मंदीर

Submitted by -शाम on 6 February, 2014 - 08:33

तुम्ही मंदीर बांधताय ?
घ्या , माझेही हजार घ्या

पण बांधताय कुणासाठी
देवासाठी
पुजाऱ्यांसाठी
भक्तांसाठी की भिकाऱ्यांसाठी

की सगळ्यांसाठीच

तसं असेल तर मला किमान आरक्षण हवं

कारण...

तुम्ही देवाचा भाव करणार
मागून...मधून...प्रवेश देणार
जुनेच हार नव्याने विकणार
आणि देव बिच्चारा बघत बसणार
म्हणून

नाहीतर मग

मी माझ्या वाट्याचा देव मागणार
मग तो तुम्ही देऊ नाही शकणार
मग मी चिडून पेट घेणार
मग समदु:खी पेटवणार
मग त्या आगीत राजकीय तेल पडणार
आणि जळून जळून उरलेल्या राखेतून
नवं मंदीर निपजणार

मग तुमचा देव शिळा होणार
हळूहळू खिळखिळा होणार
भक्तीभाव दुबळा होणार
सगळीच अवकळा होणार

मग आमचाच देव
आमचेच हार
नवीन मार्गाने
नवा भ्रष्टाचार

कदाचित नंतर
पुन्हा कुणीतरी पेटेलही

तेंव्हा देव देवाच्याजागी असणार
मंदीर मंदीराच्याजागी असणार

आणि आपला माज जिरवून आपण
गुमान निपचित बसणार

घ्या ! माझेही हजार
तुम्ही मंदीर बांधताय!
_____________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण बांधताय कुणासाठी
देवासाठी
पुजाऱ्यांसाठी
भक्तांसाठी की भिकाऱ्यांसाठी>>>>>>>>>>अप्रतिम

व्वाह!

अप्रतिम!!! जळजळीत वास्तव.
फक्त ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं त्यांनाच न समजणारं एक कटू सत्य!