आमच्यापण कलात्मक जाणिवा!

Submitted by लसावि on 3 February, 2014 - 05:15

तर सध्याचा काळ मोठा बाका आहे. आता हेच पहा ना, हे पहिलेच वाक्य 'तर' ने सुरु करायचे प्रयोजन काय असा प्रश्न काही वर्षापूर्वी आम्हाला आणि लोकांनाही पडला असता आणि आम्ही जरा तर्र असताना लेख लिहिला असावा अशीही समजूत झाली असती. पण आता तसे होत नाही कारण काळाची चाल तिरकी, नागमोडी इ.इ. न राहता पार ब्राउनीअन मोशन झाली आहे. म्हंजे नक्की काय त्याचा आम्ही शोध घेत आहोत पण लेखात काही शास्त्रीय उपमा असणे अनिवार्य आहे असे आमचे अझरबैझानरिटर्न फ्रेंड,फिलॉसॉफर व गाईड अर्थात ददा* यांचे मत आहे.

असो, तर सध्याचा काळ मोठा बाका आहे. नुसते स्वतःचे काम नीट, मन लावून करणे म्हणजे काहीच न करणे हे आता आम्हाला कळू लागले आहे. राजकीय मते असणे आणि पक्षकार्य करणे म्हणजे अधिक काहीतरी असे वाटण्याचाही एक काळ होता जो प्रदिर्घ आजारानंतर अलीकडेच निवर्तला. सामाजिक कार्य करण्याचा काळ मात्र जोरात आहे. त्यातही झोपडपट्टी विकास, प्रार्थमिक शिक्षण, अंध असल्या कामांपेक्षा अल्झायमर्स, ब्रेस्ट कँसर किंवा त्याहूनही दुर्मिळ आणि चमत्कारिक आजारांचा 'अवेअरनेस' वाढवण्याच्या कामात मॅरॅथॉन भरवणे जास्त उच्चीचे आहे. सामाजिक जाणिव आणि राजकीय कार्य यांचा जितका कमी संबंध दाखवता येईल तितके चांगले असाही ग्रह आहेच. 'disinterested service of the people in any sphere ultimately helps the country politically' असे नोटेवरच्या बाबाने कधीकाळी म्हटले होते, पण ते एक असो.

मात्र या सर्वांपेक्षाही महत्वाची जाणिव जी विकसीत झाली नसेल तर तुम्ही माणूसच नव्हे असे आम्हाला सांगण्यात आले आहे ती म्हणजे कलाजाणिव. इतके दिवस आमचा असा समज होता की आमचे वाचन बर्‍यापैकी, म्हणजे चारचौघे वाचतात त्या पुस्तकापेक्षा जरा अधिक आहे. घरात बसून शांतपणे पुस्तक वाचावे, जरा चिंतन, मनन करावे, काही वाटलेच तर आपल्यापुरते खरडावे एवडीच आमच्या कलाजाणिवेची झेप. मनाला भावेल त्याचे संगीत ऐकावे नाही आवडले तर आपल्याला ती 'टेस्ट' नाही म्हणून गप्प बसावे असा आमच्या खाक्या.

पण लेखात सुरुवातीला म्हटले आहे तसे काळाच्या या गडबडगुंड्यात आमच्या या क्वालिटीचे फारसे महत्व उरलेले नाही ह्याची जाणिव तीव्रतेने होऊ लागली. किंबहुना घरात बसून गपचीप आस्वाद घेणेच मुळात उपयोगाचे नाही तर चर्चा रंगवता आली पाहिजे असा क्लॉज निघाला. मग आम्हीही तयारी केली आणि आता वेळप्रसंगी आम्हीही मुराकामी,पामुक,अमुक तमुक अशी नावे फेकून चर्चेचा तोल सांभाळू शकतो (तोल जाण्याचे कारण कितीही वेगळे असूद्या) . सिनेमाच्या बाबतीतही आम्हाला दबंगमधला सलमान कितीही आवडत असला तरी 'तू चिलिअन डायरेक्टर जुलिआन आंद्रादेचा कोल्ड वॉटर इन बकेट पाहिलास का? द सररिअ‍ॅलिझम इटसेल्फ इज सिंबॉलिझम' अशा एका वाक्यात चारपाच जणांना गारद करण्याचे सामर्थ्य आम्ही बाळगून आहोत असा आमचा समज होता.

