोर्ट्स तो नॉर्मल है, साला गॉड नोज व्हाट ही इज ह्यावींग !" टिपिकल पारशी टोनमध्ये वाडिया सर बोलत होते. "थॅन्क्स फॉर इंव्होल्व्हिंग मी इन हिज केयर ! विल फॉलो ॲन्ड कीप इन टच !"
डॉक्टर वाडिया अतिशय मितभाषी आणि एखाद्या रक्तपिपासू जळवेसारखे ज्ञानपिपासू डॉक्टर आहेत.
त्या रात्री झोपताना सुनीलचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा सुनीलच्या खोलीत शिरण्यापूर्वी मी बाहेरील कौंटरवर बसून सर्व रिपोर्ट्सचा अभ्यास केला. रक्तामध्ये हेमोग्लोबिनचे प्रमाण मात्र कमी होते. लघवीमध्ये थोडी प्रथिने दिसत होती पण किडनीचे काम व्यवस्थित असल्याचे दाखवीत होते. एमआरआय मध्ये संपूर्ण मेंदू पांढरा दिसत होता. नेहमी दिसणारे पांढरे आणि ग्रे म्हणजे करड्या रंगांचे विभाजन पूर्ण नाहीसे झाले होते. या प्रकारचा बदल अगदी क्वचितच दिसणारा असा होता. रेडीओलोजीस्ट देखील रिपोर्ट देताना गांगरले होते. पुस्तके पाहून आणि नेटवर पाहून पुरवणी रिपोर्ट देणार होते. असे का व्हावे याचा विचार करीतच मी सुनीलच्या खोलीत शिरलो. सौ सुनील वाट पाहत उभ्याच होत्या. सुनीलच्या परिस्थितीमध्ये तीसूभरही सुधारणा नव्हती. पेशंट तपासून मी कॉटशेजारी खुर्ची ओढून चक्क बसलोच.
"हे पहा, मी आणि डॉक्टर वाडिया यांनी आपल्या पेशंटचे सर्व रिपोर्ट पहिले आहेत. खरे सांगायचे तर अजूनही आम्हाला यांना नेमका काय त्रास आहे हे समजत नाहीये.यांच्या मेंदूवर काही केमिकल्स चा परिणाम तर झाला नाही न हे पाहावे लागेल.त्यांना काही विषाणूंचा संसर्ग झाला असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज त्यांच्या पाठीतील पाणी काढून तपासू आणि तो नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतही पाठवू. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही प्रदूषण तर नसेल ना याचाही तपास करावा लागेल.? मला थोडी आणखी माहिती हवी आहे. त्यांना गेल्या सहा महिन्यांत काय काय औषधे दिली आणि कोणती चालू आहेत ते जर सांगाल का ? "
सौ ताकवले यांनी लगबगीने चालू औषधे दाखविली. ती सर्वसामान्य व्हीटँमिन्स सदृशः औषधे दिसत होती.
"या व्यतिरिक्त मी काही आयुर्वेदिक आणि देशी औषधे देत होते." असे म्हणून त्यांनी एक जीर्ण कागद माझ्या हातात दिला.
गेल्या वर्षी ह्यांना पँरालीसिसचा त्रास झाल्यापासून मी वैद्यांच्या सांगण्यावरून महायोगराज गुग्गुळ च्या रोज आठ गोळ्या देत होते. या शिवाय 'सिंदूरभस्म' देखील मधातून देत होते. एव्हडे म्हणून पर्समधून एक प्लास्टिक ची डबी मला दिली. त्या डबीमध्ये स्त्रिया कपाळाला लावतात तशा रंगाची भुकटी दिसत होती.
"सर, सिंदूर म्हणजे मराठीमध्ये शेंदूर तर नव्हे !" माझ्याशेजारी उभ्या असलेल्या वॉर्ड डॉक्टर उद्गारल्या.
माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, शेंदूर म्हणजे लेड ऑक्साईड - रसायन शास्त्र इयत्ता आठवी !
"ओ गॉड ! युरेका ! सुनील आठदहा महिने चक्क लेड खात होता. नो वंडर ही ह्याज लेड एनसेफ़लोपथी !" मी जवळजवळ ओरडलोच !
माझा शोध ऐकून वाडियासर देखील अवाक् झाले.
"युवर हायपोथिसिस लुक्स ॲट्रक्टिव्ह बट हाऊ टू प्रुव्ह ?" सर म्हणत होते.
लेड पॉयझनिंग सिद्ध केल्याशिवाय त्यावर उपचार तरी कसे करणार ?
दिवसभर हाच विचार माझ्या मनात घोळत होता. ही सुमारे सातआठ वर्षांपूर्वीची घटना आहे. तेंव्हा पुण्यातील कोणतीही प्रयोगशाळा रक्तातील लेड लेव्हल मोजमाप करीत नव्हते. नेटवर सर्च घेतले असता बेंगलोर येथे डॉ. टी. वेंकटेश हे नँशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग मध्ये ही तपासणी करतात असे कळले. मी त्यांच्याशी तांतडीने संपर्क साधला आणि त्याच दिवशी सुनीलच्या रक्ताचा नमुना बेंगलोरला रवाना झाला.
दोन दिवस सुनीलचे 'रुटीन' उपचार चालूच होते पण परिस्थिती 'जैसे थे' च होती.
तो दिवस माझ्या चांगलाच लक्ष्यात आहे. माझा फोन खणखणला ,"मी बेंगलोरहून डॉक्टर वेंकटेश बोलतोय. तुमचा हा पेशंट जिवंत आहे का ?"
"हो, आहे ना. का बरे ?"
"अरे त्याची लेड लेव्हल १५४ मायक्रोग्राम आहे. नॉर्मल पाच पेक्षा कमी असते. एव्हडी लेव्हल मी प्रथमच पाहतो आहे. नेव्हर रीपोर्टेड बेफोर इन अवर लँब ! हा तोंडी रिपोर्ट आहे. लेखी रिपोर्ट पोस्टाने पाठवीत आहे. कसला पेशंट आहे हा ?"

