बालि सहल - भाग ३ - कॉफी ब्रेक व तांबलिंगन लेक

Submitted by दिनेश. on 4 February, 2014 - 15:52

आमच्या पहिल्या दिवशीच्या गप्पांतून विजयला माझ्या आवडीनिवडी कळल्याच होत्या. त्यामूळे आमच्या ठरलेल्या ठिकाणांपेक्षाही आजूबाजूची ठिकाणे त्यांने आम्हाला दाखवली.

आमच्या दुसर्‍या दिवशीच्या टुअरमधे बोटॅनिकल गार्डनला भेट होती. तिथून जरा जवळच असलेल्या लेक ताम्ब्लियनला जाऊ असे त्याने सुचवले. अर्थातच आम्ही तयार होतो. कॉफी ब्रेकला जाऊ या का असे त्याने विचारल्यावर मला वाटले त्याला कॉफी प्यायची आहे. मी अर्थातच होकार दिला.

बालितली पर्यटकांना आवडतील अशी ठिकाणे जरा दूरदूर आहेत. शिवाय रस्तेही गावागावातून जाणारे, त्यामूळे प्रवासात जरा वेळ जातोच. तरी आजूबाजूचा निसर्गच नव्हे तर गावेही बघण्यासारखी आहेत. त्यामू़ळे प्रवासाचा कंटाळा येत नाही.

१) आपल्या विभागातील लोकप्रिय उमेदवार अलाणेफलाणे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा, अश्या टाईपचे
फलक दिसत होते. त्यांच्याकडे मतदान कसे करतात माहीत नाही पण बर्‍याच फलकांवर फोटोच्या छातीत
खिळा ठोकल्यासारखे दाखवले होते. मला राजकारणात अजिबात रस नसल्याने मी विजयला काही विचारले नाही. असे फलक मात्र गावातच होते. गावाबाहेरच्या रस्त्यांवर असे फलक अजिबात नव्हते.

२) भातशेती अखंड दिसत असे.

३) शेतात बैलाचा वापर कमी दिसला. चिखलणी पण हात यंत्रानेच करत होते.

४) रस्त्याची कल्पना यावी, म्हणून हा फोटो. स्कूटर्स व बाईक्स बर्‍याच दिसत पण त्याही शिस्तीने जात असत. पेट्रोल तिथे स्वस्त आहे त्यामूळे नव्याने सुरु झालेली बससेवा अजून लोकप्रिय झालेली दिसत नाही.
बाईक्स भाड्याने मिळायची सोय आहे.

५) रस्त्यावरचे एक दुकान. डाव्याबाजूचे भिंतीवरचे वॉलपीस बघून ठेवा तसेच विकायला असणार्‍या नारळाच्या कोवळ्या पानांचे पण लक्षात असू द्या. मग सविस्तर लिहितो.

६) विजयचा कॉफी ब्रेक म्हणजे खरं तर एक स्पाईस प्लांटेशन होते. अनेक मसाल्यांच्या झाडाची लागवड तिथे होती. बरीच झाडे मी ओळखल्याने तिथला मॅनेजर माझ्याशी फार आदराने बोलू लागला. हे झाडही मी
ओळखले. बघा तूम्हाला ओळख पटतेय का ती ?

७) अर्थात मी ओळखले ते या दूरियान फळावरून. हे फळ एकाचवेळी लोकप्रिय आणि तेवढेच बदनाम आहे.
फणसासारखे दिसत असले तरी चवीला वेगळे असते. आणि त्याचा स्वादच त्याला बदनाम करतो.
याला एक उग्र दर्प येतो. या उग्र दर्पामूळे सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशियातदेखील हे फळ
सार्वजनिक वाहनांतून न्यायला बंदी आहे. हॉटेल रूमवरही नेता येत नाही. पण मला स्वतःला तो दर्प
तेवढा उग्र वाटत नाही. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळी मी हे फळ खातो. बालितही खाल्ले.
ताजे फळ भारतात आणणे शक्य नाही पण याचा तळलेला गर किंवा आटवलेला गर बँकॉक
विमानतळावरदेखील मिळू शकतो. त्याला उग्र दर्प येत नाही. एकदा आवर्जून चाखाच.

८) तिथली कॉफीची फुले.

९) इथेच ती ५०,००० रुपियांची कॉफी प्यायलो. त्याशिवाय इथे इतर अनोखी पेये उपलब्ध होती. पांढरी हळद, लाल आले असे अनेक स्वाद चाखले. ते दिसताहेत तेवढे कप कॉफी आम्ही प्यायलो. तिथे अनेक मसाले
व कॉफी विकायलाही होती. भरपूर खरेदी केली.