पण आता इतक्यानेही भागेना कारण तुमची कलाजाणिव सशक्त आहे याचा पुरावा द्यायचा असेल तर तुमचे 'सामाजिकला' जीवन हॅपनिंग हवे असे आम्हाला कळू लागले. म्हणजे तुम्ही समाजात कलाविष्कारांचा आनंद घेताना दिसला पाहिजेत. घरात पुस्तके वाचू नका पण साहित्य 'गोष्ठीं'ना जा, घरात रेडीओही ऐकू नका पण 'कॉन्सर्ट्स'ना दिसा, फिल्म फेस्टीव्हलला तर नक्कीच जा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काही कराल ते लगेच फेसबूकवर टाका.
या नव्या रगाड्यात एक कला जी आम्ही इतके दिवस टाळत आलो तिच्याकडे लक्ष देणे भाग पडले. व्हिजुअल आर्ट्स हा प्रकार आम्ही बरेच दिवस ऐकून होतो; हे म्हणजे केवळ चित्रकला नव्हे अजून बरेच काही असते इ.इ. आता या सामाजिकला हायब्रीडमध्ये पुढे जायचे तर या कलेकडेही लक्ष पुरवणे आले. म्हणून मग आम्ही यावर्षीच्या 'काला घोडा' महोत्सवात हजेरी लावायचे ठरवले. पूर्वतयारीखातर आम्ही १५ दिवस आधीपासूनच 'मी काला घोडाला जाणार आहे, यू नो' हा सूर लाउन धरला. मधूनमधून परदेशातील अशाच कार्यक्रमांची नावे पेरायलाही विसरलो नाही. मात्र अशी भरपूर वातावरणनिर्मीती चालू असताना प्रत्येक वेळी काला घोडा हे शब्द आले की आमच्या मनी 'गजानन, डबल घोडा आण' हेच वाक्य उमटे हे ही खरेच.

अशा रितीने सर्व जामानिमा करुन रवीवारी दुपारी आमची वरात काळ्या घोड्याच्या दारी पोचली. दक्षिण मुंबईचा आह्लाददायक वारा आणि तितकाच कूल क्राऊड बघून आमच्या कॅफेलिओपाल्डभारीत** मेंदूला अंमळ गुंगीच आली. पण अशी व्यवधाने सांभाळण्याची कला आम्हाला आताशा जमते.
एंट्रीलाच एका बाजूला लाकडाचा वापर करुन बनवलेले एक मोठे इन्टलेशन होते, ज्या कलाकाराच्या मार्गदर्शनाखाली ते बनवलेले होते त्याचे नाव खरेच ओळखीचे निघाले म्हणून अधिक उत्सुकतेने ते पाहू लागलो तेवढ्यात एक चौकोनी कुटूंब तेथे प्रकटले आणि त्यातली मुले त्या लाकडी प्लँक्सना धरुन पोझ घेत उभी राहिली आणि त्यांचे उत्साही पालक धपाधप फोटू काढू लागले! लोक इन्टलेशन्सवर चढत होते, दमले तर त्यावर बसत होते आणि हाच प्रकार सर्वच्या सर्व इन्स्टलेशन्सजवळ चाललेला पाहिला. गर्दी प्रचंड होती त्यामुळे कुठलीच कलाकृती लांबून, सर्व बाजूंनी पाहण्याचा प्रश्नच नव्हता, तसा आग्रहही नव्हता पण निदान तो एक कलाविष्कार आहे त्याच्याजवळ पोझ देऊन फोटो काढायला तो सर्कशीतला वाघ अथवा हत्ती नाही इतके तारतम्य तरी असायला हरकत नव्हती. पुन्हा आपल्या पाल्यावर कलाविषयक संस्कार करायला आलेले जागरुक पालक हा नुमुना होताच
प्रत्येक वर्षी ज्या थीम्सवरती इन्स्टेलेश्न्स असतात, जे माध्यम वापरुन ते तयार केले जातात त्यात काही नाविन्य असावे ही अपेक्षाही गैरवाजवी नाही. तेच ते प्लास्टीकच्या बाटल्यांचे पर्यावरण वाचवा संदेश, मोडक्या कार्सवरची पेंटींग्स आणि त्याहूनही त्रासदायक म्हणजे अत्यंत उथळ, बटबटीत 'अ‍ॅट युअर फेस' मेसेज देणारे इन्टलेशन्स.
बाजूच्या स्टॉल्समध्येदेखील ज्याला kitsch म्हणतात अशाच गोष्टींचा बाजार, तो ही जबरदस्त चढ्या किमतीत.तिथेही गर्दी आणि विक्रीही कारण पुन्हा काळा घोडाला गेलो याचे काहीतरी प्रतिक तर हवेच ना. बाहेरच्याच फुटपाथवर त्याच आणि तशाच कलाकृती कमी किमतीत, आमचे डोके तर पार चक्राऊन गेले. सगळे फिरुन झाले, काही आवडले बरेचसे नाही. थोडीफार खरेदीही झाली.