Lead.png

मी त्यांना पेशंटची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर ते म्हणाले, " ती दोन्ही औषधे आमच्याकडे पाठवा. आम्हाला त्याचे पृथःकरण करण्यास आवडेल. फ्री ! एक उत्सुकता म्हणून !"
"अवश्य! अवश्य पाठवू. धन्यवाद !"
"आम्हाला या पेशंटचा फोलो अप कळवा. वी आर इन्टरेस्टेड !"

आता प्रश्न होता पुढील ट्रीटमेंटचा ! या प्रकारची ही पहिलीच केस होती. लेड हे एक हेवी मेटल आहे. ते एकदा शरीरामध्ये शिरल्यानंतर शरीर त्याला बाहेर काढू शकत नाही. हा धातू मेंदू आणि हाडांमध्ये जावून चिकटून बसतो व शरीरक्रियेमध्ये बिघाड निर्माण करतो. पुस्तकांनुसार BAL नावाचे औषध वापरावे असे होते. दुसर्या महायुद्धामध्ये लेडच्या बुलेटस् शरीरात राहून विषबाधा करीत त्यासाठी उपाय म्हणून हे औषध शोधले होते. हे औषध शरीरात अडकून बसलेल्या लेड धातूला खेचून लघवीवाटे बाहेर काढू शकते. पुण्यातील एक कंपनी लेड-क्लियर या नावाने BAL इंजेक्शन तयार करत असल्याचे सौ ताकवले यांनी शोधून काढले आणि घेवूनही आल्या. रोज चार इंजक्शने असे पाच दिवस दयायचे ठरले. त्याच दिवशी पहिला डोस सुनीलच्या शरीरात गेला. दुसर्याच दिवशी सुनीलने माणसे ओळखण्यास सुरुवात केली. चार दिवसात खोलीत चालण्या इतपत प्रकृती सुधारली. एक आठवड्यानंतर पुन्हा ब्रेनचा एमआरआय केला आणि तो अपेक्षेप्रमाणे अगदी नॉर्मल आला. हातचे कांकण आरशात दिसत होते !
आजमितीला सुनीलची तब्ब्येत ठणठणीत आहे. डॉ. वेंकटेश यांनी त्या गोळ्या आणि भस्म यात भरपूर शिसे म्हणजे लेड असल्याचा रिपोर्ट देखील दिला.
---------------
ही केस आणि त्यातील एम आर आय च्या इमेजेस सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन न्युरोरेडीऑलॉजी जर्नलमध्ये प्रसिध्द झाल्याने केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटले. सुनीलची ही केस माझ्या मित्रावर्गामध्ये चर्चिली गेली. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात अशी एक समजूत असल्याने ही केस मी आमच्या फिजिशियन असोशियनच्य मासिक सभेमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरविले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आणखी तीन फिजिशियन मित्रांनी त्यांचे अनुभव आणि केसेस दाखविण्याचे ठरवले. त्या अविस्मरणीय मिटिंगमधील इतर केसेस ची संक्षिप्त माहिती येथे देवू इच्छितो