१०) हे आहे मँगोस्टीनचे झाड. मला कधीचे बघायचे होते. या फळाचे एकंदर रुप आपल्या रातांब्यासारखेच असते पण झाड मात्र फारच वेगळे. फोटोतली फळे कच्ची आहेत. पिकली कि ती काळी होतात.
आतला गर थेट रातांब्यासारखाच पण चवीला जास्त गोड असतो. याची साल जाड असते आणि तिच्यात काही
औषधी गुणधर्म असतात, ( हे पण रातांब्यासारखेच ) तिचे पेयही आम्ही तिथे प्यायलो.

११ ) तिथले कोकोचे झाड मी केदारला दाखवल्यावर त्या मॅनेजरने स्वतः झाडावर चढून मला ते फळ काढून
दिले. कोकोच्या फळातील गराला व बियांना अजिबात चव नसते. सात दिवस आंबवल्यावरच त्यांना तो
रंग व स्वाद येतो.

१२) आता आम्ही एका डोंगराच्या दिशेने जात होतो.

१३) शेतातील पिकेही बदलली.

१४) शेवटी एकदाचे त्या लेक जवळ पोहोचलो. फोटोत दिसतोय तो प्रचंड वृक्ष माझ्या ओळखीचा नव्हता पण
त्यांच्यासाठी तो पवित्र आहे.

१५) त्या झाडाची गोलाकार पसरलेली मूळे बघून ठेवा. या झाडालाही सरोंग गुंडाळलेले आहे.

१६) तिथली गुलाबी फुले.

१७) रम्य परिसर

१८) पिवळे फूल

१९) सभागृह

२०) आजूबाजूचा विस्तीर्ण मोकळा भाग

२१ ) पशुपतीच्या देवळाचे ( बंद ) प्रवेशद्वार

२२) त्या दारावरील कोरीवकाम

२३ ) हेच ते रम्य तळे. नॅशनल जिओग्राफिकच्या वेबसाईटवर त्यांच्या २०१२ सालच्या फोटोग्राफी स्पर्धेतला
या तळ्याच्या एक अप्रतिम फोटो आहे. अवश्य शोधून बघा.

२४) तळ्यातले शांत पाणी.

२५) या देवळाची शिखरे दगडाची नाहीत तर गवताची आहेत. ते खास आकार गवत रचून केलेले आहेत. ठराविक वर्षांनी ते बदलतात.

२६) देवळाच्या एका बाजूने दिसलेले लाकडावरील अप्रतिम कोरीवकाम. ( तो सोनेरी रंग आहे, सोने नाही. )

२७) सांगितलं ना, तिथून पायच निघत नव्हता. या वाटा मला खुणावत होत्या.

२८ ) केदारची पण तिच अवस्था होती.

२९) देवळांच्या कडेने आम्ही जरा दूरवर गेलोच

३०) पुढेही छानच मोकळा भाग होता..

तेव्हा आपण अजून इथे थोडा वेळ रेंगाळू.. ( पुढच्या भागात अजून काही पाहू )

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश, ते फणसासारखे फळ दुरिअन आहे. असे म्हणतात It taste like heaven but smell like hell! इथे ही सगळी फळे जळी स्थळी दिसतात. दुरिअनचा केक देखील करतात. दुरिअमच्या आकाराचे ऐस्लानेड म्हणून एक भव्य सभागृह सुद्धा आहे इथे. Singapore Esplanade असे गुगल करुन बघा. सुंदर चित्र बघायला मिळेल. दुरिअनचे फळ जेवढे राकट तेवढी कोवळी त्याची पाने आहेत. आतमधला गर मासल असतो. फ्रिजमधे ठेवल की सगळ्या पदार्थांना दुरिअनचा वास चिकटतो. म्हणून, इथे ट्रेन आणि बसेस मधून दुरिअन घेऊन जायला अनुमती नाही आहे.

बाकी चित्र आणि वर्णन दोन्ही सुरेख आहे.

समर्पक आणि चफ़कल शीर्षकांमुळे जास्तच बहारदार होत आहे तुमच्याबरोबरची आमचीही 'सह'ल !

माझ्या बाली सहलीच्या स्मृती मंजुषेतून ……
मी तेथून आणली होती एक दीड फूट उंचीची भगवान बुद्धाची लाकडी कोरीव एकसंध मूर्ती आणि खूप सार्या डीव्हीडीज !

दिनेश, इथली लोक फळ कापून ती विक्रिला ठेवतात. हवेच्या संपर्कात कापलेले फळ आहे की त्याचा गंध हवेत पसरतो. बाजारात हा गंध इतका उग्र येतो की खूप वेळ तो गंध श्वासात गेला की नकोसा वाटतो. घरी एखाद दोन गरे आणून खाल्ली की तो गंध तितका उग्र वाटत नाही.