लोक इतक्या प्रचंड संख्येने येतात ही चांगली गोष्ट आहे का याचीच आता शंका येऊ लागली आहे. त्या गर्दीतले बरेचसे आमच्यासारखेच, 'मी काळा घोड्याला गेलो' हे सांगण्यासाठी आलेले. पण मग असेही वाटते की हरकत काय आहे? इथे जाणे, मी तिथे गेलो हे सांगणे लोकांना महत्वाचे वाटते हे देखील महत्वाचे नाही का? पण अशा गर्दीच्या अस्तित्वाने जे सादर केले जाते आहे त्याची समीक्षा गंभीरपणे होते का? की त्याची गरजच नाही, तो उद्देशच नाही? अशा महोत्सवातून आपण लोकांना कला कशी बघायची हे शिकवण्याचा काही प्रयत्न होणार आहे की हा सगळाच प्रकार, दर्शक आणि कलाकारही केवळ एक स्टेट्स सिंबल म्हणून घेत आहेत?

काळा घोडा एक निमीत्त आहे पण आपल्या सर्वांच्या कलास्वादाच्या पद्धतीचीच समीक्षा होण्याची गरज निर्माण झाली आहे.
अर्थात यावर फार खोलात न जाता हा तथाकथित गंभीर विचारही फेसबुकात कसा टाकायचा याचाच विचार आम्ही करीत आहोत.

तळटीपा-
* हा टायपो नव्हे आम्हाला ददा च लिहायचे आहे, दादा नव्हे, ते खरेतर the दा असे आहे.
** आम्ही किती खुबीने आमची आवड प्रकट केली आहे ते चाणाक्ष ओळखतीलच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळ्या घोड्या बद्दल मी जाहीर निषेध नोंदवत आहे ....... Happy

घोडा काळाच का पांढरा, चॉकलेटी इतर रंग का नाही..... ? हा वर्ण भेद आहे ......

असे म्हणुन मी माझे दोन शब्द संपवतो..

धन्यवाद

पटलं!

भपकेपणा वाढतोय हे खरेय पण त्यातही एखादाच का होईना जाणिवेनं समृध्द, प्रगल्भ होत नसेल कशावरून? राहता राहीले शिकवायचे वगैरे तर मला नाही वाटत काही गरज आहे म्हणून. पण आपण मास्तर आहात तर कदाचित काही अजून वेगळे सांगू शकाल असे वाटते.