१. डॉ. विनोद शहा, गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंट स्वतः डॉक्टर. डायबेटीसचे निदान झाले. मित्राने आयुर्वेदिक औषधाची कंपनी काढली होती. त्याच्या आग्रहामुळे त्याच्या कंपनीने काढलेले देशी औषध सुरु केले. चार महिन्यात सिव्हियर ॲनेमिया झाला. हिमोग्लोबिन १५ ऐवजी ३ झाले. पोटात दुखू लागले. अल्सरची शंका आल्याने डॉक्टर विनोद कडे आले. इंडोस्कोपिमध्ये अल्सर दिसला नाही. लेडची शंका आली. मुंबईला लेड तपासले. भरपूर सापडले. DMSA या गोळ्या औषधवाल्या मित्राने मागवून दिल्या. शेवट गोड. मित्राने कंपनी बंद केली.

२. डॉ. श्रीकांत वाघ, र्हूमँटॉलॉजिस्ट आणि एम. एससी (आयुर्वेद)
पुण्यातील एका वैद्यांची मुलगी अमेरिकेत. मुल होत नव्हते. वडिलांनी 'पुष्पधनवा' नावाच्या आयुर्वेदिक औषधाच्या गोळ्या अमेरिकेत पाठविल्या. मुलीच्या पोटात दुखू लागले. लेड पॉयझनिंग निदान झाले. गोळ्यांमध्ये भरपूर लेड सापडले. या कंपनीच्या या गोळ्यांवर त्या स्टेटमध्ये बंदी घातली गेली. गुगल करून शोधा म्हणजे ही बातमी सापडेल !

३. डॉ. उमा दिवटे , गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंटला बरेच दिवस जुलाब, अंगावर काळे डाग आणि हातापायांच्या नसांना सूज ! रक्तात सापडले 'आर्सेनिक' - हा एक आणखी जड धातू, हेवी मेटल !
देशी औषध घेत होता. ( आपल्या देशातील बंगालमधील अर्सेनिकच्या नैसर्गिक संकटाविषयी नवीन लेख भविष्यात लिहीन !)

----------
हा लेख लिहिण्यामागे आयुर्वेदीय औषधांवर टीका करावी, अपप्रचार करावा असा हेतू मुळीच नाही. आयुर्वेदाविषयी मला आदर आणि अभिमानच आहे. कृपया तसा ग्रह करून प्रतिसादही देवू नये हि विनंती आहे. काही कंपनीच्या औषधांबरोबरच्या माहितीपत्रकावर हेवी मेटल कंटेंट नसल्याचा क्रोमँटोग्राफ छापलेला मी पहिला आहे. सर्व औषध उत्पादकांना ही दृष्टी असावी हा उद्देश जरूर आहे.
शेवटी 'देह देवाचे मंदिर !' ही जाणीव प्रत्येकानं ठेवणे महत्वाचे !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉन ग्रिशामच्या "द लिटीगेटर्स" ची आठवण झाली.

>> औषधं तयार करताना फार्मा कंपन्यांनी..आपण पेशंटच्या जिवाशी खेळत तर नाही ना?>> माझ्यामते बहुतांश फार्मा कंपन्या फक्त नफ्याचाच विचार करतात.

डॉक्टर, उपयुक्त लेख.