मी ताजी गर कैकदा खाल्ली आहे. पन्नास सेन्टला एक गर मिळते इथे. कधीकधी दोन सुद्धा देतात.

डॉक्टर, मी पण गणेशाची मूर्ती आणली. मग फोटो टाकतोच.
बी, मी पण मग ताजे कापून घेतले होते. त्याचाही फोटो टाकतो. लहानपणी मालवणच्या एस्टीत पिकलेले फणस, अननस, सुके बांगडे यांचा एकत्र गंध घेऊन माझा बराच वेळेला वकार युनुस व्हायचा... त्यापुढे दूरियानचा गंध काहीच नाही.

दिनेश, मी योग्यकर्त्याच्या बाटिक वर एक लेख लिहित आहे. तुम्ही तिथल्या मुर्त्यांवर एक लेख लिहा. महोगनी लाकडापासून बनवलेल्या. शरदीनी डहाणूकर ह्यांनी महोगनीबद्दल लिहिले आहे. मी सुद्धा माझ्याघरी हत्ती, राईस गॉड, गणपती, बुद्धा अशा अनेक मुर्त्या विकत घेतल्यात. इतक्या छान दिसतात!!!!

दिनेश, फार्फार सुर्रेख आहेत फोटोज..बघतच राहावेसे पुन्हा पुन्हा!!!!!!!!!!!!

आणी वर्णन ही तू किती सुंदर केलंयस..

दु रि अ न ...ईईईई... नो नो नेव्हर नेव्हर !!!!!!!!! Proud

बस ,फ्लाईट, होटेल्स आणी माझ्या घर आंगणात ही आणण्याची बंदी आहे Lol

मँगुस्तिन चं झाड मी ही नव्हतं पाहिलं कधी..

आता ,'बाली' तुझ्याच नजरेने पाहतेय पुन्हा नव्या साक्षात्काराने ... Happy

मस्त Happy

छानच. अगदी घडीघडी प्रेमात पडण्यासारखे ठिकाण आहे. सुरेख फोटोज आणि तपशील.

बाय द वे, मँगोस्टिनबद्दल 'रातांब्यांसारखाच पण जास्त गोड' हा शब्दप्रयोग समजला नाही. रातांबे मुळात आंबटच असतात, मग त्यांच्यापेक्षा गोड असं कसं म्हणता येईल?

नेहमि सारखेच अप्रतिम..दिनेशदा

लहानपणी मालवणच्या एस्टीत पिकलेले फणस, अननस, सुके बांगडे यांचा एकत्र गंध घेऊन माझा बराच वेळेला वकार युनुस व्हायचा. >>:D Lol :

सगळेच प्रचि आणि सर्व वर्णन खूप अप्रतिम!!. प्रचि १६ मधली फुलं आपल्या कांचनाच्या फुलांसरखी आहेत नै!

आभार दोस्तांनो, खरं तर या उद्यानाचा अर्धा भागच पाहिला आहे अजून. दुसरा भाग आज उद्या टाकतोच.
सई, झाडावर पिकलेला म्हणजे झाडावरून गळून पडलेला रातांबा अवश्य चाखून बघ. त्यातला गर गोड लागतो.
बाजारात येतात ते किंवा कोकम करण्यासाठी काढतात ते रातांबे रंगाने लाल असले तरी पिकलेले नसतात.
हे फळ तसेही दोनचार आठवडेच सिझन मधे असते. आपल्याकडे केरळमधे थोडीफार झाडे आहेत.

शांकली ते झाड नव्हते, झुडूपच होते. कांचनापेक्षा बराच वेगळा प्रकार होता तो. बालि एकाचवेळी खुप ओळखीचे वाटते तर त्याचवेळी आपल्यापासून दूरावलेलेही.. तसेच तिथल्या झाडांबद्दल.

बी, त्या मूर्तींचे फोटो पण अवश्य टाक.

अप्रतिम, अप्रतिम. धन्यवाद दिनेशदा.

सई, झाडावर पिकलेले रातांबे गोडूस लागतात. लहानपणी खाल्लेत, आता बरीच वर्षे झाली.

अच्छा, असं आहे का? झाडाखाली गळून पडलेली फळे मी अनेकदा पाहिली आहेत, पण त्या आंबटढॅण चवीच्या आणि वासाच्या कल्पनेने उचलूनही घेतली नाहीत कधी! आता चव घ्यायला हवी एकदा.

मस्त! वाचताना असं आटतय की तुम्ही प्रत्यक्ष हे फोटो दाखवून स्वतः निवेदन करताय! खूप छान . Happy