>>>> लोक इतक्या प्रचंड संख्येने येतात ही चांगली गोष्ट आहे का याचीच आता शंका येऊ लागली आहे. त्या गर्दीतले बरेचसे आमच्यासारखेच, 'मी काळा घोड्याला गेलो' हे सांगण्यासाठी आलेले. पण मग असेही वाटते की हरकत काय आहे? इथे जाणे, मी तिथे गेलो हे सांगणे लोकांना महत्वाचे वाटते हे देखील महत्वाचे नाही का? पण अशा गर्दीच्या अस्तित्वाने जे सादर केले जाते आहे त्याची समीक्षा गंभीरपणे होते का? की त्याची गरजच नाही, तो उद्देशच नाही? अशा महोत्सवातून आपण लोकांना कला कशी बघायची हे शिकवण्याचा काही प्रयत्न होणार आहे की हा सगळाच प्रकार, दर्शक आणि कलाकारही केवळ एक स्टेट्स सिंबल म्हणून घेत आहेत? <<<<<

त्याहुन जास्त सन्ख्येने अशाच प्रकारे लोक काशीला/देवदर्शनाला जातात (हल्ली पन्ढरपुरच्या वारीलाही जातात) असे आमचे मत आहे. अशाप्रकारे देवदर्शनाला जाणारे अन कालाघोडाला जाणारे यात बरेच साम्य असावे असे वाटते आहे. तुमचे काय मत?

अशा महोत्सवातून आपण लोकांना कला कशी बघायची हे शिकवण्याचा काही प्रयत्न होणार आहे की हा सगळाच प्रकार, दर्शक आणि कलाकारही केवळ एक स्टेट्स सिंबल म्हणून घेत आहेत?>> +१
यात आयोजकांनाही गणणे.
हे फेस्ट झाल्यावर त्या कलाकृती कुठे आणि कश्याप्रकारे ठेवल्या जातात त्याबद्दल काही बोलायचे नाही.

लेख अगदी जमला आहे. आजकाल विचारवंतांचे लेख असेच असतात असं एक फुटकळ वाचक म्हणून आमचं निरिक्षण आहे. सार्काझम, थोडा स्वतःचा ढोल, थोडी दुसर्‍याची खाल आणि समाजावर भाष्य. पर्रफेक्ट Happy

रच्याकने, मक्डॉनल्डस् किंवा तत्सम ठिकाणी खा-प्या, मॉलमध्ये गेम्स खेळा आणि तत्सम गोष्टी करण्यापेक्षा आई-वडिलांच्या हौसेखातर का होइना अशा ठिकाणी गेलेलं बरंच आहे की मुलांसाठी.

लेख अगदी जमला आहे. आजकाल विचारवंतांचे लेख असेच असतात असं एक फुटकळ वाचक म्हणून आमचं निरिक्षण आहे. सार्काझम, थोडा स्वतःचा ढोल, थोडी दुसर्‍याची खाल आणि समाजावर भाष्य. पर्रफेक्ट >> +१

आमच्या मनात हा लेख वाचून ज्या काळी वसंतोत्सव नगरां-नगरांमधून वाजत गाजत, मिरवणुका काढून साजरा व्हायचा त्या काळी फेसबुक असते तर लोकांनी काय स्टेटस अपडेट्स टाकले असते, कोणते फोटू काढले असते आणि काय ट्वीट्स केले असते ह्याचा एक आगंतुक विचार उगाच कावकाव करून गेला! Proud

ब्रेस्ट कँन्सर हा दुर्मिळ आजार नसावा (माझ्यामते) आकडे चेक करायला हवेत.
तसेच मॅरेथोन भरवणे हे देखील चांगलेच आहे, यातून फिजिकल फीट राहायचा अवेरनेसही वाढतो तसेच विविध प्रकारची एकात्मताही जोपासली जाते.

कालाघोडा फेस्टिवलबद्दल आजवर ऐकून आहे पण दक्षिण मुंबईकर (माझगावकर) असूनही कधी जाण्याचा योग नाही आला, कारण जे ऐकून आहे ते असेच नकारात्मक ऐकून आहे म्हणून कश्याला त्या अरसिक गर्दीचा एक हिस्सा बना या कारणाने जाणे झाले नाही.