सगळ्यांवरच शिश्यामुळे असे परीणाम होतात का? रस सिंदूर हे औषध (दीड ते दोन महिने) घेतलेली व्यक्ती माझ्या परीचयाची आहे त्या व्यक्तीवर असे परीणाम (किंवा इतर कुठलेच दुष्परीणाम) दिसले नाहीत. (तुमचा हा लेख त्या आधी वाचनात आला असता किंवा सिंदूर -> शेंदूर -> शिसे ही लिंक मला लगली असती तर मी कडवा विरोध केला असता. )

शिश्यात काही औषधी गुणधर्म पण आहेत का? ते नसल्यास आयुर्वेदात त्याचा वापर का केला जातो? आयुर्वेदात पारद (पारा) संयुगे पण वापरली जातात त्यांचे पण असे काही परीणाम होतात का?

माहितीपुर्ण लेख!! >
जे पोटात घेत नाहीत पण वरून डोक्याला, त्वचेकरता वापरतात उदा. तेल, क्रीमत्यतू, पावडरी उकळून केस धुण्याकरता वापरणे वगैरे , यातूनही धोका उद्भवू शकतो का?>+1

मी सध्या आयुर्वेदिक औषधे घेत आहे .हे वाचून उगीचच डोक्यात किडे वळ वळायला लागले Sad Uhoh
पण अतिशय माहितीपूर्ण लेख असतात तुमचे नेहमीच Happy

पुन्हा एकदा उत्तम लेख!

आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथी, हर्बल वगैरे कुठलेही औषध, सप्लिमेंट्/टॉनिक, सौदर्य प्रसाधन वगैरे वापरताना त्यातील घटक, आपण घेत असलेली इतर औषधे, अन्न-ज्युस वगैरे सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. आयुर्वेदिक औषधांच्या बाबतीत औषधातील घटक तसेच कुठली रीत वापरुन बनवले आहे ते चांगल्या कंपन्या लेबलवर लिहितात.
मध्यंतरी मी लायब्ररीतून एक हर्बल कॉस्मेटिक्सचे पुस्तक आणले होते. त्यात बॉडी बटर, लिप बाम वगैरेसाठी रेसिपीज होत्या. प्रत्येक रेसीपीत वापरलेली इसेन्शिअल ऑइल्स ही काय हेल्थ कंडीशन असेल तर वापरु नयेत हे स्पष्ट लिहिले होते.
एखादी गोष्ट हर्बल आहे, ऑरगॅनिक आहे म्हणजे ती टॉक्झिक नाही असा बरेचदा लोकांचा समज असतो.

रच्याकने माझ्या मुलाला लहान असताना लेड पॉयझिनंग झाले होते. सुदैवाने आमचा पेडी वेल बेबी चेक मधे लेड साठी ब्लड चेक करतो त्यामुळे वेळीच लक्षात आले. पुढे दीड वर्ष औषधे घ्यावी लागली.

तुमचे लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत सगळेच. धन्यवाद. >> +१

मध्यंतरी मी लायब्ररीतून एक हर्बल कॉस्मेटिक्सचे पुस्तक आणले होते. त्यात बॉडी बटर, लिप बाम वगैरेसाठी रेसिपीज होत्या. प्रत्येक रेसीपीत वापरलेली इसेन्शिअल ऑइल्स ही काय हेल्थ कंडीशन असेल तर वापरु नयेत हे
स्पष्ट लिहिले होते. > >स्वाती त्या पुस्तकाचे नाव लिहू शकाल का ?

असामी, नक्की कुठले पुस्तक ते आठवत नाही. जरा शोधायला वेळ लागेल.

बरेचदा प्रेग्नंसी, एपिलेप्सी, हाय ब्लड प्रेशर वगैरे कंडिशन्स असल्यास इसेन्शिअल ऑइल्स वापरताना काळजी घ्यावी लागते. काही वेळा लहान मुलांसाठी वापर करणे योग्य नसते. काहीवेळा फोटो सेन्सिटिविटी वाढल्याने त्वचेवर विपरित परीणाम होतो. काही वेळा कॉम्बीनेशन फक्त विशिष्ठ वयोगटातील मुलांसाठी योग्य नसते. - जसे की टी ट्री ऑइल + लवेंडर ऑइल.

इसेन्शिअल ऑइल्स चार्टचा दुवा बघा. http://www.essential-oil-mama.com/essential-oil-use-chart.html त्यात कॉशन कॉलम मधे कधी वापर टाळावा ते दिले आहे.