मलाही सिंडीचा प्रतिसादच पटला. हल्ली नुसतं फेसबुकच नव्हे, पण मायबोलीवर ही फोटो टाकता यावेत, लिहिता यावं म्हणून लोकं असं काही काही अटेंड करत असावेत असं वाटायलाही वाव आहेच.
(कोणत्याही कारणाने का होईना पण लोकं मॅरेथॉन पळतायत हे महत्वाचं. )

आगाउ, सिंडे Lol

सिंडे तू दिलेल्या ब्लॉग लिस्टमधल्या पहिल्या ब्लॉग मुळे हे अंतिम ज्ञान प्राप्त झाले का ? Wink

प्रार्थमिक
आपल्या पाल्यावर कलाविषयक संस्कार करायला आलेले जागरुक पालक
<<
ही दोन वेचलेली मौक्तिके. Happy
पैकी प्रार्थमिक लै भारी.

आगाऊ यांचेकडून आलेला लेख पाहिल्यावर उंचावलेल्या अपेक्षा जरा साडेतीन इंच कमी उंचीवरच अपूर्ण राहिल्यासारखे वाटले..

भन्नाट! जबरी लिहीले आहे Happy

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काही कराल ते लगेच फेसबूकवर टाका.>>> Lol हे सर्वात आवडले.

एक आशावादी दृष्टीकोन म्हणजे दोन तीन वेळा असे जाऊन मग फेसबुकवर ही असे फोटो खूप टाकून झाल्यावर, मग सुरूवातीचा भोज्ज्याला शिवणे प्रकार ओसरला की मग तरी लोक हे नक्की काय आहे, त्यातून काय सांगायचे आहे ई विचार करतील Happy

आवडला....
तर फेसबुकवर "अरे काय फालतू पेपर काय वाचतो .... जरा आगाऊचा लेख वाच, मग कळेल, लेख लिहिणे म्हणजे काय!" असे मित्राला सुनावले. Happy

आगावा, लेख मस्त आणि पटलाच. काघोला शनिवारीच गेले होते आणि ताज्या दमाने वैतागले.

>>> तेच ते प्लास्टीकच्या बाटल्यांचे पर्यावरण वाचवा संदेश, मोडक्या कार्सवरची पेंटींग्स आणि त्याहूनही त्रासदायक म्हणजे अत्यंत उथळ, बटबटीत 'अ‍ॅट युअर फेस' मेसेज देणारे इन्टलेशन्स.
बाजूच्या स्टॉल्समध्येदेखील ज्याला kitsch म्हणतात अशाच गोष्टींचा बाजार, तो ही जबरदस्त चढ्या किमतीत. >> खरंच.

>>>> लोक इन्टलेशन्सवर चढत होते, दमले तर त्यावर बसत होते आणि हाच प्रकार सर्वच्या सर्व इन्स्टलेशन्सजवळ चाललेला पाहिला. गर्दी प्रचंड होती त्यामुळे कुठलीच कलाकृती लांबून, सर्व बाजूंनी पाहण्याचा प्रश्नच नव्हता, तसा आग्रहही नव्हता पण निदान तो एक कलाविष्कार आहे त्याच्याजवळ पोझ देऊन फोटो काढायला तो सर्कशीतला वाघ अथवा हत्ती नाही इतके तारतम्य तरी असायला हरकत नव्हती. >>>>> अगदी अगदी. बैल, घोडा, सिंह वगैरे आवडली होती पण त्यांचे फोटो काढायचे तर फोटो केवळ चार पायांचे प्राणी न येता बरेच दोन पायांचे प्राणीही फोटोत येत होते. तरीही चपळाई करून मी काही फोटो मिळवले.

लेख खुपच आवडला. आणि पटला देखिल.

आमच्या कॉलेजपासुन दहा मिनिटावरच काला घोडा उत्सव असतो. पण कधी जावेसे वाटले नाही. गर्दी फारशी मानवतच नाही. त्यातुन विद्यार्थ्यांचा उत्साह उतु जात असतो. त्याबाबतीतला त्यांचा वक्तशीर काटेकोरपणा वाखाणण्यासारखा असतो. कुठल्याही उत्सवाला आपला विरोध नाही पण त्यासाठी सरसकट लेक्चरला दांड्या मारण्याचे जे प्रकार सुरु होतात त्याने मस्तकात तिडीक जाते. त्यामुळे या उत्सवांबाबत मला मुळातच कंटाळा आहे.