माधव,

>> शिश्यात काही औषधी गुणधर्म पण आहेत का? ते नसल्यास आयुर्वेदात त्याचा वापर का केला जातो?
>> आयुर्वेदात पारद (पारा) संयुगे पण वापरली जातात त्यांचे पण असे काही परीणाम होतात का?

थोडंफार ऐकलंय ते सांगतो. मी आयुर्वेद वा रसशास्त्राचा तत्ज्ञ नाही. Happy

पारा विषारी आणि अवगुणी आहे असा आयुर्वेदात स्पष्ट संकेत आहे. म्हणूनच तो नेहमी भस्म करून मगच सेवन केला जातो.

भस्माचे गुणधर्म पदार्थाच्या विरुद्ध असतात. शिसे विषारी असले तरी शिशाचे भस्म गुणकारी असते. मात्र भस्म तयार करण्याची पद्धत किचकट (complicated) आणि प्रमादशील (error prone) असते. तसेच भस्म निर्मिणारा माणूस देखील साधक असावा लागतो. शेंदुराच्या प्रकरणात भस्म विपरीत प्रकारे बनवलेले असावे. निदान चौकशी करायची झाली तर मी इथपासून सुरूवात करेन.

शिशाचे वा अन्य धातूचे (उदा.: सोने, चांदी) भस्म बनवतांना धातू थेट जाळला जात नाही. पहिल्यांदा तो पाऱ्यासोबत एकजीव (amalgamate) केला जातो. नंतर हे पारदमिश्र (amalgam) अग्निसंस्कारित केले जाते. ज्याअर्थी 'सिंदूरभस्मा'त पारा सापडला नाही त्याअर्थी भस्मीकरण चुकीचे झाले असावे असा तर्क करता येतो.

आ.न.,
-गा.पै.

गापैजी,

>>भस्माचे गुणधर्म पदार्थाच्या विरुद्ध असतात. शिसे विषारी असले तरी शिशाचे भस्म गुणकारी असते.

आपण तज्ञ नाही असे कबूल करता आणी अशी बेफाम विधाने करता. कृपया असे करू नकात प्लीजच. आपल्या ज्ञानप्रदर्शनाच्या हौसेपायी एखाद्या वाचकाचा जीव जायचा. शिसे धातू, भस्म किंवा कोणत्याही स्वरूपात घातकच असते. पार्‍याचेही तेच. भारतात शेकडो नाहीतर निदान डझनावारी तरी आयुर्वेदिक कारखाने आहेत तिथे साधक बसलेले असतात का भस्म करायला? आणी शिसे असलेले औषध एका पापी माणसाने तयार केले काय किंवा संतपदाला ( ६६% पातळी गाठून) पोचलेल्याने केले काय, विषारीच असते.

>भस्माचे गुणधर्म पदार्थाच्या विरुद्ध असतात.

आणखी एक अज्ञानमूलक वाक्य.

श्री बालाजी तांबे डॉक्टर नाहीत. शेंदूर म्हणजेच Lead Oxide ही कदाचित त्यांच्यासाठी बातमीच असेल. रामदेव बाबांना तर लेड ऑक्साईडचे स्पेलिंगही येत नाही. Toxicology फार दूर राहिली.

लेखाचे शीर्षक "आयुर्वेदिक औषधे :" असे सुरु व्हायला हवे होते :).

जोक्स अपार्ट , भारातातील औषधातून शिश्यावर बंदी यावी म्हणून ऑनलाईन पिटिशन करत येइल का?

तुमच्या बाकीच्या लेखांप्रमाणे हाही लेख अप्रतिम. अगदी सोप्या शब्दांत, नाट्यपूर्ण वर्णनातून अन्यथा क्लिष्ट वाटेल अशी माहिती पोचवण्याची हातोटी खरेच छान आहे.

लेखात वाचून पुष्पधन्वा बद्दल शोध घेतला. हे एक पान दिसले.
तिथे स्पष्टपणे म्हटलेले आहे : Pushpadhanwa Rasa side effects:
Self medication with this medicine may prove to be dangerous, since it contains heavy metal ingredient.
Take this medicine in precise dose and for limited period of time, as advised by doctor.
Over-dosage may cause sever poisonous effect..