मात्र अशा ठीकाणी जाताना ती विशिष्ठ प्रकारची व्होकॅब्युलरी तयार पाहिजे नाही तर तुम्ही काय इंप्रेशन मारणार कपाळ? जर तुमच्या कडे फेमिनिस्ट शब्दभांडार तयार असेल तर तुम्ही कुणालाही हार जाणार नाही याची खात्री बाळगा.

आमच्याकडे मुंबईबाहेरुन येणार्‍या उच्चभ्रु वर्गातील विद्यर्थीनी येथे घर शोधण्याआधी कॅफे लिओपोल्ड या तीर्थेक्षेत्री जाऊन कृतार्थ होतात असे मला नेहेमी वाटते. इतके काला घोडा, कॅफे लिओपोल्ड (कसाबच्या कृपेने जास्तच)या सार्‍यांचे आता माहात्म्य वाढले आहे.

त्यातुन आमचे मित्रवर्य यावेळी काला घोडा येथे आपले नाटक सादर करणार आहेत. काला घोडा संपेल पण यांचा घोडा अश्वमेधासाठी बाहेर पडणार आहे. कोणे एके काळी शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धान्त, सांख्य तत्वज्ञान, प्रकृती, पुरुष आणि समाजशास्त्रीय तथ्ये यांच्यावर संशोधनात्मक काम करण्याची उमेद बाळगणारा हा माणुस गाइडने जरासे घाबरवताच मुंबई लोकल गाड्यांवर संशोधन करु लागला. आणि आता काला घोडा... खैर. मास्तरकी माझ्या हाडातच मुरली आहे. संशोधन सोडुन हे भीकधंदे करणारी माणसे माझ्या मनातुन उतरतात हे बाकी खरे. कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यांना तो हक्क आहे हे ही खरेच.

मला आवडला लेख.
ते फेसबुक अपडेट्स म्हणजे भारीच प्रकरण! प्रत्येक गोष्ट कशी काय लिहू शकतात लोकं काय माहित? किंवा इतरही ठिकाणी.

व्यक्त होणं ही गरज माणली तरी त्याचा इतरांना त्रास होतोय हे बर्‍याच फेसबुकीपंडितांना कळत नाही. तसेच काही मायबोलीचे पण आहे म्हणा. Happy

>>>> त्याहुन जास्त सन्ख्येने अशाच प्रकारे लोक काशीला/देवदर्शनाला जातात (हल्ली पन्ढरपुरच्या वारीलाही जातात) असे आमचे मत आहे. अशाप्रकारे देवदर्शनाला जाणारे अन कालाघोडाला जाणारे यात बरेच साम्य असावे असे वाटते आहे. तुमचे काय मत? <<<<<
यावर उत्तर द्याकी गुरुजी.

शिवाय एखाद्या ठिकाणचे माहात्म्य वाढू लागले तर आपल्या पोटात दुखवुन का घ्यायचे, अन दुखले तर उपाय काय हे देखिल सान्गा राव.
काये ना की त्या देवादिकान्च्या/सिद्धिविनायक/शिर्डी वगैरे देव/बुवा/बाया वगैरेन्चे माहात्म्य वाढल्यावर गर्दी झाल्यावर अन्निसकृपेने त्यास नाके मुरडणारे हल्ली हल्ली असन्ख्य बघतो आहे, पण कलेच्या प्रान्तात, पूर्ण भौतिक बाबीत, अगदी चितळे वा म्याकडोनाल्ड दुकानदारीचेही माहात्म्य वाढले तर काय बिघडते हे देखिल जरा उलगडून सान्गा राव... नै, देवादिकान्चे माहात्म्य वाढले तर काहीतरी गहन गम्भिर संकट ओढवते व ते टाळण्याकरता जादुटोणादिक कायदे आणले जातात ते कळलय, पण आता कालाघोडाकरताही तसाच काही कायदा आणावा काय यावरही मार्गदर्शन करा ना राव! Wink

Pages