म्हणजे निव्वळ औषधांना दोष देण्यापेक्षा प्रशिक्षित वैद्यकतज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे किंवा कोणतेही औषध घेणे गरजेचे आहे. पहे वैद्यकतज्ज्ञ आणि त्यांनी सांगितलेली औषधे दोन्ही प्रमाणित असायला हवीत.......असे वाटले.
लेखात नमूद केलेल्या घटनेत एका वैद्यानेच आपल्या मुलीला ही औषधे दिली ही गोष्ट प्रमाणीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे.

भरत, हे दिलेस ते बरे केलेस.
मी आधी एका पोस्ट मधे म्हणले आहे की लोकं एखाद्या प्रिस्क्रिप्शनवर औषधे घेतात, अन पुढे चालू ठेवायची वा नाही हे स्वमर्जीने ठरवतात, यास डॉक्टर/वैद्याकडे जायचा कण्टाळा, तपासणी फी वाचते म्हणून, स्वतःच्या अर्धवट ज्ञानावर आधारीत औषधाबाबतच्या पूर्वानुभवाचा अतिआत्मविश्वास, बेफिकीरी, चलता है वृत्ती, बर्‍याचदा आर्थिक /स्थानिक परिस्थिती अशी अनेक कारणे आहेत.
अन पन्नास टक्के भारतीय मतदारान्चे, आवर्जुन मतदान करावे हे प्रबोधन जसे अवघड तसेच पेशण्ट्स/रोग्यान्चे, आवर्जुन औषध डॉक्ट्रर/वैद्याच्या सल्ल्यानेच घ्या हे प्रबोधनही अवघड आहे पण आवश्यकही आहे.

Doc jasa lead shariratun ghalvayala aushadh aahe tasa mercury sathi pan aahe ka ?

Baryachada Asa aikate ki mulanche je shots asatat thyat mercury asat ani te lahan mulanna rather sagalyan nach ghazal asat ... Ani baryach mulanna tyane autism pan hoto ter Asa kahi aushadhane autism bara hou Shakato ka ? Sahaj manat aala ani ek olakhichi family Madhe Asa mulaga pahanyat aahe ter vait vataT ....ani tyancha pan Asa mhanan aahe ki to MMR Chya vaccine nanter Asa zala aadhi to Thikk hota......agadich asabadhha post asalyas Sanga delete karate ...

English baddal kshamaswa

vijaykulkarni,

१.
>> आपण तज्ञ नाही असे कबूल करता आणी अशी बेफाम विधाने करता.

एखादी दुर्घटना घडली तर तिची चिकित्सा करायची असते. प्रस्तुत धाग्याचे गांभीर्य ध्यानी घ्यावे. आपल्याला अन्वेषण करायचे नसेल तर कृपया शांत रहावे. शिशाच्या भस्माचे गुणधर्म आयुर्वेदिक ग्रंथात सापडतील.

माझी माहिती ऐकीव असून ती अन्वेषणाच्या कार्यार्थ गोळा केलेली आहे. तिच्यावरून कुणी स्वत: औषधे बनवून, ती खाल्ली तर मी काहीही करू शकत नाही. माझ्या प्रत्येक विधानात अबंधक (डिस्क्लेमर) दिसल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही असं दिसतंय.

२.
>> आणखी एक अज्ञानमूलक वाक्य.

हे वाक्य माझं नसून आयुर्वेदिक ग्रंथातील आहे.

३.
>> जोक्स अपार्ट , भारातातील औषधातून शिश्यावर बंदी यावी म्हणून ऑनलाईन पिटिशन करत येइल का?

कार्बन आणि नायट्रोजनपासून सायनाईड समूहातील जालीम विषे तयार होतात. कार्बन आणि नायट्रोजन नसलेल्या औषधांवर बंदी घालायची का?

एखादा धातू उदा. शिसे विषारी असतांना त्याचे भस्म गुणी कसे असेल, हा प्रश्न मात्र रास्त आहे. त्याची कारणमीमांसा आयुर्वेद तत्ज्ञाकडून माहीत करून घ्यावी.

आ.न.,
-गा.पै.

Pages